थोडा है थोडे की जरुरत है @ 08.03.22
भांडण
एकाच घरात लहानाचे मोठे झालेले दोन भाऊ. वातावरण सारखे, संस्कार सारखे, राहणीमान सारखे. अनेक गोष्टी सोबतच केलेल्या. एकंदरीत दोघांचेही अस्तित्व एकत्र मिसळलेले. परंतू काही दिवसांनी मात्र म्हणजे विशेषतः लग्न झाल्यानंतर साधरणपणे जे चित्र आपल्याला समाजात दिसते तेच या घरात देखील घडले. परीवार मोठा झाला व त्यामुळे विचार करणाऱ्यांची संख्या वाढली. सोबतच जग बदलले असल्याने विचार व्यक्त करणाऱ्यांची देखील संख्या वाढली. मग प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वानुसार विचार वेगवेगळे असणे क्रमप्राप्त होते. हे सारे बदलले परंतू कालानुरुप इतरांचे विचार स्विकारण्याची सवय करण्याची गती मात्र कमी राहीली. मग एकाच्या विचारापेक्षा दुसऱ्याचा वेगळा विचार राहू शकतो व त्याचा देखील निर्णय प्रक्रीयेत समावेश करायला हवा ही आवश्यक बाब विकसित झाली नाही. त्यामुळे एका व्यक्तीला त्याच्या मतांपेक्षा वेगळे असे मत मांडलेले पटेनासे झाले व त्यानंतर जे होऊ नये परंतू झाल्याशिवाय रहात नाही तेच झाले… कलह सुरु झाला. त्या कलहाचे पर्यवसन दोन भाऊ एकमेकांपासून वेगळे होण्यात झाले. एका घराची दोन घरे झाली. काही लोकांना असे वाटले की एका अर्थी बरेच झाले. रोजच्या कलहापेक्षा वेगळे झाले म्हणजे गुण्यागोविंद्याने नांदतील. परंतू मनात असलेला राग हा शमत नाही. राग हा खरे तर विषवल्लीच असतो. तो जेवढा समोरच्याला दुखावतो तेवढाच तो राग ज्याला येतो त्याचेही मन जाळत जातो. भाऊ असले तरी एकमेकांमधली तेढ कायम होती. त्यामुळेच एकमेकाशेजारी असलेली दोन वेगवेगळी घरे झाली असली तरी एक कॉमन वॉल होतीच.
एकमेकांपासून वेगवेगळे झाल्यावर त्या दोघांनीही स्वतंत्रपणे व आनंदाने जगण्याचे ठरविले असते तर ते सर्वांकरीताच फायद्याचे राहीले असते. परंतू या दोघांमधे झालेले भांडण काही जणांच्या पथ्यावर पडले. विशेषतः मोठ्या भावाचे काही हितशत्रू होते त्यांना असे वाटले की ही एक संधी आहे ज्याचा फायदा घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यांनी लहान भावाला गाठून त्याच्या मोठ्या भावाबद्दल नाही नाही त्या गोष्टी सांगणे सुरु केले. सारख्या सुरु असलेल्या कुरबुरी कश्या मोठ्या होतील याचा प्रयत्न करणे सुरु केले. एकंदरीत आगीत तेल ओतण्याचे काम करणे सुरु केले. काही लोक मोठ्या भावालाही भडकविणारे होते. त्यांनी त्याच्याही मनात लहान भावाबद्दल नको त्या गोष्टी टाकणे सुरु केले. दोघांच्याही बाबतीत हे बाहेरचे लोक हे सहजच करु शकले कारण या दोन्ही भावांनी ती संधी त्यांना दिली. एकमेकांबद्दल असलेल्या तिरस्काराचे त्यांनी जाहीर प्रदर्शनच मांडले होते व त्यामुळे त्याचा फायदा बाहेरच्या मंडळींनी बरोबर घेतला. त्यातच लहान भावाने त्याच्या घराच्या गच्चीवर आणखी एक घर बांधले व मोठ्या भावाला खिजविण्याकरीता मुद्दाम त्याच्या एका हितशत्रूला ते घर भाड्याने दिले. तो मोठ्या भावाचा हितशत्रू याच संधीची वाट बघत होता. या मोठ्या भावाला ज्या गोष्टी आवडत नाही त्या सर्व त्याने तेथे सुरु केल्या. रात्रीच्या पार्ट्या, दारु पिऊन गोंधळ घालणे, मोठ्या भावाच्या घराच्या भिंतीला खिळे ठोकणे असे सारे उद्योग या माणसाने सुरु केले. मोठ्या भावाची पंचाईत अशी झाली की त्याला काहीच बोलता येईना कारण तो जेव्हा जेव्हा या गच्चीवरच्या माणसाला म्हणायला जायचा तेव्हा लहान भाऊच मधे पडून त्याची बाजू घ्यायचा व स्वतःच्या भावाशी भांडण करायचा. मोठ्या भावाने देखील त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवे होते व त्यामुळे कदाचित ते सारे शांत झाले असते परंतू आपल्या भावाच्या आड राहून आपले हितशत्रू आपल्यावर कुरघोडी करु इच्छीतात या गोष्टीचा जळफळाट त्याच्याही मनात होताच. या दोन्ही भावांच्या मनात एकमेकांबद्दल असलेल्या रागाला सतत भडकत कसे ठेवायचे याची योजना बाहेरच्या काही मंडळींनी बरोबर आखली होती. त्यांना हे ठावूक होते की या भांडणामधे