थोडा है थोडे की जरुरत है @ 26.04.22
गुंत्याचे कारण
व्याख्यान आटोपून निघण्याच्या वेळी त्या आजीने तिच्या आयुष्यात झालेल्या गुंतण्याच्या गुंत्याबद्दल मला सांगितले. आजीचे सारे ऐकून झाल्यावर मी तिला म्हणालो, आजी खरोखरीच हा गुंता सोडवायचाय की माझ्या व्याख्यानातील काही विचार तुमच्या आयुष्यातील घटनांमधे चपखल बसले म्हणून माझ्याशी बोलताय. कारण आजी मी कौन्सीलर आहे. कुणाचेही कौन्सेलींग करताना सर्वात महत्वाचा नियम आम्ही असा पाळतो की ज्याला समुपदेशन करून घ्यायचे आहे त्या व्यक्तीची संपुर्ण इच्छा हवी. सोबतच पूर्ण विश्वास ठेवून कौन्सीलर जे सांगतो आहे त्यानुसार काही काळ का होईना वागावे लागते. तरच त्या सांगण्याचा परीणाम होतो. तुमचे नेमकं काय आहे ते मला सुरुवातीला कळू देत. कारण मी जे बोलणार ते तटस्थपणे व तुमचा गुंता सोडविण्याच्या दृष्टीने सांगणार. मी तुम्हाला आवडेल असे बोलेलच असे नाही तर माझे काही बोल तुम्हाला बोचू देखील शकतात. म्हणून तुमची तुम्हाला छान वाटेल ते ऐकायचे आहे की खरोखरीच गुंता सोडविण्याकरीता सल्ला हवाय. कारण तुम्हाला छान वाटेल असे बोलायचे असेल तर दोन तिन वाक्यात आपला संवाद संपेल. तुमचे सर्व बरोबर आहे, तुमच्या सहवासातील कुणालाही काहीच कळत नाही. त्यांनी तुम्ही सांगता त्याप्रमाणेच त्यांनी वागायला हवे कारण तुम्हाला फार मोठा अनुभव आहे व म्हणूनच तुचे ऐकण्यातच त्यांचे भले आहे. तुमच्याखेरीज त्यांच्या भल्याचा विचार कुणीही करु शकत नाही, अगदी ते स्वतः देखील नाही. बस्स. हे ऐकून तुम्हाला छान वाटेल परंतू गुंता सुटेल याची खात्री देता येणार नाही. तुम्ही सांगा. आजीने जरावेळ विचार केला. कारण मी जे सांगितले ते पटकन स्विकारण्याचे त्यांचे वयही नव्हते. बरेच वेळा वय व वयासोबत येणारा अनुभव हा व्यक्तींना विचाराने समृद्ध बनवतो परंतू त्यांच्या मनाचा लवचिकपणा मात्र काढून घेतो. त्यामुळे आपल्या मनाच्या विरोधातले मत किंवा कृती वयोमानपरत्वे सहन होत नाही. परंतू विचारांती आजी मला म्हणाल्या, ऐकूच आज तुमचे. सांगा तुम्ही, मी ऐकून त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करीन. हे बोलताना मला असे आश्वासन देणे आजींना किती जड जातेय ते त्यांच्या चेहेऱ्यावरून मला जाणवत होते. परंतू आता त्यांनीच मला परवानगी दिली होती व त्याचा फायदा मी घेण्याचे ठरविले. याचे कारण त्या आजींची व त्याच्यासारख्या अनेक आज्या किंवा काकुंची हीच समस्या आहे. मी काकुंना त्यांच्या गुंत्याचे कारण याबद्दल सांगु लागलो.
