थोडा है थोडे की जरुरत है @ 27.04.21

कम्फर्ट झोन

एका घरी आई-बाबा आणि मुलांमधे जरासा वाद सुरु होता. आई-बाबा एका बाजूने तर मुले दुसऱ्या. वडीलांच्या मित्राकडे एक कार्यक्रम होता. त्याच्या वडीलांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम. तो मित्र फार जवळचा असल्याने यांच्या संपुर्ण परीवाराला निमंत्रण दिले होते. त्या करीता तो मित्र त्याची बायको घरी येऊन आग्रहपूर्वक सर्वांना सांगून गेले होते. कार्यक्रमाच्या दिवशी सकाळी मात्र या घरी समारंभाला जाण्यावरुन वाद सुरु झाला. मुलांनी सकाळीच सांगितले की आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. आम्ही तेथे येऊन काय करायचे? आम्हाला बोअर होईल. आमच्या ओळखीचे कुणीच नाही. आम्ही दोन तास तेथे काय करायचे ते सांगा. आम्ही कुणाशी बोलायचे. तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांमधे रहाल आम्ही काय करायचे मग? आमच्या ओळखीचे कुणी असते तर आम्ही आलो असतो. मुलांनी बराच विरोध केला तेव्हा सुरुवातीला बाबांनी समजाविण्याचा प्रयत्न केला. अरे आपल्या सगळ्यांना बोलावले आहे. त्या दिवशी काका-काकू घरी येऊन सांगून गेले. तुम्हाला देखील सांगितले आहे. एवढ्या आपुलकीने बोलावले आहे त्यामुळे आपण सर्वांनीच गेले पाहिजे. त्यांना छान वाटेल. आणि तेथे तुमच्या वयाची मुले मुली आहेतच की. त्यांच्याशी बोलता येईल. उलट त्या निमित्ताने नव्या ओळखी होतील. आपले नेहेमीचे मित्र मंडळी तर आहेतच. पण नव्या लोकांसोबत मिसळायला हवे. नव्या ओळखी कराव्यात या निमित्ताने. पोरांचा सूर मात्र कायम होता. कशाला पण नव्या ओळखी करायच्या. काय गरज आहे? मागेही असेच झाले, तुम्ही म्हणालात म्हणून आम्ही आलो पण आमच्याशी कुणीच बोलले नाही. बाबा पुन्हा समजावणीच्या सुरात म्हणाले, अरे नव्या ठिकाणी आपण आपल्याशी कुणी बोलेल याची वाट कशाला बघायची. तुम्हीच जाऊन बोलायचे ना? तुम्ही बोललात तर ती मुले देखील बोलतील आणि मग त्या निमित्ताने ओळखी होतील. अश्या ओळखी वाढविल्या पाहीजे. त्याने संपर्क वाढतो. पण कशाला बाबा? कशाला वाढवायच्या ओळखी? आमचा जेवढा ग्रुप आहे तेवढा ठीक आहे. आम्हाला बोअर होते. आता बाबांचे हे समजावणे रागावण्याकडे झुकते आहे असे बघून आईने समजाविण्याचा मधला मार्ग शोधला. हे बघा मुलांनो, आपल्या सगळ्यांनाच निमंत्रण आहे आणि म्हणून मी आज स्वयंपाकच नाही केला. मग तुमच्या जेवणाचे काय? तेथे चला, मस्त तुम्हाला तुमच्या आवडीचे पदार्थ खायला मिळतील. मजा करा. जेवणाचे बनविले नाही म्हणून त्या निमित्ताने का होईना मुले सोबत येतील असा विचार आईने केला. परंतू त्यावर क्षणात उत्तर आले, तू स्वयंपाक करुच नको. काहीच प्रॉब्लेम नाही, आम्ही मॅगी करुन खाऊन घेऊ, आम्हाला करता येते. शिवाय काल ब्रेड पण आणली आहे, आम्ही सॅन्डवीच बनवून घेऊ. तुम्ही दोघे जा. आम्ही मस्त हे पदार्थ बनवून घेऊ आणि बढीया टीव्हीवर आमची आवडती सीरीयल बघू. तुम्हाला यायला उशीर झाला तरी हरकत नाही. तुम्ही एन्जॉय करा. आता मात्र बाबांचा संयम संपला. अरे पण ही सीरीयल किंवा तुमचे मॅगी वगैरे नेहेमीचेच आहे. आपण तेथे फक्त खायला जातोय का? आमच्या सोबत तुम्हाला चलायचे आहे. काही सामाजिक दृष्टीने एकत्र येणे असते की नाही? की केवळ तुम्ही तुमच्याच मित्र मैत्रीणींमधेच राहाल का कायम? ते मित्र मैत्रीणी उद्या काही कारणांनी वेगवेगळ्या दिशेने गेले तर काय कराल? कायम कुणी सोबत राहत असतं का? त्यासाठीच नव्या लोकांमंधे जाण्याची सवय हवी, नव्या ओळखी कराव्यात. तुम्हाला पुढे भविष्यात कुठे रहावे लागेल काही सांगता येत नाही. मग त्यावेळी असेच कराल का? केवळ इन्स्टाग्रामवर किंवा व्हॉट्स ॲपवर ओळखी असून चालत नाही. प्रत्यक्ष लोक सोबत असावे लागतात. यासाठी हे सारे सांगतोय. वडील फारच जास्त रागविले म्हणल्यावर मुले शांत बसली. सोबत येण्याबाबत त्यांची इच्छा नाही असे म्हणल्यावर आईने मध्यस्ती करुन पुढल्यावेळी नक्की याल असे सांगितले. माझ्याशी एक शब्दही बोलू नका या बाबांच्या शेवटच्या वाक्यावर वाद संपला. बाबा ओरडून म्हणाले, तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोन मधेच रहा कायम. त्याच्या बाहेर येऊ नका. हरकत नाही. परंतू जीवनात एखाद्यावेळी परीस्थिती कशी येईल हे सांगता येत नाही. त्यावेळी जेव्हा जबरदस्तीने तो कम्फर्ट झोन सोडावा लागेल ना तेव्हा तुम्हाला कळेल मी काय म्हणतो ते.

