थोडा है थोडे की जरुरत है @ 28.12.21

खिन्नता ते उभारी..

या वर्षाचा शेवटचा रविवार म्हणून मुद्दाम भटकंती करायचे ठरविले आणि काहीही ठरवता बाहेर पडलो. गाडीत बसल्यावर ठरले की ज्या ठिकाणी उजवीकडे किंवा डावीकडे जायचा रस्ता येईल तेव्हा प्रत्येकाचे मत घ्यायचे त्या दिशेने वळायचे. अशीच आपली एक गंमत. असे करता करता शहराच्या वेगवेगळ्या रस्त्यांवरून अक्षरशः भटकणे सुरु होते. मज्जा असते ना यात? एखाद्या वेळी काहीही ठरवता भटकण्यात. काही वेळानंतर मात्र चहा पिण्याची इच्छा झाली आजकाल एक नव्याने निर्माण झालेली संपुर्णपणे बदललेली चहाची टपरी शोधली. आता ही टपरी एका नाविण्यपूर्ण दुकानामधे परावर्तित झाली आहे. त्या दुकानाला छान छान नावे मिळाली आहेत. आता कळकट मळकट भांड्यामधे उकळला जाणारा चहा, पितळेच्या स्वच्छ भांड्यांमधे उकळला जातो. दुकानामधे वेगवेगळ्या लेखकांची वाक्ये किंवा कविता लिहीलेल्या असतात. दुकानाचे नाव प्रिंट केलेले छान छान कप असतात आणि पाण्यात बुचकळून ठेवलेल्या कपांमधे देता, या सुंदर कपांमधे स्पेशल तयार केलेला चहा दिला जातो. दुकानासमोर मस्त बसायला जागा होती. तिथे आम्ही बसलो. चहाचा असा आस्वाद घेताना एक फारच विचित्र प्रकार अनुभवायला मिळेल असे मला अजिबात वाटले नव्हते. सरत्या वर्षाचा शेवटचा रविवार छान आनंदाने घालवायला घराबाहेर पडलो असताना असे काही अनुभवायला मिळेल असे वाटले नाही. शिक्षण क्षेत्रात काम करत असल्यामुळे सध्याच्या आधुनिक जगातील तरुण तरुणींशी कायम संपर्क येतो त्यामुळे त्यांच्या जगाला जवळून अनुभवता येते. परंतू त्या दिवशी आलेला तो अनुभव मनाला दुखविणारा विचार करायला लावणारा होता. ते सारे अनुभवल्यावर काय करावे सुचेना. मन खिन्न झाले

