थोडा है थोडे की जरुरत है @ 13.04.21

प्रतिक

एकदा एका चर्चेमधे एका विषयावर बरेच बोलणे सुरु होते. चर्चा हळू हळू वादविवादापर्यंत पोहोचली. चर्चा सुरु झाली माझ्या मनगटावर मी बांधलेल्या एका लाकडी मण्यांच्या ब्रेसलेटवरुन. वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला माझा मित्र मला बऱ्याच गोष्टी सांगू लागला. तो म्हणाला की बरेच वेळा तुझ्या व्याख्यानांमधे तू वैज्ञानिक दृष्टीकोन मांडतोस, अवैज्ञानिक गोष्टी आणि बुवाबाजीच्या विरोधात बोलतोस मग तुझ्या मनगटावर तू हे का बांधले आहेस? चर्चेमधील काही मित्र माझ्या बाजूने तर काही त्याच्या बाजूने तावा तावात बोलत होते. तो पुढे म्हणाला, हे असे काही हातावर बांधणे म्हणजे अंधश्रद्धाच आहे. काहीही कारण असले तरी असे करायला नको. आपल्या या देशात शिकलेले लोकच असे करतात म्हणूनच बुवाबाजीला थारा मिळतो. या सर्व प्रकारामधे सामान्य माणसांची लूट होते. लाखो रुपये या असल्या थोतांडांमधे खर्च होतात. त्यापेक्षा हा पैसा जर वैद्यकीय सेवा निर्माण करण्यामधे लागला तर किती चांगले होईल. सध्याच्या काळात त्याची किती गरज आहे. एका बाजूने या बुवाबाजीच्या जाळ्यात अडकून सर्वच धर्मांचे लोक हजारो रुपये खर्च करतात आणि दुसऱ्या बाजूला या सध्याच्या काळात देशात अपुरी पडणारी आरोग्य व्यवस्था आपल्याला सुन्न करते. अश्या परीस्थितीत हातात गंडे दोरे बांधणे हे कमजोर मनाचे लक्षण आहे. या गंड्या दोऱ्यांनी काही होत नाही. उलट शिक्षित लोकांनी असे केले तर बाकीच्यांनी काय करावे? आपल्या देशाची मानसिकता बदलवायची असेल तर संपुर्ण वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारायला हवा. अश्या धरसोडीमुळेच आपले नुकसान होते. बराच वेळ आणि याच पद्धतीचे बरेच काही तो बोलत राहीला. मग त्याच्या बाजूने त्याच्या विरोधात मित्र मंडळी बोलू लागले. बराच वेळ ही चर्चा सुरु राहीली. मी त्याचे सारे शांतपणे ऐकत होतो. त्याचे सारे बोलून झाल्यावर मी त्याला माझ्या हातात बांधलेल्या त्या लाकडी मण्याच्या ब्रेसलेटमागची गोष्ट सांगितली. त्यानंतर मात्र तो जरा विचारात पडला.

खरे तर तो जे बोलत होता ते योग्य होते. आपल्या देशात अनेक अवैज्ञानिक गोष्टींमुळे आपले नुकसान होत राहते. त्याचा फायदा घेऊन काही लोक सामान्य माणसांची पिळवणूक देखील करताना दिसतात. अनेक लोक या बुवा बाजीच्या नादी लागून उध्वस्त झालेले देखील आपण बघितलेले आहेत. यामुळे प्रत्येकच धर्मांमधील मुलभूत विचार मागे पडून चुकीच्या गोष्टींचे अकारण समर्थन केल्या जाते असेही आपल्याला दिसते. खरे तर प्रत्येकच धर्मातला मुलभूत विचार हा तर्कशुद्धच आहे. फरक एवढाच आहे तो ज्या काळात मांडल्या गेला त्या काळात आजसारखे विज्ञान सार्वत्रिक झालेले नव्हते त्यामुळे त्या मुलभूत बाबी पटवून देण्यासाठी काही चमत्कारिक गोष्टींचा आधार त्या काळच्या लोकांनी घेतला. अपेक्षित हे होते की कालानुरुप त्या सांगण्याच्या पद्धती देखील बदलल्या जाव्या जेणेकरुन मुलभूत तर्कशुद्ध विचार लोकांसमोर यावा, पण दुर्दैवाने सर्वच धर्मांच्या बाबतीत ती मुलभूत विचार पटवून देणारी जुनी पद्धत तशीच राहीली विज्ञान सार्वत्रिक झाल्याने सहाजिकच त्याचे थोतांडामधे रुपांतर झाले. जर आजच्या काळानुसार ते परत मांडल्या गेले तर त्या गोष्टी पटू लागतात त्याच चमत्कारांमागचे विज्ञान उलगडल्या जाऊ शकते. परंतू तसा प्रयत्न झाल्यामुळे त्या थोतांडासोबत धर्मातील मुलभूत विचार त्यामागच्या मानवी मनोभुमिका देखील सरसकट नाकारल्या जाऊ लागल्या. हा थोतांड आणि मुलभूत मानवी भावना यातील फरक जेव्हा आपल्या लक्षात येतो तेव्हाच आपण या सर्व बाबींकडे समाजाभिमुख नजरेने बघू शकतो. माझ्या मित्राला मी जेव्हा माझ्या हाताला बांधलेल्या ब्रेसलेट मागची कथा सांगितली तेव्हा त्याला देखील ते पटले

