थोडा है थोडे की जरुरत है 31.10.23
फोन नंबर
अत्यंत जवळचे असलेले व खरा खुरा आधार देणारे माझे एक काका व अमरावती शहरातील ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. रमेश गोडबोले यांचे अत्यंत दुर्दैवी निधन झाले. काकांचा माझ्या परीवाराला जसा आधार होता तसाच अमरावती शहरातील अनेक परीवारांना होता. अनेकांना त्यांनी जिवनदान दिले आहे. अनेकांची आयुष्ये सावरली. असे आम्हा सर्वांचे आधार असलेले काका अचानक अल्पशा आजारामुळे सोडून गेले. काकांना श्रद्धांजली देण्याकरीता अमरावती शहरातील विविध संस्थांनी मिळून एका मोठ्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेकरीता काकांच्या जीवनावर एक चित्रफित बनविण्याची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. काकांच्या बहुआयामी कार्याचा आढावा घेणारी ती चित्रफीत मी तयार केली. परंतू नेमके श्रद्धांजली सभेच्या दिवशी एका महत्वाच्या कामानिमित्त परगावी गेल्यामुळे मी त्या सभेला उपस्थित राहू शकलो नाही. माझ्या अनुपस्थितीतच ती चित्रफीत तेथे दाखविण्यात आली. मी रात्री परतलो तेव्हा बऱ्याच मित्र मंडळींचे फोन आले. चित्रफित योग्य पद्धतीने बनविल्या गेली व त्यामधे काकांच्या जीवनाचा आलेख फार चांगल्या शब्दांमधे व परीणामकारकतेने मांडल्या गेला आहे अश्या प्रतिक्रीया देखील मला मिळाल्या. काकांप्रती मी अर्पण केलेली ती श्रद्धांजली होती. काही मित्र मैत्रीणींनी याला चांगले म्हणवत नाहीये परंतू परीणामकारक होते असे सांगितले. कारण काकांच्या जाण्याचा वियोग मोठा होता, तो अजूनही आहे. हे सारे त्या दिवशी घडत गेले. ती चित्रफीत माझ्या युट्युब चॅनलवर असल्याने मी त्याची लिंक सर्वांना पाठविली. ती बघून व्हॉट्स ॲपवर खूप सारे मेसेज मला आले. अनेकांनी फोन करून गोडबोले काकांचे त्यांच्या आयुष्यात किती मोठे स्थान होते हे सांगितले. परंतू मला काही क्षण संभ्रमात टाकणारा एक प्रसंग दुसऱ्या दिवशी सकाळी घडला. त्यामुळे मी काही क्षण गोंधळून गेलो. व त्यानंतर त्या प्रसंगातून सावरल्यावरही बरेच दिवस तो विचार माझ्या मनात राहीला. ही भावना आपल्यापैकी प्रत्येकजण अनुभवतो. त्यावेळी मी जसा अस्वस्थ झालो तशी अस्वस्थता आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी अनुभवलेलीच आहे. आधनिक काळातच हे घडू लागले आहे. परंतू त्यामुळे अस्वस्थ मात्र आपण सर्वजण होतो.
आधले दोन तिन दिवस प्रवास झाल्याने मी त्या दिवशी जरा उशीराच उठलो होतो. काही वेळाने मोबाईल फोन बघितला. व्हॉट्स ॲपवर काकांच्या जिवनावरील चित्रफितीच्या निमित्ताने खूप सारे संदेश आले होते. काकांचे कार्य किती मोठे होते हे परत एकदा नव्याने मला कळले. अनेकांनी तर आम्ही जिवंत आहोत ते केवळ काकांमुळे असे देखील लिहीले होते. हे सारे मेसेजेस वाचताना एक मेसेज मी बघितला. त्यात लिहीले होते, अवि, फारच सुंदर.. फारच ह्रदयस्पर्शी. तो मेसेज पाठविणाऱ्याचे नाव माझ्या मोबाईलमधे नोदविले होते, गोडबोले काका. मी मेसेजला उत्तर लिहीले, काका धन्यवाद. आपल्याला आवडले म्हणजे खरोखरीच छान… आणि मी थबकलो. काकांच्याच श्रद्धांजली चित्रफितीबद्दल काकांचाच संदेश? मला काय लिहावे की लिहू नये किवा काय.. काहीच सुचेना.. काकांच्या फोन नंबर सोबत मी त्यांचा खूप छान फोटो अटॅच केला होता. त्या फोटोकडे मी काही वेळ बघत राहीलो. काही वेळानंतर माझ्या लक्षात आले, की तो मेसेज बहुदा काकंच्या फोन नंबरवरून काकुंनी पाठवला असणार. मी काकांकरीता लिहीलेला मेसेज मिटवून काकुंना मेसेज केला व काकांच्या नावाने आलेला संदेश माझ्याकरीता आशिर्वादच आहे असे त्यांना कळविले. पण मी मनातून एका विचाराने हेलावून गेलो. तो विचार म्हणजे आता काकांचा हा नंबर डीलीट करायचा? ज्या नंबरवर फोन करून रात्री बेरात्री आपल्या वेदना सांगितल्या व पलीकडून त्यावरचे समाधान मिळाले तो नंबर डीलीट करायचा? ज्या नंबरवरून ऐकलेल्या आश्वासक आवाजाने घाबरलेल्या मनाला प्रचंड उभारी मिळत होती, नथींग टू वरी हे शब्द ऐकल्यावर समाधानाने अनेक वेळा झोप लागली तो आवाज ऐकविणारा नंबर डीलीट करायचा?
आधुनिक काळात आपल्या एकमेकांशी फार भेटी होत नाहीत त्यामुळे संपर्काचे परीणामकारक साधन म्हणजे मोबाईल फोन. त्यावर केला जाणारा संवाद. याद्वारे आपण एकमेकांशी जोडलेलो असतो. अशी अत्यंत जवळची व्यक्ती, जिच्याशी मनापासून संवाद केलेला असतो ती आपल्याला ऐहीक रुपाने सोडून जाते परंतू मोबाईल फोन मधे असलेल्या मेसेजेसच्या रुपाने ती असतेच. असा त्या जिवलग व्यक्तीचा फोन नंबर आपण डीलीट करु शकतो? कधीच नाही. तो राहूच द्यावा. त्या फोन नंबरचे असणे त्या व्यक्तीचे सोबत असण्यासारखेच आहे. कारण देवाने जरी त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यातून डीलीट केले असले तरी आपल्या मनातून ती व्यक्ती कधीट डीलीट होऊ शकत नाही. होय ना?
हो सर प्रत्येक नंबर महत्वाचा असतो ...आपण सुद्धा बरेच वेळा आमच्या मॅसेज ला रिप्लाय देता तेव्हा खूप जवळीक आहे असे वाटते. व तुमचे लेख मी न चुकता वाचतो ...त्याचे कारण मी आपणास भेटून सांगणार ...
ReplyDeleteVery true
ReplyDeleteडॉ.गोडबोले गेल्याने आम्ही बडनेरवासी एका महान व्यक्तिमत्वाला मुकलो.
ReplyDeleteखरं आहे
ReplyDeleteखरं आहे ते
ReplyDeleteभावस्पर्शी🙏🙏
ReplyDeleteभावस्पर्शी🙏
ReplyDelete