थोडा है थोडे की जरुरत है @ 29.12.20

अर्बन अँक्स -  (गोल्डन अवर)

त्या दिवशी अनू कित्येक वर्षात पहिल्यांदा कुणाचीही परवानगी घेता आणि कुणाचाही विचार करता आपल्या जीवनातील एक तास केवळ स्वतःसाठी वेगळा काढून बसली होती. आशुने हे तिला जाणवून दिले. आशू बोलू लागला. त्या दिवशी त्याचा स्वर आणखी छान आणि आश्वासक वाटत होता. अनू, आज मी तुला जे सांगणार आहे ना ते तुझ्या मनात यापूर्वी आले नसेल असे नाही परंतू याबाबत तू गांभिर्याने विचार केलेला नाहीस हे मला जाणवते. म्हणूनच या अर्बन अँक्सच्या सापळ्यात तू अडकली आहेस. आता आपल्याला यातून बाहेर निघायचेय आणि त्याकरीता आपल्याला मदत करणार आहे गोल्डन अवर. एक सोनेरी तास जो तुझ्या दिवसभरातील चोवीस तासांमधूनच तुला वेगळा काढायचा आहे. तुझी सारी कर्तव्ये, तुझे सारे काम, तुझे तुझ्या परीवाराप्रतीचे समर्पण, त्यांच्यासाठी तू करीत असलेल्या सर्व गोष्टी, परीवारातील प्रत्येकाच्या इच्छांनुसार तू स्वतःमधे केलेला बदल, इतरांच्या इच्छांपूढे विसरुन गेलेल्या तुझ्या इच्छा, आपल्या स्वतःच्या कोणत्याही गोष्टीपेक्षा नवऱ्याच्या आवडीनिवडीला, मुलांच्या गरजांना किंवा सासू सासऱ्यांच्याप्रतीच्या कर्तव्यांना तू दिलेले प्राधान्य हे सारे नेहेमीप्रमाणे सुरु राहील. त्यात आपल्याला बदल करायचा नाही. परंतू हे सारे तुझ्या दिवसभरातील चोवीस तासांपैकी तेवीस तास करायचे. एक तास हा केवळ तुझा राहणार. तो सोनेरी तास! फक्त एक तास? सोप्पे आहे, असे तुझ्या मनात येईल परंतू माय फ्रेंड, हे तुला वाटते तेवढे सोपे नाही. तो एक तास सोनेरी बनविण्यासाठी जे काही करावे लागणार आहे ते ऐक आणि मग तुला त्याचे मोल कळेल आणि ते किती अवघड आहे हे देखील कळेल. एक मात्र निश्चित की असा एक सोनेरी तास जर तुला मिळविता आला तर तुझे उर्वरीत तेवीस तास बऱ्यापैकी ताणविरहीत आणि सहज घालविल्या जाऊ शकतात आणि महत्वाचे म्हणजे अर्बन अँक्स सारखा मनाचा कोलाहल किंवा अस्वस्थता तुला जाणविणार नाही. कसा असणार हा सोनेरी एक तास? मी सांगतो. ऐक...

