थोडा है थोडे की जरुरत है @ 10.10.23
म्हणून तो महानायक…
४२ वर्षांआधीची गोष्ट मला आठवली. दिवस होता २२ मे १९८१. त्या काळी आम्ही तिवसा नावाच्या गावाला रहायचो. परंतू उन्हाळ्याच्या सुटीत एखादा महिना अमरावतीला आजोबांकडे यायचो. उन्हाळ्यात आजोबांकडे, मामाकडे जाण्याचा तो काळ होता. समर क्लासेस नावाची उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद हिरावणारी व्यवस्था उदयास यायची होती. १९८१ च्या उन्हाळ्यात देखील आम्ही सारी भावंडे एकत्रित जमलो होतो. २१ मे ला रात्री आम्ही सारे उद्या सकाळी लवकर उठायचे आहे या विचारात लवकरच झोपी गेलो. २२ मे ला सकाळी पाच वाजता उठून, भरभर तयार होऊन आमच्या एका आवडत्या मामासोबत आम्ही कुठल्या मंदिरात दर्शनाला नाही तर, अमरावतीच्या राजकमल टॉकीजमधे पोहोचलो. बघतो तर काय, तेथे प्रचंड गर्दी आधीच झालेली. त्या काळी सिनेमाची ऑनलाइन तिकीट वगैरे प्रकार नव्हता. त्या तिकीटघराच्या छोट्याश्या खिडकीत जबरदस्तीने हात घुसवत तिकीटे काढायची. तिकिट मिळाले पाहीजे याची चिंता आम्हाला लागली कारण गर्दी प्रचंड होती. आम्हा तिघा भावंडांना एका बाजूला उभे ठेऊन मामा रांगेत लागला. बाल्कनी व फर्स्ट क्लास ची तिकिटे संपली असे तिकीटघरातला माणूस ओरडला. आमचा मामा तेथे पोहोचेपर्यंत सेकंड क्लासची तिकीटे देखील संपली होती. त्याने शेवटी थर्ड क्लासची तिकीटे काढली. तिकीटे मिळाली हा आम्हाला आनंद होता. थिएटरच्या आतमधे आम्ही प्रवेश केला तर जबरदस्त वातावरण होते. आमची बसण्याची रांग पडद्यापासून पाचवी होती. त्यामुळे मान वर करून सिनेमा बघावा लागणार होता. आतमधे अक्षरशः कोलाहल सुरु होता. त्या दिवशी तिकीट मिळवून थिएटरमधे प्रवेश मिळणे ही तेथे बसलेल्या प्रत्येकाची मोठी उपलब्धी होती कारण बाहेर हाऊसफुल चा बोर्ड लागला होता व अनेकांना तिकीट न मिळाल्यामुळे घरी परत जावे लागले होते. त्यामुळे जे तिकीट घेऊन आतमधे आले त्यांना तर युद्ध जिंकल्यागत वाटत होते. त्या कोलाहलामधेच पडद्यावर चित्रपट सुरु झाला. कोलाहल जरा शांत झाला. काही वेळाने एका सिनमधे एक माणूस समोर उभ्या असलेल्या एका तरुणाला रजीस्टरवर वडीलांचे नाव लिहायला सांगतो आणि तो तरुण म्हणतो, काम अपुन करनेवाला है तो फिर बाप का नाम किसलीये? यावर तो माणूस विचारतो इतना अकडके बात क्यों करता है… या क्षणी त्या तरुणाचा चेहेरा पडद्यावर आला.. व त्याचे वाक्य… ये अपुनका स्टाईल है…. अचानक संपुर्ण थिएटर टाळ्या व शिट्ट्यांच्या आवाजाने दणाणून गेले… लोक खुर्च्यांवर उभे राहून गळ्यातले गमछे फिरवून फिरवून ओरडायला लागले कारण पडद्यावर एंट्री झाली होती द ग्रेट अमिताभ बच्चनची. ४२ वर्षांपूर्वी अमिताभच्या लावारीस नावाच्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो बघून मला जी धन्यता लाभली होती ती आजही मी तशीच्या तशी अनुभवू शकतो. १९६५ ते १९८० या काळात जन्मलेल्या प्रत्येकाच्या मनात अश्या प्रकारची एखादी तरी स्मृती असते जी आजही दील खुश करणारी असते. एवढा जबरदस्त प्रभाव अमिताभचा भारतीय जनमानसावर आहे. आज ४२ वर्षांनंतरही हा माणूस टिव्ही वरच्या एका शो मधे असाच चालत एंट्री घेतो व तेथे उपस्थित अनेक व टीव्ही बघणारे हजारो अजूनही आनंदित होतात व तो अजुनही तश्याच प्रकारे आनंद देतो. गेली अनेक वर्षे आपल्या प्रचंड मेहनतीने अनेकांच्या ह्रदयावर राज्य करतो म्हणून तो महानायक आहे का? नाही…
यशाच्या शिखरावर असताना घेतल्या गेलेल्या त्याच्या एका मुलाखतीचा अंश नुकताच ऐकण्यात आला. त्यामधे तो जे बोलला त्यामुळे त्याच्या महानायक असण्याचे रहस्य उलगडले. त्याला मुलाखतकर्त्याने विचारले, पुढच्या जन्मी तुम्हाला काय व्हायला आवडेल. तो लगेच म्हणाला.. अमिताभ बच्चन. मला अमिताभ बच्चनच व्हायला आवडेल.. परंतू मला जे यश मिळाले, जे नाव मिळाले, सुपरस्टार ही उपाधी मिळाली, पैसा मिळाला, मी सबंध भारतात प्रसिद्ध आहे या साऱ्या गोष्टींकरीता नाही… तर मला पुढच्या जन्मी अमिताभ बच्चनच व्हायचे आहे कारण मला माझ्याच आई वडीलांच्या पोटी जन्म घ्यायचा आहे म्हणून…
म्हणून अमिताभ बच्चन महानायक आहे व कायम राहील… आभाळाला भिडणारे त्याचे व्यक्तिमत्व असले तरी जमिनीला घट्ट धरून ठेवणारी नम्रता त्याला कायम मोठेच बनवित राहते. म्हणूनच अत्यंत प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यावरही त्याने नम्रतेने सांगितले की, मला अजुनही काम करायचे आहे. वयाच्या ८१ व्यावर्षी देखील काम करण्याचे व ते देखील प्रभावीपणे करण्याची जिद्द जोपासणाऱ्या खऱ्या खुऱ्या महानायकाला, आपल्या सर्वांच्या आवडत्या अमिताभ बच्चनला उद्याच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!
मोहरिल सर, लेख खासच. त्या काळातील थर्ड क्लासच्या असुविधेतील आनंदाची आठवण करून देणारा. हा सिनेमा 'लावारिस' होता, हे सांगणे न लगे. अमिताभ इतकं मोठं होणं आणि ते मोठपण जपता येणं, हे येऱ्यागबाळ्याचे काम नोहे. लेख आवडला. Thanks.
ReplyDeleteHBD shahanshah
ReplyDelete🙏सुंदर
ReplyDelete