थोडा है थोडे की जरुरत है @ 21.12.21

एक छोटीशी पीन

पेपरची ती बातमी वाचून मी सून्न झालो. कोरोनाच्या या संकटकाळामधे मुलांच्या मनावर फार ताण निर्माण झालाय हे मला लक्षात येत होते परंतू त्या ताणाचा परीणाम हा असा होईल असा विचार मी केला नव्हता. मध्यंतरी एका व्याख्यानाच्या दरम्यान बोललो होतो की सध्या पालकांची आणि शिक्षकांची भुमिका फार महत्वाची राहणार आहे. कारण मुलांच्या मनोभुमिकांवर सुयोग्य परीणाम करणारे त्यांना ताणमुक्तीच्या दिशेने अग्रेसर करणारे हे दोनच घटक आहेत. कोरोनाचा सुरुवातीचा काळ सोडला तर त्यानंतर सर्वांनीच ऑनलाईन पद्धतीला स्विकारले त्या माध्यामातून अभ्यास सुरु झाला. परंतू शाळा महाविद्यालये किंवा घरात देखील संवाद कमी झाला परस्परांशी अवांतर बोलणेही कमी झाले. प्रत्येकाला मोबाईलच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वापराची सवय लागली त्यामुळे थेट संपर्क त्यामधून होणारा प्रभावी संवाद होईनासा झाला. या सर्व बाबींसोबतच या कोरोना काळाचा परीणाम एकुणच व्यवस्थांवर झाल्यामुळे मुलांच्या मनावर एक दडपण येणे सुरु झाले. यावेळी हे दडपण लहान मुलांपेक्षा पदवी अभ्यासक्रमाला असणाऱ्यांवर जास्त होते. कोरोना काळात परीक्षा देऊन उत्तिर्ण झालेला तो स्नातक होता. एक वर्षापासून त्याची नोकरी मिळविण्याकरीता धडपड सुरु होती. परंतू कोरोना काळात फारसा अभ्यास झाल्याने परीक्षा देखील ऑनलाईन दिल्यामुळे त्याला फार अभ्यास करावाच लागला नाही आणि तो सहजच स्नातक झाला. त्याचा परीणाम असा की त्याला गेले सहा महिने वेगवेगळ्या ठिकाणांहून नकार मिळत गेला. त्याला काही येतच नव्हते. प्रत्येक ठिकाणी त्याची अवहेलना होत गेली शेवटी कंटाळून गेल्यावर याचा एवढा प्रचंड ताण त्याच्या मनावर आला की त्याने स्वतःचे आयुष्य संपविले. मनाला वेदना देणारी ही बातमी वाचल्यावर ही परीस्थिती किती वाईट आहे हा विचार मनात आला. अश्या प्रकारे आयुष्य संपविणे हे योग्यच नाही. त्या मुलाला जर समजावता आले असते तर, त्याच्याशी बोलता आले असते तर किंवा जीवनात आलेले हे अपयश पचविण्याची ताकद त्याच्यात निर्माण करता आली असती तर किंवा सर्वात महत्वाचे म्हणजे काही महिन्यांच्या अपयशामुळे असे आयुष्य संपविणाऱ्या त्या माझ्या मित्राला या मनुष्य म्हणून मिळालेल्या आयुष्याची खरी किंमतच कळलीच नाही असेच म्हणावे लागेल. मला चटकन आठविली एक छोटीशी पीन. सेफ्टी पीन.

एका छोट्याश्या नि क्षुल्लक वाटणाऱ्या सेफ्टी पीनचा प्रवास कधी विचारात घेतलाय? लोक सहजच ती पीन वापरतात परंतू त्या छोट्याश्या पीन चा प्रवास सुरु होतो तिच्या निर्मितीपासून. तिचे ते विशेष बनलेले डीझाईन, त्यासाठी वापरले जाणारी धातू, त्या पीनला अडकवण्यासाठी वर असलेले होल्डर, त्या होल्डरची विशेषता, त्या होल्डरला एका बाजूने असलेला कर्व्ह, त्यामधून पीन नीट निघू शकण्यासाठी केलेली व्यवस्था, त्या पीनला ताण मिळावा म्हणून खाली दिलेला पीळ ज्यामुळे बरोबर योग्य तो ताण निर्माण होणार, शिवाय ती पीन खोचायची असल्यामुळे तिला करण्यात आलेले टोक, त्या पीन सोबत असलेल्या अनेक पीन्स एका पीन मधे एकत्र ठेवण्यात येतात, त्यानंतर त्याला सुंदर पॅकींग केले जाते, मग ते पॅकेट्स एका मोठ्या पॅकेट मधे टाकले जातात त्यानंतर त्या पीन बनविण्याच्या कारखान्यातून त्या पीन्सचा प्रवास सुरु होतो. वेगवेगळ्या शहरातल्या वेगवेगळ्या दुकानांमधे त्या पीन्स पोहोचतात. कुणी एखाद्या मोठ्या मॉलमधे पोहोचते तर कुणी वीजही नसलेल्या एखाद्या छोट्याश्या गावातल्या दुकानात. तेथून त्या पीनचा प्रवास पुन्हा कुठे होईल हे निश्चित नसते. मग आमच्या माता भगिनी त्या पीन विकत घेतात. कधी ती पीन त्यांच्या साडीला लावायला उपयोगात येते किंवा लहानपणी शाळेच्या पॅन्टची हुक तुटल्यावर त्याकरीता पीन वापरलेली मला आठवते, कधी ती फाटलेल्या पडद्यांना जोडून ठेवण्याकरीता कामात येते तर कधी, एखाद्या मोठ्या समारंभात प्रमुख अतिथींना बॅज लावण्याच्या कामी येते. कधी ती पावडरच्या डब्याची छिद्रे मोकळी करण्यास्तव कामात येते तर आधीच्या काळात तुटलेल्या स्लिपरचे पट्टे जोडायला देखील तिचा उपयोग व्हायचा. कधी ती काचेच्या बांगड्यांना लटकलेली असते तर कधी सोन्याच्या पण गरज पडली तर बसमधल्या गर्दीचा फायदा घेऊन छेड काढणाऱ्या टारगटाला जोरात टोचण्यासाठी देखील तीच पीन कामात येते. एक अतिशय क्षुल्लक वाटणारी पीन देखील तिच्या अस्तित्वाचा उपयोग वेगवेगळ्या कामाकरीता करून मजबुतीने टिकून असते, मग लाख मोलाचे आयुष्य मिळालेल्या त्या मुलाने मात्र ते असे आत्महत्येसारख्या भ्याड प्रयत्नांने का संपवावे?

