थोडा है थोडे की जरुरत है @ 22.03.22

सकस वैचारिकतेकडे

सध्या देशात कश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. सोशल मिडीयावर वेगवेगळ्या पोस्ट वाचायला मिळत आहेत. त्यानिमीत्ताने संपुर्ण समाजमन ढवळून निघत आहे. चित्रपटाबद्दल मी आज भाष्य करणार नाही कारण याबद्दलचे विचार व्यक्त करावे किंवा करु नये या संबंधातही प्रतिक्रीया उमटत आहेत. व्यक्तिशः सांगायचे झाल्यास आम्ही एकूण २० जण चित्रपट बघायला गेलो होतो. एरवी गंमत, मजा, मस्ती करत धमाल करणारे आम्ही सर्व, चित्रपट संपल्यावर एकमेकांशी एकही शब्द बोलता आपापल्या घरी परतलो. काहीच व्यक्त होऊ नये अशी स्थिती सर्वांचीच झाली होती. आम्हा सर्वांचे असे शांत राहून घरी निघून जाणेच एक मोठी प्रतिक्रीया होती. मला मात्र या सबंध प्रक्रीयेमधे एक नवा आशेचा किरण दिसतोय. तो म्हणजे आपल्या देशाची आता सकस वैचारिकतेकडे वाटचाल सुरु झाली आहे. सोशल मिडीयाचा यामधे मोठा सहभाग आहे. अनेकांना व्यक्त होण्याची संधी या निमीत्ताने मिळतेय देशात किंवा जागतिक पातळीवरदेखील सुरु असलेल्या घटना आता आपल्या सर्वांच्या विचार प्रक्रीयेचा भाग बनल्या आहेत ही एक सकारात्मक बाब मला या सर्व प्रकारामधे आढळली

कश्मीर फाईल्स बद्दलच बोलायचे झाले तर काश्मीरी पंडीतांचा हा प्रश्न अनेकांच्या विस्मृतीत गेला होता. या चित्रपटाच्या निमीत्ताने याबाबत सर्वदूर चर्चा होणे त्याबाबत लोकांनी मत व्यक्त करणे ही एक फारच चांगली बाब आहे. मत चित्रपटाच्या बाजूने असो, विरोधात असो, परंतू लोक मत व्यक्त करीत आहेत ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. काही वर्षांपूर्वी असे चित्र दिसत होते की देशातील फार मोजके लोक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटनांबद्दल बोलत असत. बाकी सर्वसामान्य लोक हे आपल्या रोजच्या जीवनातील समस्यांचा सामना करत आसपास घडणाऱ्या घटनांपुरतेच व्यक्त होत. तिच दशा विद्यार्थ्यांची देखील होती. काही वर्षांपर्यंत मी महाविद्यालयामधे विद्यार्थीनींना सामान्य बाबींबद्दल विचारल्यावर त्यांना त्याबाबत काहीच माहित नसे. आंतरराष्ट्रीय तर सोडाच परंतू अगदी आपल्या गावाबद्दल देखील काही महत्वाच्या बाबी त्यांना ठाऊक नसत. परंतू आता सोशल मिडीयाच्या वापरामुळे अनेक इतर बाबींसोबत आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांबाबतची सजगता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आठवड्याभरापूर्वी एका वर्गात विद्यार्थिनींशी बोलताना मी सहजच रशिया युक्रेनच्या युद्धाचा विषय काढला. आश्चर्याची बाब म्हणजे बहुतांश विद्यार्थीनींना त्याबद्दल माहिती होती. नाटो म्हणजे काय, संयुक्त राष्ट्र संघ म्हणजे काय, या युद्धात इतर देशांची भूमिका काय हे सारे विद्यार्थीनी बोलत होत्या. एवढेच नव्हे तर त्यांच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात हे कुठे आहे दुसऱ्या महायुद्धानंतर कशी स्थिती बदलत गेली, सोव्हीयत युनीयनचे तुकडे कसे झाले या सर्व बाबी त्या विद्यार्थीनींना माहित होत्या. मी त्यांच्या स्रोताबद्दल चौकशी केली तर प्रत्येक मुलीने हेच सांगितले की याबाबतच्या पोस्ट त्यांनी समाजमाध्यमांमधे वाचल्या आहे. त्यांची मते वेगवेगळी होती परंतू त्यांची अश्या प्रकारच्या महत्वाच्या आंतरराष्ट्रीय घटनेबद्दलची जाण खरोखरीच सुखावणारी होती.

