थोडा है थोडे की जरुरत है @ 17.10.23
मन कस्तुरी रे!!
मन कस्तुरी रे!! मन फार वेडं असतं… जे नाही त्यासाठी धडपडत असतं.. त्याला हवं असलेलं समाधान त्याच्याच जवळ असतं.. पण तरीही वेड्यागत सैरावैरा धावत असतं.. मन फार वेडं असतं..
अवि, लहानपणी आमची स्थिती कशी होती तुला माहित आहे. बाबांचे वागणे, त्यांनी मधेच नोकरी सोडून दिली, नंतर त्यांचे ते व्यसन, आईवर त्यांचे हात उगारणे हे सारे मी फार सहन केले. इतकेही वाईट होते तरी कधीतरी संध्याकाळी आई मला त्यांना शोधायला पाठवायची. ते त्या नदीजवळच्या पिंपळाच्या पारावर बसले रहायचे. कसलीच शुद्ध नसायची त्यांना. मग त्यांना धरून धरून मी घरी घेऊन यायचो. आई शेतात काम करायची व त्यामुळे आमचे घर चालायचे. मोठा भाऊ तर घरापासून वेगळाच होता. त्याला कशाचेच घेणे देणे नव्हते. तुम्हा लोकांचे परीवार बघून फार असुया वाटायची. कायम कुणीतरी मदत केलेल्या पैश्यातून गणवेष घ्यायचा. ते सर्वांसमोर येऊन हातात गणवेष घेणे देखील कसेतरी वाटायचे. पण काहीच करु शकत नव्हतो. आपण भिकारी आहोत का असेच वाटायचे. पण आईकडे गणवेषासाठी पैसे मागणे शक्यच नव्हते. फार कसेतरी दिवस होते यार… असे म्हणून तो थांबला. त्याचा गळा भरून आला होता. बालपणीच्या दिवसांचे अनुभव तो माझ्याजवळ, त्याच्या बालपणीच्या मित्राजवळच बोलू शकत होता. बंगलोर येथे त्याच्या थ्री बीएचके अत्याधुनिक अपार्टमेंटमधे बसून मी माझ्या बालपणीच्या मित्राशी बोलत होतो. पावणे दोन कोटी रुपयांचे त्याचे अपार्टमेंट होते.
जरा शांत होऊन तो पुढे सांगू लागला. त्याच वेळेस मी ठरवले होते यार, ही परीस्थिती बदलली पाहीजे. सुदैवाने एका काकाने चांगला आधार दिला. माझ्या नशीबाने देखील साथ दिली. शिक्षण चांगले झाले. एका मोठ्या कंपनीत काम सुरु झाले. मग मात्र मी मागे वळून पाहीलेच नाही. एवढे काम करत होतो की कंपनीच्या मालकांना आनंद व्हायचा. पुढे माझ्या त्या कामाचेच फलीत म्हणजे मला त्यांनी कंपनीच्या मॅनेजमेंटवर घेतले. आज मी त्याच कंपनीचा पार्टनर देखील आहे व व्हाईस प्रेसीडेंट देखील. दिवसरात्र एवढी मेहनत केली यार मी की इतर कशाचा विचारच केला नाही. केवळ धावत राहीलो. मला एक प्रकारचे वेडच लागले होते. ती लहानपणी लोकांकडून मदत घेताना जी बोच होती ना, ते फारच लागले होते मला. मदत करणारा ज्या थाटात ती मदत करायचा ते देखील कुठेतरी सलायचे. मदत घेतानाचे फोटो काढले जायचे त्यावेळी असे वाटायचे की आपल्या गरीबीचे हे लोक प्रदर्शन करत आहेत. खरे तर त्यांचा हेतू चांगला होता पण माझे मात्र लहान मुलाचे मन पेटून उठायचे. म्हणून नंतर माझ्या मनाला मी इतर कोणत्याही गोष्टीचा विचारच करु दिला नाही. केवळ कष्ट करणे व आपली प्रगती करणे हाच ध्यास मनात होता. जसे मी ठरवले त्याप्रमाणे साधारण पंचेवीस वर्षे प्रचंड मेहनत करून हे सारे यश अक्षरशः खेचून आणले. चार वर्षांपूर्वी हे अपार्टमेंट विकत घेतले. बेस्ट ऑफ द बेस्ट इंटेरीयर करून घेतले. आमच्या कौलाच्या घरामधे पावसाळ्यात पाणी गळायचे व नेमके झोपायच्या जागी पाणी जमा व्हायचे. मग आम्ही स्वयंपाकघरात झोपायचो. कधी रात्रभर झोप लागायची नाही. म्हणूनच कदाचित मन पेटून उठले होते. मेहनत करण्यासाठी तयार झाले होते. लहानपणी जे काही मिळाले नव्हते त्या सर्व गोष्टींची भरपाई झाली. लहानपणी अक्षरशः एकेका पैशाची चणचण होती, आज मात्र काहीच चिंता नाही. आजच्या काळात जे जे हवे असते ते सारे माझ्याकडे आहे. चांगले घर, मोठी गाडी सारे काही. आज माझ्या पोराने आयुष्यभर काही केले नाही तरी तो अत्यंत आरामदायी आयुष्य घालवू शकतो एवढी मिळकत माझी आहे. आपल्या मित्राची अशी विकासात्मक वाटचाल ऐकून मला फार छान वाटले. मित्राचा खरोखरीच अभिमान वाटला. मी त्याला ते सांगितले देखील.. किती छान वाटतेय यार. किती भयंकर काळ तू लहानपणी अनुभवलास. पण त्यानंतरचा तुझा हा विकास म्हणजे अंधाऱ्या रात्रीनंतर लख्ख प्रकाशाने सारे उजळून जावे असाच आहे. मला फार आनंद झाला हे सारे ऐकून..त्या आनंदातच त्याला मी विचारले, अरे पण तुझा नशीबवान छोकरा कुठे आहे? या माझ्या प्रश्नावर मात्र तो अचानक चूप बसला. आतापर्यंत अभिमानाने उजळलेला त्याचा चेहेरा उदास झाला. काहीतरी समस्या आहे असे मला जाणवले. त्यानंतर पुढे एक ते दिड तास तो मला त्याच्या जीवनातील अशी बाजू सांगत होता की ते सारे ऐकल्यावर मला त्या ओळी आठवल्या..
मन कस्तुरी रे.. जग दस्तुरी रे….बात हुई ना पूरी रे!! (क्रमशः)
Comments
Post a Comment