थोडा है थोडे की जरुरत है @ 20.04.21

मेन्टल फ्लश

रात्री साडे अकराच्या सुमारास मित्राचा अचानक फोन आला. मला म्हणाला, माझ्या घश्यात कफ आल्यासारखा वाटतोय. साधारण वाजल्यापासून मला तसे वाटतेय. मी सुरुवातीला वाट बघितली परंतू आता मात्र कफ कमी होत नाहीये. घरातले सर्वजण जागे आहोत. काय करावे सुचत नाहीये. आजच आजुबाजूची बिघडलेली स्थिती वर्तमानपत्रात वाचली. टीव्ही वर देखील सारखे दाखवत आहेत. आपल्याही गावात स्थिती काही चांगली नाही. दवाखान्यांमधे जागा नाही. माझे कसे होणार? आजच व्हॉट्स ॲपवर देखील वाचले. एका व्हिडीयोमधे सध्या रुग्णांची अवस्था काय भयंकर झालीय ते बघितले. स्मशानभुमीचीही अवस्था.. बापरे.. मला बोलवत नाहीये रे...बायकोचे तर सारखे रडणे सुरु झालेय. मुले देखील घाबरुन गेलीत. आई बाबा आहेत घरी. त्यांना मी खोलीत बंद ठेवले आहे. अगदीच राहवले नाही म्हणून मग तुला फोन केला. आता काय करायचे ते सांग. आता कुणाला फोन करायचा? यावेळी कोणत्या डॉक्टरकडे जाता येईल ते सांग. मी जाऊन येतो. तुला येता येणार नाही. मी एकटाच जाऊन येतो. फक्त तू बोलून घे आणि मग मला सांग. रात्री साडे अकरा वाजता त्याच्या घरातील स्थिती काय झाली असणार याचा पुरेपुर अंदाज मला आला मी त्याला सांगितले. सध्या काहीही करु नको. दोन तीन गोष्टी कर. घश्यात कफ आहे तर हळदीचे गरम पाणी पिऊन घे, घरातल्या सर्वांना शांत रहायला सांग, तू एका वेगळ्या खोलीत स्वतःला सर्वांपासून सेपरेट करुन घे आणि ताबडतोब डोक्यातल्या इतर गोष्टींचा मेंटल फ्लश कर. बाकी सारे उद्या पाहू. होय, मेंटल फ्लश.