मी आजींना म्हणालो, आजी सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास, तुमचा गुंता आतापर्यंत सुटत यासाठी नव्हता कारण तो सोडविताना त्या गुंतलेल्या धाग्याची दोन्हीही टोके तुम्ही तुमच्याच दोन्ही हातात धरली होती. ती दोन्हीही टोके तुम्हीच धरून ठेवलेली असल्याने हा गुंता आता पर्यंत सुटू शकला नाही. आज तुम्ही त्या गुंत्याचे एक टोक माझ्या हातात दिल्याने आता दोघे मिळून आपण हा गुंता सहज सोडवू शकू. लक्षात घ्या या गुंत्याला पुढेही सोडविताना तुम्हाला दुसरे टोक कुणाच्यातरी हातातच द्यावे लागणार आहे व ज्याच्या हातात तुम्ही ते द्याल तो तुम्हाला हा गुंता सोडविण्यास मदत करु शकतो हा विश्वास तुमचा त्याच्यावर असायला हवा. आजी काळजीपूर्वक ऐकू लागल्या म्हणून मी देखील मनापासून त्यांना सांगू लागलो.
आजी ज्या पिढीच्या तुम्ही आहात त्या पिढीमधे फार लवकर विवाह होत असे. तुमचा देखील विवाह तुम्ही सांगितले त्या प्रमाणे वयाच्या अठराव्या वर्षी झाला व तेव्हापासून आजतागायत तुम्ही तुमच्या संसाराला फार मेहनतीने व तुमच्या कर्तृत्वाने सांभाळले. अजुनही काही वर्षांपर्यंत तुमच्या मतानुसार व इच्छेनुसार घराची सर्वच व्यवस्था सुरु होती. परंतू आता मात्र तुम्ही सांगितले त्या प्रमाणे तुमच्या सुना आल्या आणि गुंता होण्यास सुरुवात झाली. त्यांच्या येण्याचे तुम्ही स्वागत तर केले परंतू त्यांच्या येण्याने तुम्हाला तुमच्याही नकळत असुरक्षित वाटायला लागले. याचे कारण संपुर्णपणे तुमच्याच विचारांनी चालणाऱ्या व्यवस्थेमधे नवा विचार आला. कारण तुमची सून ही वेगळ्या विचारांच्या कक्षेमधे मोठी झालेली असल्याने तिचे विचार वेगळे असणे स्वाभाविकच होते. अर्थात यामुळे तुम्हाला असुरक्षित वाचणेही स्वाभाविकच आहे. त्यात काहीच वावगे नाही. हा मनुष्यस्वभाव आहे. मानवाला आपला अधिकार व आपली सत्ता सोडणे कायमच अतिशय कठीण होत आले आहे कारण सत्ता ही एक प्रकारची झिंग असते. काय सांगताय, मोहरील सर? झिंग? होय आजी. मी पुढे सांगू लागलो. सत्ता ही एक झिंग यासाठी असते की आपण त्या सत्तेत मिळालेल्या अधिकारामुळे आपल्याला रुचेल अशी व्यवस्था निर्माण केलेली असते परंतू या सोबत आणखी महत्वाचे म्हणजे त्या सत्तेच्या अधिकारामुळे आपण ती व्यवस्था इतरांनाही वापरायला बाध्य केले असते. म्हणूनच आपल्या या विचारकक्षा अतिशय घट्ट व दृढ झालेल्या असतात. त्यामधे इतर कोणताही नवा विचार स्विकारणे अत्यंत कठीण होते व म्हणूनच मग कधी कधी नाईलाजाने जर आपल्याला नवा विचार स्विकारावा लागला तर आपण सैरभैर होतो व आपल्या हातचे सुटून जाईल या भितीने जास्त गच्च धरायला लागतो. त्याचा हाताला काचा पडेपर्यंत आपण ते धरतो. असे गच्च धरल्यामुळे व त्याच त्या आपल्याच विचारांच्या चौकटीमधे गुंतत राहील्यामुळे शेवटी गुंता होणार नाही तर काय आजी? या गुंता होण्याच्या प्रक्रीयेमधून जी असुरक्षितता निर्माण होते त्यामधून एक