थोडा है थोडे की जरुरत है @ 28.02.22
हिशोब
आज मी एवढ्या दिवसांचा हिशोब पूर्ण केला. माझा मित्र मला फोनवर मोठ्या आनंदात सांगत होता. आज कसे मनातून छान वाटतेय. एवढे दिवस ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो त्याची पूर्तता आज झाली. इतकी वर्षे वाट बघणे सोपे काम नाही परंतू मी वाट बघितली आणि मला आज ती संधी बरोबर मिळाली. म्हणतात ना की देव बरोबर प्रत्येकाला कर्माची फळे दतो. पण या ठिकाणी मात्र मी ते घडवून आणले. एवढे दिवस मनात साठवलेल्या अपमानाचा आज मी हिशोब चूकता केला. आज कळेल त्यांना की एखाद्याच्या आयुष्याशी खेळणे कसे वाईट असते. आज त्यांच्या लक्षात येईल की चुकीच्या कामाची शिक्षा मिळतेच. मोठ्या तावातावात माझ्या मित्र मला त्याने चुकत्या केलेल्या हिशोबाबद्दल बोलत होता. त्याच्या बोलण्यात एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिसत होता. हिशोब चुकता केला असे तो तोंडाने म्हणत असला तरी देखील त्याच्या बोलण्यातील भावांमुळे मला कळत होते की त्याने बदला घेतला. मला तो सांगत होता…
साधारण पंचेवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच एम ए झालो होतो व सुदैवाने सेट परीक्षा देखील पास झालो. प्राध्यापकाची नोकरी मला सहज मिळू शकत होती म्हणून मी प्रयत्न करणे सुरु केले. अनेक ठिकाणी मुलाखती देणे सुरु केले. सुरुवातीला माझे गुण व सेट परीक्षा उत्तीर्ण ही योग्यता असल्याने मला सहजच नोकरी मिळेल असे मला वाटले होते पण लवकरच माझ्या भ्रमनिरास झाला. वेगवेगळ्या कारणांनी माझी नेमणूक होण्याचे टळत होते. परंतू एका ठिकाणी मला फार छान संधी आलेली आहे असे वाटले. माझ्या वडीलांचे एक मित्र, माझे काकाच एका मुलाखतीच्या पॅनलवर होते. तू त्यांना ओळखतो. त्यांच्यामुळे मला जरा चांगली संधी मिळेल असे वाटले होते. मी त्यांना भेटायला गेलो. ते मला म्हणाले की तू मुलाखतीकरीता चांगली तयारी कर, आपण बघू. मनात आशेचा किरण निर्माण झाला व मी मोठ्या आनंदात मुलाखती करीता गेलो. मी अतिशय चांगल्या प्रकारे मुलाखत पार पाडली. माझी निवड होईल या आशेवर मी असतानाच एका दुसऱ्याच मुलाची निवड झाल्याचे कानावर आले. मला काकांचा फार राग आला. मी त्यांच्याकडे गेलो व त्यांना विचारणा केली तर त्यांचे ते उत्तर ऐकून मला धक्काच बसला. त्यांनी मला सांगितले की त्यांच्या हाताखाली पीएचडी करीता काम करणाऱ्या एका विद्यार्थ्याची मुलाखत माझ्यापेक्षा चांगली झाली व त्यामुळे त्यांनी त्याला प्राधान्य दिले. मला ते ऐकून संताप आला. शेवटी काकांनी माझ्याबाबतीत दुजाभाव दाखविला. मला त्याक्षणी असे वाटले की या जगात कुणी कुणाचे नसते. तो राग माझ्या मनात कायम राहीला कारण मला खात्री होती की काकांच्या विद्यार्थ्यापेक्षा माझी मुलाखत चांगली झाली होती. पण मी हतबल होतो. त्यानंतर त्या काकांशी माझा संबंध राहीला नाही. तुझा कदाचित आहे कारण तू अमरावतीतच आहेस. सुदैवाने त्यानंतर चारच महिन्यात मला दुसऱ्या एका महाविद्यालयात नोकरी लागली व आता माझी पंचेवीस वर्षांची सेवा पूर्ण झाल्यानंतर मला देवाने माझा काकांसोबत राहीलेला हिशोब पूर्ण करण्याची संधी दिली. त्या दिवसानंतर मी काकांना कधीच भेटलो नाही. तसेही मी गाव सोडलेच होते त्यामुळे भेटण्याचा प्रश्नच नव्हता, तशी माझी इच्छाही नव्हती. पण आपला हिशोब पूर्ण करण्याची देव बरोबर आपल्याला संधी देतो. मी देखील बरोबर हिशोब चुकता केला. आज काकांना कळले असेल की मला त्यावेळी नाकारून त्यांनी किती मोठी चूक केली होती. मला कळेना तो कशाबद्दल बोलतोय ते. एक मात्र कळत होते की त्याला फार आनंद झाला होता… हिशोब चुकता करण्याचा. तो ज्या काकांबद्दल बोलत होता ते माझ्याही परीचयाचे होते व त्यामुळे याने त्यांचा काय हिशोब चुकता केला हे मला लक्षात येत नव्हते. मी त्याला जेव्हा विचारले तेव्हा त्या दिवशी घडलेली गोष्ट त्याने मला सांगितली.