अनू मला सांग तुला सर्वात जास्त कोणती गोष्ट करायला आवडते? एवढी आवडते की ती गोष्ट करताना तू स्वतःला देखील विसरून जातेस. सांग पटकन. अनू विचार करु लागली. एखादा मिनीट गेला आशू म्हणाला, बघ काय काय येऊन गेले डोक्यात? स्वयंपाक करणे, घरातील सर्वांची काळजी करणे, घरातील मंडळींसोबत सहलीला जाणे, नवऱ्यासोबत बसून कॉफी पिणे, मुलांसोबत खेळणे, होय ना? खरेच की, अनूला वाटले हा आशू किती मनातले ओळखतो. आशू पुढे म्हणाला, अनू यापैकी काहीही तुला मी म्हणालो त्या पद्धतीने आवडत नाही. तुला सर्वात जास्त आवडते ते गाणे. अनू उद्गारली, होबरोबर!! गौरीने सांगितले ना तुला? हो तिनेच सांगितले. आशूने लगेच कबुली दिली. पण यासोबत तिने हे देखील सांगितले की वर्गामधे आवडीचे गाणे ऐकण्यासाठी आणि ते इयरफोन लपवून ऐकता यावे म्हणून तू तुझ्या केसांची स्पेशल स्टाईल केली होती. तुझ्या वडीलांना आवडायचे नाही म्हणून एका गाण्याच्या स्पर्धेमधे तू चक्क वेगळा मेक अप करुन गायली होती. तू गायलेली ती आई वरची कविता ऐकून तुझ्या सुरांनी अख्खा वर्ग रडू लागला होता आणि तुमच्या मराठीच्या मॅडमदेखील गहिवरुन गेल्या होत्या. तू म्हणलेले स्वागत गीत ऐकून स्नेहसंमेलनामधे प्रमुख अतिथी असलेल्या अनुराधा पौंडवाल म्हणाल्या होत्या की या पोरीच्या आवाजामधे लता दिदिंसारखी कशीश आहे. अनू भान हरपून आशूचे ऐकत होती. त्याच्या शब्दांनी तिला तो शाळेतला काळ आठवला. आशूला तिच्या मनाची अवस्था कळत होती. त्याने तिला विचारात गुंग होऊ दिले. त्यानंतर त्याची इच्छा नसतानाही त्याने अनूला प्रश्न विचारला, अनू कुठेय ते गाणे आता? टचकन मनाला काहीतरी बोचावे असे अनुला झाले, आशू फोनवर असला तरी आपल्या मैत्रीणीच्या डोळ्यात आलेली दोन आसवे त्याला जाणविली. एक निश्वास सोडून अनामिका म्हणाली, हे माझे संसाराचे संगीत सांभाळता सांभाळता माझा तो सूर हरवला आशू. आशू अत्यंत आश्वासक शब्दात म्हणाला, साॉरी अनू, तूला तो सूर हरविल्याची मी आठवण करुन दिली. तू तर त्या सूराचे हरवणेही हरवून बसली होतीस. आता मी सांगत असलेल्या गोल्डन अवर मधे तोच सूर पुन्हा शोधायचा आणि त्याच्याच आधारे आनंद प्राप्त करायचा. बापरे! हे काय सांगतोस तू? मी आणि गाणे? ते देखील आता? अनामिका दचकून म्हणाली. आपल्या गाण्याबाबत काय काय होऊ शकते हा सारा विचार तिच्या मनात आला. आशू खरे सांगत होता. सोनेरी तास सोपा नव्हता, फारच कठीण होता

आता आशू अत्यंत ठामपणे बोलू लागला. बघ अनू, तुझ्या सर्व अस्वस्थतेवर हा एक आणि एकमेव उपाय आहे. तुझी सारी कर्तव्ये करीत असताना तूझ्या सुरासोबत तू स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व देखील विसरली आहेस. तुझे सारे काही इतर कुणाच्या तरी मर्जीने किंवा परवानगीने किंवा संदर्भानेच उरले आहे. तुझ्या आयुष्याचे प्राधान्य अजिबात राहीलेले नाही. एखाद्या रेल्वे स्टेशनवर साईडींगला टाकलेली गाडी असते ना तसे तुझे झालेय. तू तुझ्या आत्यंतिक आवडीची गोष्ट साईडींगला टाकलीस. इतर कुणी त्याचा विचार का करायचा जेव्हा तूच ती बाजूला सारली आहेस. लग्न झाल्यावर तुझ्या आईने सासरच्या सुखामधेच आपले सुख शोध असा दिलेला सल्ला तू एवढा मनामधे बसविला की तूझे स्वतंत्र असे काही राहू शकते हा विचारच तू मनातून काढून टाकला. त्यामधून घडू नये ती एक गोष्ट झाली, तुला सर्वजण गृहित धरायला लागले. तूझे वेगळे असे काही असू शकते ही विचार तूच स्वतः कुणाला करु दिला नाही. आता मात्र ते करायला हवे. अनेक दिवसांची सवय असल्याने हे  इतरांना स्विकारणे जड जाईल पण त्यांना वेळ दे. परंतू आता तुझा तो हरवलेला सूर परत आणण्यासाठी एक तास केवळ तुझा असेल. त्या तासावर केवळ तूझा अधिकार असेल. शक्यतोवर कुणाच्याही छोट्या छोट्या गोष्टींसाठी तू त्याचे प्राधान्य सोडणार नाहीस. सर्वात महत्वाचे म्हणजे तू या एक तासाची कुणालाही परवानगी मागणार नाहीस तर तू हा असा एक तास गाण्यासाठी देणार आहेस हे शांतपणे सांगणार आहेस. तू स्वतः याला प्राधान्य देशील तरच हे तुला साध्य करता येईल. अनू, माझ्यावर विश्वास ठेव, असा केवळ स्वतःसाठी जगलेला एक तास तुझ्या अर्बन अँक्सच्या समस्येवरची एकमेव संजीवनी आहे.

