थोडा है थोडे की जरुरत है @ 06.04.21

स्पर्श

परदेशातल्या आपल्या काकाची ती आतुरतेने वाट बघत होती. मनाने काकाशी फार जोडलेली होती ती. काकाबद्दल कुणी काहीही बोलू लागले तर त्याची बाजू घेऊन भांडण्यात तिचा पहिला नंबर असायचा. दहा महिन्याच्या कालावधीनंतर तिचा काका परत आपल्या घरी येणार होता. ज्या दिवशी तो आपल्या मुख्य घरी पोहोचणार होता त्या दिवशी तर ती फारच बेचैन होती. तिने ठरविले होते की काकाला सांगायचे की तू आता परत जाऊ नकोस. तू तिकडे असलास की तुझी आम्हा सर्वांना फार आठवण येते. तू तिकडे असलास की काकू आणि मुले देखील कोमेजून जातात. मला देखील तुझी खूप आठवण येते. तू असतोस तेव्हा मस्त सगळ्यांना हसवतोस, गमती जमती करतोस आणि सगळे घर कसे हसते राहते. आपल्या काकाला ती हे सारे काही सांगणार होती, तो आल्याक्षणी. तो भारतात पोहोचला आणि मग कारने निघाल्याचा त्याचा मेसेज आला. साधारण तीन तास लागणार होते त्याला नागपूरहून पोहोचायला. त्या तीन तासात तिने किमान तीस वेळा तरी दरवाज्याजवळ जाऊन बघितले. तिला काकाशी जे बोलायचे होते ते सारे काही तिच्या मनात होते. अखेर त्याची गाडी आली. तो सर्वांसोबत येऊन पोहोचला. दरवाज्यातच उभा होता तर हिने त्याला बघितले आणि धावत जाऊन तिने काकाला घट्ट मिठी मारली. त्यानेही प्रेमाने तिला जवळ घेतले. आणि काकाशी सारे काही जे बोलायचे होते ते ती पार विसरुन गेली डोळ्यातून वाहत्या अश्रूंसह ती काकाला केवळ बिलगून उभी राहीली. त्याने देखील तिच्या डोक्यावरुन हळूवार हात फिरवित तिचा लाड केला. एखादा मिनीट अश्या आत्यंतिक प्रेमाने ती काकाजवळ होती. एकही शब्द उच्चारता तिला जे म्हणायचे होते ते सारे काही तिच्या त्या स्पर्शातून तिच्या काकाला समजले. तिला जे जे सांगायचे होते, ज्या काही तक्रारी करायच्या होत्या, तो आता परत जाऊ नये म्हणून जो काही हट्ट करायचा होता ते सारे काही त्याला बरोबर समजले. अशी असते प्रेमाने भारलेल्या स्पर्शाची जादू.

प्रेम मग ते कोणत्याही नात्यातले असो, त्याच्या बद्दल आदर्शवादाच्या संकल्पना स्पष्ट करताना अनेक वेळा हेच सांगितले जाते की प्रेम हे नेहेमी आत्मिक असावे. शरीराच्या किंवा स्पर्शाच्या आकर्षणापलीकडले असावे. शारीरिक आकर्षण किंवा स्पर्शाच्या ओढीमधे गुंतलेले प्रेम हे नेहेमी कमी दर्जाचे समजले जाते प्रेम या भावनेला त्याची उदात्त पातळ गाठायची असल्यास या शारीरिक बंधनांच्या किंवा आकर्षणाच्या पलीकडले प्रेम हेच खरे प्रेम आहे अशी संकल्पना वेगवेगळ्या साहित्यकारांनी व्यक्त केलेली आपल्याला दिसते. परंतू काही साहित्यिक मात्र प्रेम भावनेचा स्पर्शभावनेच्या पलीकडे नव्हे तर त्याच्या सोबतच्या प्रेमाबद्दल सांगतात. इंग्रजी वाड़मयातला एक अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा कवी जॉन डन आपल्या एक्सटसी नावाच्या कवितेमधे एक अफाट कल्पना मांडतो

