थोडा है थोडे की जरुरत है @22.2.22

सखा

माझं आयुष्य संपुर्णपणे थांबलेलं होतंअचानक एक जण माझ्या आयुष्यात आला आणि मला म्हणाला.. माझ्यासाठी गायचेय तुलात्यावेळी मला जो उत्साह आला त्यापेक्षाही जास्त मला गाता येते याची मला आठवण झाली. अर्थात त्याने मला असे म्हणायला किंबहुना तो माझ्या आयुष्यात यायला कितीतरी वर्षे लागली. गेली काही वर्षे मला गाता येतं हे देखील मी विसरली होती. रोजचा स्वयंपाक आणि घर सांभाळणे या व्यतिरीक्त मला काही येतं हेच मी विसरली होती. माझ्या सभोवतालच्या लोकांना देखील त्याचा विसर पडला होता. मी त्यांना दोष देत नाही कारण माझ्या त्या घरातील चौकटीच्या पेक्षा मला काही वेगळं येते हे मीच तर विसरली होती ना? मला त्या कामांमधे, घर सांभाळण्यामधे, घरच्या लोकांच्या तब्येती सांभाळण्यामधेच आनंद मिळत होता. तो मला मनापासून मिळत होता ज्याबद्दल माझी आजही तक्रार नाही. परंतू त्याचा परीणाम असा झाला की घरच्या लोकांनी अशी समजूत करून घेतली की मला केवळ तेवढेच येते आणि त्यासाठीच मी जन्म घेतला आहे. मी करीत असलेल्या कामाचे मोल त्यांनी ओळखता, या चौकटीबाहेरच्या कामांसंदर्भात बोलणे सुरु झाले की ते सरसकट मला बावळट असा शिक्का मारायला लागले. माझ्या घरातल्या दुसऱ्या कुणासोबत माझी तुलना करताना मी बावळट, घाबरट, घरातली कामेच सांभाळणारी, बाहेरच्या जगात गोंधळून जाणारी अशीच प्रतिमा मिर्माण करण्यात आली. मी देखील अनेक वर्षांपासून त्या गोष्टीला मान्य करत राहीली. माझे अजूनही म्हणणे आहे की मी घरात राहून परीवाराची ज्या प्रकारे काळजी घेतली, प्रत्येकाच्या दिमतीला हजर राहीली, सर्वांच्या तब्येती, जेवणाच्या वेळा, आवडीनिवडी, औषधांच्या वेळा हे सारे सांभाळले ते माझे कर्तव्यच होते जे मी केले. परंतू घराबाहेर जाऊन नोकरी करून पैसा कमावणाऱ्यांच्या कामाशी जेव्हा जेव्हा माझ्या कामाची तुलना केली जायची तेव्हा मात्र माझ्या कामाचे मुल्य शून्य होत गेले. माझ्या आवडीनिवडी, माझ्या इच्छा, माझे स्वतःचे काही स्वतंत्र आयुष्य, हे सारे मी विसरूनच गेली होती. घरातल्या कुणाचेही काहीही असेल तर माझ्या गोष्टींना कात्री लागणार. मी मैत्रीणीकडे गप्पा मारायला जाणार हे ठरले असताना जर नवऱ्याचा फोन आला की मी कार्यालयातून लवकर घरी येतोय नंतर लगेच मला एका पार्टीला जायचे आहे तर मी त्यावेळी घरी राहणे क्रमप्राप्त आहे. याचे कारण मैत्रीणीकडे जाऊन गप्पा मारणे हा एक क्षुल्लक विषय आहे. त्यापेक्षा दिवसभराचे काम करून थकलेल्या नवऱ्याला चहा करून देणे जेणेकरून तो त्याच्या महत्वाच्या पार्टीला जाऊ शकेल म्हणून मी माझा ठरलेला कार्यक्रम रद्द करायलाच हवा. परंतू मी सकाळपासून सायंकाळपर्यंत वेगवेगळी कामे करून थकली आहे मला जरा रीलॅक्स वाटावे म्हणून मैत्रीणीकडे जाणे गरजेचे आहे हे समजून घेण्याचा प्रश्नच येत नाही. अर्थात मी देखील हे सहजच मान्य केले घरी राहू लागली. पण मी मला आवश्यक असलेली एक गोष्ट बाजूला सारून मुद्दाम घरी राहीलीय याचा अर्थ असा काढण्यात आला की ती गोष्ट माझ्यासाठी