थोडा है थोडे की जरुरत है @ 12.04.22

फोटोग्राफिक लग्न

ज्यावेळी .. १८०० मधे थॉमस वेगवूड याने पहिला फोटोग्राफ निर्माण केला त्यावेळी त्याने जगामधे एक प्रचंड मोठी क्रांती आणली. त्याचे कारण त्या फोटोग्राफमुळे मनावाला जगून गेलेले क्षण जपता येऊ लागले. मानवाच्या विकासाच्या दृष्टीने तो फारच महत्वपूर्ण शोध होता. तसे तर कालचक्र सर्वश्रेष्ठ असून त्याच्या गतीपुढे कुणाचेही काहीही चालत नाही. गेलेला क्षण कधी परत येत नाही. हे जरी खरे असले तरी वेगवूडच्या शोधामुळे गेलेल्या क्षणांना फोटोग्राफच्या रुपात पकडून ठेवणे परत परत त्या क्षणांना मानसिकदृष्टीने अनुभवणे हे एक सुख आपल्या सर्वांना लाभले. खरोखरीच ही आपल्या सर्वांकरीता निघून गेलेले क्षण परत अनुभवण्याची संजिवनीच ठरली. यामुळे काही महत्वाचे क्षण कायमचे आपल्याजवळ रहायला लागले. हळू हळू या तंत्रामधे प्रगती विकास होत गेला आणि मग त्याची विविध रुपे आपल्यासमोर येऊ लागली. एका मोठ्या कॅमेरातून काढलेले ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो, मग रंगीत फोटो, मग लग्न समारंभांचे अल्बम, ते कॅमेराचे रोल, त्याचे फोटो करून आणणे, त्याची वाट बघणे, मग डीजीटल फोटो असे करत करत आपल्या जिवनातील वेगवेगळे प्रसंग अश्या माध्यामातून जतन करण्याची एक छान पद्धत सुरु झाली. एकविसाव्या शतकात तर अचानक काही कोटी जनता फोटोग्राफर झाली कारण सर्वांच्या हातात मोबाईल फोन आला त्यामुळे प्रत्येकालाच फोटोग्राफी आवडू लागली. त्यानंतर सेल्फीचा जन्म झाला मग सुरु झाला एक झंझावात. क्षणांना कॅमेरामधे पकडणे एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरु झाले की क्षण पुढे सरकता त्याच जागी थांबलेत की काय असे वाटू लागले. पण सर्वात जास्त बदल झाला तो आपल्याकडील समारंभांमधे. नुकतेच एका लग्नात जाण्याचा दिवसभर तेथे थांबण्याचा योग आला. ते लग्न म्हणजे फोटोग्राफीक लग्न होते असेच मला वाटू लागले. लग्न हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील एक महत्वाचा क्षण असतो त्या क्षणांना फार सुंदर प्रकारे असे कॅमेराबद्ध करून ठेवणे ही बाब खरोखरीच छान होती. परंतू लग्न आहे म्हणून फोटोग्राफी की फोटोग्राफी करायची आहे म्हणून लग्न असा प्रश्न माझ्यासकट अनेकांना तेथे पडला. खरे तर माझे अनेक फोटोग्राफर मित्र मंडळी आहेत त्यांच्या सुंदर कामाबद्दल मी नेहेमीच कौतुकाने बोलत असतो. परंतू एक मूळ कन्सेप्ट कायम लक्षात ठेवण्याची गरज आहे असे मला वाटते. आजकाल लग्नाच्या फोटोग्राफीचे पॅकेज असते. त्या पॅकेजमधे चार किवा पाच फोटोग्राफर वेगवेगळ्या ॲन्गलने त्या संपुर्ण प्रसंगांचे फोटो काढत असतात. सुरुवातीला कॅमेरात रोल होते त्यामुळे किती फोटो काढायचे हे सांगितलेले असायचे. त्यामुळे एकच कॅमेरा संपुर्ण लग्नाचे एकूण फोटो ७२ असायचे. दोन रोल. आता डीजीटल फोटोग्राफी असल्याने संख्येची मर्यादाच नाही. आता ३२ जीबीचे दोन कार्ड असले तरी प्रत्येक कॅमेरातून दिड हजार या हिशोबाने संपुर्ण लग्नाचे सात साडेसात हजार फोटो निघतात. त्यानंतर त्यातून हवे ते फोटो निवडून त्याचा अत्यंत सुंदर अल्बम केला जातो. फुल पेज फोटो, ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो, त्याचे वेगवेगळे कॉम्बीनेशन्स, सारे काही अत्यंत सुंदर देखणे. लग्न समारंभाच्या स्मृती एवढ्या सुंदर राहतात की काय सांगावे. अर्थात त्यानंतर सध्या अनेकांचा संसार त्यासारखा सुरेख रहात नाही ही सध्याची आपल्या देशातील आकडेवारी सांगते. तो मुद्दा वेगळा आहे. परंतू फोटो काढताना ते किती कसे काढले जावे याचे काही मापदंड ठरविण्याची गरज आहे असे मला त्या लग्नामधे मनापासून जाणविले

