थोडा है थोडे की जरुरत है @ 14.02.23

तू कोण?

तू कोण आहेस? काय नाते आहे आपले? सांग ना कोण आहेस तू? माझे सारे जग व्यापून टाकले आहेस. तसे बघितले तर तू माझ्या सोबत नाहीस, कित्येक दिवस आपली भेट होत नाही, कामांच्या गडबडीत बोलणे देखील होत नाही. परंतू तू माझ्या सोबत आहेस ही जाणीव कायम मनाला धीर देते. खचून जायला होतं कधी कधी. संकटांची मालिका सुरू असते. एका पाठोपाठ एक काहीतरी वाईट घडत राहतं. लढाई सुरु असते. कधी कधी तर असे वाटते की देवालाही माझी परीक्षा घेणे आवडते म्हणून जरा श्वास घेऊ देत नाही. पण या सर्व लढायांमधे मला उभे राहता येते ते केवळ तुझ्यामुळे. जेव्हा अडचणींची अडथळ्यांची शर्यत पार करून करून दम भरून येतो निवांत जगण्यासाठी लागणारे श्वास कमी पडायला लागतात तेव्हामी तुझ्यासोबत आहे.. कायमहे तुझे वाक्य त्या राहीलेल्या श्वासांची भरपाई करते आणि मोकळे वाटायला लागते. या तुझ्या आधाराच्या ताकदीचे मला फार आश्चर्य वाटते. कसे काय जमते हे तुला? खरे तर माझ्या अडचणींचा पाढा एवढा मोठा असतो की त्यामधील काही उतारे मी तुझ्यापुढे वाचतही नाही. परंतू तुला कसे काय कळते की माझे मन खिन्न आहे ते? तुझ्याही विविध जबाबदारींमधून वेळ काढून फक्त माझ्यासाठी पाठविलेला तो छोटासा मेसेजनेमका अश्यावेळी येतो ज्यावेळी त्रागा सहन झाल्यामुळे मला मोठ्याने ओरडावे वाटत असते. पण त्या ओरडण्याऐवजी तुझ्या त्या वेड्या मेसेजमुळे चेहेऱ्यावर हास्य खुलतं आणि मला आंतर्बाह्य ओळखणारी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आहे या आनंदामुळे डोळ्यात आनंदाश्रु तरळतात. कोण आहेस तू? सांग ना!

एक आणखी विचार मनात येतो. तुझ्या माझ्या आयुष्यातील या अभिन्न अस्तित्वाचा विचार केला तेव्हा मला केवळ दुःखांचाच सामना करताना तुझी आठवण येते का? नाही तसे पण नाही. एखाद्या ट्रीपला गेल्यावर जेव्हा डोंगरांच्या कुशीमधे वसलेल्या एखाद्या गावी पुर्वेकडून हळूवार सूर्य उगवतो त्याच्या किरणांनी जेव्हा तो सारा मोहक हिरवागार परीसर झगमगायला लागतो तेव्हा आशाबाईंचे भिनी भिनी भोर हे गाणं गुणगुणल्या जाते.. त्या गाण्यातील गुलजार यांनी लिहीलेला प्रत्येक शब्द जो राहुल देव बर्मन यांच्या संगीताने भिजून आशाबाईंच्या सुरांनी न्हाऊन त्या झगमगत्या निसर्गाच्या रूपानं प्रत्यक्ष जगायला मिळतो तेव्हा हळूच तुझा आवाज ऐकायला येतो.. किती सुंदर आहे ना हे सारे. तो तुझा आवाज मनात उमटल्यावर अतिशय आनंद होतो की ज्या मानसिक पातळीवर हे सारे सुख माझ्याकडून अनुभवले जाते आहे तिच मानसिक पातळी असणारी एक व्यक्ती माझ्या जीवनात आहे. ही सुखाच्या अनुभुतीची सहसंवेदना देखील फारच विलोभनीय असते. अश्या अनेक आनंदांच्या क्षणी तुझे अस्तित्व जाणवते. एखाद्या प्रभावी सादरीकरणानंतर समोर वाजणाऱ्या टाळ्यांमधे दूरून तुझ्या टाळ्यांसोबत  तुझे शब्द.. ब्राव्होमला तुझा अभिमान आहे.. ऐकू येतात. रस्त्याने जाताना अचानक पाऊस सुरु होतो धावपळ करत आडोसा शोधताना परत तुझेच शब्दया पहिल्या पावसात चिंब भिजून घे.. शरीरासोबत मन देखील भिजण्याचा आनंद मिळेल.. ते ऐकले की मोकळ्या रस्त्यावर कश्याचीही पर्वा करता चिंब भिजत गाडी चालवतानाही तुझेच अस्तित्व जाणवते. तिखट पाणीपुरी खाल्ल्यानंतर जेव्हा ठसका लागतो.. तेव्हा हळू खावी पाणीपुरी.. एवढा खादाडपणा बरा नाही असे खट्याळ चिडविणेही तुझेचएवढं माझं आयुष्य व्यापलंय तू. तू कोण आहेस? आपले नाते काय आहे? परंतू अश्या पद्धतीने संपुर्ण जीवन व्यापून टाकण्याला कायम मिळणाऱ्या मनःस्वी सोबतीला जर प्रेम म्हणत असतील ना.. तर असे प्रेम मला मान्य आहे कारण ते प्रत्येक श्वासासोबत आहे शेवटच्या श्वासापर्यंत राहील ही खात्री देखील आहे.

मंडळी, वर लिहीलेले सारे काही मनापासून वाचले? आता सांगा बघू हे सारे तो म्हणतोय कि ती? बरे हे प्रियकर बोलतोय की प्रेयसी? कि एक मित्र दुसऱ्या मित्राला? कि पती पत्नीला? नेमके काय ते कळणारच नाही कारण हे खऱ्या खुऱ्या प्रेमाचे बोल आहेत. ते कुणीही कुणालाही म्हणू शकतं. कारण ते विशिष्ट हेतू, फायदा, किंवा स्वार्थ यापैकी कश्याचाही लवलेश नसलेले विचार आहेत. हे फार आदर्शवादी वाटत असले तरी अश्या प्रेमाची साथ कुणालाही आयुष्यात मिळणे ही फार जमेची सुखमय बाब राहू शकते. प्रेमाचा खरा अर्थ ज्याला उमगतो त्या व्यक्तीला हे सुख प्राप्त होऊ शकते. ते सुख आपल्यापैकी प्रत्येकाला प्राप्त होवो या जागतिक प्रेमदिवसाच्या निमीत्ताने शुभेच्छा!!





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23