थोडा है थोडे की जरुरत है @ 25.02.20

बोलघेवडी

एरवी सर्वसाधारणपणे बोलघेवडी हा शब्द अकारण बडबड करणाऱ्या व्यक्तीबाबत वापरला जातो. एखाद्या सरकारवर किंवा व्यक्तीवर टिका करताना देखील हा शब्द वापरलेला आपल्याला आढळतो. वेगावेगाने कधीकधी अतर्क्य किंवा असंविधानिक बोलणे याला देखील बोलघेवडे असणे असे संबोधतात. मुळात बोलघेवडे असणे हा बोलण्यापेक्षा व्यक्तिमत्वाचा भाग जास्त आहे असे मला वाटते. काही लोकांना बोलायला जमतच नाही त्यांना आपल्या पारंपारिक भाषेत मुगजड असे म्हणतात. याच्या अगदी उलट जे भडाभडा बोलून मोकळे होतात किंवा सहजच बोलत राहतात त्यांना बोलघेवडे संबोधिले जाते. परंतू या बोलघेवडे असण्याला देखील चांगल्या अर्थाने बघितल्या जाऊ शकते. एक झोपडी बोलघेवडी, पांथस्थाचा पाय अडे असे ना.धों. महानोरांनी एका कवितेत म्हणले आहे ते चांगल्या अर्थानेच. या बोलघेवडेपणाला आपण आधुनिक परीभाषेत सहज संवाद साधण्याची कला अवगत असणे असे देखील म्हणू शकतो. अशीच एक बोलघेवडी एका कार्यक्रमाच्या दरम्यान मला भेटली. होय बोलघेवडीच होती ती. तिला बोलायला सांगितले तेव्हा तर बोलत होतीच परंतू मी भाषण देतानाही काही गोष्टींचे संदर्भ आठवल्यावर बोलणे सुरु करीत होती. खरे तर सभेच्या नियमाला धरुन तिचे बोलणे किंवा वागणे नव्हते. परंतू तिच्या बोलण्याला मी किंवा संपुर्ण सभागृहाने मनापासून स्विकारले भरभरुन दाद दिली कारण त्या बोलघेवडीकडे सहज संवाद साधण्याच्या हातोटी पेक्षाही महत्वाची एक गोष्ट होती ज्यामुळे तिचे सारे काही आम्ही साऱ्यांनी खपवून घेतले. तिच्या बोलण्यातला निखळ निरागस सच्चेपणा

एका विभागाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यात मी प्रमुख वक्ता म्हणून हजर होतो. कार्यक्रम सुरु झाला होता परंतू तरी देखील एका विद्यार्थिनीची सारेच जण वाट बघत आहेत असे मला त्यांच्या फोन वगैरे करण्याच्या प्रकारावरुन लक्षात आले. त्या विभागाचे समन्वयक असलेले माझे मित्र देखील मला म्हणाले की सर, तुम्ही त्या विद्यार्थिनीला भेटावे कारण ती आमच्या विभागासाठी भुषणावह आहे. परंतू कुठल्यातरी कारणाने तिला कार्यक्रमाला पोहोचायला वेळ लागत होता. जरा वेळानंतर ती आली. साडी वगैरे नेसून, छान तयार वगैरे होऊन. पहिल्यांदा माझ्यासकट अनेकांना वाटले की ही बहुदा मेकअप करण्यात रंगली असणार म्हणूनच हिला उशीर झाला. छान नटून थटून या बहिणाबाई स्टेजवर येऊन बसल्या. काही वेळानंतर तिला बोलायला सांगण्यात आले. ज्या प्रकारे ती बोलघेवडी बोलत होती ना ते सारे अफाट होते. अनेक वेळा एखाद्या विषयाची गांभिर्याने तयारी करुन तसेच वक्तृत्वाचे सर्व नियम पाळून सभागृह जिंकता येणार नाही परंतू आपल्या दहा मिनीटाच्या संवादाने त्या बोलघेवडीने सारे सभागृह जिंकून घेतले