आपण सर्वच जगत असताना फार कमी लोक असतात ज्यांना स्वतःच्या आवडीनुसार जगता येते. अन्यथा आपण आपली कर्तव्ये पार पाडत राहतो. स्त्री असो अथवा पुरुष, आपण आपल्या कर्तव्यांचा गाडा ओढत राहतो आणि या प्रक्रीयेत आपल्याला नेमके काय आवडते ते मात्र विसरून जातो. अश्या सर्वांनी चोवीस तासातला एक तास आपल्या स्वतःसाठी राखून त्याला सोनेरी करण्याचे तंत्र अवगत करणे अत्यंत आवश्यक आहे. या आधुनिक काळात विविध समस्या आणि परिस्थिती आपल्याला घेरत असतात आणि आपण आपल्याही नकळत त्यात अडकत जातो. कितीही कर्तव्यपूर्ती केल्या तरीही त्याला या गोल्डन अवरची सर येणार नाही. येऊच शकत नाही. उलट या एका सोनेरी तासामुळे त्या उर्वरीत तेवीस तासांमधील कष्टाला बळ प्राप्त होते. तुझ्यासारखे अनेकांना तर आपल्याला असे काही छान येत होते हे देखील आठवत नाही त्यामुळे त्यासाठी एक तासही काढण्याची गरजच भासत नाही. अशी मंडळी इतरांनाही तो तास मिळवू देत नाहीत. त्यामुळे या सोनेरी तासाचे महत्व सर्वांनाच कळायला हवे. तू मात्र लवकरात लवकर असा तास काढ आणि मला कळव.

साधारण वीस दिवसांनी अनूने आशुला फोन केला, आशू, आज मी संपुर्ण एक तास गायले. मला इतके छान वाटतेय की मी सांगूच शकत नाही. आज मी किशोरीबाईंच्या सहेला रे सोबत गाऊन बघितले. काय गायलेय रे त्या बाईने. इतकी छान सुरावट आणि सुनाये वर घेतलेली तान...बापरे...अंगावर काटा आला... अनामिका बोलत राहीली. तिला तिचा स्वतःचा असा गोल्डन अवर गवसला होता आणि तो मिळवून देणारा एक छान सखा देखील





Comments

  1. खूप छान आताच्या काळात हि खरच गरज आहे

    ReplyDelete
  2. Atishay surekh... Janu... Prat

    ReplyDelete
  3. Apratimach😍every woman needs this golden hour 👏👏

    ReplyDelete
  4. आत्मनिरीक्षण अन त्यामुळे घडणारे परीक्षण अन त्यातून मिळणारी आत्मशांती ही काळाची गरज

    ReplyDelete
  5. Very relevant and thought provoking. Congratulations.

    ReplyDelete
  6. सध्याच्या परिस्थितीत स्वतः ला वेळ देणं आवश्यक आहे. आपण सगळेच आपली कर्तव्य पार पाडण्यात धन्यता मानतो , छान लेख लिहिला आहे

    ReplyDelete
  7. खूप छान!सुन्दर!जवळजवळ प्रत्येकीचा जीवनानुभव शब्दबद्ध केलाय!

    ReplyDelete
  8. अप्रतिम लेख, प्रत्येक महिला करिता आवश्यक असणारा विचार व कृती.

    ReplyDelete
  9. Whole 24 hours and struggling to find an hour for herself/himself..
    relatable for those who have got plenty on their plates.

    Nicely written by the writer as usual. All the necessary elements were there in a perfect amount just like suspense, drama, friendship, new blossoming relationship, brainstorming sessions and sharing empathy..
    According to my opinion the blog should have been divided into two parts instead of three.

    But overall it was a pleasure to read and thanks for sharing!

    ReplyDelete
  10. संसाराच्या या जबाबदारीतून महिलांना आजकाल आपल्या आवडीच्या क्षेत्राकरिता वेळच मिळत नाही. पण कुणी एखादा मित्र किंवा मैत्रिणीने त्याची आठवण करून दिली तर आपला छंद जोपासण्यासाठी एक नवी ऊर्जा मिळते आणि तो आनंद शब्दात न मांडण्यासारखा असतो.

    ReplyDelete
  11. I am mesmerized while reading. What a Fascinating artefact it is created by Dr. Avinash Moharil. Great work!

    ReplyDelete
  12. अर्बन अँक्स इनोव्हेटिव्ह थेअरी सर!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23