थोडा है थोडे की जरुरत है @ 20.02.24

अभी जो है….

एका डोंगरी किल्ल्याच्या कड्यावर ती शांतपणे बसलेली असते. समोर विस्तिर्ण पसरलेला भुभाग, त्याच्या पुढे त्याहीपेक्षा जास्त मोठ्या आकाराचे जंगल त्यानंतर क्षितीजावर अस्ताला जाणारे सूर्यबिंब. त्या सूर्यास्ताच्या वेळी साऱ्या भुभागावर पसरलेले गडद केशरी रंगाचे आवरण समोरच्या निसर्ग सौंदर्यात मोठी भर घालत होते. सायंकाळची अशी कातरवेळ मनाला हुरहुर तर लावतेच परंतू दिवसभर धावून धावून थकलेल्या मनाला शांत देखील करते. अशी ती शांत बसून तो अप्रतिम सूर्यास्त बघत असतानाच तो धावत धावत येतो तिचा हात धरून तिला उठवतो. तो तिला म्हणतो, चल चल पटकन चल, तिकडे किल्ल्याच्या आतमधे लाईट ॲन्ड साऊंड शो सुरु होतो आहे. मी तिकिटे काढली आहेत. पटकन चल. तो शो मीस नको व्हायला. सूर्यास्ताच्या त्या विलोभनीय दृष्य विलक्षण भारावलेली ती, अलगद त्याचा हात सोडवते त्याला म्हणते, तो लाईट ॲन्ड साऊंड शो बघायला गेली तर हे समोर दिसतेय ते सुंदर दृष्य मी गमावेन त्यामुळे मी येथेच बसणार. अचानक तो देखील समोर बघतो त्या दृष्याने भारावून तिच्याजवळ बसतो. तरी त्याचे त्या शो कडे धाव घेणारे मन त्याला स्वस्थ बसू देत नाही. तो तिला विचारतो, येथे बसुया परंतू जर तो लाईट ॲन्ड साऊंड शो खूप सुंदर असला तरया प्रश्नावर ती जे उत्तर देते ना ते खरे तर जीवनाचे सार आहे

जीवन जगताना आपल्याला जगण्याचा वेग कधी मिळाला त्या वेगासोबत आपण कधी सुसाट निघालो हे आपल्याला कळतच नाही. जसे एरवी आपण रस्त्याने जाताना सुसाट वेगात आपल्या बाजूने गाडी गेली तर आपल्याला तो वेग फारच जास्त वाटतो. खरे तर ती गाडी ६० कि.मी. प्रती तास याच वेगानेच गेली असते. पण आपल्याला तो वेग फारच जास्त वाटतो. पण जर आपण गाडीत बसून गाडी चालवत असू तर सहजच १०० कि.मी. प्रती तास गाडी चालविली जाते तो वेग फार जाणवत नाही कारण त्या वेगाची आपल्या शरीराला मनाला सवय झालेली असते. असेच जीवनाच्या धावण्याचे असते. त्याची सवय होते त्यामुळे कमी वेळात काय काय साधता येईल या धडपडीत आपण असतो. त्यामुळे आणखी छान, आणखी छानच्या मागे आपण धावत असतो. म्हणूनच लाईट ॲन्ड साऊंड शो जर खूप सुंदर असला मिस झाला तर काय? असे त्याने विचारल्यावर तिने जे उत्तर दिले ते या जीवनाच्या धावपळीच्या पार्श्वभूमीवर फार महत्वाचे आहे

ती म्हणते, बनी, तो लाईट ॲन्ड साऊंड शो सुंदरच असणार परंतू तो बघायला गेलो तर हा समोर दिसतोय तो सुंदर देखावा ही वेळ मीस होईल त्याचे काय? जीवनात एखादी सुंदर गोष्ट अनुभवताना दुसरी कोणतीतरी सुंदर गोष्ट मीस होणारच. आपण सारेच अनुभवू शकत नाही. सध्याची ही अतुलनीय सांयकाळ, जी आपण अनुभवतो आहे ती महत्वाची आहे. आता जे अनुभवतो आहे ते महत्वाचे आहे. जी मीस होतेय ते होऊ दे. काहीना काही, कधी ना कधी मीस होणारच. जे मिळतेय त्याचा आनंद घेण्याचा विचार कर. केवळ एका मिनीटात ती त्याला जीवन जगण्याचे एक अत्यंत सकारात्मक सूत्र सांगते. सोबतची बॅग बाजूला ठेवून तो तिच्याजवळ बसतो त्यानंतर काहीही बोलता, शांतपणे तिच्या सोबत तो अद्वितीय सुर्यास्त अनुभवतो. जरा वेळाने एकच शब्द उच्चारतोवा!!

बदलत्या आधुनिक काळात तर हेच सूत्र जास्त उपयोगी ठरतेय कारण आता आपल्याला अनेक ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे हे करु की ते, हे बघू की ते असा आपला गोंधळ उडालेला असतो. एका छोट्याश्या आयुष्यात आपण सारेच साधू शकणार नाहीच. त्यामुळे सध्याच्या क्षणाला जे सुंदर काही अनुभवतो आहे ते मनाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचवूया, त्याचा संपुर्ण आनंद घेऊया त्याचे खरे सुख अनुभवूया. या आनंदयात्रेच्या प्रवासात इतर काही मीस झाले याचे दुःख करत बसण्यापेक्षा, सध्या जे मिळते आहे त्याचे सुख अनुभवणे हेच आनंदी समाधानी जीवनाचे प्रतीक आहे.. होय ना?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18