थोडा है थोडे की जरुरत है @ 18.04.23
समाधानाची चावी.. एक प्रश्न!!
माझ्या मित्राचा फोन आला व त्याने सांगितले की आम्ही बाबांची दुसरीकडे स्वतंत्र व्यवस्था करतो आहे. आता आम्ही त्यांना सोबत ठेवू शकत नाही. किती सहन करायचे यार? काय काय नाही करत आम्ही सारेच त्यांच्यासाठी. त्यांच्या मतानुसार सारेच करतो. परंतू ते मात्र प्रत्येकाचा केवळ अपमान करतात. ते कुणाचेही ऐकूनच घेत नाहीत. कसे करावे काही सुचत नाही. त्यांच्या या असल्या वागण्यामुळे आता आम्ही सर्व वेडे व्हायचे शिल्लक आहोत. तू म्हणालास त्या प्रमाणे आम्ही त्यांच्या कलाने वागणे सुरु केले. त्यांच्यासाठी आम्ही आमचे कार्यक्रम बदलले. त्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेऊन सारे काही करतो पण हे मात्र त्यांच्या भूतकाळातून बाहेरच यायला तयार नाहीत. काहीही झाले की माझ्या काळात असे होते, माझ्या काळात तसे होते. आम्ही असे करत होतो, आम्ही तसे करत होतो. आम्ही एवढ्या वयात हे केले, ते केले. पण त्यांनी त्यांच्या ज्या वयात कर्तृत्व गाजविले असे त्यांना वाटते त्याच्या दुपटीपेक्षा जास्त वयाचा मी आहे पण मी मात्र काहीही करण्याच्या लायक नाही असेच ते सारखे ठसवित राहतात. सतत नकारात्मक भूमिका. त्यांच्या या असल्या वागण्याने मला ना, जीवन सुंदर आहे वगैरे विचार, दंतकथाच वाटू लागल्या आहेत. कारण पहाटेपासून तो झोपेस्तोवर हे केवळ आणि केवळ नकारात्मकच बोलत असतात. हे वाईट, ते वाईट, कॉलनीमधे कुत्रे खूप भुंकतात पासून ते देशाच्या राजकारणापर्यंत हे केवळ वाईट काय हेच सांगत राहतात. कंटाळा येतो यार असले निगेटीव्ह विचार ऐकून. यांच्या असल्या वागण्यामुळे माझी बायकोही कायम चिडलेली असते. कारण हे सारखे तिच्या माय बापाचा उद्धार करतात. तिने बनविलेले जेवण त्यांनी एकदाही काहीतरी तृटी काढल्याशिवाय आजपर्यंत केले नाही. काहीना काही ते सांगतातच. शिवाय हे सांगताना त्यांची आई कसा छान स्वयंपाक करत होती या कथा सारख्या म्हणजे प्रत्येक पदार्थागणिक शंभरवेळा तरी ऐकून झाल्या आहेत. माझी मुले देखील त्यांच्याजवळ फिरकत नाहीत. कारण त्यांनाही ते कसे वाया गेलेले आहेत, सारखे मोबाईल बघत असतात, उद्धट आहेत, कामे करत नाहीत, आळशी आहेत असे बोल लावतात. म्हणजे मला पण यांच्याच शिस्तीत यांनी वाढविले व आमच्या पोरांना देखील यांचीच शिस्त, मग आम्ही कधी आमच्या पोरांना आमच्या पद्धतीने मोठे करायचे? सारे हेच करणार, सारे हेच सांगणार, सारे निर्णय हेच घेणार व यांना न विचारता जर काही ठरवले तर मग तर विचारुच नको. पन्नास वेळा देवाचा मोठ्या मोठ्याने धावा करून माझी किंमत संपली असे म्हणायचे व कुठून तो निर्णय घेतला असे आम्हाला जाणवूनच द्यायचे असा चंग त्यांनी बांधलेला असतो. कंटाळलो यार. खरंच. मी आता त्यांना माझ्याजवळ ठेऊ शकत नाही. तू एकदा बोलून बघ. त्यांना काही सांगता आले तर बघ. माझे तर डोकेच काम करत नाहीये. तावातावाने हे सारे बोलून त्याने फोन बंद केला कारण बहुदा रागामुळे व उद्वेगामुळे त्याला बोलणे जमत नव्हते. मी काकांशी बोलायचे ठरवले.
काका, वयाने व अनुभवाने आपण माझ्यापेक्षा फार मोठे आहात. आपल्याला काही सूचना करणे हे योग्य नाही पण केवळ एकच सांगतो, या जगात परफेक्ट कुणीच नाही. कारण देवाने परफेक्ट माणूस बनविलेलाच नाही. परंतू तरी देखील आपण या जगात समुह बनून राहू शकतो कारण एका छोट्याश्या गोष्टीचा वापर अनेक लोक करतात. ती म्हणजे आपल्याशी आपल्या सभोवतालचे लोक नीट वागत नसतील किंवा आपल्याला टाळत असतील तर त्यांच्याबद्दल मनात राग येऊ देण्याआधी स्वतःला एक छोटासा प्रश्न विचारायचा, माझे चुकतेय का? या प्रश्नाचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे माझे देखील चुकू शकते म्हणजे मी मिस्टर परफेक्ट नाही व ते मनाने स्विकारल्यावर मला माझ्या वागणूकीत बदल करता येऊ शकतात. आपण बदल केला की आपल्या सभोवतालची परीस्थिती आपोआप बदलून सुखद व्हायला लागते. काका विचारात पडले. तळहातांनी त्यांनी चेहेरा झाकून घेतला. कदाचित डोळ्यात अश्रू होते, पण त्यांना ते दाखवायचे नव्हते. त्यानंतर मी काही बोललो नाही. जरा वेळाने हळूच मला म्हणाले, खरंच चुकते यार आपलेही कधी कधी… मी हसलो… त्यानंतर काहीच सांगायची गरज नव्हती. काकांना समाधानी आयुष्य जगण्याची चावी सापडली होती.. त्या छोट्याश्या प्रश्नात!! तो प्रश्न होता, माझे चुकतेय का?
Yes 💯
ReplyDeleteखुप छान विचार
ReplyDeleteखूप छान सर, 🙏
ReplyDeleteKhup chan
ReplyDelete