होय कम्फर्ट झोनच. आधुनिक काळातील जवळपास प्रत्येकच घरात कमी अधिक प्रमाणात असले प्रसंग वारंवार घडत असतात. तरुण मुला मुलींचे त्यांचे असे कम्फर्ट झोन तयार झाले आहेत. त्यामधे त्यांचे मित्र मैत्रीणी, त्यांच्या गप्पा, त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्ट, त्याला मिळालेले लाईक, त्यांनी बनविलेली रील, त्याचे व्ह्यू, स्नॅपचॅट वरचे फोटो, त्यांच्या वेबसीरीज, त्यांच्या ग्रुपमधील वाढदिवस, त्यांच्या ग्रुपमधील चर्चा, भांडणे, पुन्हा दोस्ती, या साऱ्या त्यांच्या त्या कम्फर्ट झोन मधील बाबींमधे ते गुंग असतात. परंतू हा कम्फर्ट झोन कायम स्वरुपी टिकणारा नाही कारण या कम्फर्ट झोनच्या पलीकडे देखील एक विस्तीर्ण जग आहे. त्या जगात आनंद, मौज या सोबतच काही विदारक सत्यता, काही वेदना किंवा अकल्पित बाबी आहेत ज्यांचा सामना करावा लागतो. तारुण्याची काही वर्षे ओलांडल्यानंतर त्याच जगात जावे लागते त्यावेळी केवळ कम्फर्ट झोनमधे राहीलेला तरुण किंवा तरुणी त्या जगात बावरुन जाण्याची शक्यता असते. क्वचित प्रसंगी कोलमडून जाण्याचे देखील प्रसंग आपल्याला दिसतात. आपल्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे देखील जगायचे असते, या गोष्टीची सवय नसल्याने आकस्मिक संकटांचा सामना करण्याकरीता या मंडळींना ताकद पुरत नाही, त्यासाठी आवश्यक असणारे मनोधैर्य त्यांच्याकडे रहात नाही त्यामुळे बरेच वेळा नैराश्य येते. त्यामुळे मुलांचा हा कम्फर्ट झोन मधून मधून तोडणे आवश्यक आहे. तो आपण जबरदस्तीने तोडण्यापेक्षा त्यांनी त्यांचाच तो सोडून बाहेर राहण्याची सवय केली तर ते अधिक उत्तम होऊ शकते. अर्थात अश्या कम्फर्ट झोनची मुलांना सवय लागण्यामधे आपण पालकांचा देखील वाटा आहे. मुलांना जीवनातील सारी सुखे कम्फर्ट देण्याचा आपणच प्रयत्न करतो. शिवाय त्यांचे नि आपले जगच वेगळे झालेय. त्यांच्या जगात डोकावण्यासाठी आपल्याला वेळ नाही. त्यांच्या वेब सिरीज, त्यांच्या पोस्ट, त्यांचे इन्स्टाग्राम इत्यादी बाबी आपल्याला फारच निकामी वाटतात त्यामुळे त्यांनी त्यांचा कोष बनवून घेतलाय ज्यात आता आपल्याला प्रवेश उरलेला नाही. आपल्याला त्या सर्व गोष्टी फालतू वाटतात आणि त्यांच्या करीता तेच जीवन आहे. अश्यावेळी दोन्ही बाजूने समन्वयाची भूमिका गरजेची आहे. आपण पालक म्हणून देखील त्यांच्या कम्फर्ट झोनमधे प्रवेश करावा आणि आपल्याला सुरुवातीला अनकम्फर्टेबल वाटले तरी तेथे रमावे. तसेच मुलांनी देखील पालकांचा जीवनाबद्दलचा अनुभव जास्त आहे हे जाणून स्वतःचा कम्फर्ट झोन सोडून पालकांच्या मार्गदर्शनात नव्या जीवनाचा आस्वाद घ्यावा स्वतःला त्याकरीता सक्षम बनवावे.

