थोडा है थोडे की जरुरत है @ 14.12.21
संस्कार करणाऱ्यांना सांभाळूयात
२१ व्या शतकात भारताचे जगातील स्थान याबाबत एक व्याख्याते भाषण देत होते. देशाने आजवर केलेली प्रगती व अन्य देशांनी आपल्या देशापेक्षा जास्त केलेली प्रगती याबाबत त्यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. त्यांनी ज्या आकडवेवारीच्या भरवश्यावर ती बाब मांडली ती तंतोतंत खरी होती व विचार करायला लावणारी होती. परंतू हे सारे सांगून झाल्यावर त्यांनी नेहेमीप्रमाणे या सर्व गोष्टीला राजकारणी लोक कारणीभूत आहेत व पर्यायाने त्यांना जो राजकीय पक्ष आवडत नाही त्यावर बरेच तोंडसूख घेतले. देशातील प्रत्येक समस्येला आणि विकासामधील अडथळ्यांना राजकीय व्यवस्था कशी जबाबदार आहे हे सांगण्याची सध्या एक नवी फॅशन आहे. यामधे वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे समर्थक सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात, मुद्दाम त्यासाठी वेळ देऊन पोस्ट टाकतात व खळबळजनक चर्चा घडवून आणतात. राजकीय मंडळींना दोष देणे किंवा त्यांच्यावर वाईटाची जबाबदारी टाकून मोकळे होणे फार सोपे आहे. परंतू ज्या सामाजिक व्यवस्थेमधे आपण वावरतो त्या ठिकाणी जी नागरीकत्वाची सुजाणता व देशप्रेम हवे असते ते दाखविताना मात्र आपणच कमी पडतो या गोष्टीचा सोयीस्करपणे विसर पडलेला असतो. सुजाण नागरीकत्व किंना आपल्या देशाबद्दलचे प्रेम हे मुळातच असावे लागते किंवा पिढ्या घडविताना ते रुजवावे लागते या गोष्टीला अधोरेखित करणारी एक घटना एका व्हॉट्स ॲप पोस्टच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचली होती. एक अतिशय छोटीशी गोष्ट परंतू त्या गोष्टीचा परीणाम व त्यामधून निर्माण झालेली सकारात्मकता व आशावाद अद्याप कायमस्वरुपी माझ्या मनात कोरल्या गेला आहे. बंगलोर विमानतळाबाहेर घडलेली ती घटना बघून खरोखरीच देशप्रेम हे नव्या पिढ्यांमधे रुजविले तर एक उत्कृष्ट भावना निर्माण होते व त्यानंतर देशप्रेमाच्या अनेक छोट्या छोट्या बाबी सहजच या पिढीकडून घडायला लागतात. शेवटी देशप्रेम म्हणजे प्रत्येकवेळी हातात बंदुक घेऊन सिमेवर लढायला जाणेच नाही. ते सौभाग्य फार कमी लोकांना लाभते. परंतू ज्यांना ते लाभत नाही त्यांना आपल्या मनातील देशभक्ती रोजच्या जीवनातील अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीमधून दर्शविता येऊ शकते. जसे मी बघितलेल्या व्हिडीयोमधे मला जाणविले होते. त्या बापाने किंवा कोणत्यातरी शिक्षिकेने त्या लहान मुलाच्या मनात देशप्रेमाचे काही मोलाचे विचार मनापासून रुजविले होते व त्यामुळेच ती घटना घडली असावी.
बंगलोर एयरपोर्टवर आपल्या मुलाला घेऊन तो माणूस जात होता. बंगलोर हे अनेक कारणासाठी प्रसिद्ध असल्याने तेथील एयरपोर्टवर सुरक्षा अतिशय कडक असते. त्या दिवशी देखील अपवाद नव्हता. त्या एयरपोर्टच्या बाहेर सैन्यदलाची एक भली मोठी गाडी उभी होती व त्यावर एक सैनिक पूर्ण पोषाखासह हातात बंदुक घेऊन पहारा देत होता. त्या गाडीसमोरून तो माणूस आपल्या लहान मुलाला घेऊन चालत होता. तो मुलगा छोटासा म्हणजे अगदी तीन किंवा चार वर्षाचा असावा. त्याच्या वडीलांचे लक्ष पुढे होते परंतू चालता चालता या मुलाला तो सैन्यदलाच्या गाडीवरील सैनिक दिसला. कदाचित त्याला त्याच्या प्ले हाऊस मधल्या मॅडमनी किंवा त्याच्या आई वडीलांनी सैनिकांबद्दल काही सांगितलेले आठवले असेल. अचानक त्या छोट्याश्या मुलाने आपल्या वडीलांचा हात सोडला व तो उजवीकडे वळून थांबला. त्याचे वडीलही हा का बरे थांबला म्हणून बघू लागले. त्यानंतर त्या मुलाने जे केले ते अत्यंत नैसर्गिकपणे केले होते. त्याच्या वडीलांनी त्या क्षणी त्याला ती गोष्ट करायला सांगितली नव्हती किंवा त्या व्हिडीयोकरीता त्याने असे केले असेही नव्हते. कारण हा सारा व्हीडीयो एका सीसीटीव्ही कॅमेरामधे चित्रीत झालेला आहे. परंतू त्या छोट्याश्या मुलाची अगदी छोटी वाटणारी कृती फार महत्वाची होती कारण त्याने ती नैसर्गिकरित्या केली होती. त्या मुलाने आपल्या वडीलांचा हात सोडला. तो त्या सैन्यदलाच्या गाडीसमोर उभा राहीला आणि त्या सैनिकाला त्याने कडक सॅल्यूट केला. आपल्याला एक छोटासा मुलगा सॅल्यूट करतो हे बघून त्या सैनिकाने देखील त्याला त्याच्या खास अंदाजात कडक सॅल्यूट केला. आपल्या मुलाची ही सारी कृती त्याचे वडील बाजूला उभे राहून बघत होते. अगदी सहजपणे त्या सैनिकाबद्दल त्या मुलाच्या मनात निर्माण झालेले कृतज्ञतेचे भाव आणि त्यामधून त्याने त्या सैनिकाला केलेला सॅल्यूट ही गोष्ट साधी परंतू अतिशय महत्वाची होती.