खरोखरीच ती छोटीशी पीन देखील आपल्याला किती शिकवून जाते, जर आपली शिकण्याची इच्छा असेल तर. हेच सध्याच्या तरूण मुला मुलींना समजावण्याची गरज आहे. अनेक क्षुल्लक गोष्टींचा ताण त्यांच्या मनावर येऊ लागलाय कारण ताण सहन करण्याची त्यांची क्षमता वाढविण्याचा प्रयत्न आपल्याकडून हवा त्या प्रमाणात होत नाही. एक तर आपण त्यांना अति सुरक्षित वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना काही नविन करू देण्याऐवजी पालकच ते सारे करून टाकतात. त्यामुळे एखाद्या वेगळ्या परीस्थितीमधे काय करायचे हे त्यांना कळतच नाही. समाजात वावरताना ज्या पद्धतीचा सकारात्मक आत्मविश्वासू ॲप्रोच लागतो तो त्या मुला मुलींचा तयारच होऊ दिला जात नाही. यामुळे ही मुले मनाने कमजोर राहतात वेगवेगळ्या परीस्थितींमधे स्वतःला सांभाळायचे कसे हे त्यांना येत नाही. ही प्रक्रीया काही मुला मुलींच्या बाबतीत सावकाश संयमानेही करावी लागते परंतू ती करणे भाग आहे. एकंदरीत मुला मुलींना आयुष्याच्या वाटेवर सक्षमपणे चालविण्यासाठी त्यांना काही संकटांचा सामना करण्याची सवय लावावी लागेल. त्यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे असले तरी त्यांना त्यांची पावले टाकू देणे आवश्यक आहे. अन्यथा या कोरोना काळामधे त्यांना आलेले एकटेपण त्यांना कुठे नेईल आणि त्यमधून त्यांच्या मनावर ताण निर्माण होऊन त्याचे नियोजन करता आल्यामुळे ते काय करतील हे नक्की सांगणे कठीण आहे

एक छोटीशी पीन जर वेगवेगळ्या परीस्थीतीमधे वेगवेगळ्या दृष्टीने उपयोगात येत असेल तर मन, बुद्धी विचार मिळालेल्या एखाद्या व्यक्तीचे आयुष्य किती उपयोगाचे राहू शकते हे सध्याच्या तरुण मुला मुलींना पटवून देणे गरजेचे आहे. ते आपल्याजवळ येणार नाहीत तर आपल्याला त्यांच्या जवळ जावे लागेल. याबाबतीत पालकांनी शिक्षकांनी उगाचच इगो बाळगता संवादांना सुरवात करणे गरजेचे आहे. शाळा महाविद्यालयांमधे विद्यार्थी येणे सुरु झाले आहेत. त्यांच्यासोबत अभ्यासाविषयी बोलण्यासोबतच कोरोना काळातील त्यांच्या अवस्थांबाबत, त्यांच्या समस्यांबाबत त्यांच्या मनात निर्माण झालेल्या इन्फेरीओरीटी कॉम्प्लेक्स बाबात चर्चा करण्याची गरज आहे. शरीर स्वास्थ्यासाठी खूप सारे मास्क, सॅनीटायझर्स, साबणे, हॅन्ड वॉश सोप, असे बरेच काही उपलब्ध आहे. परंतू कोरोना काळात विशेषतः मुलांच्या मनावर निर्माण झालेल्या ताणाला कमी करण्यासाठी केवळ एकच साधन उपलब्ध आहे ते म्हणजे त्यांच्याशी सकारात्मक संवाद

एका छोट्याश्या पीनचे एवढे योगदान राहू शकते तर आपले कितीतरी जास्त राहील हा विचार मुला मुलींच्या मनात रुजवूयात जीवने सांभाळूयात




Comments

  1. सर, एकदम छान.

    ReplyDelete
  2. अतिशय छान, मन possitivity कडे वळवणार लेख sir

    ReplyDelete
  3. सुंदर लेख. 👌🏽
    'पीन'चे उदाहरण देऊन माणसाला प्रेरणा देणे हा विचार खूपच जबरदस्त आहे.

    ReplyDelete
  4. सेफ्टि पिन च उदाहरण एकदम अप्रतिम
    प्रभावी काॅनंसिलिंग

    ReplyDelete
  5. अगदी सहज शक्य असलेल्या गोष्टी आपण करू शकतो. पण त्याच्या मागील विचार किती मोठा आहे. म्हणूनच तुमचं शीर्षक आवडते. थोडा है थोडे की जरुरत है.

    ReplyDelete
  6. एक छोटीशी पिन. त्यातून प्रेरणा व सकारात्मक विचार. हे खूप सुंदर रीतीने सांगितले आहे.

    ReplyDelete
  7. वा,,, अतिशय समर्पक,,,

    ReplyDelete
  8. Very well written the fact of life

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18