थोडा है थोडे की जरुरत है @ 15.03.22
मोहोर
बऱ्याच वर्षांपूर्वी जेव्हा आमचे घर बांधले तेव्हा घरासमोर मोठे व प्रशस्त अंगण असावे ही इच्छा पूर्ण झाली होती. त्यानंतर बागेची खूप आवड असलेल्या माझ्या बाबांनी एक छान बाग निर्माण केली. झाडांना नियमित पाणी घालणे व झाडांची निगा राखणे हे त्यांचे महत्वाचे काम होते. खूप छान छान झाडे त्यांनी लावली व जोपासली. फक्त का कोण जाणे एका झाडाच्या बाबतीत कायम अपयश यायचे व ते म्हणजे लिंबाचे. लिंबाचे झाड घरी असणे ही त्यांची व आम्हा सर्वांचीच खूप दिवसांची इच्छा परंतू ती काही केल्या पूर्ण होत नव्हती. तीन चार वेळा लिंबाची वेगवेगळी झाडे त्यांनी आणून लावली परंतू काही ना काही कारणामुळे ती झाडे जगू शकली नाही. त्यांना कायम त्या गोष्टीचे वाईट वाटायचे की सारी झाडे छान जगतात परंतू लिंबाचे झाडच जगत नाही. काही वर्षांपूर्वी बाबा आम्हाला सोडून गेले. पुन्हा एकदा लिंबाचे झाड लावण्याचा प्रयत्न आम्ही केला. कदाचित बाबांनीच आशिर्वाद दिला म्हणून यावेळी लिंबाचे झाड लागले. त्याची चांगली वाढ होऊ लागली. एक बागवान मित्र त्याची निगा घेऊ लागला. त्याला योग्य पद्धतीचे खत वगैरे देऊन तो चांगली जोपासना करु लागला. एकंदरीत अनेक वर्षांची माझ्या बाबांची इच्छा म्हणजे आमच्या कृष्णकमल या घराच्या अंगणात लिंबाचे झाड डौलाने उभे झाले. आणि मग आम्हा सर्वांना आनंदित करणारा क्षण आला की त्या लिंबाच्या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले आली. खूप सारी. बागवान मित्राने मोठ्या आनंदाने सांगितले की, लिंबाचे झाड फारच छान फुटले. त्याला म्हणायचे होते की फार छान मोहोर आला. त्याने सांगितले की हे फुल काही दिवसांनी गळून पडते व त्याच्याजागी लिंबू तयार होते. फार छान वाटत होते की संपुर्ण झाड पांढऱ्या फुलांनी मोहरून गेले होते. बागवान मित्राने पुढे सांगितले की आता फक्त यावेळी जोराचा पाऊस यायला नको कारण तसे जर झाले तर हा मोहोर आधीच गळून पडतो व मग लिंबू तयार होत नाही किंवा ते नीट जीव धरत नाही. लिंबू जीव धरत नाही हे त्याचे वाक्य माझ्या मनात त्या झाडाबद्दल वेगळीच भावना निर्माण करून गेले. जणू त्या झाडावर नवजीवन उगवते आहे व त्याची काळजी घेतल्या गेली पाहीजे. सोसाट्याचा वारा किंवा मुसळधार पाऊस आला तर त्या झाडावरचे जीवन उध्वस्त होणार आहे. मी त्या दिवसापासून त्या झाडाला नियमित पाणी देणे वगैरे करु लागलो. आम्ही सर्वजण मोठ्या आतुरतेने त्या झाडावर छान लिंबे कधी येतात याची वाट बघत होतो. आणि मग अचानक तो दिवस उजाडला.
माझ्या नेहेमीच्या सवयीप्रमाणे मी पहाटेचे फिरणे वगैरे आटोपल्यावर बागेत फेरफटका मारला. सर्व झाडांची पाहणी केली, पहाटे बागेत सुंदर फुललेल्या आनंदाचा आस्वाद घेतला व त्यानंतर माझ्या आवडत्या लिंबाच्या झाडाची पाहणी केली. संपुर्ण झाड पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेले होते. आता लवकरच ही फुले गळायला लागतील व त्यानंतर घरच्या झाडाची लिंबेच लिंबे. मित्र परीवाराला सांगूनही झाले होते की छान लिंबे आलीत की ताज्या लिंबाचे सरबत प्यायला घरी यायचे आहे. फार आनंद होत होता. मी स्वतः संपुर्ण काळजी घेऊन वाढविलेले ते झाड होते. माझ्या बाबांची एक तीव्र इच्छा त्यांच्या पश्चात पूर्ण होणार होती. दुपारी महाविद्यालयात गेलो. माझ्या कक्षामधे बाहेर काय सुरु आहे ते फार कळत नाही. साधारण दुपारचे अडीच वाजले असतील. एकदम जोरात आवाज झाला व मी दचकलो. विज कडाडली होती. मी दचकून बाहेर पाहीले. प्रचंड अंधारून आले होते. मी तडक माझ्या कक्षाच्या बाहेर निघालो. बाहेर बघतो तर काय, मुसळधार पाऊस कोसळण्याची चिन्हे निर्माण झाली होती. एरवी पाऊस हा देखील माझ्या आवडीचा विषय आहे. पावसात भिजणे किंवा पाऊस बघणे हे सुख मी अनेकवेळा अनुभवले आहे. पण आज मात्र हे असे भरुन आलेले आभाळ बघून माझ्या मनात धडकी भरली कारण मला आठवले घरच्या अंगणातील लिंबाचे झाड व त्यावर आलेला मोहोर. मी अस्वस्थ झालो. घरी पत्नीला फोन केला, तिकडे पण आभाळ आहे का? खरे तर माझ्या महाविद्यालयापासून माझे