थोडा है थोडे की जरुरत है @ 22.12.20

अर्बन अँक्स - (मित्र)

अनू, सर्वात प्रथम तुला एक गोष्ट सांगतो, तुला काहीही झालेले नाही. तू अगदी नॉर्मल आहेस. जे काही तुला होतेय आणि जे कदाचित तुझ्या आजुबाजूच्या लोकांनी तुला सारखे जाणवून दिलेले आहे परंतू तसे काहीही नाही. हे प्रत्येकाच्याच आयुष्यात सध्या होतेय. ज्या आधुनिक काळात आपण जगतो त्या काळाच्या चकचकीत प्रक्रीयेचे हे सारे साईड इफेक्ट आहेत. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा तुला काही विचित्र आणि समजावून सांगता येत नाही असे काही झालेय हे डोक्यातून काढून टाक. उलट मी तर तुझे अभिनंदन करीन की तुला हे तुझ्या मैत्रीणीला सांगता आले. अनेकांना तर ही अस्वस्थ अवस्था सांगता देखील येत नाही त्यामुळे ते तसेच त्रस्त राहतात. स्री पुरुष सर्वांना हा असा त्रास सध्या होतोय, तू तो बोलून दाखवला हे तुझे मोठेपण आहे. एक अतिशय सुंदर आयुष्य तुला मिळलेले आहे आणि ते मनापासून आणि तुला वाटते तसे जगण्याचा तुला संपुर्ण अधिकार आहे. कारण आपल्याला आई वडीलांनी जरी जन्म दिला असला तरी देखील एकदा एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून जेव्हा आपण या जगात येतो तेव्हा आपल्या जीवनाच्या सर्व गोष्टींना खऱ्या अर्थाने केवळ एकच व्यक्ती जबाबदार असते ती म्हणजे आपण स्वतः. इतर सर्व नातेवाईक, मित्र मैत्रीणी हे आपल्या जीवनाच्या मार्गावरील आपले सहचारी आहेत ते देखील त्यांचे त्यांचे जीवन जगत मार्गक्रमण करीत असतात. त्यामुळे आपल्या जीवनातील आनंद दुःखासाठी प्राधान्याने आपणच उत्तरदायी असतो म्हणूनच आपल्या जीवनाचे प्रचंड महत्व असते. तुझ्याही जीवनाचे आहे. माझ्या जीवनाचे महत्व? अनू गेल्या कित्येक वर्षांमधे पहिल्यांदा असे काहीतरी ऐकत होती. संसार सांभाळशील आणि स्वतःला समर्पित करशील असे आईने लग्नाच्या काही दिवस आधी सांगितलेले महत्वाचे बोल तिला आठवले. त्यानंतर गेली अनेक वर्षे संसारातील अनेक गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देत ती मार्गक्रमण करीत राहीली. या सर्व प्रकारात तिचे स्वतःचे असे काहीही उरले नव्हते कारण तिचा नवरा, त्याची माणसे, त्याचे घर, त्याची नोकरी, त्याची प्राधान्ये, मुलांची प्राधान्ये, हे सारे प्राधान्याने करता करता तिला तिच्या स्वतःच्या जीवनाचा विसर पडला होता, त्यामुळे आशुच्या तोंडून तुझ्याही जीवनाचे महत्व आहे हे ऐकून तिला काही क्षण छान वाटले. मी देखील कुणीतरी आहे आणि माझ्याही जीवनाला महत्व आहे हे वाक्य तिला सुखावून गेले. अन्यथा गेली काही वर्षे तिचे असणे हे कुणाच्यातरी संदर्भानेच बोलले किंवा सांगितले जायचे. त्यामुळे आशुचे ते एक वाक्य देखील तिला सुखावून गेले. त्याच्या वाक्याचा परीणाम आशू जाणून असल्याने त्याने अनामिकेला त्यावर विचार करायला वेळ दिला. जरा वेळाने तो पुढे म्हणाला, अनू, तुझ्यासारखी समस्या असलेले अनेक स्त्री-पुरुष माझ्याकडे येतात आणि त्या सर्वांना मी जे अनेक उपाय सांगतो त्यातील सर्वात रामबाण उपाय म्हणजे, गोल्डन अवर

