थोडा है थोडे की जरुरत है @ 08.02.22
नकळत ओघळलेला अश्रू
६ फेब्रुवारी…सकाळी ८ वाजताच्या सुमारास.. अचानक टीव्हीवरील सर्वच चॅनल्स एक ह्रदयद्रावक बातमी दाखवू लागले. काही चॅनल्सवर आधल्या दिवशीच या बातमीचा अंदाज वर्तविण्यात आला होता. पण तसे काही होणारच नाही असे मनाला पक्के समजावले होते. पण यावेळी मनाच्या आशावादानेही धीर सोडला व ती बातमी खरी ठरली. तिच्या जाण्याची ती वेदनादायी बातमी शेवटी ऐकावी लागली. वेगवेगळ्या चॅनल्सवर ते ॲंकर्स क्षणाक्षणाची माहिती देत होते. तिच्या अंत्य दर्शनाला येणाऱ्या लोकांबद्दल सांगत होते. सारा कोलाहल माजला होता. मला मात्र या साऱ्या घटनेवर विश्वासच ठेवणे शक्य होत नव्हते. तिच्या शिवाय आयुष्य या गोष्टीची कल्पनाच कधी केली नव्हती. आयुष्याची पन्नास वर्षे कायम ती सोबत होती. वेगवेगळ्या वळणावर तिची साथ होती. मनातील वेगवेगळ्या भावना ज्या व्यक्त करता आल्या नव्हत्या त्या तिने सहजच व्यक्त करून दिल्या. कुणाला काही सांगायचे होते, जे शब्दात बांधणे जमले नाही ते तिने तिच्या स्वरांमधून सहजच पोहोचविले. त्यामुळे तिचे जाणे मनाला पटतच नव्हते. दिवसभर चॅनल्स वरच्या प्रक्षेपणामधे ती दिसत होती. तिचे पार्थीव असा उल्लेख होत होता. तरीही मन मानायला तयार नव्हते. पण शेवची सायंकाळी सातच्या सुमारास तिला अग्नीज्वाळांनी वेढले आणि मग मात्र मनाचा निग्रह तुटला व सकाळपासून रोखून ठेवलेला तो अश्रू न कळत ओघळला. आपल्या आयुष्यातून काहीतरी फार महत्वाचे नाहीसे झाले याची जाणीव झाली. असे काहीतरी जे कायम आपल्याला आधार देत आले, आपल्या सोबत होते व सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आपल्या भावभावना व्यक्त करण्यासाठी ज्याचा सर्वात मोठा आधार आपल्याला मिळाला ते काहीतरी हरवले होते. नकळत ओघळलेल्या त्या अश्रूसोबत गतस्मृतींची कवाडे उघडली गेली व जीवनाचा हा लौकीकार्थाने गमावलेला आधार किती प्रबळ होता व त्यासोबत तिच्या किती साऱ्या स्मृती जोडलेल्या होत्या हे लक्षात आले.
अगदी लहानपणी, ज्यावेळी टीव्ही, टेपरेकॉर्डर देखील नव्हते त्यावेळी शाळेच्या स्नेहसंमेलनामधे विंगेत उभा असताना शाळेतील एखादी मुलगी स्टेजवर नृत्य करीत असायची व त्या नृत्याला गाण्याचा आधार देणारी माझी आई माईकवर तिचे गाणे म्हणायची, सत्यं शिवं सुंदरम….मी तीन चार वर्षांचा आईकडे बघत ते गाणे ऐकायचो… तेव्हापासून तिची सोबत लाभली. शाळेत असताना कुणीतरी मैत्रीण फार आवडायची जिच्या बद्दल मित्रमंडळींना सर्वात पहिल्यांदा सांगताना कसे सांगावे हा प्रश्न होता. मग एक गाणे मी म्हणतो हे मी तिच्याबद्दल म्हणतो आहे असे सांगितले व त्यानंतर… तेरे बिना जिंदगी से कोई, शिकवा तो नही.. तेरे बिना जिंदगी भी लेकीन.. जिंदगी तो नही… बरेच दिवस मित्र त्या गाण्याचे सामुहिक गायन करत चिडवायचे… अव्यक्त भावनांना व्यक्त करण्याचे काम तिनेच माझ्यासाठी हे गाणे गाऊन करुन ठेवले होते. तरुणपणी कॉलेजमधेही गाण्याची आवड