थोडा है थोडे की जरुरत है @ 16.05.23
क्षण गेला…
गाडी स्टेशनवर १५ मिनीटे थांबणार होती. त्याने तिला सांगितले होते, तू नक्की ये मला तुला काहीतरी महत्वाचे सांगायचे आहे. असे काहीतरी जे मी फोनवर सांगूच शकणार नाही. परंतू सांगायचे आहे कारण त्यावर आपल्या नात्याचे भविष्य अवलंबून आहे. फार गरजेचे आहे. ती गोष्ट मला तुला प्रत्यक्ष समोरासमोर सांगायची आहे. तो तिला सोडून जाणार ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. एक तर जाणार होता, परंतू जाण्याआधी तिच्यासाठी वेळ पण काढला नाही. आपल्याच कामात गर्क राहीला. तिला त्याचा भयंकर राग आला होता. पण त्याचे म्हणणे टाळणे तिला कधी जमलेच नव्हते. शिवाय तो महत्वाचे काहीतरी बोलणार होता. त्यामुळे ती धावपळ करत स्टेशनवर पोहोचली. तो चातकासारखी वाट बघत होता. गाडी प्लॅटफॉर्मवर आली होती पण ती मात्र पोहोचली नव्हती. त्याने डब्यात सामान ठेवले व तो तिची वाट बघत राहीला. तेवढ्यात ब्रीजवरून ती धावत येताना दिसली. त्याच्या भेटीच्या ओढीने तिने केस देखील बांधले नव्हते. हातात पर्स घेऊन तो कुठे दिसतो हे शोधत ती खाली येत होती. एवढ्या धावपळीत देखील त्याच्या आवडत्या रंगाची साडी नेसूनच ती आली होती. किती प्रेम आहे हिचे माझ्यावर. किती भाग्यवान आहे मी, ही माझ्या आयुष्यात आल्यामुळे..त्याला सहजच वाटून गेले. धावपळ करत एकदाची ती त्याच्या समोर येऊन उभी राहीली. धावत आल्याने तिला दम लागला होता. त्याने तिला पाणी प्यायला दिले. पण त्याच्या जवळचे पाणी न घेता पर्समधून बॉटल काढून तिने पाणी प्यायले. अजूनही ती चिडलेली आहे हे त्याच्या लक्षात आले. काहीच क्षण न बोलता ती उभी होती. गाडी सुटायला जरासाच वेळ उरला होता. त्यामुळे ती महत्वाची गोष्ट तो तिला सांगणार तेवढ्यात अचानक तिनेच तावातावात बोलणे सुरु केले.
तुला माझी किंमत आहे का? मला सोडू जाणार आहेस हे ठीक आहे पण गेला आठवडाभर तू जे मला टाळतो आहेस याचा काय अर्थ समजायचा? तीन वर्ष झाले आहेत आपल्या या नात्याला. तीन वर्षातच कंटाळलास का? तू तर आयुष्यभर सोबत राहण्यासंबंधी बोलला होतास. मी तुझ्या सोबत आहे. आपण सोबतच राहणार आहोत. ते सारे खोटे खोटेच होते का? असेच करायचे होते तर मग मला स्वप्ने का दाखवलीस? माझे जीवन जसे सुरु होते तसे राहू द्यायचे होतेस. मला स्वप्ने दाखविलीस आणि आता मात्र मला ही अशी वागणूक? मला साधा मेसेज देखील स्वतःहून केला नाहीस तू गेल्या आठवड्याभरात. केवळ मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिलीस. सकाळपासून मी वाट बघत असते, तुझ्या एखाद्या मेसेजची. किती वेळा तो फोन बघते पण तू मात्र निवांत असतोस. तुला साऱ्या तुझ्याच गोष्टींची काळजी. माझी काहीच किंमत नाहीये तुला. मी मात्र तुला भेटण्यासाठी, तुझ्याशी बोलण्यासाठी किती कष्ट घेते हे ठाऊक आहे? एक तर घरचे आपल्या या नात्याला समजून घेत नाहीत. त्यांना तर तुझे नावही काढलेले चालत नाही. परंतू तो सारा विरोध पत्करून मी तुझ्यासोबत आहे. असे असताना तू मात्र तुझ्या जगात गुंतलेला असतोस. जेव्हा भेटतोस किंवा बोलतोस तेव्हा मी म्हणते म्हणून. म्हणूनच विचारतेय.. कंटाळलास का मला? अरे बोल ना. किती गप्प राहशील? आता ती चिडून गेली होती. पण या सर्व वाद करण्याच्या वेळात गाडीचे हॉर्न कधी झाले हे तिला कळलेच नाही. त्याने हळूच तिचा हात हातात घेतला.. क्षणभरच आणि तो वळला व हलणाऱ्या गाडीत चढून दरवाज्यात उभा राहीला. गाडी सरकू लागली. ती गाडीसोबत चालू लागली. त्याच्या डोळ्यातून आतापर्यंत थांबवलेले अश्रू वाहू लागले. ते बघितल्यावर अचानक तिला त्याचे वाक्य आठवले.. मला तुझ्याशी फारच महत्वाचे बोलायचे आहे… गाडीसोबत धावता धावताच तिने विचारले.. अरे पण तू मला काहीतरी सांगणार होतास ना?… काय होते ते? सांग…ती जोरात ओरडली…. परंतू त्याचा आवाज तिच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हता…त्याने केवळ अश्रू पुसले.. गाडी वेगात पुढे निघून गेली… त्याचे बोलणे काय होते हे न ऐकताच ती एकटी प्लॅटफॉर्मवर राहीली…
आयुष्यात आपल्याला हवे तसे क्षण मिळतीलच असे नसते. तेथे चॉईस फार कमी असतो. बरेच वेळा अनेक गोष्टी एकमेकात अश्या काही गुंतलेल्या असतात की त्यांची उकल इच्छा असूनही करताच येत नसते. अश्यावेळी मिळणारे क्षण कसे घालवायचे हा मात्र चॉईस आपल्याकडे राहू शकतो. सहवासाकरीता मिळालेले क्षण भूतकाळात काय मिळू शकले नाही याबद्दल वाद करण्यात घालवायचे की मिळालेल्या क्षणांना प्रेममयी सहवासाने महोत्सवामधे परावर्तीत करायचे हे ठरवणे गरजेचे असते. नात्याच्या सकस संवर्धनाकरीता हे भान जपणे फार आवश्यक आहे. अन्यथा गाडीची वेळ होऊन जाते व महत्प्रयासाने मिळालेले आनंद क्षण देखील भूतकाळातील निसटलेल्या क्षणांचा विचार करत निसटूनच जातात.. केवळ वेदना तेवढी शिल्लक उरते.… होय ना?
Really very beautifuly narrated the romantic love story
ReplyDeleteNice article
ReplyDeleteखरंय माणूस जे नाही मिळालं त्याचाच जास्त विचार करतो मात्र जे हातात आहे त्याची त्याला जाणीव नसते.
ReplyDelete👌👌👌
ReplyDeleteGreat narration in lucid language, nuances and sensitivities along with the touching message explicitly displayed in the narration. Keep it up Bhai.👌🏻👍🏻
ReplyDeleteStory is romantic but the end is sad
ReplyDeleteAnd the story is incomplete……….
Break ke bad kya hoga