आपल्या एक्सटसी या कवितेत जॉन डन तळ्याकाठी हातात हात धरुन बसलेल्या प्रियकर प्रेयसीचे वर्णन करतो. ते दोघे तसे बसले असताना त्यांचे आत्मे शरीरातून बाहेर निघून वर काही अंतरावर जाऊन आपापसात चर्चा करतात. आत्मे असल्यामुळे तिचा आत्मा किंवा त्याचा आत्मा असा फरक नाहीसा झालेला असतो. त्या आत्मिक प्रेमाची एकरुपता त्याचे श्रेष्ठत्व ते एकमेकांशी बोलतात. परंतू काही वेळाने ते दोन्ही आत्मे म्हणतात की आपल्याला आपापल्या शरीरांमधे जावे लागेल कारण आपल्या प्रेमाचा खरा परीघ ती शरीरेच आहेत. त्यांच्यामुळेच त्यांच्यातील आकर्षणामुळे या प्रेमाची जाणीव होऊ शकली. त्यांच्यामुळे हे प्रेम व्यक्त होऊ शकले. आता हे प्रेम आत्मिक पातळीवर पोहोचले असले तरी देखील या प्रेमाचे आविष्कार, प्रेमाची सार्थकता, अनुभव, आनंद हे सारे काही  व्यक्त करण्याकरीता आपल्याला त्या शरीरांचीच गरज आहे म्हणूनच आपण त्यांचे आभार मानायला हवे की आपले प्रेम आत्मिक पातळीवर पोहोचविण्यासाठी शारीरिक अस्तित्वच कारणीभूत आहे. त्यांच्याच माध्यमातून आपल्याला प्रेमाची खरी प्रचिती आली त्यामुळे आता आपले प्रेम आत्मिक पातळीवरचे जरी असले तरी त्या शरीरांची आपल्याला गरज आहे म्हणूनच आपल्याला त्यांच्यात परत जायला हवे कारण तीच आपली वर्तुळे आहेत ज्यांच्यात राहून आपण या अद्वितीय प्रेमाचा आनंद घेतो आहोत आणि असे म्हणून प्रियकर आणि प्रेयसीचे आत्मे पुन्हा त्याच्या शरीरात परत जातात कवितेचा शेवट करताना जॉन डन ने असे लिहीले आहे की ते दोघे जण जास्त समंजस होऊन चालू लागली. याचा अर्थ या सर्व प्रसंगामुळे खऱ्या प्रेमाचा अर्थ त्या दोघांना कळला. प्रेमाच्या अनुभूतीमधे प्रेमाचा प्रवास जरी आत्मिक पातळीकडे जाणारा अत्यंत आदर्शवादी असेल तरी देखील शारीरिक पातळीवर त्या प्रेमाचा अनुभव हा देखील त्याचा मुलभूत भाग आहे. अश्या दोन्ही पातळ्यांवर अनुभवले जाणारे प्रेम हे पूर्णत्वाकडे नेणारे असते असेच जॉन डनला सुचवायचे आहे. खरे तर जॉन डन हा मेटॅफिजीकल विचारांचा पुरस्कर्ता मानला जातो. मेटॅफिजीकल म्हणजे भौतिकाच्या पलीकडचे बोलणारा. परंतू भौतिकाच्या पलीकडे असलेला आदर्शवाद साध्य करायचा मार्ग मात्र भौतिकतेच्या आधारेच पार पाडावा लागतो किंबहुना तो मार्ग कायम सोबत राहतो असे त्याने या कवितेत सुचविलेले आहे. म्हणूनच स्पर्श ही एक अभूतपूर्व संकल्पना आहे.