लहान भाऊ हा कच्चा दुवा आहे. त्याला हाताशी धरून किंवा त्याला पुढे करून मोठ्याला परस्पर धडा शिकविता आला तर तो या बाहेरच्या मंडळींचा सर्वात मोठा फायदा होणार होता. हळू हळू या बाहेरच्या लोकांच्या वारंवार सांगण्यावरून लहान भावाने मोठ्या भावावर कुरघोडी करणे सुरु केले. आपल्या घरात भाडेकरु मुद्दाम मोठ्या भावाचे हितशत्रू ठेवणे सुरु केले. त्यांच्या करवी मोठ्या भावाला जितका जास्तीत जास्त त्रास होईल तेवढा देणे सुरु केले. मोठ्या भावानेही त्याकडे दुर्लक्ष न करता आपल्याच लहान भावाला धमक्या देणे सुरु केले. बघता बघता हे भांडण अगदी विकोपाला पोहोचले. एकमेकांविरुद्ध भांडणाचा अतिशय खालचा स्तर गाठल्या गेला. लहान भावाचे सोबती त्याला जास्तीत जास्त भडकवत राहीले, त्याला आम्ही तुझ्या सोबत आहोत तू काळजी करु नकोस, तुझ्या मोठ्या भावाची आपण चांगली जिरवू, तू फक्त पुढे हो अश्या पद्धतीचा आधार देऊ लागले. त्या आधाराच्या भरवश्यावर लहान भावाने मोठ्या भावासोबत थेट वाद उकरुन काढला व भांडण टोकाला पोहोचले. एकमेकांना शिवीगाळ करणे, प्रसंगी अंगावर धावून जाणे, एकमेकांविरुद्ध पोलीस स्टेशनमधे तक्रारी करणे यासारख्या गोष्टी सुरु झोले. सारखे मधून मधून पोलीसांच्या गाड्या घरी येऊ लागल्या. या सर्व भांडणात दोन्हीही भावांच्या परीवाराचे देखील नुकसान होऊ लागले. इच्छा नसतानाही त्यांना या भांडणात सामील व्हावे लागले. मोठ्या भावाच्या मुलीचे लग्न ठेरले असताना तिच्याबद्दल वाईट वाईट सांगून लहान भावाने तिचे लग्न मोडले तर लहान भावाची एनफोर्समेंट विभागाला तक्रार करून मोठ्या भावाने त्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. अश्या प्रकारे एकमेकांना जमेल त्या पद्धतीने त्रास देणे सुरु राहीले. शेवटी मोठ्या भावाने अंतीम घाव म्हणून न्यायालयात लहान भावाच्या विरोधात दावा ठोकला व कुरबुरींना लढाईचे रूप दिले. आता प्रकरण न्यायालयात गेले म्हणल्यावर लहान भावाला पैसे व इतर सर्वच गोष्टींची गरज भासणार होती. सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या बाजूने साक्ष देणारे लोक हवे होते. आतापर्यंत त्याला मोठ्या भावाच्या विरोधात भडकविणारे व आम्ही तुझ्या सोबत आहोत असे सांगणारे सारेच मित्र हळू हळू दूर जाऊ लागले. त्यांनी याला मोठ्या भावाच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्याकरीता पैसे दिले परंतू प्रत्यक्ष न्यायालयात उभे राहून साक्ष देण्याचे मात्र साफ नाकारले. त्याक्षणी लहान भावाला आश्चर्याचा धक्का बसला. त्याच्या हे लक्षात आलं की दोन भावांमधे वाद निर्माण करण्याचा हा मोठा डाव होता. परंतू आता न्यायालयीन लढाई सुरु झाली होती. आता मागे फिरणे शक्य नव्हते. ज्या तथाकथीत मित्रांनी लहान भावाला बाजूला सारले होते त्यांच्या बद्दलचा राग तो व्यक्त करु लागला परंतू आता त्याला लढाई लढणेच होते. खरे तर अजूनही तो हे सारे थांबवू शकत होता. मोठ्या भावानेही हे सारे समजून घेणे गरजेचे होते. परंतू दोघांमधेही निर्माण झालेले इगो जे इतरांच्या सांगण्यामुळे फारच मोठे झाले होते ते आता त्यांना माघार घेऊ देत नव्हते. लढाई सुरु राहीली ज्यामधे या दोघांचेही परीवार होरपळून निघत राहीले व ज्या हितशत्रुंना हे असेच व्हावे असे वाटत होते ते बाजूला उभे राहून गंमत बघू लागले.
अनेकांच्या आयुष्यात हे असेच होते. लोकांच्या सांगण्यावरून आपले इगो वाढविले जातात व त्यानंतर त्या वाढलेल्या इगोंमुळे आपण खऱ्या अर्थाने आपल्या जवळच्या असणाऱ्या लोकांना दुखावतो. यात नुकसान आपलेच असते हे मात्र आपण विसरलेलो असतो. होय ना?
(वरील लेखनाचा सध्याच्या जागतिक परीस्थीतीशी काहीही संबंध नाही व तसा संबंध जाणवल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)
थोडक्यात पण फारच व्यवस्थित समजावून सांगितले खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteखरी परिस्थिती आहे ही आजही लोक ओळखत नाही भाऊ भाऊच असतो रकत्त रक्तच असते
ReplyDelete