थोडा है थोडे की जरुरत है @ 27.02.23

बाबांचा पगार झाला नाही

आर्थिक नियोजन ही बाब सध्याच्या काळात एवढी महत्वाची आहे की त्याची सवय आपल्या मुलांना फार लवकर लावणे ही काळाची गरज आहे असेच म्हणावे लागेल. आपल्याला मिळणारा पैसा योग्य रीतीने जपून कसा वापरायचा याचे प्रशिक्षण मुलांना देणे फार गरजेचे आहे. काही पालकांचा या बाबत जरा वेगळा दृष्टीकोन असतो. वरकरणी भावनिकदृष्ट्या ते योग्य वाटत असले तरी देखील त्याचे दूरगामी परीणाम फार योग्य नसतात. काही पालकांचे म्हणणे असते की त्यांच्या लहानपणी त्यांना आर्थिक सबळता नव्हती त्यामुळे फार गरीबीत दिवस काढावे लागले. परंतू आता सुदैवाने परीस्थिती सुधारल्यामुळे मी जे भोगले ते माझ्या मुलांना भोगण्याची पाळी यायला नको. म्हणून दर महिन्याला हजारो रुपये वापरण्याची क्षमता असलेले क्रेडीट कार्ड त्यांनी मुला मुलींना दिलेले असते. क्रेडीट कार्ड वापरून फटाफट खरेदी करताना त्या तरुण मुलाला किंवा मुलीला त्या पैश्याचे मोल कळलेले नसते परीणामतः त्यांना अडचण म्हणजे काय किंवा एखाद्या गोष्टीकरीता वाट बघणे म्हणजे काय हे कळतच नसते. परंतू या तरुण मुला-मुलींच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यांना एक वाक्य ऐकणे गरजेचे आहे, ते म्हणजे, बाबांचा पगार झाला नाही. आपल्या घराच्या आर्थिक व्यवस्थापनामधे असाही काळ असतो ज्यावेळी आपल्याकडे पैसे नसतात त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षांना त्या काळात मुरड घालावी लागते हे मुलांना योग्य वयातच कळणे गरजेचे आहे. तेव्हाच त्यांना पैश्याचे मोल कळू शकते त्यासोबतच माझा पैसा मी सांभाळून वापरायला हवा हे देखील चांगलेच कळते. याचा एक लक्षात राहणारा अनुभव मला माझ्या मुलांच्या बाबतीत आला.

माझी मुलगी काही वर्षांपासून पुण्याला शिक्षण घेण्याकरीता रहात असल्याने तिला महिन्यातून दोन वेळा पैसे पाठविले जातात. १५ दिवसाचा खर्च तिने दिलेल्या रकमेमधे करायचा. १४ तारखेला सर्व हिशोब मला पाठवायचा म्हणजे १५ तारखेला सकाळी रकमेचा दुसरा हफ्ता तिला पाठविला जातो. मित्र मैत्रीणींसोबत जेवायला जाताना, किंवा सिनेमा बघायला जाताना ते सर्व आपापले पैसे खर्च करतात तो हिशोब चोख ठेवला जातो. यामधे अगदी चहाचे दहा रुपये देखील आठवणीने मागितले किंवा दिले जातात. परंतू गंमत तेव्हा झाली जेव्हा मुलीपाठोपाठ आता माझा मुलगा देखील शिकायला पुण्याला गेला. त्याच्याकरीता देखील खर्चाची तशीच व्यवस्था मी लावून दिली. पण माझ्या मुलीपुढे एक मोठा पेच एका प्रसंगात निर्माण झाला. माझा मुलगा शिकायला गेला तेव्हाची सुरुवातीचीच ही गोष्ट. एका रविवारी या दोघा भावा बहिणीने भेटायचे ठरविले एका कॅफेमधे सायंकाळचे जेवण सोबत घेण्याचे ठरले. माझ्या मुलीचा मला फोन आला आणि त्यांचा असा प्लॅन झाला आहे वगैरे बोलणे झाले. परंतू ती आणखी काहीतरी बोलू इच्छिते असे मला जाणविले. माझा तिच्यासोबत मोकळा संवाद असल्याने तिला मी काय सांगायचेय असे विचारले. तेव्हा जरासे अडखळतच तिने मला विचारले की बाबा, आज आता आज आम्ही दोघे भाऊ बहिण सोबत जेवायला जाणार आहोत. आजच्या जेवणाचे बील त्याची ताई म्हणून मी द्यायला हवे ना? खरे तर तिला विचारायचे होते की काय करु? कारण तिच्या मनात महिन्यातील राहीलेले दिवस उरलेले पैसे याचे गणित सुरु होते. मला फार गंमत वाटली. त्या दिवशीपुरता तिच्या मनातला तो तिढा मी पटकन सोडविला. तिला मी सांगितले की आज तुम्ही दोघांनीही काहीच खर्च करायचा नाही. तुम्ही दोघेच आम्हा सर्वांव्यतिरीक्त वेगळ्या गावात पहिल्यांदाच भेटताय त्यामुळे आजचे तुमचे जेवण मी प्रायोजित करतोय. पण त्यासोबतच मी तिला हे देखील सांगितले की यापुढे तुम्ही जेव्हा भेटाल एकत्रित काही खर्च करणार असाल तर तुझा खर्च तू करायचास त्याचा खर्च तो करेल. दोघांनीही आपापला खर्च करायचा आपापला वेगवेगळा हिशोब ठेवायचा. सोबतच नेहेमी नेहेमी मी तुमचा जेवणाचा खर्च प्रायोजित करणार नाही कारण कधी कधी माझा पगार झालेला नसतो हे लक्षात ठेवायचे. आनंद हा आहे की दोन्हीही मुलांच्या हे आता लक्षात आहे राहील.

घराच्या आर्थिक नियोजनात मुलांना सहभागी करून घेणे, त्यांना काही बाबतीत नाही म्हणणे, काही गोष्टींकरीता वाट बघायला लावणे, बाबांचा झालेला पगार त्यांच्यापासून लपविणे या सर्व बाबी मुद्दाम ठरवून करणे गरजेचे आहे म्हणजे घरात प्रामाणिकपणे येणाऱ्या पैश्याचे त्यांच्या मनात मुल्य वाढते ते वाढलेले मुल्य जबाबदारीची देखील छान जाणिव करून देते. म्हणून बाबांचा किंवा आईचा पगार झाला नाही हे मोकळेपणाने सांगावे.




Comments

  1. अगदी योग्य आणी आवश्यक सलाह

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23