असणारे काही प्राध्यापक भेटले व त्यामुळे तिचा सहवास लाभतच राहीला. स्नेहसंमेलनामधे अंताक्षरी खेळताना तिच्या गाण्यांची साथ प्रचंड रहायची. कितीतरी गाणी संपुर्ण कडव्यांसह पाठ असायची.. अजूनही आहेत. अजूनही आठवतं…शेवटच्या वर्षीच्या स्नेहसंमेलनात, अंताक्षरीच्या शेवटच्या टप्प्यावर, शेवटच्या राऊंडला छ शब्दावर सर्वांचीच गाडी अडकलेली होती, एक दोन नेहेमीची गाणी गाऊन झाली होती व आता छ शब्दावरून गाणेच नाही असे वाटत असताना अचानक तिच मदतीला आली व तिने गायलेले छमछम नाचत आई बहार हे गाणे म्हणून जिंकलेली अंताक्षरी व मित्रमंडळींनी केलेला जल्लोष अजूनही स्मरणात आहे. रायगडावर एका एकांत पहाटे एका जीवलग मित्रासोबत हरीहरेश्वराच्या मंदीरात बसलो असताना गाभाऱ्यात आवाज घुमत होता म्हणून दोघांनी मिळून म्हणलेली छत्रपती शिवरायांची आरती, जयदेव जयदेव जयजय शिवराया तशीच्या तशी घुमत्या सुरांसह आठवते व त्यानंतर रात्री प्रचंड धुक्याने वेढलेल्या रायगडावर गेस्ट हाऊस समोर शेकोटी पेटवून त्याच मित्रासोबत छोट्याश्या रेकॉर्डरवर गुणी बाळ असा जागसी का रे वाया..नीज रे नीज शिवराया ही अंगाई ऐकताना… कडव्यामधे तिने अपरात्रीचा प्रहर लोटला बाई… हे म्हणताना कापरा केलेला आवाज जिजाऊच्या मनातील भावना किती योग्य व्यक्त करतो म्हणून पन्नास वेळा तरी तीच ओळ परत परत ऐकलेली आठवते… तिच्या आवाजावरील प्रेमाने एक जिवलग मित्र आयुष्यभरासाठी सोबत आहे… ही तिच्या आवाजाची ताकद.. माणसे जोडण्याची. नोकरीच्या निमित्ताने घरापासून पहिल्यांदाच दूर राहण्याची वेळ आली व मग कधीकधी घरची फार आठवण येत असे. सायंकाळी एकटेच त्या गावच्या रेल्वे स्टेशनवर जाऊन बसायचे व मग आपल्या गावाला जाणारी रेल्वे बघायची… ती बघत असताना कानात इअरफोन टाकून नविनच घेतलेल्या आयपॉडवर एकच गाणे ऐकले जायचे… या चिमण्यांनो परत फिरा… घराकडे अपुल्या… तीन चार वेळा ते गाणे ऐकल्यावर मग परत निघायचे… मला घरची खूप आठवण येते आहे ही अव्यक्त भावना.. त्या रेल्वेस्टेशनवर तिनेच तर कुणाच्याही नकळत व्यक्त करून दिली… नविन नविन मोबाईल फोन आले व त्यानंतर त्यामधे कॉलर ट्यून नावाचा प्रकार आला. आपल्याला जर कुणी फोन केला तर त्या फोन लावणाऱ्याला एखादे छान गाणे ऐकायला मिळावे ही ती नवी व्यवस्था. ही व्यवस्था सुरु झाल्यापासून तो आजपर्यंत एकच गाणे ऐकवतो आहे व ते म्हणजे… ए री पवन, ढुंढे किसे तेरा मन, चलते चलते… व अनेक लोक ते गाणे ऐकून फोन लवकर उचलत जाऊ नको कारण ते गाणे फारच सुंदर वाटते असे कायम सांगत राहतात.. याचे कारण देखील तीच… कारण तिने त्या गाण्यात जे सखीचे भाव ओतले आहेत ते प्रत्येकाच्या मनाला भावल्याशिवाय रहात नाही. बाबांना महेश्वर व तेथली नर्मदा फार आवडायची म्हणून त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या अस्थी विसर्जन करण्याकरीता महेश्वरलाच घेऊन गेलो होतो. बोटीत बसून नर्मदेच्या विस्तिर्ण पसरलेल्या पात्रातून आम्ही जात होतो. लांब…नदीच्या