थोडा है थोडे की जरुरत है

शब्दांच्या आड लपलेला भाव

हाडांच्या डॉक्टरच्या दवाखान्यात शिरतानाच एक मित्र वहिनी समोर बसलेल्या दिसल्या. माझ्यासोबत माझ्या बायकोला लंगडताना बघून मित्र म्हणाला, अरे! अजुनही संपलेच नाही का तुमचे नाटक? त्याचे ते वाक्य ऐकून वहिनी एकदम म्हणाल्या, काहीही काय बोलता हो? ती काय नाटक करतेय का? तो संवाद तेथेच संपला कारण मित्राला डॉक्टरांच्या केबीनमधे जावे लागले. आमचे काम आटोपल्यावर घरी परतताना त्या मित्राचा पुन्हा फोन आला. तो मला म्हणाला, यार! मघाशी मी वहिनींना एकदम नाटक वगैरे म्हणालो पण मी आपल्या नेहेमीच्या भाषेत आपण मित्राला वगैरे विचारतो तसेच वहिनींना विचारले. त्यांना वाईट वाटले असेल तर तू समजावून सांग, माझी भाषाच तशी आहे. त्यांना दुखविण्याचा हेतू नव्हता. गैरसमज नको व्हायला. मी त्याला म्हणालो, काळजी करु नको. गैरसमज वगैरे काही होत नाही. तिला माहित आहे. अश्या भाषेची तिला सवय आहे. तू पण गेटच्या आतला आहेस आणि गेटच्या आतील एक व्यक्ती आमच्या पण घरी आहे. काळजी करु नको. मला तर सवय आहेच कारण मी पण तिवश्याचा आहे

माझ्या मित्राला समजावताना मी ज्या परीसराचे किंवा गावाचे नाव घेतले त्यांची ही एक अफलातून विशेषता आहे. अमरावतीच्या जुन्या भागात राहणारे हे निवासी ज्यांना गेटच्या आतले असे विशेषण लावले जाते त्यांची भाषाच अशी रांगडी आहे. खरे तर नव्या शहरांमधील नव्या कॉलनींमधे आढळणार नाही एवढा एकोपा, सामाजिक सलोखा, एकत्रितपणे खूप गोष्टी करण्याची सवय या अनेक बाबी या परीसराला वेगळेपण प्रदान करतात. या परीसरात अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरे होतात. दोनशे महिला एकत्रित येऊन हळदी कुंकु करतात, अजुनही घरोघरी भुलाबाईची गाणी गायली जातात खिरापती बनविल्या जातात. सहजीवनाचे सुरेख दर्शन या परीसरात कायम घडत राहते. एवढे सारे एकत्रित सहभागाने जेव्हा होते याचाच अर्थ एकमेकांबद्दल स्नेह जपण्याचे कौशल्य एकमेकांना सोबत घेऊन चालण्याचे कसब देखील या मंडळींच्या ठायी आहे. फक्त ही मंडळी जेव्हा बोलतात तेव्हाच मात्र गोंधळ होतो. समाजमान्यतेच्या चौकटी काटेकोरपणे पाळणाऱ्या मंडळींना यांच्या भाषेमुळे नेमका भाव लक्षातच येत नाही. माझे बालपण ज्या गावाला गेले त्या गावाचेही असेच. निरातीशय प्रेम करणारी मंडळी परंतू भाषेचा लेहजा असा की त्याची सवय नसणाऱ्याला तो सारा प्रकार विचित्रच वाटतो. म्हणजे आपल्या घरी आग्रहाने बोलावणारा माझा तिवश्याचा मित्र मला म्हणतो, आता काय आवतन द्या लागते काय? हे घर तुयं नाही हाये काय? जास्त शायना झाला तू आजकाल. पायजो, यायचं असंन तं येजो नाही तं रायलं. आता अश्या पद्धतीने दिलेले निमंत्रण या असल्या भाषेची सवय नसणाऱ्याला जरा विचित्रच वाटू शकते. मला मात्र त्याच्या त्या रांगड्या भाषेतून एकच जाणवते की मी त्याच्या घरी यायलाच हवे ही त्याची मनोमन इच्छा आहे. परंतू त्याच्या त्या राकट जराश्या उर्मट वाटणाऱ्या भाषेमागचा भाव मला ओळखता येत होता कारण मी हीच भाषा ऐकत बोलत मोठा झालो आहे. परंतू अत्यंत सोफिस्टीकेटेड वातावरणात आणि बोलण्याचे सगळे मॅनर्स आणि एटीकेट्स अगदी लहानपणापासून पाळत आलेल्या व्यक्तीला हे गावरान बोलणे बोचते किंवा ते अवघडल्यासारखे होतात. त्यात त्यांचा दोष नसतो कारण भाषेच्या प्रत्यक्ष सादरीकरणावरूनच माणसाच्या योग्यतेचे लेबल ठरविणाऱ्या जगात ते सतत वावरत असतात त्यामुळे त्यांना या रांगड्या भाषेच्या मागे दडलेला भाव कळणे शक्य नाही. दुसरीकडे अशी खडबडीत भाषा बोलणाऱ्यांचाही दोष नाही कारण माणसाच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या परीसराचा लहानपणी जो पगडा बसतो तो कायमस्वरुपी असतो. अश्या मंडळींना सोफिस्टीकेटेड भाषेच्या वातावरणात सवय नसताना जर टाय बांधला तर कसे होईल तसे गुदमरायला होते.

भाषा रांगडी असो अथवा अलंकारिक, आपल्याला नात्यांमधला स्नेह जपता येणे महत्वाचे आहे. अन्यथा मोबाईलच्या या जगात ज्याप्रमाणे आपण बोलत असलेली मोठमोठी वाक्ये इमोजी मधे रुपांतरीत झाली आहेत त्याप्रमाणे नात्यांमधला स्नेह इमोजींसारखा तात्कालिक, सोईनुसार किंवा कामापुरता राहू नयेहे महत्वाचे.. होय ना?




Comments

  1. विषय साधाच पण अतिशय सुंदर सादरीकरण असल्याने लेख खूप आवडला.

    ReplyDelete
  2. खूप छान... विदर्भ म्हणा मराठवाडा किंवा अन्य कोणताही विभाग असू देत... प्रत्येक विभागात मराठी बोलली जात असली तरी तिचा बाज हा दर दहा कोसांवर बदलतो... पण त्या शब्दांमागील असलेल्या भावना मात्र सारख्याच असतात हे मात्र नक्की... जुन्या लोकांना हा बोलण्यातला sofisticated पणा आवडत नाही... गैरसमज करून घेणारे भरपूर असतात... कारण आजचा जमाना दिखव्याचा आहे... भावना समजणारे खूप कमी लोक राहिलेत.
    तुमची लेख लिहिण्यासाठी निवडलेला साधा सुधा विषय मनाला नेहमीच भावतो.
    🙏🙂

    ReplyDelete
  3. खुप छान, आपली भाषा आपणच जोपासली पाहिजे..

    ReplyDelete
  4. खुपच छान

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23