महत्वाची नव्हतीच अन्यथा मी घरी राहीली नसती त्यामुळे अश्या प्रकारे संसाराच्या चौकटीपलीकडच्या माझ्या प्रत्येकच गोष्टीला क्षुल्लक समजण्यात आले. मी मला हव्या असलेल्या गोष्टी संसाराची चौकट मनापासून जोपासण्यासाठी जे प्रयत्न केले त्याला गृहीत धरण्यात आले त्यामुळे मी बावळट, वेंधळी काहीही करु शकणारी ठरले. पण मग अचानक माझ्या आयुष्यात कुणीतरी आले. तो मला म्हणालातुला माझ्यासाठी गायचंय. त्यावेळी मला पहिल्यांदा तीव्रतेने जाणविले की संसाराच्या मी जोपासलेल्या चौकटीपलीकडे देखील माझ्याकडे माझे स्वतःचे असे सांगायला काहीतरी आहे. तो माझ्या आयुष्यात आला नि त्याने मला माझ्या सुरांची परत भेट करवून दिली. आणि काय गंमत सांगू? मला माझ्या आयुष्यात नवचैतन्य आल्यासारखे वाटले. खरे तर मी माझ्या संसाराच्या चौकटीत आनंदात नव्हती असे नाही. मी ते सारे काही मनापासून एन्जॉय करत होती परंतू हे मात्र काहीतरी माझे असे स्वतःचे होते. जसे आपली एखादी आपल्या शाळेतली जुनी वही अचानक सापडते ना तसे काहीसे झाले होते. ती वही फक्त आपली असते, तिचे कव्हर आपण लावलेले असते, तिच्या मागच्या पानांवर काहीकाही गंमती जमती लिहलेल्या असतात, कुठे आवडलेल्या कवितेच्या ओळी, पटकन सुचलेले एखादे रांगोळीचे डीझाईन, किंवा आवडत्या मित्र मैत्रीणींची लिहीलेली नावे वगैरे.. भन्नाट असे काहीतरी. पण ते सारे आपले असतेफक्त आपलेतसे काहीसे मला माझेच हरवलेले सूर गवसल्यानंतर झाले. त्याने मला खूप काही मदत केली नाही असे तो म्हणतो परंतू त्याने जे केले ना ते माझ्या आयुष्यातील गेली अनेक वर्षे कुणीही केले नव्हते. माझ्यातल्या त्या स्पेशल मला त्यानेच भेटवून दिले. माझे सूर मला सापडले आता त्या सुरांच्या आधारे मला नवे आकाश मिळालेय. अर्थात गेल्या अनेक वर्षांमधे मला जे माझे मी पण गवसले नव्हते किंवा कुणी ते मला जाणवूच दिले नाही याला मी इतरांना दोष देत नाही. या संसाराच्या चौकटीमधे मीच माझ्या मीपणाला गमावून बसली होती. संसाराच्या सर्व कर्तव्यांची पूर्तता करणे यातच मी धन्यता मानली. परंतू ती कर्तव्यपूर्तता करताना मला देखील माझे असे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे लागेल ही जाणीव मीच निर्माण केल्यामुळे इतरांना त्याचे महत्व वाटण्याचे कारणच नव्हते. मी ही अशीच आहे यातच मला सूख मिळतेय हे सर्वांनीच गृहित धरले. परंतू हे सारे केल्यानंतर या कामाला इतर लोकांच्या तुलनेत किंमतच दिली गेली नाही. मी जी माझ्या आयुष्याची एवढी वर्षे या संसाराच्या चौकटीला मनापासून सांभाळण्याकरीता दिली त्याची किंमत शून्य झाल्यावर मला बावळट हा शिक्का बसल्यावर मी खाडकन जागी झाले त्याच वेळी मला कुणीतरी भेटले. ज्याने माझ्या संसाराची चौकट सांभाळण्याचे कौतुक तर केलेच परंतू त्यासोबत त्याच्या व्यतिरीक्त माझ्याकडे असलेल्या माझ्या सुरांची मला ओळख करून दिली ज्याच्या आधारे आता माझे स्वतःचे असे क्षण त्या क्षणांच्या आधारे छोटीशी का होईना परंतू मोकळ्या आकाशात भरारी मारण्याचे स्वप्न मी आता बघू शकतेय