हा शब्द मी सर्वप्रथम माझ्या एका समुपदेशक मित्राच्या तोंडी ऐकला होता. त्याने त्याच्या कौन्सेलींगकरीता येणाऱ्या आजोबांची कहाणी सांगताना हा शब्द सांगितला होता. त्याच्याकडे एक आजोबा कौन्सेलींग करीता यायचे. पंचाहत्तरीला आलेले ते आजोबा त्यांना डीप्रेशन आले म्हणून त्याच्याकडे आले होते. सुरुवातीच्या दोन तीन सीटींग मधेच त्यांची समस्या त्याच्या लक्षात आली. आजोबांची पत्नी काही वर्षांपूर्वी त्यांना सोडून गेली होती. ते मुलासोबत राहत होते. परंतू त्यांची समस्या होती की त्यांना मेंटल फ्लश करता येत नव्हता. त्यामुळे त्यांना त्यांच्या आठवत असलेल्या आयुष्यातील केवळ वाईटच गोष्टी सांगायची सवय लागली होती. त्यांना आलेले वाईट अनुभव, त्यांच्यासोबत घडलेल्या वाईट घटना, यातील सर्व बारकाव्यांसह त्यांना सारे काही स्मरणात होते अश्या पद्धतीचा विचार कायम डोक्यात ठेऊन प्रत्येकाला तेच ऐकवित राहण्याची त्यांना सवय जडली होती. त्यामुळे त्यांच्या आसपासचे मंडळी देखील सारखे वाईट आणि नकारात्मक ऐकून कंटाळून गेले होते. आजोबांना कुणी सांगू शकत नव्हते म्हणून त्यांच्या जवळच्या लोकांनी एक साधा मार्ग शोधला की त्यांच्याशी फार बोलणे. त्यामुळे आजोबा एकटे पडू लागले. आजोबांना त्यांच्या मुलाच्या समस्यांपेक्षा त्यांच्या काळात तेल किती स्वस्त मिळत होते आता ते किती महाग झाले याची चिंता वाटत होती. वाढलेल्या भावाचे तेल विकत आणायला त्यांचा मुलगा समर्थ होता परंतू त्याबद्दल सारखे सारखे नकारात्मक बोलून आजोबा उगाचच वातावरण गढूळ करायचे. त्यांच्या ऑफीसमधे त्यांच्याशी वाईट वागलेला बॉस त्यांच्या चांगला लक्षात होता पण त्यांच्यासोबत चांगले वागलेले लोक मात्र त्यांना आठवायचे नाही. एकंदरीत सर्वच गोष्टींकडे नकारात्मकतेने बघणे केवळ नकारात्मकच मांडत जाणे ही त्यांची सवय होती. माझ्या मित्राने त्यांना कौन्सेलींग करताना या मेंटल फ्लशची कल्पना सांगितली होती. त्याने त्यांना सांगितले की आता तुमचे वय ७५ आहे. अजून तुम्ही काही वर्षे जगणार. तुमचे उर्वरीत आयुष्य जर आनंदी घालवायचे असेल तर मेंटल फ्लश वापरायचा. म्हणजे आपल्या आयुष्यभराच्या संपर्कातील लोकांबद्दलचे आपल्या मनातले वाईट विचार पहिले फ्लश करायचे म्हणजे काढून टाकायचे. तुम्ही ज्या लोकांबद्दल सांगत आहात त्यातील बऱ्याच लोकांशी तुमचा संपर्क देखील नाही किंवा काही तर या जगातूनही गेलेत. परंतू तुम्ही मात्र त्यांच्या बद्दलच्या केवळ कटू स्मृती मनामधे ठेवल्या आहेत, ज्या स्मृतींचा काहीच उपयोग नाही. त्या तुम्हाला त्रास देणार, तुमच्या मनात परत परत त्यांच्याबद्दल वाईट विचार येणार, ते विचार तुम्ही सारखे ऐकविणार, या सर्व प्रकाराचा काही उपयोग आहे का? तुम्ही सर्वात पहिल्यांदा या सर्व गोष्टींकरता एक मेंटल फ्लश करुन टाका. सर्व नकारात्मक गोष्टी मनातून काढून टाका. वेळ लागेल परंतू त्यासाठी एक सोपा उपाय आहे, तो म्हणजे तुमच्या आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचा विचार करा. तुमचे सध्याचे आयुष्य, तुमच्या मुलाने तुम्हाला दिलेले सुरक्षित आयुष्य, त्याची त्याच्या परीवाराची सोबत, तुमची घेतली जाणारी काळजी, तुमच्या गत आयुष्यात तुमच्याशी चांगले वागलेले लोक, तुम्ही घालविलेला चांगला आनंदी काळ हे सारे आठवणे सुरु करा. जसे जसे हे सारे तुम्ही आठवाल तसे तसे मनातील साऱ्या वाईट नकारात्मक गोष्टी देखील आपोआप फ्लश होतील. तुमच्या मनाला शांतता लाभेल. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. तुमच्याही स्वभावात काही दोष आहेत. त्या दोषांसकट जवळच्या लोकांनी तुम्हाला स्विकारले आहे, सांभाळले आहे, या गोष्टीचा विचार करा त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. प्रत्यक्ष जमले नाही तर किमान मनातल्या मनात ती कृतज्ञता व्यक्त करा. परंतू मनातील साऱ्या वाईट घटना स्मृती जर तुम्ही हळू हळू फ्लश करु शकलात तर बघा, तुम्हाला हे जग सुंदर दिसेल. सकाळी उठल्यावर तक्रारींऐवजी तुम्ही सुंदरतेसंबंधी बोलू लागाल, तुमच्या सभोवतालच्या लोकांच्या चुका शोधण्यापेक्षा त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचे कौतुक कराल, त्यांचे चांगुलपण तुम्हाला दिसू लागेल त्यामुळे तुम्ही इतर अनेक लोकांपेक्षा किती भाग्यवान आहात हे तुमच्या लक्षात येईल. अनेकांना तुमच्या वयात देखील किती हालअपेष्टा सहन कराव्या लागतात याचा विचार तुमच्या मनात येईल. तुमच्याच वयाचे एक आजोबा माझ्याकडे उदबत्त्या विकायला येतात. त्यांना कुणीही नाही. पत्नी दहा वर्षांपूर्वी सोडून गेलीय. त्यांना जगायचे असेल तर काम करावे लागते ते करतात. त्यांच्या तुलनेत तुम्ही किती सुरक्षित आणि समाधानी व्यवस्थेमधे आहात. त्यामुळे आता या क्षणांपासून तुमचा जेवढा काळ शिल्लक आहे तो सारा काळ केवळ आनंद स्मृतींचा असू द्यात. तुमच्या पश्चात तुमच्याबद्दल इतरांच्या मनात आनंद रहावा कि तुमच्या नकारात्मक तक्रारी रहाव्यात याचा विचार तुम्हीच करा. हे सारे करण्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करावी लागणार आहे. मेंटल फ्लश. याद्वारे सर्व वाईट विचार, त्रासदायक स्मृती, तक्रारी सारे काही फ्लश करा त्याची जागा आनंदी, समाधानी इतरांच्या कौतुकाच्या क्षणांनी भरुन टाका. बघा, आयुष्य कसे छान वाटू लागते मग कोणतेही डीप्रेशन तुमच्या आजुबाजूलाही येऊ शकत नाही