सोशय मिडीयाच्या माध्यमातून आपला प्रवास आता सकस वैचारीकतेकडे सुरु झाला आहे असे म्हणायला हरकत नाही. हे सारे होत असताना सुरुवातीला जरा जड जाणार आहे. कारण आपल्याला अगदी टोकाच्या विरुद्ध किंवा मुद्दाम खोडसाळपणाने लिहीलेल्या गोष्टी वाचाव्या लागतील. त्यामुळे वातावरण काही प्रमाणात कलुषित होण्याचाही धोका आहेच. काही दिवसांपूर्वी आपण हा असला अनुभव घेतला. परंतू प्रगल्भ वैचारिक वातावरण निर्माण होऊन ते स्थिरावण्याकरीता हे सुरुवातीचे धक्के सहन करावे लागणारच. आता कुठे आपल्याला महत्वाच्या घटनांबद्दल माहिती मिळू लागलीय. त्यामुळे ज्या पद्धतीने ती मिळालीय तसे त्वरीत आपण व्यक्त होतो आहोत. असल्या काही प्रकारानंतर आता पुढे हळू हळू आपल्याला एखाद्या घटनेचे विविध पैलू वाचायला मिळतील. त्यावरून आपण आपले मत बनविणे सुरु करु. हा प्रवास आता आपल्या सर्वांचा सुरु होणार आहे. एखाद्या घटनेचा फक्त एकच दृष्टीकोन नसतो तर त्याला वेगवेगळे पैलू असतात. आपल्याला आवडतो तोच भाग सध्यातरी आपण समजून घेतोय त्यावरचे आपले मत व्यक्त करतोय. परंतू हळू हळू आपल्याला एकाच घटनेच्या वेगवेगळ्या बाजू समजतील त्यानंतर आपण आपले स्वतःचे असे मत व्यक्त करणे सुरु करु. अश्या प्रकारे आपले व्यक्तिगत मत तयार होणे हा एक प्रगल्भतेचा संकेत आहे. या. सर्व प्रकारात आणखी एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीचा विचार आवडतो त्याच्या विरोधातील विचार देखील आपल्याला निदान वाचण्याची सवय होते आहे. कायम एकाच विशिष्ट चौकटीतून विविध गोष्टींकडे बघणे हितकारक नसते. सध्या आपल्याला आपल्या  मनाविरोधातल्या विचारांचा राग येतोय आपण त्याबद्दल तीव्रपणे व्यक्त होतोय. सध्याच्या घडीला ही जरा ताणतणाव निर्माण करणारी गोष्ट जरी वाटली तरी देखील हळू हळू हा ताण देखील निवळेल. येणाऱ्या काळात आपल्या मताच्या विरोधी किंवा वेगळे मतही राहू शकते त्या मतांचा देखील आदर करणे किंवा त्यास नम्रपणे नाकारणे हे जमायला हवे. हे देखील कालानुरुप आपल्याला जमेल.