कम्फर्ट झोन हा सर्वांकरीताच चांगला असतो. परंतू त्याच्या बाहेर असलेले वास्तव त्या अनुषंगाने निर्माण होणारी आव्हाने देखील पेलावी लागतील ना? हे आपल्या तरुण मित्र मैत्रीणींना समजून घ्यावेच लागेल. तीच काळाचीही गरज आहे. निदान सध्या आपल्या आजुबाजूला असलेल्या परीस्थितीत संकटे कशी अनपेक्षितरीत्या पुढ्यात येतात आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर निघून त्याचा प्रचंड धीराने कसा सामना करावा लागतो हे तरी त्यांनी समजून घ्यायलाच हवे. होय ना





Comments

  1. Sachitanand Bichewar27 April 2021 at 08:41

    सर्व जाणिवा,अनुभुतीमधूनच कणखर माणूस बनतो...जबाबदारी आल्याशिवाय कस लागत नाही.. अगदी सत्य सर.. छान वास्तव ,..अभिनंदन सरजी

    ReplyDelete
  2. घरा घरातली वस्तुस्थिती आहे, मुलांना लग्न समारंभात जायला आवडतं नाही. जनरेशन गॅप विचारांची. मग परिस्थिती चा सामना योग्यरित्या करू शकत नाही. खुप छान मांडणी सर.