कधी कधी वैज्ञानिक दृष्टीकोन पटवत असताना आपण टोकाचा सरसकट विरोध करु लागतो सामान्य जनमानसाच्या मनावर एवढ्या वर्षांचे झालेले संस्कार एकाच दिवसात पुसून टाकण्याच्या जिद्दीने त्या संस्कारांवरच तुटून पडतो. आपल्याला असे वाटत असते की तर्कांच्या आधारावर या साऱ्या गोष्टी मी थोतांड म्हणून सिद्ध केल्या की लोक बदलून जातील. परंतू तसे होत नाही. तर्कांच्या आधारावर आपल्या गोष्टी तावातावाने सिद्ध करताना आपण अजाणतेपणी लोकांच्या भावना दुखावतो. भावना ही तर्कापेक्षा जास्त प्रभावी असते. किंबहुना आपल्या देशात लोक तार्किक पेक्षा भावनिक जास्त आहेत. त्यामुळे आपल्याला जर वैज्ञानिक दृष्टीकोन मनामनात रुजवायचा असेल तर जरा त्यांच्या कलाकलाने घेऊन हळूवार पद्धतीने रुजवावा लागेल. अन्यथा आपण ज्या थोतांडाला हद्दपार करु इच्छितो त्याचा पाश जास्त आवळला जाण्याचीच शक्यता आहे. आपल्याला जरा सावकाश आणि चतुराईने हे काम करावे लागेल. सारेच काही बंद करा, फेकून द्या, तोडून टाका ही भाषा आपल्याला लोकांपासून दूर नेणारी आहे. याऊलट त्यांना या सर्व प्रथांमागचे विज्ञान, मानसशास्त्र समजावून त्यातील अनावश्यक भाग तेवढा बाजूला काढायला सांगुया. ते जरी होऊ शकले तरी देखील आपण बऱ्यापैकी मजल मारली असे होऊ शकते. आक्रस्ताळेपणा करुन हे होऊ शकणार नाही. सामाजिक बदल हे कायम हळूवार होत असतात. अगदी या कोरोनाच्या काळात धर्मस्थळे बंद असताना देखील त्यांच्या बंद दारांची दर्शने मोठ्या प्रमाणावर होत होती जेथे पोलीसांकरवी गर्दी कमी करावी लागली. कोरोनापासून आपल्याला केवळ वॅक्सीनच वाचवू शकते हे वैज्ञानिक सत्य ठाऊक असताना देखील ही धार्मिक स्थळांच्या बंद दारांसमोरील गर्दी आपल्या देशाची मनोभुमिका समजावते. ती लक्षात घेऊनच वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्याचे काम आपल्याला करावे लागेल. माझ्या मित्राला हे सारे पटू लागले होते माझ्या ब्रेसलेट बांधण्यामागची गोष्ट ऐकल्यावर तर तो पूर्णपणे शांत झाला त्याने माझी ती कृती समजून घेतली.

मी त्याला ते सारे सांगितले. खूप वर्षांपूर्वी मी एका ओरीएंटेशन कोर्स करीता शिमला येथे गेलो होतो. तेथे माझी एका देबोशिष नावाच्या आसामच्या प्राध्यापकाची भेट झाली. वीस दिवसात आमची खूप छान मैत्री झाली. त्याचे नुकतेच लग्न झाले होते. त्याची पत्नी देखील कोर्स मधे सोबत होती. माझे देबोशिष चे खूप छान ट्युनींग जमले असल्याने त्याने खूप साऱ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर केल्या. कशी कोण जाणे त्याची माझी फार घट्ट मैत्री झाली. खूप इमोशनल असा तो व्यक्ती आहे. नंतर आम्ही संपर्कात होतोच. एकदा त्याने मला एक पार्सल पाठविले ज्यात हे लाकडी मण्यांचे ब्रेसलेट होते. त्यासोबत एक चिठ्ठी होती. त्यात लिहीले होते, प्रिय अविनाश, आज मी आणि माझी पत्नी अरुणाचल प्रदेशातील एका बौध्द मॉनेस्ट्रीमधे गेलो होतो. तेथे आम्हाला हे ब्रेसलेट देण्यात आले आम्हाला असे सांगण्यात आले की हे मनाला आनंदी ठेवण्याचे ब्रेसलेट आहे. हे तुम्ही वापरता तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीला पाठवा म्हणजे त्या व्यक्तीच्या आणि तुमच्याही जीवनात कायम आनंद राहील. अविनाश, त्यांनी असे म्हणल्यावर आम्हा दोघांच्याही मनात तुझेच नाव आले म्हणून हे तुला पाठवितो आहे. आपल्या शिमल्याच्या वास्तव्यात तू वैज्ञानिक दृष्टीकोन वाला आहे हे मला माहित आहे. परंतू आम्हा दोघांच्या आनंदाकरीता तू हे तुझ्या मनगटावर बांधावे ही आमची इच्छा आहे. तुझाच देबोशिष

माझ्याशी वाद घालणाऱ्या मित्राला मी म्हणालो, माझ्या वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या विपरीत वागून मी हे माझ्या मनगटावर बांधलेय कारण त्यामुळे माझे किंवा इतर कुणाचेही काहीच नुकसान नाही. परंतू माझ्या आसामच्या मित्राच्या भावना जपल्याचा आनंद मात्र फार जास्त आहे. माझे काही चुकले का? माझा मित्र काहीच बोलला नाही. तुम्ही काय म्हणता?









Comments

  1. सर खूपच सुंदर🌺🌺🌺

    ReplyDelete
  2. खरंच, खुप छान लेख.... वैज्ञानिक आधारही आवश्यक आहे तसेच कुणाच्या भावना जपण्याचा आनंद हा वेगळाच आहे ते ही आपल्या जवळच्या माणसाच्या.....

    ReplyDelete
  3. लेख खूप लेख आहे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23