महत्वाचा प्रश्न तुमच्याच मनात सारखा निर्माण होत राहतो, मी नसेल तर कसे? मी सांगितले नाही तर कसे होईल? मी लक्ष दिले नाही तर कसे चालेल? माझ्याशिवाय हे सारे कुणी करु शकणारच नाही. त्यामुळे ते चांगले होणे ही माझीच जबाबदारी आहे. या अश्या स्वतःहून स्वतःकडे घेतलेल्या जबाबदारीमुळे इतर कोणताही नवा विचार स्विकारणे किंवा इतरांना संधी देणे शक्य होत नाही. कारण तो नवा विचार हा माझे माझ्या घरातले अस्तित्व संपवेल का हे कायमस्वरुपी भय तुम्हाला गुंतवूनच टाकते. आजी तुम्हाला वाईट वाटेल परंतू एक असा क्षण येणार आहे की हे गच्च हातात धरुन ठेवलेले सारे त्या क्षणी तुमच्या हातून निसटून जाणार आहे. त्यावेळी तुमची इच्छा विचारली जाणार नाही. मग त्यावेळी आपले अस्तित्व संपताना आपल्या हातात घट्ट धरून ठेवलेल्या गोष्टींनी काच पडण्यापेक्षा, मोकळ्या हातांनी निरोप घेता आला तर किती छान होईल. मी असे म्हणल्याबरोबर आजी जरा गलबलली. मला कळत होते की मी जरा तीव्रतेने बोलतोय, परंतू त्याहीपेक्षा जास्त इजा त्या आजीला तिच्या त्या गुंत्यामुळे होत होती म्हणून मी पुढे सांगू लागलो.
आजी या जगातील आपल्या अस्तित्वानंतर आपल्याला कश्या पद्धतीने लोकांनी स्मरावे याची व्यवस्था आपल्याला आपल्या हयातीतच करून ठेवावी लागत असते. कारण त्या एका क्षणी आपण हातात धरून ठेवलेले सारेच निसटून जाणारच आहे. परंतू आपल्या हातून आपले म्हणून जे होते ते सुटताना ती इतर लोकांना त्यांची सुटका वाटली तर कसे होईल? कदाचित हे वाक्य फारच टोकाचे वाटत असेल परंतू हेच सत्य आहे. यासाठीच आता जेवढे दिवस परमेश्वराच्या वहीखात्यात शिल्लक आहेत त्या दिवसांमधे प्रयत्नपूर्वक जे एवढे दिवस घट्ट धरुन ठेवले व ते तसे धरल्यामुळे गुंता झाला तो मोकळा करणे सुरु करावे लागेल. तरच त्या एका क्षणाला सारे काही सोडून जाताना मुक्त हातांनी व तेवढ्याच आनंदी मनाने आपल्याला जाता येईल. मला ठाऊक आहे की हे करणे फार कठीण आहे कारण मनातील असुरक्षिततेती भावना अशी सहजा सहजी निघून जात नाही. परंतू त्याकरीता छोटे छोटे बदल जर तुम्ही रोजच्या जीवनात केले तर हे सहज शक्य आहे व ज्या गुंतण्याच्या गुंत्याचा तुम्हाला त्रास होतो तो नाहीसा होईल. गुंतणे राहील परंतू त्याचे ओझे वाटणार नाही. पुढे मी काय सांगतो हे ऐकण्याकरीता आजी सरसावून बसली. (क्रमशः)
Very beautifully written..
ReplyDeleteखूप मस्त
ReplyDeleteसत्य परिस्थिती
ReplyDeleteआजीन्प्रमाणेच सर्वांसाठीच महत्त्वाचे आणि काळाच्या पटलावर अतिशय सुयोग्य अशा प्रकारचे समुपदेशन की ज्या समुपदेशनामुळे, त्याच्या अंमलबजावणीमुळे निश्चितच हा गुंता सुटून निरामय अशा प्रकारची कुटुंब व्यवस्था निर्माण होण्यासाठी कुठलीही बाधा राहणार नाही.
ReplyDeleteखूपच छान.
छान सोडवतो आहेस तू गुंता..आजीच्या आणि वाचकाच्याही मनातला..
ReplyDeleteअत्यन्त हळुवार हातांनी गुंता सोडवताय सर,सुटेल नक्की👍
Delete