थोडा है थोडे की जरुरत है @ 15.12.20

अर्बन अँक्स -

काय होतंय तुला? सगळेच तर आहे आपल्याकडे. घर आहे, गाडी आहे, आवश्यक ती चैन करता येते, कधीच आर्थिक चणचण नसते, पोरगा व्यवस्थित आहे, तुझेही काम नीट सुरु आहे, घरात कशाचीच कमतरता नाही, दोन वेळेला व्यवस्थित खायला मिळण्याऐवढे किंबहुना जास्तीच आपल्याकडे आहे. हे सारे असताना तुला कशाचे टेन्शन आहे हेच मला कळत नाही. कशाची भिती वाटते, कशाची अस्वस्थता आहे, कशामुळे झोप लागत नाही हे माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. एका सुखी आयुष्याच्या ज्या संकल्पना आहेत त्या सर्व आपल्या घरी भरभरुन आहेत तरी देखील तुला समस्या आहेच. बरं नेमके काय वाटते हे देखील तू सांगू शकत नाहीस. जरा बाहेरचे जग बघ. सध्याच्या या कोरोना काळात तर कित्येक लोकांचे अक्षरशः हाल झालेत. लोकांचे आर्थिक स्थैर्य हरवून बसलेय. आपल्याला तशी काहीही समस्या नसताना तुला नेमके काय होते हे मला कळतच नाही. सारखी अस्वस्थता आणि भिती. कशासाठी? मला आता कंटाळा आलाय तुझ्या असल्या वागण्याचा. या सर्व गोष्टींमुळे तुझी वाढत चाललेली चिडचिड, अत्यंत कमी झालेली निर्णय क्षमता हे सारे मला आता सहन होत नाहीये. मला तर असे वाटते की तुला सुख देखील पचवता येत नाहीये. अन्यथा जरा आपल्याकडे कामासाठी येणाऱ्या बायकांकडे बघ. कश्या प्रकारे जगतात त्या. अचानक कामे बंद झाली तर जगायचे कसे असा प्रश्न ज्यांच्यासमोर आहे. त्यांना तुला पडतात तसले प्रश्न नाही पडत. तुझी तर अवस्था अशी झालीय की तुला नक्की काय होतंय ते तुला सांगता देखील येत नाहीये. आपल्या नवऱ्याचे हे सारे ऐकून परत एकदा डोळे भरुन आल्यावर अनामिकाला काय करावे हे कळत नव्हते. नवरा जे म्हणत होता ते सारे पटत होते परंतू तिला जी समस्या होती ती देखील होतीच आणि त्यामधे तिचा स्वतःचा काहीही दोष नव्हता. नवऱ्याचे हे रागावणे ऐकून घेतल्यावर तिला खरोखरीच स्वतःबद्दल लाज वाटू लागली. तो खरेच तर सांगत होता. सारे काही माझ्याकडे होते. एका सुखी आयुष्याला जे जे म्हणून आवश्यक असते ते सारे तिच्याकडे होते. काही कमतरता होत्या परंतू त्यांची तिने स्वप्न देखील बघितली नव्हती. नवऱ्याच्या नोकरीमुळे आर्थिक स्थैर्य जे सर्वात महत्वाचे असते ते नेहेमीच होते. बाकी सारेच छान आणि दृष्ट लागू नये असेच होते. तरीही गेल्या काही वर्षांपासून तिच्या मध्यवयाच्या प्रवासात हा एक बदल तिच्या व्यक्तिमत्वामधे होत गेला. अडचण ही होती की हे दुखणे तिला समजाविता देखील येत नव्हते. एरवी काही दुखले खूपले तर ते सांगता येते आणि त्यावर उपाय करता येतो. येथे तो प्रकार नव्हता. काय होतंय हेच कळत नव्हते. परंतू गेल्या एक दोन वर्षांपासून तिला सारखे असुरक्षित वाटू लागले होते, सारखी कश्याची तरी काळजी वाटू लागली होती, अकारणच रडू यायला लागले होते, अगदी टीव्ही सिरीयलमधील दुःखद प्रसंग बघितल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू दाटून येऊ लागले, एकंदरीत एक विचित्र प्रकारची अस्वस्थता तिला सारखी जाणवित होती. या सर्व प्रकारामुळे तिचे कोणत्याच गोष्टींमधे मन लागत नव्हते. तिच्या या असल्या अस्वस्थतेचा परीणाम तिच्या दैनंदिन कामावर देखील होत होता. एकंदरीत तिला काय होत होते हे तिचेच तिला कळत नव्हते ते तिला सांगताही येत नव्हते. नवरा रागावून बाहेर निघून गेला आणि अनामिका घरात एकटी राहीली. मन भरुन आले होते. दिवेलागणीचा वेळ होती त्यावेळी तिला अजूनच उदास वाटू लागले. तेवढ्यात एका अनोळखी नंबरवरुन तिला फोन आला. अनू, ओळखलेस का? तिच्या टोपण नावातला नू उगाचच लांबवून बोलणारी एकच व्यक्ति तिला ठाऊक होती. अनामिका जोरात ओरडली, गौरी? कुठे होतीस इतके दिवस? काही लाज वाटते तुला? मला अशी कशी विसरू शकतेस तू? अश्या प्राथमिक रागावण्यानंतर अनामिका फारच खूश झाली होती. कारण तो फोन होता गौरीचा. तिच्या अत्यंत जिवलग मैत्रिणीचा

