थोडा है थोडे की जरुरत है @ 07.02.23

एकच शब्द उच्चारा..

मला असे वाटतेय अविनाश की मी माझ्याच लोकांपासून तुटतोय. याचे कारण देखील मला कळतंय. चाळीस वर्षांहून अधिक काळ शिक्षक म्हणून काम केल्यामुळे मला तेवढे निश्चित कळतेय. पण माझे माझ्या स्वतःसोबत एक द्वंद्व सुरु आहे. ज्या वैचारिक प्रक्रीयेला मी आजपर्यंत जपत आलो आहे, ज्या संस्कारांना मी उराशी बाळगून मी एवढी वर्षे आयुष्य घालविले आहे. ज्या गोष्टी आयुष्यभर जपण्यासाठी मी कधीही कोणत्याही प्रकारची तडजोड केली नाही त्याच गोष्टींबाबत मला आता माझ्या उतारवयात तडजोड करावी लागत असेल तर मग माझा संताप होतो. काही गोष्टी या नाही पटत म्हणजे नाहीच पटत तर मी काय करावे? माझे संपुर्ण जिवन मी स्वतः उभे केले. आई लहानपणीच गेली होती. लोकांकडे वार लावले असत. त्यांच्याच भरवश्यावर मी शिक्षण घेतले, मोठा झालो अत्यंत सचोटीने नोकरी केली. माझे अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्दयावर आहेत. अजुनही मला भेटतात तर वाकून नमस्कार करतात मला म्हणतात की सर, तुमच्यामुळेच मी आज माझ्या आयुष्यात घडू शकलो मोठा होऊ शकलो. मग ही उदाहरणे बघितल्यावरही माझी वैचारिक प्रक्रीया चुकीची असेल का? एवढ्या लोकांना घडविणे हे काहीच महत्वाचे नाही का? पण हे काहीही गृहित धरता, माझ्या जवळचे लोक मात्र माझ्या विचारांचा आदर करत नाहीत. माझ्या घराबाबतच्या अपेक्षांना मानत नाहीत. परीणामी मी त्यांना या बाबत सुनावतो मग ते पुन्हा माझ्यापासून दूर जातात. एकंदरीत फार अवघड होऊन बसलंय सर. अहो मनाला मुरड घालायची तरी किती? नाही सहन होत आता. असे वाटते की आपल्या वैचारिक अधिष्ठानाशी प्रतारणा करण्यापेक्षा मृत्यू आलेला बरा. तो देखील लवकर येत नाही. आत्महत्या करयला मन धजावत नाही. मनावर फार ओझे आहे अविनाश. तुम्ही सांगा काय करु?

माझ्या समोर बसलेले ते आजोबा त्यांची व्यथा सांगत होते. मला तर असे वाटले की त्यांच्या वयाच्या अनेकांची व्यथा ते बोलून दाखवित आहेत. आजोबा शांत झाल्यावर मी त्यांना सांगितले की मी तुम्हाला फक्त तीन प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नांची उत्तरे मनापासून विचारपूर्वक देण्याचा प्रयत्न करा. ती जर तुम्हाला देता आली तर तुमच्या समस्येचा उपाय तुम्हीच शोधू शकता. पहिला प्रश्न, तुम्ही ज्या वैचारिक प्रक्रीयेचा वारंवार उल्लेख करीत आहात ती जगातील सर्वोत्तम वैचारिक प्रक्रीया आहे याचे काही प्रमाण किंवा पुरावा आपण देऊ शकता का? दुसरा प्रश्न, आयुष्य संपताना तुमच्या कोणत्या नि कशाप्रकारच्या स्मृती तुमच्या आप्तेष्टांनी जपाव्यात असे तुम्हाला वाटते? तिसरा प्रश्न, घरातील सर्वात ज्येष्ठ म्हणून आपली नेमकी कोणती भुमिका असायला हवी? माझे तिनही प्रश्न ऐकून आजोबा जरा विचारात पडले. स्वतःचीच वैचारिक प्रक्रीया धोक्यात आहे असे कायम वाटल्याने त्यांनी तसा काही विचार केला नसावा. जरा वेळाने आजोबा म्हणाले, तुम्हाला नेमके काय म्हणायचे आहे हे मला कळले नाही. मला प्रश्नांची उत्तरे माहित आहेत परंतू ती उत्तरे योग्य असतील अशी खात्री मला वाटत नाही म्हणून ती द्यायला माझे मन धजावत नाहीये. आजोबांचा नेमका काय गोंधळ उडालाय ते माझ्या लक्षात आले. त्यांना जास्त ताण देता मी त्यांना म्हणालो, आजोबा, मी ही उत्तरे देऊ शकतो परंतू तुमची ऐकण्याची तयारी हवी. त्यांनी मान डोलावली.

मी उत्तरे दिली. आपल्या वैचारिक प्रक्रीयेपेक्षा इतर कुणाची वैचारिक प्रक्रीया चांगली असू शकते यापेक्षाही ती असू शकते हेच तुम्ही मान्य केलेले नाही. त्यामुळे जीवाचा आटापीटा करुन, त्रागा करून, तुम्ही आपलेच म्हणणे खरे करत आलात उगाच वाद नको म्हणून इतर लोक चूप बसले ज्याला तुम्ही तुमचा विजय समजलात हीच मोठी चूक झाली. त्यामुळेच तुमच्या रागावण्याच्या, ओरडण्याच्या, जिव्हारी लागेल असे बोलण्याच्याच स्मृती लोकांनी तुमच्या पश्चात लक्षात ठेवाव्या का याचा विचार करा कारण सध्या तरी त्याच स्मृती जास्त ठळक आहेत. आणि शेवटचे म्हणजे घरातील ज्येष्ठ म्हणून यापुढे स्वतःच्याच वैचारिक प्रक्रीयेला लादता, एकच शब्द वारंवार उच्चारा, छान. सोबतच्या लोकांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीला छान एवढीच प्रतिक्रीया द्या. अगदीच आवडले नाही तर प्रतिक्रीया देऊ नका. पण एक तर छान किंवा मौन हे दोनच पर्याय अनुसरा. आयुष्याचे  किती दिवस राहीलेत हे कुणालाच ठाऊक नसते. म्हणूनच आपल्या पश्चात बाकी काही लक्षात राहण्यापेक्षा आपण म्हणलेले छान-छान लक्षात राहीले तर ते मनापासून जपले जाईल अन्यथा इतर कटू बोलणे त्यासोबत आपणही स्मृतीतून पुसले जाऊ. निर्णय आपला आहे

आजोबांच्या डोळ्यात पाणी आले होते. काहीच बोलता ते उठले निघताना माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, अविनाश…. छान!!





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23