अनामिका, आता हा काय सांगणार ते ऐकण्यासाठी तयार झाली. गोल्डन अवर म्हणजे नेमके काय हे तिला देखील जाणून घ्यायचे होते. आशू सांगू लागला. अनू, सध्याच्या जगात कुणाच्याही जीवनाचे रहाटगाडगे म्हणून वर्णन करायचे झाल्यास सकाळी उठणे, व्यायाम करणे, नास्ता बनविणे/खाणे ऑफीसची तयारी करणे/करुन देणे, स्वयंपाक बनविणे, जेवायला वाढणे, डबा भरुन देणे/घेणे, घरची इतर कामे करणे/ऑफीसमधील कामे करणे, दुपारचा चहा करणे/घेणे, आवरसावर करणे/फाईली तपासणे, झोप घेणे/मिटींग मधे सहभागी होणे, सायंकाळची कामे करणे/कामे आटोपून ट्रॅफीकमधून घरी येणे, रात्रीचा स्वयंपाक करणे / टीव्ही बघणे, वाढणे/ जेवण करणे, झोपणे, सकाळी उठणे, व्यायाम करणे, नास्ता बनविणे. या क्रमाने हे सारे आपल्याच आयुष्याचे वर्णन केवळ वाचतानाही कंटाळा येतोय ना अनू? विचार कर, आपल्या पैकी प्रत्येकजण कमी अधिक प्रमाणात हे असेच आयुष्य अक्षरशः रोज जगतोय. मला ठाऊक आहे, यामधील प्रत्येक गोष्ट ही करावीच लागते किंवा त्याशिवाय जीवन चालेल कसे या यदरात मोडणारी आहे. परंतू या सगळ्या पळापळीत किंवा साचेबंद मार्गक्रमणात तो गोल्डन अवर जर मिळविता आला तर हे सारे केवळ सुसह्यच नाही तर आनंदाने करता येईल आणि मग या जीवनाच्या तोच तो पणामधून निर्माण होणारी ती अस्वस्थता, जी तुला हैराण करते आहे ती येणारच नाही. गरज आहे ती असा गोल्डन अवर मिळविण्याची किंवा तश्या प्रयत्नांची. अर्थात या गोल्डन अवर बद्दल बोलणे जरी सोपे असले तरी भल्या भल्यांना तो मिळविता येत नाही. याचे एकमेव कारण म्हणजे आपल्यालाच मुळात त्या गोल्डन अवरची महती कळलेली नाही त्यामुळे आपल्या संदर्भात इतरांना ती समजण्याचे काहीच कारण नाही. तू देखील जर तो गोल्डन अवर शोधू शकलीस ना अनू, तर बघ जादूची कांडी फिरविल्यागत तू बदलून जाशील

आता अनामिकेचे कुतुहल फारच वाढले. तिला गोल्डन अवर बद्दल जाणून घ्यायचे होते. ती म्हणाली, आता सांग ना पटकन मला. स्वतःच्या नकळत तिने आशुला एकेरी संबोधले होते