स्टार प्रवाह या वाहिनीवरील आई कुठे काय करते या अत्यंत लोकप्रीय मालिकेतील अरुंधती सध्या हे सारे बोलतेय आणि तिच्या या बोलण्याबद्दल वेगवेगळी मते देखील आहेत. प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगवेगळा राहू शकतो. पण अरुंधतीला तिच्यातल्या सुरांना भेटवून तिला आत्मसन्मानाने जगण्याचा मार्ग दाखविणारा तो आशुतोष हा अरुंधतीचा कोण याबद्दल चर्चा सुरु झालीय. सर्वांच्या मनात धास्ती आहे की आता ही दोघे प्रेमात पडणार का? ती दोघे लग्न करणार का? याबद्दल पुढे मालिकेत काय होईल ते आपल्याला यथावकाश कळेलच. पण आशुतोष अरुंधतीचा कोण तर केवळ मित्रापेक्षा देखील पुढे म्हणजे तो तिचा सखा आहे. असा सखा जो अत्यंत खंबीरपणे तिच्या सोबत आहे, तिला पाठबळ देतो आहे, तिला आत्मसन्मानाने जगणे शिकवतो आहे सर्वात महत्वाचे म्हणजे, तो तिचा सन्मान करतो. तिच्या संपुर्ण अस्तित्वाचा सन्मान जो तिच्या सोबतच्या मंडळींनी आजवर केला नाही, उलट तिला फक्त गृहित धरले. तिचा सखा म्हणून आशुतोष तिला हात धरुन उडवत नाहीये तर तिला स्वतःहून उडता यावे यासाठी तिच्या पंखांना बळ पुरवतोय. तिच्या ठायी असलेल्या अनेक गुणांना बहरण्याचे प्रोत्साहन देतोय. हे फक्त एक सखाच करु शकतो. असा सखा आयुष्यात लाभणे ही खरोखरीच भाग्याची गोष्ट असते. होय ना? (थोडा है२२..२२)





Comments

  1. बे मिसाल...मधला सखी ची उगीचच आठवण झाली....

    ReplyDelete
  2. हास्यामध्ये दडलेले अश्रू ओळखतो तो सखा,
    डोळे पुसून पुन्हा हसायला लावतो तोही सखाच
    ना सांगितलेले ऐकतो तो सखा,
    ना पाहिलेले दाखवतो तोही सखाच
    आधाराला सदैव तत्पर तो सखा,
    पण उभे रहायला ताकद देतो तोही सखाच,
    चुकीच्या वाटेवर अडवितो तो सखा,
    गर्द धुक्यातून वाट दाखवितो तोही सखाच,
    चुकल्यावर कडवे बोल बोलतो तो सखा
    शाबासकीची थाप देतो तोही सखाच,
    नितळ , पवित्र नात्याचा बंध सखा,
    जसा द्रौपदीचा जिवलग कृष्णसखा ...

    ReplyDelete
  3. सखा .... हवाच ....

    ReplyDelete
  4. खूप छान!असं सख्य बाई नाही करू शकत अजूनही कुणाशी हे मात्र वास्तव आहे आजही!वय कितीही असलं तरी!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18