थोडा है थोडे की जरुरत है @ 09.05.23
राज्यगीत
चित्रपट सुरु होण्याआधी राष्ट्रगीत वाजणार असा संदेश आला. हॉलमधील सर्वजण उभे झाले. राष्ट्रगीताच्या गायनानंतर चित्रपट सुरु झाला. एका शाहिराच्या जिवनावरचा चित्रपट. तो कदाचित एखाद्या माहितीपटासारखाच असेल असे वाटले होते. परंतू अत्यंत रंजकतेने चित्रपटाची कथा पुढे सरकत राहीली. शाहिर हा आपल्या गायन सामर्थ्यामधून कश्याप्रकारे समाजप्रबोधन करु शकतो याचे वर्णन शाहीर साबळेंच्या जीवनावरील या चित्रपटातून केदार शिंदेने फारच उत्तम प्रकारे मांडले आहे.चित्रपट संपतानाचा प्रसंग. अत्यंत प्रभावीपणे व अजय अतुलच्या संगीतामधे बांधलेले गीत गर्जा महाराष्ट्र माझा सुरु झाले. आता मात्र थिएटर मधले काहीच जण उभे झाले. आम्ही जे काही मोजके उभे होतो ते देखील हळू हळू उभे झालो. बरे वाटेल का? लोक काय म्हणतील? असे प्रश्न कदाचित मनात असतील. गाणे संपेपर्यंत हे लोक कशाकरीता उभे झाले आहेत याबद्दल कुजबुज सुरु झाली होती. गाणे अजय गोगावलेच्या आवाजातून थेट शाहीर साबळेंच्या आवाजात कधी पोहोचले ते कळलेच नाही. परंतू त्या गीतामधील एक एक शब्द प्रभावी गायनासह मनात झिरपत राहीला. खरे तर सकाळी शासनाच्या आदेशानुसार महाविद्यालयात ध्वजारोहणानंतर हे गीत वाजविण्यात आले होते व त्यावेळी देखील त्या गीताच्या सन्मानार्थ उभे राहीलो होतो. परंतू आता हा अनुभव काही वेगळा होता. एक तर आपण आपल्या राज्याच्या गीताला सन्मान देतो आहे ही भावना मनामधे होती. या गीता करीता उभे रहावे अशी सूचना देखील नव्हती. त्यामुळे जे काही झाले ते उत्फुर्तपणे झाले होते. तो सारा भाव मनात असताना जेव्हा डॉल्बी डीजीटल साऊंड सिस्टीममधे व चकाकणाऱ्या सेल्यूलॉईडवर समोर हे गाणे बघत व ऐकत असताना फार वेगळा अनुभव येत होता. राजा बढेंचे शब्द, श्रीनिवास खळेंचे संगीत व शाहीर साबळेंचा खणखणीत आवाज याचा मूळ बाज जसाच्या तसा ठेवून अजय-अतुल यांनी सादर केलेले ते गीत त्या हॉलमधे मनाला रोमांचित करीत होते. शब्द, चाल, आवाज, सादरीकरण या सर्वच बाबींचा मिलाफ एवढा परीणामकारक ठरला की गाणे संपता संपता अभिमानाचे अश्रू डोळ्यातून ओघळले. माझ्या राज्याचे हे गीत ही भावना फारच छान होती. आपल्या राज्याच्या गीताच्या सन्मानार्थ पब्लीकली पहिल्यांदाच उभे राहून एक वेगळा अनुभव मिळाला. फारच अविस्मरणीय असा!!
परंतू आपल्या डोळ्यात अश्रू का आले हा विचार मी करत राहीलो. ते होते अस्तित्वाच्या जाणिवेचे. आपल्या अस्तित्वाची जाणीव ही अशीच थेट मनाला भिडत असते. अगदी लहानपणी सवंगड्यांसोबत अनुभवलेल्या शाळेला मोठेपणी पुन्हा भेट देण्याची संधी लाभते तेव्हा त्या सर्व जुन्या आठवणींना स्मरून डोळे पाणावतात कारण त्या परीसरामधे आपले अस्तित्व राहीलेले असते. त्या वयात कदाचित त्या अस्तित्वाची जाणिव होत नाही परंतू नंतर आयुष्यात पुढे अनेक वर्षांनी ती जाणीव किती महत्वाची आहे हे आपल्याला कळत असतं. पाच खोल्यांच्या भाड्याच्या घरात आयुष्य काढलेले कुटुंब जेव्हा स्वतः बांधलेल्या दोनच खोल्यांच्या घरात प्रवेश करते तेव्हा ती आपल्या अस्तित्वाची जाणीव असते. तसेच या गीताचे देखील झाले असावे. एका महान राज्याचा नागरिक म्हणून माझ्या अस्तित्वाची एक गीतरुपी ओळख प्राप्त झाली ही एक विशेष बाब होती. अश्याप्रकारे आपल्या अस्तित्वाची प्रतिके कायम टिकविणे फार गरजेचे आहे. कारण त्याद्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण होत असते. गर्दीचा तर भाग आपण असतोच व रहायलाही हवेच. परंतू त्या गर्दीत राहूनही आपले असे स्वतंत्र अस्तित्व टिकविणे ही मोठी बाब असते. त्याकरीता ही प्रतिके असतात. त्याकरीता ती जोपासायची असतात व त्याकरिताच त्यांचा सन्मान करायचा असतो. एकदा असा सन्मान जर मनात बसला तर मग सन्मानार्थ उभे रहावे अशी ओळ टाकावी लागत नाही. ज्याप्रमाणे वयाने, ज्ञानाने व अनुभवाने मोठे कुणी समोर आले तर आपसूकच नमस्कार केला जायला हवा कारण त्याद्वारे आपण त्यांच्या ज्ञानाच्या व कार्याच्या स्वतंत्र अस्तित्वापुढे नतमस्तक होत असतो. परंतू नमस्कार कर असे सांगावे लागत असेल तर मग काहीतरी चुकतंय. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्याचे हे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारे गीत शासकीय आदेशाच्या आधारे नव्हे तर त्याप्रती खरोखरीच सन्मानाची भावना निर्माण होऊन मनात मनात रुजावे हीच अपेक्षा. जय महाराष्ट्र!!
Comments
Post a Comment