पात्रामधे असलेल्या एका मंदीराजवळ नावाड्याने बोट थांबविली… तेथे पोहोचता पोहोचता ज्या ज्ञानेश्वरीतील पसायदानावर बाबांनी अनेक प्रवचने केली ते मोबाईलवर लावले होते. तेथेही तीच गात होती आर्ततेने… आता विश्वात्मके देवे… तिच्याच दैवी सुरांच्या साक्षीने बाबांच्या शेवटच्या भौतिक अस्तित्वास मी नर्मदा मातेच्या सुपुर्द केले… शेवटच्या अस्थी पाण्यात सोडताना ती गात होती… येथ म्हणे श्री विश्वेशराओ, हा होईल दान पसावो, येणें वरें ज्ञानदेवो, सुखिया झाला…आयुष्यातल्या जवळपास सर्व महत्वाच्या व मनापासून जगलेल्या प्रत्येक क्षणाला ती होती… किंबहुना तिच्यामुळे ते सारे क्षण अजूनही स्मरणात आहेत… मागच्याच आठवड्यात दिवसभराचे काम आटोपून घरी आलो तर मुलगा म्हणाला बाबा, एक छान गाणे ऐकवतो. एखादे इंग्रजी गाणे हा ऐकवेल म्हणून मी त्याला नाराज न करता पण मनातून नाराजीनेच..ऐकव म्हणालो… व त्याने गाणे ऐकविले… लग जा गले के फिर ये हसीं रात हो न हो, शायद फिर इस जनम मे मुलाकात हो न हो… तीचाच दैवी आवाज…डोळे मिटून गाणे ऐकू लागलो.. व मनाशीच हसलो.. तिने माझ्या पुढच्या पिढीचाही आधार बनणे सुरु केले होते…
माझ्या आयुष्यातील वर नमुद केलेले तिचे अस्तित्व वाचणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ती एवढ्याच तीव्रतेने सामील आहे याची मला खात्री आहे. म्हणूनच अग्नीज्वाळांनी वेढलेल्या तिच्या पार्थिवाला बघून डोळ्यातून आलेला अश्रू मी पुसून टाकला व पुन्हा चेहेऱ्यावर हसू फुलले कारण त्या अग्नीज्वाळांच्या पार्श्भूमीवर गीत वाजत होते…
नाम गुम जायेगा, चेहेरा ये बदल जायेगा
मेरी आवाज ही पहेचान है, गर याद रहें।।
खरंच.....मनाला किती ही बजावले की हा दिवस येणारच तरीही मन मानायला तयार नव्हते...गीत संगीत आणि स्वर ह्यांचे एक अविश्वसनीय युग पाहण्या ऐकण्याचे भाग्य मिळालेल्या जवळ जवळ तीन चार पिढ्यांसाठी आठवणींचा खजिनाच राहील ह्यात शंका नाही...
ReplyDeleteनकळत ओघळलेला अश्रू... असंख्यांनी अनुभवले असतील त्या दिवशी....
पंत, व्यकताव्यक्त भावनांना स्वरलताच्या माध्यमातून वाट मिळाली हे ही खरेच...आणि कळत नकळत आपणही आपल्या भूतकाळात प्रवास करवून आपल्या विषयीच्या काही अव्यक्त पैलूंचे दर्शन घडविले.... वा छान...छानच...
धन्यवाद मित्रा…
Delete🙏🙏👌👌👌👌
ReplyDeleteसुंदर!!!ह्या पलीकडे शब्द नाहीत माझ्याकडे!
ReplyDeleteसुरेख...
ReplyDeleteअप्रतिम!
ReplyDeleteयापेक्षा दुसरी कोणती आदरांजली असससू शकते स्व. लता दिदींना!!
||भावपूर्ण आदरांजली||
Khup chaan vayakt kele
ReplyDeleteआम्हा सगळ्यांच्या मनातील भावना किती सुंदर व्यक्त केल्यात. त्या सर्व बातम्या ऐकून नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या व्हायच्या. काहीतरी हरवलं अस वाटायचं. ती पोकळी पुन्हा त्यांची गाणी ऐकूनच भरून काढूया.
ReplyDeleteडॉ.कल्पना देशमुख
कानांना तृप्त करणारे स्वर कायमचे हरवले. भावपूर्ण श्रद्धांजली
ReplyDelete