थोडा है थोडे की जरुरत है @ 19.04.22

गुंतण्याचा गुंता

मराठी भाषेचे वैभव अनेक वेळा आपल्याला जाणवित असते. या संदर्भातल्या वेगवेगळ्या पोस्ट देखील आपण एकमेकांना पाठवित असतो. हे खरेच आहे की मराठी भाषेची लवचिकता वाखाणण्यासारखीच आहे. आता बघा ना, गुंतणे गुंता हे दोन शब्द किती एकमेकांच्या जवळचे आहेत. परंतू या दोन्ही शब्दांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. किंबहुना एक शब्द म्हणजे प्रक्रीया आहे आणि दुसरा म्हणजे बरेचवेळा त्या प्रक्रीयेचा शेवट

व्याख्यान आटोपून मी सर्वांना भेटायला मंचावरून खाली आलो तेव्हा ती आजी हळू हळू चालत माझ्याजवळ आली. व्याख्यान देत असताना मला तिचे अस्तित्व जाणविले होते कारण माझ्या बोलण्याला ती मनापासून दाद देत होती, काही उदाहरणे ऐकून डोळे पुसत होती. एकंदरीत मी जे दोन पिढ्यांच्या वागण्यासंबंधी बोलत होतो ते तिला पटत होते. तिचा प्रतिसाद बघून मला बरे वाटत होते. त्यामुळे तिच्याशी बोलण्याची माझी इच्छा होतीच. माझ्याजवळ आल्यावर ती मला म्हणाली की तुम्हाला भेटायला बरेच लोक थांबलेत. परंतू त्या सर्वांशी भेट झाल्यावर मला तुमची पाच मिनीटे हवी आहेत. तुम्हाला लगेच गावाला परत जायचे आहे परंतू तरी देखील तुमची पाच मिनीटे हवीत, मी वाट बघते. असे म्हणून ती आजी सभागृहाच्या कोपऱ्यात बसली. इतर लोकांशी माझे बोलणे झाले साधारण पंधरा मिनीटानंतर मी त्या आजीला भेटायला गेलो. आयोजकांना मी जरा थांबायला सांगितले तिच्याजवळ बसलो. ती मला म्हणाली, आज तुम्ही जे बोललात ते माझ्या घराचेच वर्णन आहे असे मला वाटत होते. परंतू मला आता काही कळेनासे झालेय. काही सुचत नाहीये म्हणून मला जरा तुमचा सल्ला हवाय. खरे म्हणजे आपल्या घरात, घरातल्या व्यक्तींमधे, त्यांच्या कामामधे गुंतणे हे चांगले असते ना? आपल्या देशाच्या सामाजिक परिस्थीतीचा विचार करता आपण सारे असे एकत्र एकमेकांमधे गुंतलेले असतो तेच आपले बलस्थान आहे ना. माझे देखील तसेच आहे. मी माझ्या परीवारामधे मनापासून गुंतली आहे. सुरुवातीपासूनच माझे घर माझे कार्यक्षेत्र राहीले आहे. घराची शिस्त, घराचे संस्कार, घराचा विकास, घरातील सर्वांचा विकास याबाबतीत मी मनापासून लक्ष दिले त्यामुळे मी या सर्व प्रक्रीयेमधे पूर्णपणे गुंतून गेली. नाही म्हणायला काही बाहेरची कामे, थोडीशी व्यस्तता, एक  महिला मंडळ असे माझे छोटेसे वर्तुळ होते. परंतू मुख्यत्वे करून माझे घर त्या घरातील माणसे हेच माझे कार्यक्षेत्र आहे. घरातील प्रत्येकाच्या सर्व गोष्टींमधे प्रक्रीयेमधे माझा सहभाग कायम राहीला आहे. त्यामुळे नकळतच त्या सर्व प्रक्रीयांचे नेतृत्व देखील माझ्याकडेच राहीले आहे. त्यामुळे अजूनही मला त्या सर्व प्रक्रीया माझ्या पद्धतीने व्हाव्यात केल्या जाव्यात असे वाटते. कारण शेवटी घर म्हणजे काही विटा सिमेंटच्या भिंती नाहीत ना? त्या घराला एक घरपण मिळते ते विशिष्ट पद्धतीमुळे. ती पद्धत, ती प्रक्रीया फार सचोटीने मी राबविली. घरातल्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक वस्तुला, तिच्या जागेला, माझ्या विचारांचा स्पर्श आहे. त्यामुळे मी ते सारे फार नेटाने निभावले. परंतू आता माझ्या मनाचा गोंधळ उडाला आहे. आता घरी सुना आल्या, त्यांची व्यक्तिमत्वे वेगळी आहेत, जे अत्यंत स्वाभाविक आहे. त्यांनी माझ्या सर्व पद्धती पुढे चालविण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. परंतू कधीकधी मला त्या पद्धती आवडत नाहीत. अश्यावेळी मला माझे या सर्व प्रक्रीयेमधे गुंतणे चूक आहे का असे वाटायला लागले आहे. एवढे गुंतलेच नसती तर मग मला या सर्व गोष्टींचा त्रास झाला नसता असे मला वाटते. एका बाजूने मी जे काही केले त्याबद्दल अभिमान वाटत असताना माझ्या विचारकक्षेच्या पलीकडचे काहीही मला सहनच होईनासे झालेय. त्यामुळे माझा संभ्रम फार वाढलाय. त्यामुळे मला वेदना होतात. त्रास होतो. आनंदी राहता येत नाही. जेव्हा मी या सर्व बाबींचा विचार करते तेव्हा अशी घरच्या बाईची योग्य गुंतणूक नसलेली त्यामुळे विस्कळित झालेली घरे मला दिसतात. त्यामुळे माझे गुंतणे योग्य होते असे माझे ठाम मत आहे. परंतू कधी नव्हे तो मला माझ्या गुंतण्याचा त्रास होतो आहे त्यामुळे मला तुमच्याशी बोलायचे होते. माझे आयुष्य तसे अगदी व्यवस्थित सुरु आहे. मला असे वाटते की पुरुषांपेक्षा बायकांना हा त्रास होत असावा. कारण माझ्या महिला मंडळातल्या बऱ्याच मैत्रीणी हेच बोलत असतात. नेमका काय गोंधळ होतोय तेच कळत नाहीये. ज्यांच्यामधे मी गुंतलेय ते सर्व माझेच आहेत, माझ्यावर प्रेमही करतात, सारे काही छानच आहे. हे केवळ तुम्हाला सांगण्यासाठी म्हणून नाही तर ते तसे खरोखरीच आहे. काही घरांमधे कायम असलेले तणाव नात्यांचे विस्कटलेलेपण बघितले की मला माझ्या घराच्या चांगुलपणाचे कौतुकच वाटते. परंतू तरी देखील माझ्या मनातला गोंधळ कमी होत नाही. मनाविरूद्ध गोष्टी झाल्या की मी त्या सहन करु शकत नाही. त्याबद्दल बोलले जाते. परंतू मी मनाला आवर घालून जर बोलली नाही तर त्याचा मला त्रास होत राहतो. त्याचा परीणाम प्रकृतीवर होतो मग पुन्हा आपल्यामुळे सर्वांना त्रास होतोय याचेही वाईट वाटत राहते. नेमके काय चुकतेय हेच कळत नाही. परंतू त्रास होतो, आपण या सर्व गोष्टींमधे उगाच गुंतलोय म्हणून हे सारे सोडून निघूनही जावे वाटते. काही वेळाने त्याबद्दलही वाईट वाटते. मी का सोडून जायचे, ही माझी गुंतणूक आहे असेही वाटते. अश्या सर्व बाबी मनात गोंधळ माजवीत आहेत. माझ्यावर प्रेम करणारे सारेच मला समजाविण्याचा प्रयत्न करतात. मला ते सारे पटतेही. परंतू माझे अस्तित्व तर आहेच ना? माझ्या शरीरात विचार करणारा मेंदू तर आहेच ना? त्यामधे विचार येत राहतात. ते मला बेचैन करतात. माझे पती मात्र फारच समाधानी असतात. त्यांना हे प्रश्नच पडत नाहीत. ते मला समजावून देखील सांगतात. परंतू माझ्या गुंतणूकीबद्दल काय? असे मी त्यांनाही वारंवार विचारत राहते. मी माझे संपुर्ण आयुष्य या गुंतणुकीकरीता दिले आहे. मला अनेकांनी सल्ला दिला, तू सर्व गोष्टींमधून लक्ष काढ, जुन्या काळात वानप्रस्थाश्रम याचसाठी होता वगैरे. त्या व्हॉट्स ॲपवरही माझ्या मैत्रीणी काही काही पोस्ट किंवा व्हीडीयो पाठवतात की संसाराचे पाश तोडायला हवे. गुंतलेले मन काढून घ्यायला हवे. परंतू हे शक्य आहे का हो? ही गुंतणूक म्हणजे काय बॅंकेत पैसे ठेवून केलेल्या गुंतणुकी सारखी आहे का? फिक्स डीपॉजीट मॅच्युअर झाले की मुद्दल व्याज घेऊन मोकळे. असे शक्य नाही. ही गुंतणूक मनाची, प्रेमाची, सहवासाचीअगदी खरे सांगायची तर आयुष्याचीच आहे. ती सुटणार कशी? तुम्ही मला सांगा. माझे हे गुंतणे चूक आहे की बरोबर? तुमच्या भाषणात तुम्ही असे म्हणालात की ज्येष्ठांनी लक्षात घ्यायला हवे की त्यांचे घरातील स्थान आता येणाऱ्या काळात फार महत्वाचे आहे. मग मला माझ्या गुंतणुकीचा त्रास का होतोयमला सांगा

