थोडा है थोडे की जरुरत है @ 29.03.22
झेन चे हास्य
पैसा आणि आनंद हे नेहेमीच सोबत असतात असे नाही. पैश्यामुळे अनेक आनंदी क्षण प्राप्त होऊ शकतात हे जरी खरे असले तरी आनंद मिळविणे ही मात्र एक प्रवृत्ती असते. प्रचंड पैसा असेल तरच आनंद मिळतो असे अजिबात नाही. छोट्या छोट्या गोष्टीत देखील ज्यांना आनंद मिळविता येतो तो सुखी माणूस. परंतू कधी कधी तर पैसा आहे किंवा नाही याच्याही पलीकडे जाऊन अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येते. अश्यावेळी खरे तर त्या दुर्दैवी व्यक्तीला दुःखी होण्याचा अधिकार असतो कारण परमेश्वरानेच त्याच्यावर अन्याय केलेला असतो. अश्या व्यक्तीने जगावर चिडून नकारात्मक विचार केला तरी ते समजण्यासारखे असते. पण बरेच वेळा शरीराने धडधाकट असलेले व सारे काही छान असलेले लोकही आपल्याला अतिशय नकारात्मक विचार करताना दिसतात. सारखी कश्यावरतरी टीका करत राहणे हा त्यांचा छंद असतो. या असल्या स्वभावामुळे लोकांना त्यांच्या आसपास राहणे आवडत नाही. याच्या अगदी उलट झेनचे होते.
जन्मतः शारीरिक किंवा मानसिक दृष्ट्या विकलांग असणे ही खरोखरीच परमेश्वराची कोणती योजना असते हे कळण्यापलीकडे आहे. अश्या व्यक्तींना जगताना किती त्रास सहन करावा लागतो व त्यांच्या सोबत त्यांचा सांभाळ करणारे देखील दुःखातच असतात. कारण आपल्या जवळच्या व्क्तीचे असे जगणे त्यांनाही सहन होत नसते. परंतू करता काहीच येत नाही. त्यातल्या त्यात शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या व्यक्तीला आपण काहीना काही प्रमाणात समजावू शकतो. त्याला बऱ्याच गोष्टीचे आकलन असते. त्यामुळे अनेकवेळा तो आनंदात जीवन जगताना आपल्याला दिसतो. अर्थात अशी उदाहरणे अपवादात्मक असतात. कारण दिव्यांग म्हणले की सामान्य जीवन जगण्याकरीता त्यांना संघर्ष हा करावाच लागतो. असाच संघर्ष झेनचा देखील होता. परंतू झेनचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन मात्र प्रचंड सकारात्मक होता. म्हणूनच त्याच्या हास्याबद्दल फार छान बोलल्या गेले. त्याच्या हास्याकडे बघून कुणालाही शंका येत नव्हती की हा मुलगा केवळ २६ वर्षांचे जीवन घेऊन जन्माला आलेला आहे. सेलेब्रल पाल्सी या आजाराने जन्मतःच ग्रस्त असलेला झेन फक्त २६ वर्षे जगला. परंतू या २६ वर्षाच्या अल्प प्रवासात त्याने त्याचे हास्य सर्वांच्या स्मरणात ठेवले. त्याचे व त्याच्यासारख्या हजारो दिव्यांग मुलांचे आयुष्य सुखकर व्हावे म्हणून त्याच्या वडीलांनी जगातील एका अतिशय मोठ्या कंपनीचे कामकाज या दिशेने वळविले होते. त्यांच्या कामातील बराचसा वेळ, श्रम आणि पैसा हा अश्या दिव्यांग मुलांना सामान्य जीवन जगण्याकरीता आवश्यक सुविधा बनविण्याकरीता त्यांनी खर्ची पाडला. एवढे सारे करूनही झेनचे वडील झेनला वाचवू शकले नाही परंतू झेनच्या निमित्ताने त्यांनी त्यांच्या मुलासारख्या अनेक दिव्यांग मुलांकरीता मोठे काम केले. झेनचे वडील हे करु शकले कारण ते होते जगातील एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाची कंपनी, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला.
