थोडा है थोडे की जरुरत है @ 23.05.23
किंमत
पुण्याला एक दिवस मुक्काम झाल्यावर मुलीला फोन केला. ती देखील तेथेच राहत असल्याने भेट घ्यायची होती. भेटण्याचे ठिकाण वगैरे ठरल्यावर तिने मला सहजच विचारले, बाबा, तुमचा नास्ता झाला का? मी तिला म्हणालो की नास्ताच करतो आहे. ती म्हणाली कुठे आहात तुम्ही? मी तिला तिच्या महाविद्यालयाजवळच्याच एका हॉटेलचे नाव सांगितले. ते ऐकल्याबरोबर तिने जी प्रतिक्रिया दिली ती मला फारच छान वाटली. कारण ती प्रतिक्रीया माझ्या मुलीच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल दर्शवित होती. खरे तर बाप म्हणून मला त्याबाबत विचार केल्यावर जरा वाईट वाटले. परंतू अंतीमतः आनंद याचा झाला की काही वर्षांपूर्वी आम्ही परीवारातील सर्वांनी मिळून तिच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य ठरला होता. तो निर्णय होता तिला बारावी झाल्यावर पुण्याला शिकायला पाठवणे. केवळ १७ वर्षांची पोर एकटी कशी राहू शकेल या प्रश्नाने आमच्या झोपा उडाल्या होत्या. परंतू निर्णय घेतला व तो निर्णय योग्य होता ही आश्वस्तता देणारी ती प्रतिक्रीया माझ्या मुलीने दिली.
आपण मुलांना घराबाहेर पाठविण्यास तयार नसतो व त्यामागचे एकमेव कारण म्हणजे आपले त्यांच्यावर नितांत प्रेम असते. त्या प्रेमापोटी जमेल तेवढे त्यांना आपल्या पंखांखाली आपण धरून ठेवलेले असते. परंतू ज्याप्रमाणे पक्ष्याच्या पिल्लालाही घरट्यातून बाहेर काढले जाते व त्याचे त्याला उडणे शिकावे लागते तसेच आपल्यालाही मुला-मुलींना मोकळ्या आसमंताखाली उभे करावे लागते. त्यानंतरच त्यांना त्यांच्या बळावर जगणे सुरु करता येते. या संपुर्ण प्रक्रीयेमधे पालक म्हणून आपल्याला चिंता वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. मुलांना मुक्तपणे वागण्याची संधी मिळाल्यावर ते फारच स्वैर होतील असे वाटणेही स्वाभाविक आहे. परंतू मुक्तपणा हा बरेचवेळा जबाबदारीची जाणीव देखील करून देतो. मुक्तपणा मिळाला की मुलांच्या स्वैर वागण्याच्याच गोष्टी जास्त ठळकपणे चर्चील्या जातात व त्यामुळेच मुलांना मुक्तपणा देण्यास पालकांचे मन धजावत नाही. परंतू जबाबदारीने वागण्याऱ्या मुला मुलींच्या गोष्टी देखील सांगितल्या जायला हव्या. कमी वयात त्यांनी जपलेले भान, घरातील कम्फर्ट झोन सोडून बाहेर पडल्यावर करावा लागणारा मानिसिक संघर्ष या साऱ्या गोष्टी फार कौतुकास्पद असतात. पण त्या बोलल्या जात नाहीत. कधी कधी तर पालक, आमच्यावेळी आम्ही कश्या खस्ता खाल्ल्या, या वर्णनांमधेच अडकलेले असल्याने मुलांच्या कौतुकाकरीता वेळच उरत नाही. सध्या मुलांसाठी घरापासून दूर राहणे हे वेगळ्या प्रकारचे आव्हान आहे. घरातील पालकांनी दिलेले संस्कार व सभोवताली अनेकवेळा त्याची होणारी पायमल्ली ही ओढाताण फार विचित्र आहे. परंतू अनेक मुले मुली बरोबर स्वतःला सांभाळतात. चांगली सोबत जोडतात व जबाबदारी आपसुकच स्विकारतात. त्यामुळे मुलांमधे मुक्तपणा सोबत सहजच निर्माण झालेली जबाबदारीची जाणीव मनाला सुखावते. अशी मनाला सुखावणारीच ती प्रतिक्रीया माझ्या मुलीची होती.
मला ती म्हणाली, बाबा, बापरे तुम्ही त्या हॉटेलमधे गेलात का? बाब, तेथे साधा दोसा देखील ऐंशी रुपयांचा आहे. कॉफी आणि दोसा जर एकत्र घेतले तर ११५ रुपये लागतात एका वेळी. आम्ही त्या हॉटेलसमोरून जातो पण तेथे नास्ता करत नाही. फक्त एकदाच तेथे गेलो. बापरे, खूप जास्त रेट्स आहेत तेथे. त्यापेक्षा आमच्या कॉलेजच्या कॅन्टीनमधे ५० रुपयात होऊन जाते. तेवढ्याच पैश्यात दोन दिवसांचा नास्ता होतो बाबा! माझ्या मुलीच्या तोंडून हे सारे ऐकताना मला पाच वर्षांपूर्वीचा काळ आठवला. एकदा पिझ्झा ऑर्डर करताना मी म्हणालो होतो की किती महाग आहे हा पिझ्झा? त्यावर माझी मुलगी म्हणाली होती, बाबा फक्त ८०० रुपयांचाच तर आहे. त्यावेळी ८०० रुपये देखील फक्त वाटत होते व आता नास्त्याकरीता ११५ रुपये खूप जास्त वाटत आहेत. हा फरक होता मुक्तपणातील जबाबदारीचा. महिन्याला खर्चाकरीता दिले जाणारे पैसे महिनाभर पुरवायचे आहेत या भावनेमुळे बरोबर कमी पैश्यात मिळणारा दोसा शोधला गेला कारण पैसे बाबांचे असले तरी ते महिनाभर पुरवायचे आहेत व आपले खर्च आपल्यालाच मॅनेज करायचे आहे. म्हणूनच ती प्रतिक्रीया मला फार आवडली.
मेहनतीने माय बापानी कमावलेले पैसे मुलांनी खर्च करायलाच हवे कारण ते त्यांच्यासाठीच असतात, परंतू त्या पैश्यांची किंमत जेव्हा मुलांना कळते तेव्हा मायबापाची मेहनत सफल होते असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. म्हणूनच त्याच आनंदात मुलीला त्याच हॉटेलमधे मी भेटायला बोलावले… ११५ रुपयांचा दोसा व कॉफीचा आस्वाद घ्यायला… खरे सांगतो… त्या दिवशी तो दोसा फारच चविष्ट वाटला!!
Comments
Post a Comment