आजीची समस्या ही माझ्या लक्षात आली. अनेक ज्येष्ठ मंडळींची ही समस्या आहे घराघरांमधे ती आहे. काळ ज्या गतीने बदलतोय त्याचेच हे पडसाद आहेत. मी आजींना म्हणालो की मी तुम्हाला सांगतो. बघा पटतंय का ते? तुम्ही जे तुमच्या घराच्या प्रक्रीयेमधे गुंतलात ती एक अतिशय अभिनंदनीय बाब आहे ते तुमच्यासारख्या अनेक आज्या करीत आहेत म्हणून आपली घरे अजूनही टिकून आहेत. त्याबद्दल तुमचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. आपल्याला काळजी एवढीच घ्यायची आहे की आपल्या त्या गुंतण्याचा गुंता व्हायला नको. गुंतणे छानच आहे कारण ती माणूसपणाची खरी ओळख आहे..परंतू त्याचा गुंता होऊ देणे हे कसब आहे. तो गुंता कसा होऊ द्यायचा नाही हे मी तुम्हाला सांगतो.. (क्रमशः)





Comments

  1. आवडती डिश समोर ठेवली ,एक घास खाऊ घातला आणि उचलून घेतली . असा काहीसा अनुभव या ठिकाणी आला .

    पुढच्या आठवड्यापर्यंत जिज्ञासा ताणावी लागेल. उत्सुक आहोत .


    प्रा डॉ संजय पाटील ,
    सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय , वाशिम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18