घर फक्त दीड किलोमीटर अंतरावर आहे परंतू तरीदेखील कधी कधी गावाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस पडतो हल्ली म्हणून चौकशी केली. तिने मला सांगितले की आभाळ तिकडेही भरुन आलंय. मी मनापासून देवाची प्रार्थना करु लागलो की परमेश्वरा आता जरा हवा सुटू दे म्हणजे हे आभाळ जरासे दूर जावे. विजांचा कडकडाट सुरुच होता. माझे कामात अजिबात लक्ष लागेना. मी सारखा आत बाहेर येरझारा करु लागलो. माझ्या सहकाऱ्यांच्याही लक्षात आले की मी अस्वस्थ आहे. त्यानंतर काही वेळात पाऊस सुरु झाला. माझ्या ह्रदयाचा ठोका चुकल्यासारखा झाला. मी परत घरी फोन केला. पत्नीने सांगितले की पाऊस तिकडेही सुरु झाला होता परंतू त्याचा जोर फार नव्हता. विजांचे आवाज मात्र सुरुच होते. मला वाटले की आता थोड्याच वेळात पावसाचा जोर वाढेल आणि मग घरच्या लिंबाच्या झाडावर नव्याने उगवलेली ती जीवने ध्वस्त होतील. मला माझ्या कक्षात करमेना म्हणून मी पोर्चमधे येऊन उभा राहीलो व मनातल्या मनात देवाला विनवू लागलो की आज हा पाऊस नको. पावसाचा जोर वाढला. मी पुन्हा घरी फोन केला. माझी अस्वस्थता घरी सर्वांच्याच लक्षात येत होती. आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. परंतू सुदैवाची गोष्ट म्हणजे घराच्या परीसरात अजून पावसाचा जोर वाढला नव्हता. मी घरातल्या सर्वांनाच दर पाच मिनीटाने फोन करुन खात्री करून घेत होते. शेवटी न राहवून आई म्हणाली की तू घरीच येऊन जा म्हणजे तुला खात्री पटेल. त्या प्रचंड अस्वस्थतेत काही मिनीटे गेली. मी घरी सांगून ठेवले होते की खिडकीतून झाडाकडे बघायचे व पावसामुळे मोहोर गळतो की काय ते मला कळवायचे. माझ्या कक्षाच्या दरवाज्यातून पावसाचा वाढलेला जोर मला बघवत नव्हता. काही वेळ तसाच गेला. लिंबाच्या झाडाचा मोहोर गळून गेला असेल याची मला खात्री झाली. फार वाईट वाटत होते. अचानक फोन वाजला. घरून मुलीचा फोन होता. काही वेळ मी फोन उचलू शकलो नाही. माझा हात थरथरत होता की आता मला काय ऐकायला मिळणार आहे. मी फोन उचलला व कानात प्राण आणून ती काय म्हणते हे ऐकू लागलो. अत्यंत आनंदाच्या सुरात तिने मला सांगितले, बाबा इकडे पाऊस थांबला आणि झाडाचा मोहोर जसाच्या तसा आहे. काहीही झाले नाही. आनंदाने माझ्या डोळ्यात अश्रू उभे झाले. काही वेळातच माझ्या समोरचाही पाऊस थांबला. थोड्याच वेळात महाविद्यालयाची वेळ संपली. मी जमेल तेवढ्या वेगाने गाडी चालवत घरी पोहोचलो व सर्वात आधी लिंबाच्या झाडाचा मोहोर बघितला. पांढऱ्या रंगाच्या फुलांनी बहरलेले झाड तसेच डौलाने उभे होते. त्याक्षणी मला किती आनंद झाला हे शब्दात वर्णन करता येणार नाही. शांतपणे बागेतल्या पाळण्यावर बसलो. घरी सगळेच आनंदात होते. पण त्याक्षणी एक विचार मनात आला… अन् परत सर्रकन अंगावर काटा आला…
माझ्या घरच्या अंगणातल्या एका झाडाचा मोहोर मुसळधार पावसाने गळणार होता तर मी एवढा अस्वस्थ झालो होतो, ज्या झाडाला लिंबे लागली नसती तरी मी बाजारातून विकत आणू शकलो असतो, ज्या मोहोराच्या गळून जाण्यामुळे माझ्या जीवनमानावर थेट परीणाम होणार नव्हताच अश्या मोहोराकरीता मी एवढा बेचैन होतो… तर हजार झाडे लावलेल्या संत्र्याच्या बगीच्यात, ज्याच्यावर जीवन अवलंबून आहे, असा मोहोर फुटला असताना, मुसळधार पावसाच्या वेळी तो भुमिपुत्र शेतकरी व त्याचा परीवार किती अस्वस्थ होत असतील? कल्पनाही करवत नाही… त्या लाखाच्या पोशींद्याच्या संवेदना मात्र त्या दिवशी मी तीव्रतेने समजून घेऊ शकलो..
🙏🙏🙏🙏
ReplyDeleteImmotiinal
ReplyDeleteखर आहे सर
ReplyDeleteशेतकऱ्यांचं तर हातात पैसा पडे पर्यंत काही खरं नसतं पंत.....संवेदना छान उतरली आहे....
ReplyDeleteआपल्या भावनिक चिंतेने शेतकर्याच्या स्थितिला समजू शकलास अशीच सामाजिक संवेदनाशील ता सर्वात असो
ReplyDeleteबळीराजा बाबतची संवेदना स्पष्ट व्यक्त करण्यात आली.
ReplyDeleteआत्मानुभूतीमधून परानुभूती छान रेखाटली आहे.
ReplyDeleteडॉ. संजय पाटील
प्राध्यापक ,
सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय,वाशीम
सुंदर अविभाई...
ReplyDelete