थोडा है थोडे की जरुरत है @ 21.02.23

पत्थरोंका दर्द

एक फार सुंदर गाणे इतक्यातच ऐकण्यात आले. पॅपॉन या गायकाने हे गाणे गायले असून विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाली याचे संगीत या गाण्याला आहे. गाणे पहिल्यांदा जेव्हा मी ऐकले तेव्हा त्या गाण्याच्या मी प्रेमातच पडलो. गाण्याची धून, गायकाचा आवाज यासोबत माझ्या मनात राहीले ते या गाण्याचे शब्द. खरोखरीच गीतकार गीत किंवा कविता लिहीताना सभोवतालच्या जीवनाचे बारकाईने निरीक्षण करून भावना व्यक्त करतात. त्यांनी लिहीलेल्या भावना बरेचवेळा आपल्याच असतात किंवा इतरांमधे आपल्याला त्या आढळतात. गाण्याच्या सुरुवातीलाच असे लिहीले आहे,

दर्द पत्थरोंको भी होता होगा

किसी को क्या पता

चुपके चुपके समंदर भी रोता होगा

किसी को क्या पता

त्या दिवशी समीरच्या आग्रहाखातर मी त्याच्या सोबत जेवायला गेलो. त्याचा आग्रह होता की मी त्याच्या सोबत जेवण घ्यावे. जेवण हे केवळ निमित्त होते. त्याला मुळात काहीतरी बोलायचे होते. जेवण करताना सुरुवातीला शिळोप्याचा गप्पा सुरु होत्या. पण एक गोष्ट मात्र तो सारखी करत होता. ती म्हणजे मधूनच तो टेबलवर जोरात हात आपटत होता. अगदी इजा होईल एवढ्या जोरात. हात आपटण्याची वेदना त्याच्या चेहेऱ्यावर देखील दिसत होती. मी ते बघत होतो. बरेच वेळा तो प्रकार झाल्यानंतर शेवटी राहवून मी त्यांस विचारलेच. हे काय करतो आहेस तू? किती जोराने हात आपटतो आहेस. लागेल ना. तो काही बोलला नाही पण पुन्हा त्याने एकदा हात आपटला. मग मात्र मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्याला विचारले, काय झालेय? कशाला स्वतःला शिक्षा करतोय? कशाचे एवढे वाईट वाटतेय तुला? आता मात्र त्याचा चेहेरा बदलला. तो जवळपास रडवेला झाला. त्याच स्वरात तो मला म्हणाला, मी फार वाईट माणूस आहे रे. मी माझ्या बायकोला फार त्रास देतो. फार बोलतो मी तिला. तिला कोणत्याही प्रकारचे सुख देत नाही. ती वाट बघत राहते की मी एखाद्या दिवशी तरी नवऱ्यासारखा वागीन पण मी तसा वागतच नाही. मी तिला गुलाम बनवून ठेवलेय. माझ्या तालावर तिने नाचायचे. मी तिचा मालक आहे असेच मी वागतो. माझे सारे बोलणे खाऊन, माझे सारे ताण तणाव सांभाळून ती माझे सारे सारे करते परंतू मी तिचा केवळ अपमानच करतो. मी फार वाईट माणूस आहे रे. असे मला सांगून त्याने पुन्हा टेबलवर हात आपटला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. समीरचे हे रुप मला देखील संपुर्णपणे नवीन होते. समीर म्हणजे अत्यंत रॅशनल विचार करणारा, कुणाचीही पर्वा करणारा, डेअर डेव्हील (डीडी) ही उपाधी असणारा, इमोशनल होणे वगैरे बायकी धंदे आपल्याला जमत नाही असली टीपीकल पुरूषी वाक्ये वारंवार तोंडावर फेकणारा, एक घाव दोन तुकडे करणारा केवळ आपल्याच मर्जीचा मालिक अश्या पद्धतीचे व्यक्तीमत्व धारण केलेला मित्र हेच मलाही माहित होते. आजचा समीर फारच वेगळा होता. आज तो फार मनापासून बोलत होता. बरेच वेळा दारू पिल्यावर अनेकांना अशी उपरती होते परंतू आज समीरच्या बाबतीत तसेही काही नव्हते. कारण मी त्याला माझ्यासमोर जास्तीत जास्त लेमन सोडा पिण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे आज त्याचे बोलणे हे मनापासून होते. बायकोवर करीत असलेल्या अन्यायाची त्याला जाणीव झाली होती. काही क्षणातच त्याने स्वतःला सावरले आणि यार हे कुणाला सांगू नको. मी रडलो हे तर बोलूच नको. माझ्या इमेजचा प्रश्न आहे. तू आपला वाटतो म्हणून बोललो. त्याला मी म्हणालो, समीर मी कुणालाही सांगणार नाही पण तू मात्र हे सारे एकदा तुझ्या बायकोला सांगायला हवे. तुला जर तिच्याशी वागण्याचा पश्चाःत्ताप होत असेल तर तिलाच हे सांगायला हवेस. त्यात कसला आलाय इगो? एकदा तिला समोर बसवून हे सारे सांग त्यानंतर चांगला वागण्याचा प्रयत्न कर.

समीर बोलला की नाही मला माहित नाही. परंतू अत्यंत कठोर दगडी मनाच्या एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा असाही एखादा हळवा कोपरा असू शकतो हे मात्र त्या दिवशी जाणविले. कवी खरच बरोबर लिहितो..

दर्द पत्थरोंको भी होता होगा… 

किसी को क्या पता..

चुपके चुपके समंदर भी रोता होगा

किसी को क्या पता..





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23