थोडा है थोडे की जरुरत है @ 24.10.23
मन कस्तुरी रे.. जग दस्तुरी रे!!
माझ्या थ्री बीएचके फ्लॅट कडे बघून आणि आतापर्यंत मी जे माझ्या प्रगतीबद्दल सांगितले ते ऐकून माझा मित्र म्हणून तुला माझ्याबद्दल निश्चितच अभिमान वाटला असेल. पण या माझ्या सोनेरी यशाला देखील एक मनाला व्यथित करणारी काळीकुट्ट किनार आहे. त्याबद्दल खरे तर मी फार बोलत नसतो परंतू तुझ्यापासून लपवू देखील शकत नाही. त्यानंतर त्याने डोळ्यातून पाणी ओघळणार नाही याचा कसोशीने प्रयत्न करून त्याने त्याच्या आयुष्याची ती किनार माझ्यासमोर उघड केली. तो जेव्हा ते सारे बोलत होता तेव्हा माझ्या मनात त्याच ओळी उमटत होत्या.. मन कस्तुरे रे.. जग दस्तुरी रे..
माझा मुलगा एका बोर्डींग स्कुलमधे आहे. तो घरी येत नाही. म्हणजे मी त्याला येथे आणत नाही. कारण तुला सुंदर वाटणाऱ्या या घराच्या त्याच्या मनात फार चांगल्या स्मृती नाहीत. कंपनीमधे कामाला सुरुवात झाल्यावर मी प्रचंड मेहनत करायला लागलो. मी तुला सांगितल्याप्रमाणे मला तो बालपणी मनावर उमटलेला गरीबीचा डाग धुवायचा होता. त्यामुळे मी अक्षरशः स्वतःला त्या कामात झोकून दिले. कशाचीच शुद्ध मला नव्हती. याच दरम्यान माझा विवाह कंपनीमधील मॅनेजर पदावर असलेल्या एका गृहस्थाच्या मुलीशी झाला. मुळातच श्रीमंत घरात राहणाऱ्या माझ्या बायकोला माझ्या या फ्लॅटचे किंवा मी निर्माण केलेल्या सुख सुविधांचे फार काही कौतुक नव्हते. माझ्याकरीता जी अत्यंत मोठी उपलब्धी होती ती तिच्याकरीता सामान्य बाब होती. त्यामुळे तिला माझ्याकडून फार वेगळ्या अपेक्षा होत्या ज्या सर्व वेळेबाबत होत्या. परंतू तुला खरे सांगू, त्यावेळी मी तिला वेळ सोडून बाकी सर्व देऊ शकत होतो. पण माझ्या बालपणीचा गरीबीचा डाग धुण्याच्या नादात मी देखील वेड्यासारखा धावत सुटलो होतो. केवळ पैसा मिळवून आपल्याला सुख मिळविता येईल असा विचित्र विचार माझ्या मनात स्थापित झाला होता. त्यामुळे पत्नीसोबत दुरावा निर्माण झाला. या ड्रॉईंग हॉलमधेच, जेथे आपण बसलोय ना तेथे, आम्ही एकमेकांवर जोरजोराने किंचाळायचो, आरोप करायचो, अगदी एकमेकांच्या अंगावरही जायचो. दोघांनाही हे भानच रहायचे नाही की बेडरुमच्या दारातून आमचा मुलगा दार किलकिले करून हे सारे बघतोय. आमच्या दोघांचा तो तमाशा बघून तो रडायचा व झोपी जायचा. भांडून थकल्यावर मी दारू प्यायला बाहेर निघून जायचो व बायको बेडरुममधे दार बंद करून बसायची. या सर्व वाईट प्रकारात त्या लहानग्याच्या मनावर काय परीणाम होत असेल याचा कधी विचारच केला नाही यार.
आज आमचा डीव्होर्स झालाय. मुलाची कस्टडी माझ्याकडे असली तरी त्याला बोर्डींग स्कुलमधे ठेवलेय. तो सुट्यांमधेही घरी येत नाही. त्याला सुरुवातीला खूप मानसिक त्रास झाला परंतू आता त्याने स्वतःला या घरापासून म्हणजेच आमच्यापासून तोडून टाकले आहे. त्यामुळे मी सध्या तसे बघितल्यास पूर्ण एकटा आहे. आपले काहीतरी चुकतेय हे आम्ही दोघांनीही समजून घेतले नाही व त्यामुळे ऐश्वर्य प्राप्त झाले, परंतू समाधान गमावले. ते समाधान जे माझ्याजवळच होते परंतू मी ते न ओळखता वेगळ्या गोष्टींमधे शोधत राहीलो. माझ्या बायकोकडून मला माझ्या मेहनतीबद्दल थोडेसे कौतुक व पाठबळ हवे होते आणि तिला माझ्याकडून थोडासा वेळ हवा होता. हे दोघांनाही एकमेकांकरीता करणे फार कठीण नव्हते रे. परंतू ते त्या वेळी लक्षातच आले नाही. आम्ही दोघेही आपापल्या सुखाचा हिस्सा ओरबाडण्याचा प्रयत्न करत राहीलो. जे आमच्याच जवळ होते ते साधे व सोपे सुख आम्हाला शोधता आले नाही व ते आम्ही शोधण्याकरीता वेड्यासारखे भांडत राहीलो. त्यामुळे नाते अपुर्ण राहीले. मुलाच्या आयुष्यावर विपरीत परीणाम झाला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझ्या आयुष्याचा बॅलन्स गमावला. लहानपणीचा गरीबीचा डाग मी धुतला परंतू कायमच्या एकटेपणाच्या वेदनेचा डाग मात्र पुन्हा लावून घेतला. एवढा वेळ कसोशीने रोखलेले त्याचे अश्रू आता मात्र ओघळले.
माझ्या परीने त्याला जेवढे समजावणे शक्य आहे तेवढे मी समजावण्याचा प्रयत्न केला होता. परंतू त्या कस्तुरीमृगासारखीच चूक त्याने केली होती. जे त्याच्याजवळ होते ते मिळविण्याकरीता तो धावत राहीला आणि त्या नादात.. बात हुई ना पूरी रे!! असे होऊन बसले..
आयुष्यात आनंद व समाधानाची कस्तुरी आपल्याजवळच असते, परंतू तिला न ओळखता आपण बरेचवेळा तिला शोधत भरकटत जातो व मग रस्ताच हरवून जातो. असा रस्ता हरवून जिवनाचे मुल्य संपण्यापेक्षा वेळीच आपल्या मनातील ती आनंदकस्तुरीची कुपी आपणच ओळखायला हवी… होय ना?
Comments
Post a Comment