    ReplyDelete
  3. खूप सुरेख लिहिलेत sir. हे आजचे जळजळीत वास्तव आहे.
    नवीन पिढीची जगण्याची शैली वेगळ्याच वळणावर आहे. हीच का ती तंत्रज्ञानातील आधुनिकता नि त्याचे दुष्परिणाम...?
    शाळेत असताना यावर निबंध असायचा. पण असे स्वकेंद्रित जीवन जगणारी पिढी निर्माण होईल असा विचार कधीही केला नव्हता... Personal computer म्हणता म्हणता त्याने आपले जीवन personal करून टाकले आहे की आई-वडिलांच्या, आप्तस्वकीयांच्या भावनांना त्यामध्ये प्रवेशच नाही.
    Space पहिजे म्हणता म्हणता खूप मोठी gape तयार होते आहे. घरातल्या घरात नवरा-बायको, बहीण-भाऊ यांच्या नात्यांना देखील हल्ली space हवी असते. नातेसंबंध टिकवणे मुश्कील आणि तोडणे सोपे झाले आहे. तुमचं-आमचं ही तफावत हल्ली फार बघायला मिळते.
    यासर्व modernisation मधून आपल्या भावी पिढीला वाचवणे गरजेचे आहे.

    ReplyDelete
  4. आजच ज्वलंत वास्तव आहे हे. मूल आई वडिलांन पासून दूर होत चालली आहे. याला कारणही माझ्या मते आपल्या पिढीतील आई वडिलच आहे. मुलांनी फक्त अभ्यास करावा, बाहेर फिरू नये, खेळू नये दुसऱ्यांच्या मुला सारखे मार्क्स मिळावा या गोष्टी मोठ्या प्रमाणावर मुलांवर लादायला सुरुवात केली त्यामुळे देखील मुले एकटे राहायला लागलीत. आणि या गोष्टींमुळे मुलांमध्ये फ्रस्ट्रेशन वाढत चाललं आहे. हे पण नाकारता येत नाही.

    ReplyDelete
  5. अगदी छान लिहीले अवि..मला तर हा माझ्याच घरातला प्रसंग वाटत होता अगदी म्यागीसहित. तू लिहीलेला शब्द न् शब्द खरा आहे. मला इतकाच दिलासा आहे की माझी मुलगी आमच्या सोबत येते. पण मुलगा येत नाही सहसा...

    ReplyDelete
  6. वास्तव रेखाटलं. कमी अधिक प्रमाणात नवीन पिढीच.

    ReplyDelete
  7. खरंय एकदम!मी पण अनुभवलं हे!

    ReplyDelete
  8. Very Nice....आजच्या पिढीला Comfort zone मधून बाहेर पडणे अत्यंत आवश्यक आहे... अन्यथा भविष्यात विपरीत परिस्थिति निर्माण झाली तर ते त्यासोबत समायोजन करु शकणार नाही...

    ReplyDelete
    Replies
    1. काही डॉक्टर असे असतात,की जे आजाराचं अचूक निदान लावतात ;परंतु त्यांना योग्य उपचार करता येत नाही .असंच काहीसं हल्ली पालकांच्या बाबतीत झालंय ;परंतु आपण याबाबतीत अचूक निदानही लावलं आणि योग्य उपचारही सांगितला . वर्तमान काळात मुलं आणि पालक यांच्यामध्ये एक मोठं अंतर तयार झालेलं आहे.हे भविष्यकाळात खूपच घातक ठरणार आहे .आपण यावर अतिशय मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे .त्याबद्दल आपले खरोखरच अभिनंदन .विषयनिवड अतिशय उत्तम आहे. लेखनही अतिशय सुंदर झाले आहे .भविष्यकाळात आपण अशा ज्वलंत नवनवीन प्रश्नांवर आणखी लिखाण करावं ही अपेक्षा

      Delete
  9. Best way is to teach our little ones how to adjust anywhere ....

    ReplyDelete
  10. Good morning Sir,really you have written, truth by actual experience or observation.This is fact in society.

    ReplyDelete
  11. खरं आहे मित्रा....आपापल्या comfort zone चा परीघ वाढवीत नेणे हेच वरिष्ठांच्या हाती आहे. पोरं येतीलच समजल्यावर.....

    ReplyDelete
  12. अतिशय उत्तम लिहिले आहे. मुलांना आपणच कंफर्ट दोन मध्ये. ठेवतो. पण कोविड मुळे ही परिस्थिती अजून बिकट झाली आहे. मुलांशी संवाद व मैत्री करणे अत्यंत गरजेचे आहे.
    शोभा पोटोडे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23