थोडा है थोडे की जरुरत है @ 04.04.23
राईट टर्न
आज पुन्हा ४ एप्रील. मला आठवते ती ४ एप्रील २०१४ ची रात्र. दवाखान्यात वेटींग रुम मधल्या बाकड्यावर मी कसाबसा झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. दुपारपासून सुरु झालेली धावपळ शांत झाली होती. दवाखान्यात भरती करणे, आयसीयू मधे शिफ्ट करणे, नागपूरला सध्या नेण्याची गरज नाही अशी शाश्वती मिळणे, भेटायला येणाऱ्यांची गर्दी, असे कसे होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न, सारे सारे आटोपून आयसीयू मधे ते व बाहेर रात्री गरज पडली तर रहावे म्हणून मी असे दोघेच दवाखान्यात होतो. सारी धावपळ संपेस्तोवर रात्रीचा एक वाजला होता. त्यामुळे झोप लागण्याची वेळ टळून गेली होती. झोपण्याआधी एकदा आयसीयू मधे जाऊन मी त्यांना बघून आलो. ते शांतपणे झोपले होते. खरे तर बोलण्याची इच्छा होती परंतू झोप लागली असल्याने मी फक्त जवळ जाऊन उभा राहीलो. क्षणभर. त्यांना असे दवाखान्यात भरती झालेले मी कधीच बघितले नव्हते. माझ्या स्मृतीपटलावर ते चित्रच नव्हते. इतर कुणी भरती झाले असेल तर मात्र त्याची भेट घेण्याकरीता बाजूच्या बाकावर बसलेले मी त्यांना कित्येकदा बघितले होते. परंतू त्यांना असे बघवतच नव्हते. नर्स मला म्हणाली, तुम्ही आता आराम करा, काही लागले तर मी कळवते. त्यांच्या कपाळावर हात ठेवून मी बाहेर आलो. त्या बाहेरच्या बाकावर झोपण्याचा प्रयत्न केला परंतू झोपच लागत नव्हती. साधारण रात्री तीन साडेतीन च्या सुमारास झोप लागली. दुपारी चार वाजता त्यांना दवाखान्यात भरती केले व पहाटे पावणे चार वाजता नर्सने घाईघाईने मला उठवले. मी धावतच आयसीयू मधे पोहोचलो. डॉक्टर त्यांच्या छातीवर ह्रदयाला चार्ज करणारे पॅड्स लावून प्रयत्न करीत होते. काही वेळातच मला ते म्हणाले, आय ॲम सॉरी. आयुष्यात पहिल्यांदाच दवाखान्यात भरती होऊन केवळ बारा तासात ४ एप्रीलच्या रात्री पावणे चार वाजता माझ्या वडीलांनी, माझ्या दादांनी माझ्या डोळ्यांदेखत राईट टर्न घेतला. अगदी तस्साच जसा त्या लहान मुलाच्या आई बाबांनी घेतला होता.
आपल्या लहान मुलाला शाळेत सोडून ते आईबाबा सायकलवर बसून निघाले. तो मुलगा त्यांना बघत होता. सायकलच्या कॅरीयरवर बसलेली आई त्याला बघत होती. अचानक रस्त्यावर राईट टर्न आला. वळताना आई नि बाबा दोघांनीही त्या मुलाला टाटा केला व ते राईट टर्न घेऊन दिसेनासे झाले. त्यानंतर दुर्दैवाने ते कधीच परत आले नाही. त्यांचा अपघात झाला. रोज तो मुलगा शाळेच्या गेटजवळ उभा राहून त्या दिशेने बघायचा. त्याच्या मॅडमच्या ते लक्षात आले. त्यांनी त्याला समजावले. बघ बेटा, आई बाबा गेले नाहीत, त्यांनी फक्त राईट टर्न घेतला. ते आहेत. तू नीट बघ. तो बिचारा आश्वस्त झाला व त्याला त्यानंतर अनेक गोष्टी करताना, आपले आई बाबा दिसू लागले. ते आहेत ही भावना त्याच्या मनामधे बळावत गेली. युनीफॉर्म घालताना तो नीट परीधान केला पाहीजे हे सांगणारी आई त्याला आरश्यात त्याच्या मागे उभी दिसायची. उन्हाळ्यात आंबे खाताना, बेटा हा आंबा खा, फार गोड आहे हे सांगणारे बाबा त्याला दिसायचे. अश्या प्रकारे त्या मॅडमने त्याला सांगितलेल्या त्या राईट टर्न च्या संकल्पनेमुळे आपले आई बाबा आपल्या सोबत आहेत हे त्या मुलाला सतत जाणवित राहीले.
मी भाषण द्यायला उभा होण्याआधी माझा कागदावर लिहीलेला पूर्ण परीचय करून दिल्यानंतर ते सर म्हणाले, हा तर अविनाश सरांचा परीचय झालाच पण याहून महत्वाचा परीचय म्हणजे आपल्या कॉलेजमधे साधारण दहा वर्षांपूर्वी ज्या मोहरील सरांची भाषणे झाली होती व ती भाषणे ऐकून आपले विद्यार्थी अत्यंत प्रभावित झाले होते त्या सरांचे हे चिरंजीव आहेत. माझी ओळख अजूनही माझ्या वडीलांच्या नावाने केली जात होती याचा मला अतिशय आनंद झाला. त्यानंतर जवळपास दीड तास तेथील मुलांशी मी संवाद साधला. मुले मनापासून ऐकत होती. भाषण संपल्यावर सर्वांनी खूप टाळ्या वाजविल्या. मला निश्चितच आनंद झाला. पण एका गोष्टीने मात्र डोळ्यात अश्रू तरळले. या टाळ्यांच्या गजरात, त्या मोठ्या सभागृहात सर्वात शेवटी उभे राहून माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा आधार असलेले माझे दादा आनंदाने टाळ्या वाजवत होते. ४ एप्रील २०१४ रोजी रात्री पावणे चार वाजता त्या रुग्णालयात माझे दादा मला सोडून गेले नाही. त्यांनी केवळ एक राईट टर्न घेतला. आपल्याला सोडून जाणारे कायमचे निघून जात नसतात. केवळ राईट टर्न घेतात. दादा…. तुम्ही कायम सोबत आहात…. म्हणूनच आमचे सारे काही आहे..
निःशब्द!!!🙏🙏👍🙏🙏
ReplyDelete