गौरी आणि अनामिका ही जोडी अगदी बालवाडीपासून ते दहावीपर्यंत सर्वांना सुपरीचित होती. दोघींचे एकमेकांशिवाय पान हलत नव्हते. अनामिकाला अनू अशी हाक मारणारी ही एकच होती, गौरी. परंतू दहावीनंतर गौरीला आपल्या वडीलांच्या बदलीमुळे गाव सोडून जावे लागले. सुरुवातीला संपर्क राहीला परंतू नंतर दोघीही आपापल्या आयुष्यात गर्क झाल्या त्यानंतर आताच संपर्क होत होता त्यामुळे अनामिकाला काय बोलावे नि काय नाही असे झाले होते. सुरुवातीला जुन्या आठवणी निघाल्या. त्या गोड दिवसांच्या आठवणींच्या उतरंडी उतरल्यावर दोघींनी पुढील आयुष्यातील घडामोडींबद्दल गप्पा केल्या हळूच गप्पांच्या नादात विषय अनामिकेच्या सध्याच्या मनःस्थितीवर येऊन पोहोचला. कधी नव्हे ते अनामिकेला आपले मन मोकळे करण्याची संधी मिळाली. अचानक अनामिकेचा गळा भरुन आला. तिला गेल्या एक दोन वर्षात जाणविणारी समस्या तिने गौरीला सांगितली. गौरीने शांतपणे तिचे ऐकून घेतले. एरवी स्वतःच्या बडबडीमुळे समोरच्याला बोलूच देणारी गौरी आता मात्र शांत होती. तिला नेमके कळत होते की अनामिकेला काय होतंय ते. कधी रडत रडत तर कधी खिन्न होत अनामिकेने तिची व्यथा गौरीजवळ बोलून दाखविली. तिचे सारे ऐकून झाल्यावर एक मोठा सुस्कारा सोडून गौरी म्हणाली. अनू, तुझा विश्वास बसणार नाही पण आजपासून तीन वर्षांपूर्वी मी देखील अश्याच अवस्थेत होती. माझी तर अवस्था तुझ्याहून वाईट होती. मला अश्याच प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले होते त्यात मी काही महिने डीप्रेशनमधे देखील होती. सगळे काही छान असताना डीप्रेशन कशाचे येते असे माझा नवरा देखील मला म्हणायचा. परंतू या बाबत ना मला काही कळत होते ना मी त्याला समजावू शकत होते. पण मग मला माझा दोस्त भेटला आणि त्याने मला अगदी अलगद या सर्व ताणातून बाहेर काढले साधारण एक वर्षानंतर मी अतिशय आनंदात आणि ताणविरहित आयुष्य जगू लागली. दोस्त? काय सांगतेस? अनामिकेने आश्चर्याने विचारले. खळखळून हसत गौरी उद्गारली, हो दोस्तच. सच्चा मित्र ज्याने सर्वप्रथम मला हे सांगितले की मला जे काही होतंय ते अतिशय सामान्य आहे आणि तसे सारे होणे ही गोष्ट कुणाच्याही बाबतीत होऊ शकते. स्त्रियांच्याच नाही तर अगदी पुरुषांच्या बाबतीतही हे असे होते. त्याने सर्वात महत्वाचे हे सांगितले की मला आलेले नैराश्य ही माझी चूक नाही तर ती एक प्रकारची अवघड मानसिक स्थिती आहे ज्याच्यावर सहज इलाज होऊ शकतो. अनू, तो माझा दोस्त सोडला तर मला कुणीही समजून घेत नव्हते, उलट माझ्या मनःस्थितीबाबत मलाच दोष दिला जात होता ज्यामुळे मी देखील स्वतःलाच दोषी मानू लागली होती. परंतू माझ्या त्या सोबत्याने मला पहिल्यांदा मी चुकत नाहीये हे सांगितले. अनू, तू काळजी करु नको. माझा मित्र तुला देखील मदत करेल. तो एक छान कौन्सेलर आहे आणि त्याच्याच भाषेत सांगायचे झाल्यास आपल्याला जो त्रास होतो त्या समस्येचे नाव आहे अर्बन अँक्स

दुसऱ्या दिवशी दुपारी अनामिकाचा फोन वाजला. समोरुन आवाज आला. हाय, तुला अनू म्हणून हाक मारली तर चालेल ना? मी तुझा मित्र बोलतोय, आशुतोष. तू मला आशू म्हणू शकतेस... (क्रमशः)





Comments

  1. महत्त्वाच्या विषयावर सुंदर मांडणी

    ReplyDelete
  2. खूपच छान सर🙏🙏🙏

    ReplyDelete
  3. अर्बन अँक्स ......समस्येवर छान मांडणी

    ReplyDelete
  4. Atishay sunder mandani sir,thank you.

    ReplyDelete
    Replies
    1. सर,फार छान मांडणी केलीत आपण.

      Delete
  5. सर,अतिशय सुंदर मांडणी.

    ReplyDelete
  6. खुपच सुंदर लिहिले आहे सर 👌👌

    ReplyDelete
  7. खूप छान मांडणी. दुसऱ्या भागात काय उपाय सांगितला असेल याबद्दल उत्सुकता आहे.

    ReplyDelete
  8. थोडा है thodeki जरुरत है काळाला अनुसरून केलेली अतिशय सुंदर मांडणी.

    ReplyDelete
  9. Khup chan....Waiting for 2nd part...

    ReplyDelete
  10. Khup chan....Waiting for 2nd part...

    ReplyDelete
  11. Vishay khup chan ahe ani javalcha ahe ....waiting for 2nd part

    ReplyDelete
  12. उर्वरित भागाच्या प्रतीक्षेत......!👌💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23