थोडा है थोडे की जरुरत है @ 07.12.21
संवेदना अजूनही आहे
साधारण सहा महिन्यापूर्वीची घटना आहे. मी विद्यापीठात कार्यरत असतानाचा प्रसंग. त्या दिवशी फार काही भेटणारे नव्हते व मी माझे काम करत माझ्या केबीन मधे बसलो होतो जेव्हा ते दोघे मला भेटायला आले. विद्यार्थी भेटायला आले की मला फार आनंद होतो कारण ते नेहेमीच माझ्यासाठी सर्वात महत्वाचा घटक राहीले आहेत. त्यांना वेळ व प्राथमिकता द्यायलाच हवी ही मान्यता अगदी सुरुवातीपासून माझी असल्याने मी माझे काम बाजूला ठेवले व त्यांच्याशी बोलू लागलो. विद्यार्थी संघटनेचे ते दोघे पदाधिकारी होते. एका अतिशय महत्वाच्या विषयावर ते माझ्याशी बोलायला आले होते. सर्वच अधिकाऱ्यांना दोघादोघांनी भेटायचे असे त्यांनी ठरविले होते. त्यानंतर पुढचा अर्धा तास ते मला तो विषय समजावून सांगत होते. त्यांचे मी काळजीपूर्वक ऐकत तर होतो परंतू त्याच वेळी माझे मन भूतकाळात रमू लागले. त्यांना बघून कालचक्र उलट दिशेने फिरावे तसे काहीसे मला झाले. माझ्याच आयुष्यातील काही प्रसंगांना त्यांच्याकरवी मी जोडल्या गेलो. मला त्यांच्या जागी स्वतःला बघता आले. पण त्यासोबत एक अतिशय महत्वाची गोष्ट घडली ती म्हणजे माझा काही वर्षांपासूनचा एक समज, गैरसमज होता ही जाणीव मला झाली. अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने आपला विषय ते दोघे माझ्यासमोर मांडत होते. विषय अतिशय महत्वाचा होता आणि सर्वात मुख्य म्हणजे तो व्यक्तिगत नव्हता तर अनेक विद्यार्थ्यांना मदत करण्याकरीता मांडला जाणारा होता.
कोरोना काळात विद्यार्थी महाविद्यालयांमधे जाऊ शकले नाही. त्यांचे जास्तीत जास्त शिक्षण ऑनलाईन पद्धतीनेच पार पडले. असे असताना ज्या काही गोष्टींचा वापरच विद्यार्थ्यांनी केला नाही त्याचे शुल्क त्यांना माफ केले जावे ही त्यांची मागणी होती. जसे महविद्यालयात न गेल्यामुळे सायकल स्टॅन्ड वापरल्याच गेला नाही, ग्रंथालय नाही, त्यांची मेडीकल किंवा फिजीकल टेस्ट नाही, स्नेहसंमेलने नाही अश्या गोष्टी, ज्या झाल्याच नाही त्यांचे शुल्क माफ केले जावे याकरीता ते विद्यार्थी निवेदनासह आपले म्हणणे मांडत होते. परंतू हे मांडताना आणखी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे ते दोघे तो विषय फार पोटतिडकीने मांडत होते. कोरोना काळात रोजगारावर, शेतीवर झालेला परीणाम, लोकांनी गमावलेल्या नोकऱ्या, त्यामुळे निर्माण झालेली आर्थिक विवंचना व त्यामुळे शुल्क भरता न येण्याची पालकांची अगतिकता या साऱ्या बाबी ते फार तळमळीने मांडत होते. गावामधे काही जणांचे संसार उध्वस्त झाले व त्यांच्या परीवाराची कशी वाताहात झाली हे सांगताना त्याचे कंठ दाटून आले होते. ते जे सांगत होते ते ऐकून मला तीस पस्तीस वर्षांपूर्वी काही मुले मुली अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर बसलेले दिसत होते. अश्याच एका विषयावर तावावावाने बोलणे सुरु होते.
जम्मु काश्मीर मधून विस्थापित झालेल्या काही विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ती चर्चा सुरु होती. तेथील दहशतवादामुळे काही विद्यार्थ्यांना अक्षरशः घरदार सोडून पळून यावे लागले होते. त्यांच्या पुनर्वसनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यांना सरकारी मदत मिळावी या साठी आम्ही काही मुले मुली धडपडत होतो. त्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचे वर्णन करताना आमचेही कंठ दाटून आले होते. त्यापैकी काही मुलांना तर आपल्या आई वडीलांच्या क्रूर हत्या डोळ्यांनी बघाव्या लागल्या होत्या, काहींना त्याहून भयानक गोष्टींना सामोरे जावे लागले होते. स्वतःचा जीव वाचवून अक्षरशः पळून आलेल्या काही विद्यार्थ्यांना सरकार कडून मदत मिळावी, त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी, त्यांना महाविद्यलयांमधे प्रवेश मिळावे व त्यांना शुल्क माफ केले जावे यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत होतो. हा सारा जुना काळ मला आठवून गेला. माझ्या समोर बसलेले माझे तरुण मित्र बोलत राहीले व मी त्यांचे म्हणणे समजावून घेत राहीलो. त्यानंतर त्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी माझ्याच अध्यक्षतेखाली समिती तयारझाली व मुलांनी मांडलेल्या विषयानूसार विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय विद्यापीठाने घेतला. पण या साऱ्या प्रक्रीयेमधे आजच्या तरुणाईबद्दलचे जे सार्वत्रिक मत बनले आहे ते मात्र संपूर्णपणे खरे नाही ही जाणीव मला झाली. सोबतच, आधीच्या काळात आमच्या सारख्या तरुणांच्या मनात संवेदना होत्या व त्या आता लोप पावत चाललेल्या आहेत हा आमच्या पीढीबद्दलचा वृथा अभिमान देखील नाहीसा झाला.