सध्या आपण या वैचारिक प्रवासाच्या संक्रमण स्थितीमधे आहोत. माहिती प्राप्त करून त्यावर त्वरीत मत देण्याच्या स्थितीमधे आपण आहोत. निदान या सर्व आपल्या आजुबाजूने घडणाऱ्या जगात आपण डोकावू लागलोय ही एक महत्वाची बाब आहे. अन्यथा काही वर्षांपूर्वी काश्मीर सारखी समस्या किंवा आसाम मधील अस्वस्थता, किंवा भारत चीन मधील संबंध याबाबत केवळ दिल्लीमधील इंग्रजी वृत्तपत्रांच्या किंवा वृत्तवाहिन्यांच्या पत्रकारांचीच मते गृहित धरली जायची. आता मात्र या सर्व समस्यांबाबत सामान्य जनतेला देखील माहित आहे त्यांना केवळ गृहीत धरता कामा नये असा विचार निर्माण होतोय. समाजमाध्यमांमधे उमटणाऱ्या प्रतिक्रीया यांना कधी नव्हे ते अनन्यसाधारण महत्व आलेले आहे. वेगवेगळ्या सरकारांना देखील समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रीया बघून निर्णय करावे लागत आहेत ही एक अत्यंत सकारात्मक बाब आहे. ज्या लोकशाहीचा पुरस्कार आपण करतो जगभरात सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाचा नावलौकीक आहे त्या देशात अश्या प्रकारे सामान्य माणसाचे मत प्रदर्शन केले जाणे ही महत्वाची बाब मानली जाणार आहे.

या सर्व प्रवासाचा पुढचा टप्पा आपल्याला आता गाठायचा आहे तो म्हणजे एखाद्या घटनेबाबत आपल्याला जे वाटते त्यापेक्षा वेगळे मत कुणाचे असू शकते त्याचा आपल्याला सन्मान करता यायला हवा. आपल्या वैचारिक चौकटीपेक्षा वेगळा विचार सहन करण्याची आपली क्षमता वाढायला हवी त्याबाबत वेगळे मत असले तरी ते संयतपणे व्यक्त करण्याचे धारीष्ट्य आपल्याला प्राप्त व्हावे. हे देखील कालानुरुप घडेलच. याबाबतीत आपण सर्वांनीच सकारात्मक रहायला हवे. अशी वैचारिक सकसता निर्माण झाली तर मग मुद्दाम भेदाभेद निर्माण करणारे विचार आपल्याला सहज ओळखता येतील त्यास आपण बळी पडता आपल्या स्वतःच्या वैचारिक क्षमतेने निर्णय करु. तो दिवस देखील आपल्या या वैचारिक संक्रमणामधे लवकरच येईल. त्या दिवशी देश चालविणाऱ्या व्यवस्थांना सामान्य माणसाला गृहित धरता येणार नाही तर त्याचे मत त्यांना खरेखुरे गृहित धरुनच पावले उचलावे लागतील तीच खरी आपल्यासारख्या सामान्यांची असामान्य ताकद असेल. होय ना?






Comments

  1. प्रमोदप्रज्ञा22 March 2022 at 10:38

    नमस्कार सर.
    सध्यातरी सोशलमीडियावर आलेले फॉरवर्ड्स पुढे ढकलण्यात अधिकांश जनता व्यस्त आहे. खऱ्या-खोट्याची शहानिशा करणे दूरच, 'दुसरी बाजू' समजून घेण्याची तयारीही दिसत नाही. त्यापायी संबंधात कटुता आली तरी फिकीर न करण्याइतके आपल्या भूमिकेला चिकटून आहेत.
    सोशलमीडिया सध्या संक्रमण काळात आहे आणि लौकरच आपला प्रवास सकस वैचारिक प्रगल्भतेकडे होईल ही तुमची भविष्यवाणी खरी ठरो हीच मनापासून इच्छा. तसेच घडो।।

    ReplyDelete
  2. ज्यांनी न्याय मूर्ती श्री रत्नपारखी यांचि काशमिर वरचीभाषणे ऐकली. आहेत त्यांच्या डोळ्यासमोर मुर्तिमंत वास्तव नक्कीच ऊभे राहिले असेल.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18