चहाचा बढीया आस्वाद घेताना तेथे काही मुला मुलींचा एक ग्रुप आला. आल्याबरोबर त्यांचा एवढा कल्ला हल्ला होता की आपल्यासोबत इतर मंडळी देखील येथे आहेत याचे त्यांना अजिबात भान नव्हते. आल्याबरोबर त्यांनी जणू त्या सर्व जागेचा ताबा घेतल्यागत वागणे सुरु केले. बसण्याकरीता वेगवेगळ्या ठिकाणी असलेले स्टूल पायांनी ढकलत त्यांनी एकत्रित केले. चित्र विचित्र कपडे त्यांनी परीधान केले होते. काही मुले मुली तर अगदी शॉर्ट्स घालून होते. अगदी घरच्या बेडरूनमधून उठून थेट तेथे आल्यागत. येताना एका गाडीवर तीन तीन जण बसून ते आले होते. तेथे बसल्यावर मोठमोठ्या आवाजात त्यांचे बोलणे सुरु होते. त्या सर्वांची भाषा अतिशय उग्र आणि शिव्यांनी भरलेली होती. आजकाल अश्या शिव्या देतातच किंवा बोलताना शिव्यांचा वापर ही मुलांच्याच नव्हे तर मुलींच्याही ग्रुपमधे कॉमन गोष्ट आहे अशी तुकतीच माझ्या ज्ञानात भर पडली आहे. त्याचा प्रत्यय मला तेथे येत होता. अश्या प्रकारे अभद्र भाषेत बोलताना त्या दुकानाच्या परीसरात आपल्यासोबत अन्य काही लोक बसलेले आहेत, ज्यांच्यामधे काही परीवार देखील आहेत, त्याच्या सोबत लहान मुले देखील आहे याचे अजिबात भान त्यांना नव्हते. मुलांसोबत मुली देखील समान प्रमाणात ती भाषा बोलत होत्या. सभ्यतेच्या अपेक्षा फक्त मुलींकडूनच असतात का मुलांना सूट आहे का? असल्या वाक्याला गृहित धरून मी वरील वाक्य लिहीले आहे. कारण आपल्या भारतीय समाजामधे मुलींच्या संवेदनशीलतेवर समंजसपणावर अजूनही विश्वास ठेवला जातो. अपेक्षा दोघांकडूनही समानच आहेत. परंतू त्या अपेक्षांचा चुराडा होताना मी बघत होतो. सुरुवातीचा धांगडधिंगा झाल्यावर त्यांनी लाईट आणा म्हणून गलका केला. लाईट म्हणजे सिगरेट पेटविण्यासाठी लायटर. ते उपलब्ध नसल्याने त्यांनी त्या दुकानदाराकडे आगपेटीची मागणी केली. कदाचित त्या दुकानातील हे सारे तरुण तरुणी रोजचेच ग्राहक असतील त्यामुळे त्याने आगपेटी दिली. मग समुहामधे सिगरेटी पेटविण्यात आल्या मुले मुली मिळून सिगरेटी पिणे सुरु झाले. सिगरेट पिताना तोंडातून धुराचे गोल काढण्याची स्पर्धा देखील सुरु झाली. चार चार जणांची ती स्पर्धा होती. तोंडात सिगरेटचा कश घ्यायचा मग वर तोंड करुन धुरांचे गोल बाहेर काढायचे. ज्याने जास्त गोल काढले तो सेफ झाला. असे करत करत शेवटी जो हरला त्याच्यावर त्या दिवशीच्या चहाच्या पैश्याची पेनल्टी लागली. हे करीत असताना मुलांचे मुलींचेही एकमेकांना चिडविणे, कल्ला करणे त्यामधे शिव्या देऊन एकमेकांना बोलावणे सर्वात महत्वाचे म्हणजे त्या शिव्यांचे कुणालाही काहीही वाटणे हे सारे सुरु होते. त्यांच्या बोलण्यामधे येणाऱ्या त्या अभद्र शिव्यांपैकी एकही मी येथे लिहू शकत नाही कारण ते अतिशय असभ्य वाटू शकते. पण त्या सर्व शिव्या दर चार शब्दांनंतर पेरून ती सर्व मुले मुली बिनधास्त बोलत होते त्यांना त्याचे काहीही वाटत नव्हते. त्यांच्या त्या कंपुच्या जवळच बसलो असल्याने त्यांचे बोलणे स्पष्टपणे ऐकू येत होते. बोलताना ते त्यांच्या शिक्षकांबद्दल, मधेच एखाद्याच्या वडीलांबद्दल बोलत होते. तसे बोलताना देखील त्यांच्या शिव्यांची विशेषणे सुरुच होती. अगदी स्वतःच्या आई वडीलांबाबत बोलतानाही मेरा बाप सा…. बहोतही …. है किंवा शिक्षकाबद्दल बोलताना वो टीचर की तो मैने क्लास मे ….. रख दी असे किळसवाणे बोलणे तेही मोठमोठ्याने सुरु होते. त्यांच्या त्या तसल्या धांगडधिंग्याचा तेथे बसलेल्या सर्वांनाच त्रास होत होता परंतू त्या टोळक्याला मात्र कशाचेच भान नव्हते. मी जरा वेळाने चहा पिणे झाल्यावर दुकानदाराकडे पैसे द्यायला गेलो तेव्हा या सर्व प्रकाराबद्दल मी त्याच्याकडे नाराजी व्यक्त केली. येथे परीवार बसले असताना या प्रकारचे वागणे तुम्ही कसे चालू देता हे देखील विचारले. त्याने अत्यंत व्यावसायीक दृष्टीकोनातून मला उत्तर दिले, तो मला म्हणाला, सर कुठे यांच्या तोंडी लागता. असा एक नाही तर चार ग्रुप आहेत जे माझे रोजचे कस्टमर आहेत. तुम्ही किंवा हे परीवार जे येथे दिसत आहेत ते एखाद्या रविवारी येतात पण ही पोरे माझे रोजचे ग्राहक आहेत. सकाळ संध्याकाळ आठवडाभर हेच मला सांभाळावे लागतात. सुरुवातीला मी त्यांना हटकून पाहीले पण काही फायदा नाही सर. माझ्याच अंगावर ते आले मलाच त्याचा त्रास झाला. काय करावे, त्यांचे माय बाप त्यांना काही म्हणत नाही तर आपण कशाला तोंडी लागायचे. थोडावेळ करतात गोंधळ आणि मग निघून जातात. त्याचे उत्तर मला पटले नाही परंतू पटवून देखील उपयोग नव्हता. घरातून निघाल्यावर रस्ते निवडण्याच्या गंमतीमधे मी सहजच त्या रस्त्यावर गेलो होतो त्यामुळे त्याच्या दुकानात जाण्याची पाळी आली होती. एरवी मी त्या दुकानाचा रोजचा ग्राहक नाही. त्यामुळे तो दुकानदार त्याच्या दुकानाच्या आर्थिक बाबीचा विचार जास्त करणार हे देखील बरोबर होते. त्या सर्व ग्रुपचा तो गोंधळ मागे ठेवून मी गाडी पुढे काढली त्यानंतर मन मात्र खिन्न झाले. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात मुला मुलींना चांगले नागरिक बनविण्याची प्रक्रीया राबवतो. त्या प्रक्रीयेचे असे फलीत दिसल्यावर मी खरोखरीच निराश झालो. ती मुले प्रत्यक्ष माझे विद्यार्थी नसले तरी देखील शैक्षणिक प्रक्रीयेतीलच आहेत त्यांना कुणीतरी घडविण्याचा प्रयत्न करीतच आहे. परंतू ते प्रयत्न अश्या प्रकारे असफल झालेले बघून माझे मन पूर्णपणे निराश झाले होते. जरा बरे वाटावे म्हणून मी गाडी पुढे नेऊन अमरावतीच्या छत्री तलावावर जायचे ठरविले