जेमतेम तीन चार वर्षे वय असलेल्या त्या मुलाच्या मनात देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाबद्दल अश्या पद्धतीचा आदर असावा व त्याहून महत्वाचे म्हणजे तो आदर दाखविण्याची संधी मिळताच त्याने इतक्या प्रभावीपणे कुणीही न सांगता व्यक्त व्हावे ही खरोखरीच अत्यंत महत्वाची उपलब्धी आहे. स्नेहसंमेलनामधे मुलांना फॅन्सी ड्रेस स्पर्धेमधे सैनिकाचा पोषाख घालून त्याला जोशपूर्ण वाक्ये म्हणायला लावणे हे तर छान आहेच परंतू अश्या पद्धतीची कृतज्ञतेची भावना मुलांच्या मनात रुजविणे किती मोलाचे आहे हा विचारच आपल्याला प्रेरणादायी ठरतो. देशातील लहानग्यांना घडविणाऱ्या समस्त शिक्षक व पालकांना उत्साहित करणारा हा प्रसंग होता असे मला वाटते.
आपल्या देशात लहान मुलांना चांगले प्रशिक्षण देणाऱ्या अनेक प्रतिष्ठीत संस्था आहेत. त्यातील काही शासकीय तर काही खाजगी आहेत. या संस्थांमधून खऱ्या अर्थाने चांगले नागरिक घडविण्याची प्रक्रीया निरंतर घडत असते. परंतू दुर्दैवाने या संस्थांमधे कार्य करणाऱ्या शिक्षकांकडे मात्र बरेच वेळा समाज दुर्लक्ष करतो की काय असे वाटते. या सर्व संस्थांमधे अनेक ठिकाणी अत्यंत अल्प पगार शिक्षकांना दिला जातो. त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण देण्याच्या व्यवस्था उपलब्ध नाहीत. या शिक्षकांना योग्य सुविधा दिल्या जात नाहीत व काही ठिकाणी तर एवढ्या तुटपुंज्या मोबदल्यात एवढे प्रचंड काम करून घेतले जाते की त्याला पिळवणूक म्हणायची की काय असा प्रश्न पडतो. मुलांच्या मुलभूत जडणघडणीमधे अत्यंत सकारात्मकतेने योगदान देणाऱ्या या शिक्षक वर्गाकडे सर्वाधिक दुर्लक्ष केले जाते ही फारच दुर्दैवाची बाब आहे. खरे तर या वर्गाकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे कारण त्यांनी केलेले संस्कार कायमस्वरुपी टिकणारे असतात. त्या छोट्या मनावर जाणिवपूर्वक उमटविल्या जाणाऱ्या अनेक सुरेख बाबी मी वर वर्णन केलेल्या उदाहरणाप्रमाणे सहजच प्रकट होणे ही किती सुरेख गोष्ट आहे. या संदर्भात समाजातील सर्वच वर्गात गांभिर्याने विचार व्हायला हवा. देशाच्या येणाऱ्या पिढ्या सक्षमतेने घडविण्यासाठी या मुलांच्या शिक्षकांना सर्वोत्तम प्रशिक्षण, सुविधा आणि या श्रेष्ठ कामाचा योग्य मोबदला याबाबत विचार करायला हवा. परदेशात ज्या प्रकारे कम्यून मधून शाळांची जबाबदारी घेतली जाते त्याप्रमाणे आपल्याही देशात घेता येईल का याचा गांभिर्याने विचार व्हायला हवा.
उच्च शिक्षणाच्या व्याप्तीच्या दृष्टीने वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्या देशात विचार केला जातो. तो करणे गरजेचे आहे कारण त्यामधून उद्यमशील किंवा नोकरी करण्यासाठी योग्य असा तरुण तयार होतो. परंतू त्यासोबतच चांगले नागरिक घडविण्याच्या दृष्टीने काही मुलभूत संस्कार करणाऱ्या छोट्या मुलांच्या शाळांकडे व त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांकडे समाजाने लक्ष देण्याची गरज आहे. बंगलोर एयरपोर्टवर त्या सैनिकाला सॅल्यूट करणारा तो लहानगा संवेदनशील मनाचे अत्यंत प्रभावी प्रतिक आहे. ही संवेदनशीलता व रोजच्या जीवनात राबविता येणारी देशभक्ती आपल्याला सहजच जोपासता येईल जर या मुलांना प्रशिक्षित करणाऱ्या शाळा व त्यांचे शिक्षक यांना आपण आधार व पाठबळ देऊ शकलो तर.. चला तर याबाबत मनापासून विचार करुयात!!
छानच
ReplyDeleteजरूरी समस्ये वर लक्षवेधी लेख
ReplyDeleteखुप छान लेख
ReplyDelete