जगातील एका नामांकित कंपनीचा सीईओ असलेल्या सत्या व अनू नडेला यांचा मुलगा झेन हा जन्मतः सेलेब्रल पाल्सी या आजाराने ग्रस्त होता. २०१४ मधे मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सीईओ पद स्विकारल्यानंतर सत्या यांनी त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांच्या मुलासारख्या दिव्यांग मुलांच्या मदतीकरीता आपल्या कंपनीचे स्रोत वापरणे सुरु केले. तेथील शास्त्रज्ञ, तेथील संशोधन व्यवस्था या सर्व बाबींचा उपयोग दिव्यांग मुलांकरीता जिवन सुखकर करणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी बनविता येतील याचा विचार त्यांनी सुरु केला. ज्या रुग्णालयामधे झेनचा जास्तीत जास्त उपचार झाला त्याच ठिकाणी सत्या यांनी चाईल्ड न्यूरोसायन्सचा एक स्वतंत्र कक्ष सुरु केला व त्याठिकाणी अनेक दिव्यांग मुलांचे उपचार अतिशय आधुनिक पद्धतीने करण्यास मदत केली. झेन च्या विकलांगतेमुळे त्यांना त्याच्या व त्याच्यासारख्या अनेक लहान मुला मुलींची वेदना ठाऊक होती. मी सुरुवातीलाच लिहील्याप्रमाणे शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्या झेनची विचारक्षमता सक्षम होती व म्हणूनच त्याला हे कळले होते की त्याच्या कडे फार कमी आयुष्य आहे. मृत्यू हा प्रत्येकच मानवाकरीता न टाळता येणारी गोष्ट असली तरी ती जीवनात कधी येणार हे ठाऊक नसल्याने आपण कसेही जगत राहतो. आपल्या वागण्या बोलण्याने इतरांना दुखावत राहतो, एवढेसे जिवन आहे परंतू त्यात द्वेष करतो, राग व्यक्त करतो, घृणा करतो, एकमेकांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतो, एकमेकाला हरविण्याचा प्रयत्न करतो, एकमेकांच्या कामावर व वागण्यावर सतत टीका टिप्पणी करत राहतो. हे सारे केले जाते कारण अपरीहार्य असला तरी देखील मृत्यू कधी येणार हे माहित नसते. परंतू झेन सारख्या दिव्यांगांचे काय होत असेल जेव्हा त्यांना हे ठाऊक आहे की त्यांचा मृत्यू वयाच्या २६ व्या वर्षी होणार आहे किंवा त्याची नजर चुकवत मागल्या वर्षी डॉक्टरांनी देखील त्याला सांगितले होते की तुझ्याकडे आता फक्त एक वर्ष आहे. काय अवस्था होत असेल. परंतू झेन मात्र त्याच्या मृत्यूला जवळ बघूनही चिडत नव्हता, किंवा परमेश्वराने त्याच्यावर अन्याय केला म्हणून जगावर राग व्यक्त करीत नव्हता. तो हसत होता मनापासून. संगीत मनापासून ऐकत होता व ती आवड त्याने जोपासली होती. आपल्या विकलांगतेमुळे का होईना परंतू आपले बाबा त्याच्या सारख्या अनेकांकरीता खूप काही करीत आहेत याचा त्याला विशेष आनंद होता. त्याच्या आजारावर जे उपचार व्हायचे त्यामुळे त्याला फार वेदना होत असत. परंतू त्या वेदना त्याने चेहेऱ्यावर दिसू दिल्या नाहीत. याच महिन्याच्या एक तारखेला ज्या दिवशी झेनचा मृत्यू झाला त्या दिवशी त्या रुग्णालयाच्या समोरच्या बोर्ड वर एक संदेश लिहीला गेला. तो संदेश म्हणजे शरीराने धडधाकट असलेल्या आपल्यासारख्या अनेकांकरीता जीवन कसे जगावे याचा वस्तुपाठच होता. सारे काही असताना व एक सुदृढ आयुष्य परमेश्वराने दिले असतानाही अनेक वाईट व नकारात्मक विचार आपल्या मनामधे भरून व सदैव सारे काही वाईटच आहे हे बोलून बोलून स्वतःचे व सोबतच्यांचे आयुष्य निरस करणारे जे अनेक लोक असतात त्यांच्यासाठी तर झेन बद्दल लिहीलेला तो संदेश फारच महत्वाचा होता. आपल्या वागण्याने आपण आपल्या सोबत जीवन जगणाऱ्यांना आनंद देतो आहोत की त्यांना निराश करतो आहोत हे न कळणाऱ्या मंडळींनी तो संदेश वाचावा त्यानुसार आपल्या वागण्यात बदल करावा असेच त्या संदेशातून सूचित होते. त्या रुग्णालयासमोर लिहीले होते,
झेन हा त्याच्या संगीतावरील सारग्राही प्रेमाकरीता, त्याच्या सूर्यप्रकाशासमान तेजस्वी हास्याकरीता व त्याच्या परीवारावर आणि त्याच्या सहवासातील प्रत्येकावर त्याने केलेल्या नितांत प्रेमामधून मिळणाऱ्या आनंदाकरीता कायम स्मरणात राहील.
परमेश्वराच्या कृपाशिर्वादामुळे सुदृढ आयुष्य मिळालेल्या आपल्या सर्वांना आपली ओळख झेनच्या कायम स्मरणात राहणाऱ्या हास्यागत निर्माण करता यायला हवी.. होय ना?
Comments
Post a Comment