थोडा है थोडे की जरुरत है @ 05.04.22

दान

तो एप्रील महिनाच होता. तारीखच होती. वर्ष २०१४. त्या दिवशीची पहाट मी आयुष्यात विसरु शकत नाही. पहाटे .३० दरम्यान एका दवाखान्याच्या बेंचवर झोपलो असताना मला एक नर्स उठवायला आली त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकणे माझ्यासाठी माझ्याकरवी माझ्या परीवारासाठी अतिशय वेदनादायी होते. आमच्या घराचा आधार, आमच्या सर्वांची सकारात्मक उर्जा, आमच्या सर्वांचे सांभाळकर्ता, आमच्या घराचा आधारवड, आमचे दादा आम्हाला सोडून गेले. त्यांचे जगणे जेवढे सहज तेवढेच त्यांचे जाणे देखील. काहीही त्रास नाही, दवाखान्यात भरती होण्याची आयुष्यातील पहिली नि शेवटची वेळ, अगदी शेवटच्या दिवसापर्यंत घरच्या अंगणातील झाडांना स्वतः पाणी घालून ते गेलेते कायमचे. आयुष्यभर अत्यंत निस्पृह जीवन जगून त्यांनी आदर्श शिक्षक कसा असावा हा वस्तुपाठच घालून दिला होता. परंतू त्यांच्या काही गोष्टी परीवारातील कुणालाही किंवा कुठेही जाहीरात करता घडल्या त्या त्यांच्या मृत्यूपश्चातच आम्हाला समजल्या. निवृत्तीपश्चात त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना दहावीचे इंग्रजी शिकविणे सुरु केले. शिकवणीला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी जाऊन त्याची त्याच्या परीवाराची चौकशी करणारे ते शिक्षक होते, जी गोष्ट अतिशय दुर्लभ आहे. हे त्यांचे शिक्षणाचे दान तर आम्हाला दिसत होते परंतू एक गोष्ट जी त्यांच्या मृत्यूपश्चात मला कळली ती ऐकून तर मी थक्क झालो. दान देताना एका हाताने दिल्यावर दुसऱ्या हातालाही कळू नये असे म्हणतात. त्यांची ती गोष्ट म्हणजे अगदी तशीच होती. नव्या शतकामधील बदलत्या मार्केटींग स्ट्रॅटेजीचा त्यांच्यावर काहीच परीणाम झाला नव्हता. त्यांची दानाची पद्धत तशीच होती.. शेवटपर्यंत

मी देखील त्यावेळी एम इंग्रजीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचो. माझ्याकडे बरेच विद्यार्थी विद्यार्थीनी यायचे. कधीकधी एखाद्या बॅचमधे शिकविण्याचा मस्त मूड लागला तर बॅच संपवायला उशीर व्हायचा तेव्हा पुढच्या वर्गाचे विद्यार्थी बाहेर वाट बघायचे. त्यावेळी त्या विद्यार्थ्यांशी माझ्या दादांचा संवाद व्हायचा. काही मिनीटांचाच तो संवाद. परंतू मनापासून काही क्षणच केलेला संवाद हा अनेक तासाच्या बोलण्यापेक्षा महत्वाचा परीणामकारक ठरतो याचाच प्रत्यय मला ही गोष्ट ऐकल्यावर आला. ती विद्यार्थीनी माझ्याकडे शिकायला यायची परंतू माझे दादा तिचेही दादा कधी झाले हे मला कळले नाही. माझा वर्ग झाल्यावर किंवा सुरु होण्याआधी ती आमच्या अंगणातल्या पाळण्यावर बसलेली असायची. कारण कुणाचीतरी सोबत असल्याखेरीज तिला हलताच येत नव्हते. पायाने ती अधू होती. तिला आधाराशिवाय चालता येत नव्हते. इतर विद्यार्थ्यांपेक्षा तिला जास्त वेळ बसावे लागे म्हणूनच दादा तिच्याशी संवाद साधत. नंतर काही दिवसांनी मी ते एम इंग्रजीचे वर्ग बंद केले. ही माझी विद्यार्थीनी देखील माझ्या संपर्कातून दूर गेली. त्यानंतर तिची माझी भेट थेट आमचे दादा गेल्यानंतरच झाली. आपल्या वडीलांसोबत ती मला भेटायला आली होती. नेहेमीप्रमाणे तिचे वडील तिला घेऊन आले सांत्वनाचे शब्द बोलल्यावर ते म्हणाले की सर, माझी मुलगी आज जिवंत आहे आनंदी आहे ती केवळ तुमच्या वडीलांमुळे. त्यांचेच उपकार आहेत की आज ही अत्यंत समाधानी आयुष्य जगत आहे. तसे तर तिला अजूनही स्वतःच्या पायावर नीट उभे राहता येत नाही परंतू तिला आयुष्यात सक्षमतेने उभे केले ते केवळ तुमच्या वडीलांनी. मला त्यांच्या बोलण्याचा काहीच अर्थबोध होत नव्हता. ती मुलगी माझ्या वडीलांची विद्यार्थी नव्हती. तिचा माझ्या वडीलांशी संपर्क कधी आला आणि तिला तिच्या आयुष्यात उभे करण्याकरीता माझ्या वडीलांनी मदत कधी केली. माझ्याकरीता हे सारे आश्चर्यकारक होते. त्यानंतर त्या मुलीच्या वडीलांनी जे मला सांगितले त्यावरुन मला दानाच्या त्या खऱ्या खुऱ्या व्याख्येची प्रचिती आली.