खरे तर तिच्या त्या बोलण्यात कुठेही गर्भितार्थ वगैरे होता असे अजिबात नव्हते. ती बोलत असताना त्या कार्यक्रमाशी फार सुसंगत बोलत होती असेही नव्हते. चांगल्या वक्तृत्व शैलीची जे मापदंड होते ते देखील ती फार पाळत नव्हती, माईक चा सेन्स देखील तिला नव्हता. परंतू तरी देखील तिच्या दहा मिनीटाच्या संवादात सभागृहातील प्रत्येकाला हसायला, टाळ्या वाजवायला आणि प्रसंगी डोळ्याच्या कडा पुसायला लावण्याचे सामर्थ्य होते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे ती आरश्याप्रमाणे पारदर्शी बोलत होती. थेट मनापासून आणि आपल्या सवंगड्यांसोबत बोलल्याप्रमाणे सारे अगदी सहज. कार्यक्रमस्थळी पोहोचायला झालेला उशीर का झाला हे रंगवून रंगवून तिने सांगितले. पोहचवून देतो पण मला गाडीत पेट्रोल टाकायला भावाने पैसे मागितले अशी गोड तक्रार तिने करुन टाकली. आज मला नटून थटूनच यायचे होते कारण हा क्षण माझ्यासाठी खूपच महत्वाचा आहे आणि म्हणून मी छान तयार झाली. दिसते ना मी छान? असा निखळ प्रश्न देखील तिने विचारला. अत्यंत कठिण परिस्थीतीत माझे शिक्षण झाले हे सांगताना माझ्या पायाचे मोठे ऑपरेशन झाले माझा पाय कापावा लागला असे जेव्हा ती बोलली तेव्हा मनात चर्र झाले. परंतू त्या ऑपरेशन नंतरचा सगळा प्रवास, त्यामधे झालेला त्रास, त्या त्रासावर मात करुन धेतलेले पदव्युत्तर शिक्षण आणि त्यामधे मिळालेले गुणवत्ता यादीतील स्थान हे सारे तिने त्याच सहजतेने सांगितले. तिला कुठेही सहानुभूती गोळा करायची नव्हती. तिला केवळ आपल्या जिवाभावाच्या लोकांना आपले ह्रदगत् ऐकवायचे होते. आम्ही सर्वजण तिचे मनापासून ऐकत होतो. तोडके मोडके परंतू सारे काही थेट या ह्रदयीचे त्या ह्रदयी बोलणारी ती बोलघेवडी माझ्या भाषणादरम्यान देखील बोलत होती मला त्याचे काहीच वाटत नव्हते. एरवी भाषण सुरु असताना झालेला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय हा वक्त्याला जरा त्रासदायक ठरणारा असतो. परंतू येथे माझ्या बोलण्यातले संदर्भ शोधून ही पोर जेव्हा उत्सफुर्तपणे बोलत होती तेव्हा प्रसंगी मी देखील थांबून गेलो तिला बोलू दिले. कारण ती जे बोलत होती ना ते फारच मार्मिक आणि सच्चे होते. आई वडीलांनी आपल्यावर शिक्षणाची संधी देऊन केलेल्या उपकारांना कधीच विसरु नये आणि आपल्यापेक्षा कमी शिकलेले आहेत म्हणून त्यांचा कधीही अपमान करु नये असे मी बोलत असताना, मधे आमची बोलघेवडी बोलू लागली. सर, माझ्या आई बाबांना तर मला जेव्हा मेरीट मिळाला तेव्हा नेमके काय झाले ते देखील कळले नव्हते. पायाने अधू असणारी त्याची पोरगी शिकते आहे नव्हे जगते आहे याचाच त्यांना जास्त आनंद होता सर. बाकी त्यांना काही माहीत नव्हते. विद्यापीठ म्हणजे काय, पदव्युत्तर शिक्षण म्हणजे काय, त्यात मेरीट येणे म्हणजे काय या पैकी कोणतीही गोष्ट माझ्या पाचवी शिकलेल्या बाबांना माहित नव्हती. म्हणून मला मेरीट मिळाल्यावर माझे बाबा मला म्हणाले, ताई आता हेडमास्तर तुला बक्षिस देतील काय? असे आहेत माझे बाबा, काही कळत नाही पण एका पाय नसलेल्या मुलीला मात्र पायावर उभे करणे बरोब्बर समजले त्यांना. असे सांगून आमची बोलघेवडी हसता हसता रडू लागली. तिचे ते विलोभनीय रुप बघून आम्हा सर्वांच्या डोळ्यातून अश्रू कसे ओघळले ते कळलेच नाही. त्या दिवशी मला मनापासून वाटले आणि मी बोलूनही दाखविले की माझ्याही भाषणाचा वेळ जर या बोलघेवडीला दिला असता तर किती छान झाले असते?

चांगला संवेदनशील संवाद कसा साधायचा यावर अनेक वेळा कार्यशाळा घेण्याची वेळ माझ्यावर येते. कारण लोक बोलतात परंतू त्या बोलण्याला ह्रदयाची जोड नसते, त्या संवादाचे शब्द डिक्शनरीतून शोधलेले असतात परंतू त्यांना मनाचा स्पर्श झालेला नसतो, संवादाचे शास्त्र कदाचित प्रभावीपणे आत्मसात केले असते परंतू संवाद हा लोकांना आत्मसात केल्यानंतरच साधता येतो हे मुळतत्व कुठेतरी विसरल्यागत झालेले असते. त्यामुळे अस्खलित पल्लेदारपणे संवाद साधणारे बरेचवेळा फार छान वक्तव्य करुन जातात आपल्या बुद्धीला खूप भावतात खाद्य देखील देतात. परंतू अशी एखादी बोलघेवडी जी थेट ह्रदयातून बोलते, मनमोकळेपणाने आपलेच समजून बोलते नियमांची पर्वा करता सारे काही स्वच्छ आरश्यासारखे पारदर्शी बोलते सर्वात महत्वाचे म्हणजे संवादाचा शब्द शब्द प्रामाणिकपणे उच्चारते ती थेट ह्रदयापर्यंत पोहोचते. आपल्या वडीलांचे मोठेपण सांगायला तिला फार अलंकारिक भाषा लागत नाही तर केवळ निरागसतेने त्यांचे महात्म्य तोडक्या मोडक्या पद्धतीने शब्दांची जुळवाजुळव करुन ती सांगते ते आपल्याला पटकन पटून जाते

कार्यकर्माचा मुख्य वक्ता असूनही, मला एक विस्तृत विषय मांडायचा असूनही, त्या दिवशी पहिल्यांदाच असे वाटले की काहीच बोलू नये आणि केवळ या बोलघेवडीची तिच्या नटण्यापासून ते कापलेल्या पायापर्यंत सारे काही प्रेमाने व्यक्त करणारी ही मनःस्वी बडबड ऐकत रहावी. अशी होती मला भेटलेली एक बोलघेवडी!! बोलघेवडी शब्दाचा एक नवा समानार्थी अर्थ मी त्या दिवशी अनुभवला, थेट मनापासून बोलणे!!




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18