आशुने हसत तिला विचारले, अनू गेल्या दोन वर्षात तू केवळ तूझ्यासाठी म्हणून असे काही केलेय? असे काही ज्यात इतर कुणाचाही सहभाग नव्हता, ते करताना तू कुणाची परवानगी घेतली नव्हती, ते करताना तू मला आता डीस्टर्ब करायचे नाही असे ठणकावून सांगितले होते, असे काही केले आहेस? विचार करुन उत्तर दे. अनू विचार करु लागली. काहीच सुचेना म्हणल्यावर ती गंभीर झाली. नाही असे मी काहीच केलेले नाही. लगेच तिचा गंभीरपणा कमी करण्यासाठी तो म्हणाला, काळजी करु नको, हाच प्रश्न मागच्या आठवड्यात एका मित्राला विचारला तेव्हा त्यानेही उत्तर दिले की ऑफीस, तेथील कामे, घरासाठी करत असलेली धावपळ यात असे काही केलेच नाही. जीवनाच्या चाकांना करकचून बांधून यंत्रवत जगत राहणारी आणि त्याला त्याग किंवा समर्पण असल्या उदात्त शब्दांनी सजविणारी तू एकटी नाहीयेस अनू. आशूचा आवाज तीव्र झाला होता. हा सारा त्याग आणि समर्पण करुनही शेवटी तुला अस्वस्थता आलीच ना? याचा अर्थ तू केलेस त्याचे मोल नाही असे नाही. ते लोकांना जाणवत नाही असे तुला बरेच वेळा वाटत असले तरी देखील त्याचे मोल मोठे आहे असेच मी मानतो. तुझ्यासारखे एखादे घर सांभाळणारी, किंवा नोकरी करण्यास बाहेर पडून आर्थिक सबळता वाढविणारी किंवा परीवाराची जबाबदारी पार पाडण्यासाठी कार्यालयात मान मोडून काम करणारा माझा मित्र या सर्वांचे समर्पण त्याग मोठाच आहे. पण प्रश्न हाच उरतो की असे असूनही ही अस्वस्थता का? ही अर्बन अँक्सची स्थिती का? यावर अनेक उपाय आहेत परंतू सर्वात महत्वाचा आणि ज्यापासून सुरुवात करायची तो म्हणजे गोल्डन अवर. परंतू त्याबद्दल मी तुला उद्या सांगीन माझा एक तास संपला. मला दुसऱ्या सेशनला जायचे आहे. बाय. आशूने फोन बंद केला. आशू असे काय करतोस... सांग ना.. अनामिकेचे वाक्य अर्धवटच राहीले आणि आशूने फोन बंद केला. अनामिकेने अचानक जीभ चावली. आपण याला चक्क आशू म्हणालो. गौरी म्हणाली ते खरे होते. एक छान मित्र मिळालाय बहुदा. आशू

दोन दिवसांनी आशुच्या सेशनसाठी तिने दुपारची वेळ ठरविली होती. तसे आशुला कळविले होते. आज तिने याकरीता कुणालाही विचारले नव्हते. मुलांना सांगितले होते की आता एक तास मला अजिबात डीस्टर्ब करायचे नाही. त्यांचे खाण्याचे वगैरे आधीच करुन ठेवले होते. आशुच्याच सुचनेनुसार ती छान तयार होऊन बसली होती. आज तिचा मित्र तिला गोल्डन अवर बद्दल सांगणार होता. फोन वाजला... आणि गोल्डन अवर बद्दल कळण्या आधीच अनामिकेचे गोल्डन अवर जगणे सुरु झाले होते. (क्रमशः)





Comments

  1. फार सुंदर सर, खरच प्रत्येकाने या गोल्डन अवर चा विचार करायला हवा

    ReplyDelete
  2. अविनाश भाऊ बहोत खूब

    ReplyDelete
  3. "ज्या आधुनिक काळात आपण जगतो त्या काळाच्या चकचकीत प्रक्रियेचे हे सारे साईड इफेक्ट आहेत"
    खूप सुंदर सर!

    ReplyDelete
  4. Panacea of healthy life articulated beautifully. Worth to follow by everybody.

    ReplyDelete
  5. Golden hour ....क्या बात सर ...अत्यंत मार्मिक
    👏👏

    ReplyDelete
  6. मार्मिक लेख !

    ReplyDelete
  7. Golden hour.... apratim sirji...

    ReplyDelete
  8. व्वा अवि गोल्डन अवरची मस्त आयडिया..नेहमीप्रमाणेच सुंदर लेख..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23