लग्न सोहळा ही एक भावनांची गुंतणूक असते. त्या लग्न सोहळ्यामधे जे विधी केले जातात त्यांना एक अर्थ आहे. त्यामधे एक शास्त्र आहे म्हणूनच त्याला संस्कार म्हणतात. त्या संस्कारांमधील भाव जर सहा सात कॅमेराच्या गराड्यात टेक रीटेकच्या भानगडीत संपून जात असेल तर कसे व्हावे. अंतरपाट दूर होण्याआधी हाती हार घेऊन उभी असलेली ती दोघे नेमके कोणत्या मनःस्थितीत असतात. मंगलाष्टके म्हणली जाताना वधूपित्याच्या मनात काय भाव असतो. मला अजूनही आठवतं, अमरावतीलाच एका मित्राच्या बहिणीच्या लग्नामधे अमरावतीचे सुप्रसिद्ध संगीत गुरुवर्य मनोहरराव कविश्वर यांनी मंगलाष्टके म्हणली होती. त्यांच्या त्या स्वरांचा परीणाम एवढा जास्त होता की मंडपातील प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी तराळले होते. मुलीच्या आईच्या भावना व्यक्त करणारे मंगलाष्टक जेव्हा बाबा कविश्वर गात होते तेव्हा सर्वांना गहीवरून आले होते. त्यानंतर एकमेकांच्या गळ्यात वरमाला घालताना सर्वांच्या साक्षीने ती दोघे एकमेकांची होताना तो क्षण फोटोग्राफरने स्वाभाविकपणे टीपायला हवा तेच त्याचे कसब आहे. त्या हार घालण्याचे एवढे रीटेक या लग्नात होत होते की पाच मिनीटे सर्वजण खोळंबून पुन्हा पुन्हा हार घालणे बघत होते. या असल्या गोष्टीमुळे त्या क्षणी त्या दोघांच्या त्यांच्या स्नेही मंडळींच्या मनातील भावनांचे काय होत असेल. तोच प्रकार सप्तपदीच्या वेळी. एक पाऊल ओलांडताना तिचे जरा चुकले तर फोटो चांगला यावा म्हणून ते पाऊल पुन्हा ओलांडायला लावणे ही काय गोष्ट आहे? खरे तर पाच किंवा सहा कॅमेरे असताना कोणत्या ना कोणत्या कॅमेरातून तो क्षण योग्य टीपलाच जावा. परंतू तसे झाल्यासही काही फार बिघडणार नाहीये. सप्तपदीमधे सातवेळा पाऊल उचलले जाणार आहे सातही वेळाचे फोटो अप्रतिम आले तरच पैसे मिळतील असा कुठे करार नसणार. परंतू प्रत्येक प्रसंगाचे असणारे पावित्र्य त्यामागील भावभावना जपणे हे देखील गरजेचे आहे. म्हणजे होम सुरु असताना मधेच गुरुजींचे मंत्र थांबवून त्या होमाच्या बॅकग्राऊंडवर वधुचे फोटो छान येत आहेत म्हणून पंधरा मिनीटे फोटोशुटच चालले. तोवर गुरुजींचे मंत्र थांबलेले. बरे, आजकाल कदाचित गुरुजींनाही याची सवय झाली असावी त्यामुळे ते देखील या ॲन्गलने फोटो काढा म्हणजे छान येईल अशी सूचना करत होते. त्या होमाचे काय महत्व आहे. सप्तपदीची सात पावले चालत असताना ज्या सांसारिक जबाबदाऱ्यांच्या निर्वहनाची वचने एकमेकांना द्यायची असतात त्याचे काही महत्व आहे की नाही? सर्वात कहर तर तेव्हा झाला जेव्हा वरातीच्या वेळी ती वधू आपल्या वडीलांना भेटली. दोघेही एकमेकांना बिलगून रडू लागले. त्या पित्याची पोर त्याला सोडून जात होती. स्वाभाविकच अत्यंत हळवा क्षण होता. नेमके यावेळी सारे फोटोग्राफर त्या ठिकाणी नव्हते. ती आपल्या वडीलांना भेटून भावाला भेटायला गेली, त्यावेळी ते सारे धावले. मग त्यांच्या लक्षात आले की वडीलांची भेट हा फोटो राहीला. त्याकरीता त्यांनी त्या वधुला पुन्हा वडीलांकडे जायला सांगितले त्या भेटीची पोज सांगून मग धडाधड फोटो निघाले. हे काय आहे? सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी त्या लग्नात हजर होतो परंतू आमच्यापैकी सर्वांना त्या लग्नातील फक्त फोटोग्राफीच लक्षात राहीली. या फोटोंव्यतिरीक्त प्रत्येकाच्या मोबाईलमधून काढल्या गेलेले फोटो तर मी मोजलेत नाही. लग्नात आलेल्या सर्व मंडळींच्या वेगवेगळ्या मोबाईलमधून काढल्या गेलेल्या फोटोंची संख्या जर यात समाविष्ट केली तर त्या चोवीस तासात त्या प्रसंगांचे किमान पंचेवीस हजार फोटो तरी काढले गेले. लग्नाचे फोटो की फोटोकरीता लग्न हा प्रश्न राहून राहून मनात येतो.