ही गोष्ट आपण देखील मान्य केली आहे परंतू बरेचवेळा त्या स्पर्शाला आदर्शवादाच्या तुलनेत कमी लेखले जाते. शब्दांपेक्षा स्पर्श हा जास्त महत्वाचा असतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. याची प्रचिती तर खरे सांगायचे झाल्यास अगदी बालपणापासून येत असते. रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी कितीही ला ला, अलेले केले तरी त्याच्या माऊलीच्या कुशीचा उबदार स्पर्शच त्याला सर्वात जास्त सुरक्षितता प्रदान करतो ते तेव्हाच शांत झोपते. बरेच वेळा भावना अनावर झाल्या की आपण सहजच म्हणतो की मला भावना व्यक्त करण्यासाठी शब्द सापडत नाहीये आणि मग आपण संबंधित व्यक्तीचा केवळ हात हातात धरुन ठेवतो त्या भावनिक स्पर्शातून सारे काही व्यक्त होऊन जाते. म्हणूनच नात्यांच्या अनुभूतींमधे स्पर्शाचे महत्व फार जास्त आहे. बरेच वेळा स्पर्शाला विकृत, ओंगळवाणा, सहेतूक, किळसवाणा असल्या विशेषणांनी संबोधले जाते जे जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांमुळे अगदी खरे ठरते. असे स्पर्श बरेच वेळा त्रासदायक देखील ठरतात त्यामुळेही स्पर्शाला आत्मिक पातळीच्या तुलनेत कमी लेखले जाते. परंतू सौम्य, हळूवार, स्नेहपूर्ण, आश्वासक, रोमांचक, सुखद, प्रेममयी, ममतापूर्ण ही देखील विशेषणे स्पर्शालाच लागू पडतात. जीवनात आपला अनुभव आपले याबद्दलचे मत बनवित असतो. ते मत कायमस्वरुपी असू नये कारण वाईट अनुभवांसोबत चांगले अनुभव देखील येत असतात हा विश्वास कुठेतरी कायम रहायला हवा.

हे सारे काही लिहीण्यामागचे कारण म्हणजे गेले अनेक दिवस आपण एका जागतिक संकटामुळे एकमेकांपासून दूर आहोत. मित्र मंडळींना कडकडून भेटलेलो नाही तसे ते सध्या संयुक्तिक देखील नाही. दो गज दूरीचे महत्व अद्याप देखील कायम आहे. पण हा काळही लवकरच संपेल तेव्हा मात्र.... तबियत से गले मिलेंगे दोस्त!!





Comments

  1. फारच सुरेख दाखले देऊन लेखन केले आहे. Ecstasy कविता आठवली.
    आजकाल मुलांना स्पर्श ओळख करून दिली जाते. Short films दाखवल्या जातात पालकांना शाळेतून. आपल्या मुलांना चांगला आणि वाईट स्पर्श ओळखता यावा म्हणून. सोशल मीडिया ने प्रेम या शब्दाची पर वाट लावली आहे. त्यामुळे मुलांना TV जे प्रेम दाखवेल ते खरे वाटते. सध्याची वेळ फार बिकट आहे. प्रेम स्पर्शाची व्याख्या पार बदलत चालली आहे. त्या अनुषंगाने खूप सुंदर लेख आहे.

    ReplyDelete
  2. Samveda na ter natural asete pan sparsh hi bhavna dekhil gjivnat kiti vegveglya kangoryatun anubhavle jate he khup chan shabdat mandle sir

    ReplyDelete
    Replies
    1. Samveda na ter natural asete pan sparsh hi bhavna dekhil gjivnat kiti vegveglya kangoryatun anubhavle jate he khup chan shabdat mandle sir. Sunita lthape

      Delete
  3. खूपच छान 👌👌👌👌अप्रतिम 🙏🙏

    ReplyDelete
  4. खूप छान लिहिलं आहे.

    ReplyDelete
  5. सुंदर!खूप तरल संवेदना खूप छान शब्दात पकडल्या आहेत!लेखकाचे कौशल्य!💐ह्या सगळ्यांमधील सीमारेषा खूप धूसर असल्या ना तरी जाणवतात मात्र लगेच!

    ReplyDelete
  6. अप्रतिम लेख! आत्म्याचा आणि शरीराचा परस्पर संबंध स्पर्शाचे उदाहरण देऊन उत्कृष्ट रित्या मांडले आहे. खुप छान...

    ReplyDelete
  7. Khoop suner lekh jhon Donnew chi kavtta Chan ulghdun sangitli attishya aprateem mandani ani sadriksrsn

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23