थोडा है थोडे की जरुरत है @ 11.04.23

हुशार ॲप

मित्राचा मोठ्या उत्साहात फोन आला, उद्या संध्याकाळी घरी ये. माझ्या मुलाने एक नवे ॲप डेव्हलप केले आहे. त्याचा इंजीनिअरींगचा प्रोजेक्ट आहे. पण त्याने कमाल केली आहे. गुगल च्या प्ले स्टोअर्सशी त्याचा संपर्क सुरु आहे. बहुदा ॲपलशी देखील बोलणे होईल. सारे व्यवस्थित झाले तर धमाल होईल. तू ये उद्या तुझ्याकडून आणखी काही सूचना आल्या तर त्या तो त्यात समाविष्ट करेल. त्याला तुला ते ॲप दाखवायचे आहे. किंवा असे कर मी त्याला आता पाठवू का? माझा मित्र फारच डेस्परेट झालाय हे माझ्या लक्षात आले. त्याला मी आश्वासित केले की दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याच्या कडे येईन. ठरल्याप्रमाणे मी त्याच्या घरी गेलो. त्याचा मुलगा तो दोघेही त्या ॲपबद्दल अतिशय जास्त उत्साहात होते. मी त्या मुलाचे बोलणे ऐकू लागलो. खरोखरीच फारच अप्रतिम असे ते ॲप त्याने बनविले होते. नव्याने सुरु झालेल्या आर्टीफीशीयल इंटेलीजन्सचा वापर त्याने या ॲपमधे केला होता. या ॲपमधे एकदाच आपल्याला माहिती भरावी लागेल त्यानंतर ते ॲप आपली खूप सारी कामे करेल. त्याने मला सारे काही विस्ताराने सांगितले. ते सारे ऐकल्यावर मी त्याला एक सूचना केली. परंतू ती ऐकल्यावर मात्र त्या मुलाचा आणि त्याच्या वडीलांचा उत्साह मावळला. खरे तर मला तसे करायचे नव्हते परंतू ॲपचे वर्णन केल्यावर त्याने एक असे वाक्य उच्चारले की मला रहावलेच गेले नाही.

हे ॲप म्हणजे आपल्या जवळच्या लोकांना आपल्या भावना ॲटोमॅटीक पोहोचविणारे ॲप होते. आपल्या जवळच्या नातेवाईकांची, मित्रांची काही माहिती यात समाविष्ट करायची. जसे त्यांचे वाढदिवस, त्यांच्या लग्नाचे वाढदिवस, त्यांच्या नोकरीत रुजू होण्याचे दिनांक किंवा व्यवसाय सुरु होण्याचे दिनांक, किंवा त्यांना अपत्य झाली ते दिनांक, त्यांच्या आवडी निवडी, त्यांच्या आवडीचे गायक, चित्रपट, फुले, रंग हे जेवढे जमेल तेवढे त्या ॲपमधे टाकून द्यायचे आणि मग खरी धमाल सुरु होणार. ते ॲप तुमच्या सहवासातील प्रत्येक व्यक्तीचे एक प्रोफाईल आपोआप तयार करणार त्यानंतर त्या व्यक्तीसोबत भविष्यात नाते टिकविण्याची जबाबदारी त्या ॲपची. ते सारे ऐकून मी चकित होत होतो. माझ्या चेहेऱ्यावरचे भाव बघून तो मुलगा आणखीनच उत्साहात आला. त्याने मला प्राथमिक माहिती त्या ॲपमधे टाकल्यानंतर ते ॲप काय काय धमाल करणार याची माहिती सांगितली. आपल्या संपर्कातील व्यक्तीला रोज एक मेसेज ते ॲप आपोआप पाठवणार. तो मेसेज पाठवाताना आपण त्याच्यासंबंधी जी माहिती एकदाच भरलीय त्याचा तो तल्ल्ख बुद्धीने वापर करणार म्हणजे मी जर माझ्या एखाद्या मित्राची माहिती टाकताना त्याला गुलाब आवडतो असे लिहीले तर त्याला गुलाबाच्या फुलाचा मेसेज जाणार किंवा किशोर कुमारचे गाणे जाणार किंवा मधुबालाचा फोटो जाणार. त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला छान छान मैत्रीचे शुभेच्छांचे संदेश जाणार, त्याच्या मुलाच्या वाढदिवसाला तो बाप झाला हे जगातील कसे सर्वोत्तम लुख आहे हे ते ॲपच सांगणार. एवढेच काय तर या माझ्या मित्राचे फेसबुक प्रोफाईल आपोआप चेक करून त्याची मावशी त्याला सोडून गेल्याची पोस्ट जर त्याने टाकली असेल तर त्याच्या मावशीच्या श्रद्धांजलीचाही मेसेज हे ॲपच पाठवणार. मित्राचा अपघात झाला हे जर त्याच्या फेसबुकवरून कळते तर गेट वेल सून चा मेसेज आपोआप जाणार. उत्साहात हे सारे सांगताना तो मुलगा अचानक बोलून गेला, काका, हे जगाचे भविष्य आहे. तुमची नाती जपण्यासाठी प्रत्यक्ष भेटायची गरजच नाही. हे ॲपच ती नाती आपोआप टिकवेल. हे ऐकल्यावर मात्र मी त्याला ती सूचना केली ज्यामुळे त्याचा उत्साह मावळला. त्याला मी म्हणालो, बेटा हे सारे काही ॲपच करणार आहे अशी जाहीरात जेव्हा तू करशील हे जेव्हा सर्वांना कळेल की हे मेसेजेस हा स्नेह प्रत्यक्ष माणसाचा नसून ॲपचा आहे तेव्हा काय होईल? तुझे ॲप तर लॉन्च होण्याआधीच कोसळेल

हे ऐकल्यावर मात्र तो विचारात पडला. त्याला जवळ बसवून मी सांगितले, बेटा तुझ्या बुद्धीमत्तेचे कौतुक करून घेण्यासाठी सुद्धा तुझ्या बापाला मला येथे प्रत्यक्ष बोलवावे लागले. मेसेजवर हे काम तो करु शकला नाही. बेटा नवनविन तंत्रज्ञानाचे प्रयोग माणसाचे जीवन सुकर, समाधानी ताणविरहित बनविण्यासाठी करायलाच हवेत..पण बेटा.. दुःखाने कळवळणाऱ्या मनाच्या वेदना अश्रु बनून जेव्हा डोळ्यांवाटे बाहेर पडतात नातेव्हा खांद्यावर मायेने थोपटणारा हात लागतोते काम ॲप नाही करु शकत!!







 

Comments

  1. Karay shewatch vakya Ani hi Nati jodayaal manus Ani manasashi samvad hava asto to krutrim asala tar Kay upayog tyat Prem ,mayache olawa yachi garaj asete

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18