माझ्या मित्राची समस्या असो किंवा या आजोबांचा प्रॉब्लेम असो, त्यावरचा एकच उपाय असतो, मेंटल फ्लश. वाईट त्रासदायक विचार सरळ फ्लश करता आले पाहीजे. या विचारांचा काही उपयोग नसतो. ते विचार समस्यांचे समाधान शोधू देत नाहीत, ते समाधानी ठेवू शकत नाहीत, ते नकारात्मकता पसरवितात, ते जीवनाचा आनंदही घेऊ देत नाहीत. मग अश्या विचारांना गोंजारत बसण्यापेक्षा फ्लश करणे हा सर्वोत्तम मार्ग असतो.

माझ्या मित्राने रात्री मनात निर्माण झालेली भिती फ्लश केली, दुसऱ्या दिवशी टेस्ट केली, ती पॉझीटीव्ह आली. त्यानंतर औषधे घेतली, चौदा दिवस विलगीकरणात राहीला आता ठणठणीत आहे. असेच काहीसे त्या आजोबांबद्दल देखील झाल्याचे मला माझ्या मित्राने सांगितले. चला तर मग, सध्याच्या या कठीण प्रसंगी जास्तीत जास्त मेंटल फ्लशचा वापर करुन जमेल तेवढी सकारात्मकता रुजवूयात. जमेल ना?





Comments

  1. मस्त लिहिलंय सर.

    ReplyDelete
  2. आवश्यक आहे
    सद्यपरिस्थितीत...

    ReplyDelete
  3. सर, खूपच मार्मिक .आजच्या परिस्थितीला अतिशय उपयुक्त

    ReplyDelete
  4. उत्कृष्ट लेख. Positivity is the key to resolve such issues. People magnify problems by their negative thoughts and worries. Worth sharing .

    ReplyDelete
  5. Very beautifully written Avibhau it's the need of thr hour

    ReplyDelete
  6. Very apt expression of positivity, Sir.

    These days, Positive patients require positive thoughts the most and your suggested mental flush can act as the best remedy.

    ReplyDelete
  7. वास्तविक... खरचं आजच्या या परिस्थिति मध्ये समुपदेशानाची खुप गरज आहे.लोक खुप panic झालेले आहे.. तुझा हा लेख निश्चीतच समुपदेशन करतोय...

    ReplyDelete
  8. सध्याच्या परिस्थितीत सकारात्मकता वाढवण्यासाठी सकारात्मक लेख'मेंटल फ्लश'.... खुपच छान👏

    ReplyDelete
  9. अत्यंत सुंदर व समयोचित लेख अविनाश भाऊ.

    ReplyDelete
  10. खूप सुंदर!आता खूप गरज आहे त्याची!

    ReplyDelete
  11. छान
    आवश्यक आहे

    ReplyDelete
  12. चला अवघे करूया करोना काळात मेंटल फ्लश

    ReplyDelete
  13. एकदम छान
    याची खूपच गरज आहे

    ReplyDelete
  14. माझ्या बाबांच्या जाण्याने आलेल्या मनःस्थितीला सावरायला मलत करणारा लेख🙏🙏

    ReplyDelete
  15. "दुनिया मे कितना गम है। मेरा गम कितना कम है।" ही सुंदर अनुभूती देणारा हा लेख.
    प्रा. डॉ संजय पाटील
    वाशीम

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23