आजची तरुणाई देखील संवेदना बाळगून आहे किंबहुना आता त्यांच्याकडे विविध समस्यांवरचे उपाय देखील आहेत. आता ते व्हॉट्स ॲप किंवा इन्स्टाग्राम बद्दल बोलत असले तरी त्याच्या माध्यमातून ते जलद गतीने संवाद साधतात व आपले म्हणणे अनेकांपर्यंत तातडीने पोहोचवतात. व्यक्त होण्याचे माध्यम बदलले असले तरी देखील ते त्याच संवेदनशीलतेने व्यक्त होतात. आजच्या तरुणांबद्दलचा हा अत्यंत सकारात्मक विचार माझ्या मनात प्रस्थापित असतानाच नुकतेच मी कौन बनेगा करोडपती या मालिकेमधे अमिताभ बच्चन यांच्या नातीकडून ती करीत असलेल्या कामाबद्दल ऐकले. ते ऐकल्यावर तर तरुणाई किती संवेदनशील आहे याचा पुनःप्रत्यय आला. एका सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून ती मुलगी, गडचिरोली सारख्या दुर्गम भागात एका गावात महिलांसंदर्भात होणाऱ्या एका कुप्रथेविरुद्ध काम करते. गडचिरोली जिल्ह्यात एका आदीवासी गावात एक वाईट प्रथा आहे की त्या गावातील ज्या महिलांना मासिक पाळी असेल त्यांना गावातून बाहेर काढून दिले जाते व त्या महिलांना रानात उघड्यावर वाईट स्थितीमधे रहावे लागते. त्या महिलांकरीता अश्या काळाकरीता त्या तरुण मुला मुलींनी घरे बांधून दिली आहेत. जेणेकरुन महिन्यातील त्या दिवसांमधे त्यांना उघड्यावर किंवा जंगलात छताविना राहण्याची अवहेलना सहन करावी लागू नये. याबद्दल माहिती देताना ती मुलगी म्हणाली की या कुप्रथेविरुद्ध आम्ही संघर्ष करतोय परंतू हजारो वर्षांच्या प्रथा एकदम बदलणार नाहीत त्यामुळे आम्ही ते हळू हळू करतोय. पण सध्या या गावातून बाहेर काढून दिल्या जाणाऱ्या महिलांकरीता त्वरीत काहीतरी करायचे होते म्हणून आम्ही ही विशेष घरे उभारण्याची संकल्पना कार्यान्वित केली व त्यामुळे त्या आदीवासी भागातील महिलांची अवहेलना काही प्रमाणात थांबलीय. त्या गावातून बाहेर येतात परंतू त्यांच्यासाठी खास बांधलेल्या घरांमधे राहतात.
ही बाब किती सकारात्मक आहे. जेव्हा मी याबाबत माझ्या काही मित्रांशी बोललो तर त्यांच्यापैकी प्रत्येकाने किमान एक उदाहरण असे दिले ज्यात सध्याचे तरुण फार सुंदर काम करीत आहेत. मग ते काम अश्या कुप्रथा दूर करण्याचे असेल, किंवा पर्यावरण संरक्षणाचे असेल किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्याचे असेल. ज्यांना दिशा सापडलीय ते तरुण मनापासून सक्षम कार्य करीत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून आम्ही करत होतो त्यापेक्षा जास्त सक्षमतेने काम करीत आहेत. त्यांचा दृष्टीकोन व्यापक आहे. जात पात असल्या क्षुल्लक बाबींचा विचार न करता सर्वांना सामावून घेणे त्यांचा स्थायी भाव आहे. म्हणूनच माझ्यासमोर बसून विद्यार्थ्यांच्या समस्या मांडणाऱ्या तरुणांनी माझ्या मनातला सध्याच्या तरुणाईबद्दचा गैरसमज तर दूर केलाच पण फक्त आम्हीच केले हा वृथा अभिमान देखील संपविला.
सध्याच्या आपल्या या काळात काही तरुण तरुणी अत्यंत चुकीच्या गोष्टी करत असतीलही, तशी उदाहरणे आपल्या ऐकीवातही असतील. परंतू या सोबतच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण तरुणींची संख्या देखील मोठी आहे. यांच्याबद्दल आपण माहिती घ्यावी, इतरांना सांगावे, त्यांना प्रोत्साहित करावे जेणेकरून मार्ग भटकलेले काही तरुण तरुणी देखील त्यांना जॉइन करु शकतील व सकारात्मकतेचे एक छान वातावरण आपण सहज निर्माण करु. चला तर तरुणाईच्या संवेदनापूर्ण व्यवहाराबद्दल बोलुया…
अजुनही समाज भान जागृत आहे.आणि या लेखाने तरूणाई ला जागे केले फारच छान
ReplyDeleteअजून ही समाजभान जागृत आहे आणि तरूणाई ला या लेखाद्वारे समाज मानाच्या जवळ नेले फारच छान काम
ReplyDeleteखूप खूप छान
ReplyDeleteखुपचं छान लेख आहे सर
ReplyDelete