फोटोग्राफी अत्यंत सुंदरच व्हायला हवी. त्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे वापरले जावे. परंतू हे जमेल तेव्हडे सहज व्हावे. सोबतच ज्यांनी हा करार केलेला आहे त्या ग्राहकाने देखील त्या फोटोग्राफरला सांगावे की काही प्रसंग सुटले तरी चालतील पण सर्व फोटोग्राफी मुद्दाम केल्यासारखी वाटता सहज वाटावी. फोटोग्राफी हा लग्न संस्कारांच्या भावना जगण्यामधील अडथळा बनू नये. ती एक सहज प्रक्रीया जर झाली तर त्याचा आनंद फार जास्त राहील आणि सहजतेने टिपलेले ते क्षण मनाला जास्त भावतील. किंबहुना असे सहजतेने टिपलेले क्षणच फार सुंदर दिसतात. तेच टिपायला खऱ्या फोटोग्राफरचा कस लागतो. त्यालाच आमचे मित्र मंडळी कॅन्डीड फोटोग्राफी म्हणतात ना? तसे सारेच कॅन्डीड होऊ द्यावे वधु वरांना त्या लग्न संस्कारांना केवळ उपचार वाटू देता त्याचे महत्व देखील कळू द्यावे. सर्वांनीच याचा किमान विचार तरी करावा, होय ना?





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18