अंगणातल्या पाळण्यावर बसून वडीलांची वाट बघताना माझ्या वडीलांशी तिचा जो काही क्षणांचा संवाद होत होता त्यावरून माझ्या दादांच्या लक्षात आले की हळू हळू ती मुलगी नैराश्याकडे जाते आहे. माझे वर्ग संपल्यावर कधीतरी त्या मुलीने माझ्या वडीलांना एक मोठे पत्र लिहीले ज्यात तिने आयुष्य जगण्यासा अर्थ नाही ते संपवायला हवे अश्या आशयाचे काहीतरी लिहीले. ते वाचल्यावर माझ्या दादांनी तडक तिचे घर गाठले. ते तिला भेटले तिला समजावण्याचा प्रयत्न केला. नकळत त्यांचे तिच्याशी मुलीचे नाते तयार झाले. ती देखील मोठ्या आत्मियतेने त्यांना तिच्या जीवनातील कष्टप्रद प्रसंग सांगू लागली. एखाद्या अपघातात आपल्यासारख्याचा पाय मुरगळला आठ दिवस तो डॉक्टरांनी बांधून ठेवला तर आपल्याला नकोसे होते. तिच्या बाबतीत तर आयुष्यभराची परावलंबीता परमेश्वराने दिलेली होती. कायम कुणावर तरी अवलंबून राहणे ही तिच्यासाठी फारच असहनीय बाब होत होती. माझे दादा तिला भेटत राहीले. तिच्यातील जगण्याचा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला. तिचे वडील त्यांना म्हणायचे, मोठे सर, हिने नोकरी करावी किंवा पैश्याची काही अडचण आहे असा काहीच भाग नाही. सुदैवाने मी माझ्या मुलीचा व्यवस्थित सांभाळ करु शकतो परंतू माझी एकच इच्छा आहे की तिने आनंदाने जगावे. परंतू सध्या ती फार खिन्न आहे सारखे मृत्यूचे विचार तिच्या मनात येतात. माझ्या दादांच्या तिची अवस्था लक्षात आली. हळू हळू त्यांनी तिच्याशी बोलून, तिला मानसिक आधार देऊन निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले. तिला जगण्याची उमेद निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी तिच्या वडीलांशी बोलून एक सुंदर कल्पना तिला दिली. इंग्रजी वाड़मयाची ती विद्यार्थीनी असल्याने ती पुस्तकांमधे रमत असे. तिचे आकलन देखील छान होते. अनेकवेळा शिकविताना मी ते अनुभवले होते. एखाद्या कवितेमधील एखादी तीव्र भावना तिच्या मनाला स्पर्शून जायची नकळत तिचे डोळे पाणवायचे. तिच्या संवेदनशील मनाला एक भक्कम आधार माझ्या दादांच्या त्या कल्पनेतून मिळाला. दादांनी तिला तिच्या परीसरात एक वाचनालय सुरु करण्याचे सुचविले. त्या वाचनालयाच्या माध्यमातून तिला अनेक पुस्तकांच्या संपर्कात राहता येईल, तसेच सोबतीला वाचक राहतील तर तिला बरे वाटेल तिचा वेळ तिच्या आवडीच्या पुस्तकांसोबत छान जाईल. तिच्या वडीलांना ती कल्पना आवडली. त्यांनी लगेच त्या पद्धतीची व्यवस्था केली वाचनालय सुरु झाले.

माझ्या दादांबद्दल हे सांगताना, पाणावलेल्या डोळ्यांनी त्या दिवशी ती माझी विद्यार्थीनी जे बोलली ते कायम माझ्या स्मरणात राहीले आहे. ती मला म्हणाली, छोटे सर, मला माझ्या आयुष्यात सहानुभूती अनेकांची मिळाली, मला चालता येत नव्हते तर माझा हात धरून मला अनेकांनी आधार दिला. त्या सर्वाप्रती मी कृतज्ञ आहे पण मला केवळ आधार देता मला माझ्या पायांवर उभे करणारे मला देखील आनंदाने जीवन जगता येऊ शकेल हा आत्मविश्वास निर्माण करून देणारे दादाच होते. तिचे ते शब्द ऐकल्यावर मला काय बोलावे सुचेना. माझ्याही नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. एखाद्या मुलीला अश्या प्रकारे जीवन जगायला लावणारे माझे दादा, परंतू हे एवढे मोठे काम आमच्यापैकी कुणालाही त्यांनी सांगितले नव्हते, इतरांना कळण्याचा तर प्रश्नच नव्हता. दान असे द्यावे की एका हाताने दिल्यास दुसऱ्या हाताला कळू नये या दानाच्या व्याख्येचा खराखुरा अर्थ मला त्या दिवशी कळला.

सात वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी दादा आम्हाला सोडून गेले. परंतू मी वर सांगितलेल्या कितीतरी आठवणींमधून ते अजूनही सोबतच आहेत. बरेच वेळा जीवनात आपल्याच पायांवर मजबुतीने उभे राहण्यात आयुष्य खर्ची पडते, दादांनी तर स्वतःसोबत अश्या एका मुलीला जीवन जगण्याचा प्रकाश प्रदान केला. खरेच आहे.. असे अमुल्य दान ज्याने ते केले त्याने सांगूच नयेते असेच कळावे!!





Comments

  1. 👌👌👌🙏 विनम्र अभिवादन!

    ReplyDelete
  2. सत्पात्री दान !
    खऱ्या दानाचे स्वरूप आणि त्यासोबतच वडिलांबद्दलचा कृतज्ञ भाव एकसमयावेच्छेदेकरून व्यक्त झालेला आहे. छानपणे !

    डॉ. संजय पाटील
    प्राध्यापक ,
    सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, वाशीम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18