तेथे रस्त्यावर गाडी लावली आणि चालत तलावाच्या काठावर गेलो आणि अचानक मला परत दोन ग्रुप दिसले. तरुण तरुणींचेच. परंतू यावेळी मात्र मला त्यांना बघून, भेटून अतिशय आनंद झाला. मनावर आलेली खिन्नता पार दूर झाली वर्षाच्या शेवटच्या रविवारी नव्या वर्षात कराव्या लागणाऱ्या एका कामाची प्रेरणा देखील मिळाली. असे हे दोन ग्रुप कमालीचे होते. चहाच्या दुकानातील मुला मुलींसारखे हे पण तरुणच होते परंतू आपल्या देशाची आधुनिक तरुणाई कशी असावी याचे खरे रुप दर्शविणारे होते. वर्ष संपताना चहाच्या दुकानात भेटलेल्या ग्रुपमुळे खिन्न झालेले मन या दोन ग्रुपना भेटून नवी उभारी घेऊन नव्या वर्षाच्या सकारात्मक स्वागतासाठी तयार झाले.. चला तर मनाला उभारी देणाऱ्या या तरुणाईची ओळख करून घेऊयातनव्या वर्षात!!! (…क्रमशः)





Comments

  1. Kay karave aamachya sarakhya teachers ni hey drushha sahan zale nahi mhanun regular order means parmanent job mi resin kela reputed ..... college cha karan tithe ek students ni teacher chya kansinit hanali te fakktta tyachi cheating pakadli mhanun

    ReplyDelete
    Replies
    1. Don’t get that much upset.. a positive side is coming up in the next week…

      Delete
  2. आज काल हे चित्र common आहे सर. पण विशेष बाब अशी की एक असभ्य ग्रुप सोबत तुम्हाला दोन चांगले ग्रुप पाहायला मिळाले. म्हणजे अजून ही चांगल्या गोष्टींचे प्रमाण जास्त आहे, आता हे टिकवून ठेवणे किंवा अजून वाढवणे यासाठी प्रयत्न आपण सगळे च शिक्षक करू. सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गावर आणने शक्य नसले तरी "मी माझ्या विद्यार्थ्यांना जाणता नागरिक बनवेल" असा संकल्प च नवीन वर्षात प्रत्येक शिक्षकाने करू. खरंच याने कितपत बदल होईल माहिती नाही, पण आपल्या शिक्षक मनाला मात्र नक्की उभारी मिळेल

    ReplyDelete
  3. खरंय सर तुमचं. हे असं चित्र बघितलं की मन खट्टू होतं. वाईट वाटतं. पण या अशा तरूणांच्या जडण-घडण करण्यात कोणाला दोष द्यावा-- कारण अगदी पाचवी पासुन विद्यार्थ्यांच्या पालकांचा अनुभव मी घेतलाय. खूप काही बोलण्यासारखं आहे. 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18