आता पंचेवीस वर्षे सेवा झाल्यामुळे तो बऱ्याच महाविद्यालयांमधे निवड समितीवर जात असतो. तो सांगू लागला.. आज मी ज्या महाविद्यालयात निवड समितीवर गेलो होतो तेथे काकांची मुलगी मुलाखतीकरीता आली होती. लग्न होऊनही तिने माहेरचेच नाव लावले असल्याने मी तिला ओळखले. तिची मुलाखत घेतली, सारे कठीण प्रश्न विचारले. तिने बऱ्यापैकी उत्तरे दिली. तिचा मुलाखतीमधील परफॉर्मन्स चांगला होता. परंतू मी तिला रीजेक्ट केले. तिला बोलावून सांगितले की तुझी मुलाखत चांगली झाली परंतू तुझ्या बाबांना सांग की योग्यता असतानाही मला सरांनी नाकारले आणि हे दुःख कसे असते याचा जरा तुम्ही पण अनुभव घ्या. एवढासा चेहेरा करून ती निघून गेली. मला एवढा आनंद झाला की काय सांगू? गेली पंचेवीस वर्षे मनात टोचणारी सल कमी झाली असे वाटले. आज जरा शांत झाल्यासारखे वाटतेय. देवाने काकांना त्यांची चूक समजावून सांगण्यासाठी माझ्याकरवी हे घडवून घेतले असे मला वाटते. मला फार आनंद झाला असल्याने तुला लगेच फोन केला. काय म्हणतो?
त्याचे ते बोलणे ऐकल्यावर मला काय बोलावे ते सुचेना. पंचेवीस वर्षाच्या कालावधीत एखादे मनाचे दुखणे जोपासून वेळ येताच त्याचा हिशोब करून त्याने मिळविलेला आनंद मला आनंदच वाटत नव्हता. इतकी वर्षे ही सल मनामधे जोपासणे हीच मुळात किती चुकीची बाब आहे. त्याच्या बाबत त्यावेळी काकांनी जे केले ते चुकच होते असे क्षणभर गृहित धरले तरी संधी मिळताच अश्या प्रकारे हिशोब चुकता करण्याची त्याची मनोवृत्ती मी समजून घेऊ शकत नव्हतो. मी काहीच बोललो नाही बघितल्यावर त्याने मला विचारले की, काय झाले? तुला पटलेले दिसत नाही. मी त्याला सांगितले, काकांच्या मुलीचे माहेरचेच नाव यासाठी होते की दोन वर्षांपूर्वी तिच्या पतीचे अपघातात निधन झाले व तिच्या सासरच्यांनी तिला फ्रार त्रास दिला म्हणून ती आता काकांकडेच राहते. परीस्थिती चांगली नाही, दोन मुले शिकत आहेत म्हणून ती नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतेय. आता तूच बघ… तू हिशोब कसा केलास? एवढे बोलून मी फोन बंद केला.
आधीच्या काळात घडलेल्या घटनांचे, बोलण्याचे, वादांचे, त्रासांचे व्रण अनेक दिवस आपल्या मनावर जोपासणारे व संधी मिळताच त्या व्रणांचा हिशोब करणारे आणि तो करत असताना ही देवाने केलेली योजना आहे असे म्हणून आपले वागणे जस्टीफाय करणारे अनेक लोक आपल्याला भेटतात. आर्थिक व्यवहारांमधे देणे घेणे मोकळे करून हिशोब चुकता करणे योग्यच असते. परंतू मानवी व्यवहारामधे असले हिशोब पूर्ण करण्याच्या नादात आपण आपल्या मनाच्या जखमा किती चिघळत ठेवतो व त्याचा आपल्या एकुणच स्वभावावर किती वाईट परीणाम होतोय हे बरेच वेळा भल्या भल्यांना कळत नाही. मानवी व्यवहारांमधे असले हिशोब पूर्ण करण्याच्या ऐवजी असली खाती बंद करणे जास्त योग्य असते. झाले गेले गंगेला मिळाले हे वाक्य फारच उपयुक्त असते. सारे काही मनातून काढून झालेल्या गोष्टी पूर्णपणे विसरणे व झालेल्या गोष्टीची बोलण्यात पुनरावृत्ती न करता आपल्या बोलण्यात वेगवेगळ्या व्यक्तींबद्दल तीव्र भाव न ठेवता, केवळ गोड आणि प्रेमाचेच शब्द बोलण्याचे किंवा तसेच वागण्याचे ठरवले तर आपले सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व तयार होऊ शकते. अन्यथा जुने हिशोब पूर्ण करण्याच्या नादात, ज्याचे हिशोब आपण पूर्ण करतोय त्याला त्र त्रास होतोच परंतू आपल्यालाही आनंद मिळत नाही.. त्रासच होतो. मानवी व्यवहारात हिशोब पूर्ण करायचे नसतात तर वहीखाते बंद करायचे असते. होय ना?
खरे आहे....विसरा आणि पुढे चला...थोड्या वेगळ्या पार्श्वभूमीवर जयप्रकाश नारायण आठवतात...जनता पक्षाला त्यांनी सल्ला दिला होता...तो मानल्या गेला असता तर....खैर...जर तर ह्यांना तसा काही अर्थ नसतो. पण हे ही खरे की विसरा ह्याचा अर्थ माफ करून टाका असा घेतला तर बरे...नाहीतर अनुभव विसरण्यासारखेच नाही का ? आणि जीवन म्हणजे तरी काय...अनुभवांची विणच...नाही?
ReplyDeleteउत्कृष्ट लेख आणि विषय देखील.
ReplyDeleteआपापसातील नाती म्हणजे व्यापार नव्हे. तर सहवास आणि अनुभवातून वैचारिकरीत्या समृद्ध होणे आहे.
खूप सुंदर अनुभव.
खरे आहे. विचारांच्या कक्षा रुंदावणारा , खऱ्या अर्थाने मनाची मशागत करणारा लेख! अभिनंदन!!
ReplyDeleteKhup chan
ReplyDeleteखरंय
ReplyDelete