थोडा है थोडे की जरुरत है @ 04.02.2020

हिशोबाच्या पलीकडे

दोघांचा वाद सुरु होता. वादाला कारण छोटेसे होते. उल्लेखही करु नये असे. परंतू त्यावरुन सुरु झालेला वाद मात्र विकोपाला गेला होता. सर्वात पहिले त्याचे सांगणे सुरु होते. मी या घरासाठी काय काय करतो ते माझे मला माहीती आहे. अनेक वेळा तर मी काय करुन टाकतो याची दखलही कुणी घेत नाही. राब राब राबतो, दिवसभर कामे करतो नि त्यामुळे थकून जातो. या घरासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आणणे, येथील प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडणे, कार्यालयाची कामे करणे हे सारे मी करतो. या सोबतच घरातील सर्वांना बरे वाटावे म्हणून कुठे बाहेर जाण्याचे प्लॅन करणे, त्यासाठी अतिरीक्त खर्च करणे, मुलांच्या भविष्याची तजविज करणे, त्यांना काही कमी पडायला नको म्हणून काळजी घेणे, सोबत सर्वच बाबतीत ॲडजस्ट करणे, सर्वांच्या मनाचा विचार करणे, हे सारे केल्यावरही माझ्या मनाचा विचार मात्र कुणीच करीत नाही. मला काय आवडते हे कुणी बघत नाही. प्रत्येकजण फक्त स्वतःचाच विचार करणार. आता हे सहन करण्याच्या पलीकडे गेलंय. सामान्य कर्तव्य पूर्तीची यादी वाचून झाल्यावर त्याने मग काही ठळक महत्वाच्या कामांचा उल्लेख सुरु केला. तुझ्या माहेरी जेव्हा मामांकडे लग्न होते तेव्हा त्यांच्याकडून योग्य पद्धतीने बोलावणे केल्या गेले नव्हते तरी देखील मी माझा मान सोडून तुला घेऊन गेलो होतो. त्या लग्नामधे सगळी गैरसोय झाली होती तेव्हा मी सर्वांकरीता हॉटेलमधे व्यवस्था केली होती. त्यावेळी मी पैश्याचा विचार केला नव्हता. तुझ्या आई बाबांनी देखील लग्न झाल्यानंतर मला योग्य वागणूक दिली नव्हती. तुझ्या माहेरच्यांना माझ्या कर्तुत्वाचे कधीच कौतुक नव्हते. त्यांच्यालेखी तर मी कस्पटासमानच आहे. माझ्या अनेक मित्रांना मी बघतो तेव्हा त्यांची काय सरबराई करतात सासरचे लोक. इथे तर दोन शब्द बोलायला कुणी तयार नसते. पण मी त्याबद्दल कधी बोललो नाही. इतकेच काय पण तुझ्या घरचे लोक काहीही सांगतात तेव्हा मी त्याला नाही म्हणत नाही, ते येतात तेव्हा त्यांच्यासाठी गोडधोड विकत आणतो, त्यांना कुठे बाहेर न्यायचे असेल तर घेऊन जातो परंतू त्यांच्या वागण्यामधे ज्या चुका होतात त्याचे तू मात्र केवळ समर्थन करत राहतेस. अनेक वेळा मला काही सांगायचे असते परंतू तुझ्याजवळ माझ्यासाठी वेळ नाही. बाकी इतरांकरीता वेळच वेळ असतो. मी कधीच मला प्राधान्य द्यावे असा आग्रह आजपर्यत धरला नाही परंतू याचा अर्थ माझी किंमतच तुम्ही लोक करीत नाही. तुझ्या आयुष्यात सर्वात महत्वाची व्यक्ती मी आहे हे विसरु नको. माझ्यामुळे तुझे सारे आहे. मी जर मनात आणले ना तर दोन दिवसात साऱ्या गोष्टी सरळ होतील. परंतू मी कधीच कोणत्या गोष्टीची जबरदस्ती करत नसतो. परंतू माझ्या संयमाचा जास्त गैरफायदा घेऊ नको. मी नसलो ना तर कुणी विचारणार देखील नाही. सारी मिजास जी आहे ती केवळ माझ्या भरवश्यावर आहे. मी सारे लक्षात ठेवले आहे. आताही सांगू शकतो की कोणत्यावेळी नि कसा तुझ्याकडून आणि तुझ्या माहेरच्या लोकांकडून माझा अपमान झाला आहे. माझ्याजवळ सगळा हिशोब आहे. आज जे सांगितले ते तर काहीच नाही. एखाद्या दिवशी जर सारे काढले ना तर कठीण होऊन जाईन. वादामधे हे सारे ऐकल्यावर ती तरी चुप कशी बसणार आणि तिने तरी का बसावे? सारखा तिचा आणि तिच्या माहेरच्या लोकांचा उद्धार ती कसा सहन करेल? आता या वादाचे दुसरे स्वरुप सुरु झाले. आता ती बोलू लागली.

काय मघापासून लावले आहे तुझ्या माहेरचे तुझ्या माहेरचे? माझ्या माहेरचे होते म्हणून या घरात तुमचे लग्न होऊ शकले आणि केवळ मी आहे म्हणून तुमच्या सारख्या विक्षिप्त आणि विचित्र परीवारामधे निभावून नेते आहे. काय यादी सांगताय तुम्ही मला कामांची? तुम्ही पैसे कमावून आणता तर काय खूप मोठी गोष्ट करता का? घरामधे तुमच्या या विस्कळीत घराला सांभाळण्याची कामे कोण करते? जरा पैसे कमावता तर बायका लावून बघा, त्या काय काय करु शकतात ते! तुम्ही तर काय माझ्या हातचे बनलेले जेवण करुन निघून जाता. त्यानंतर या घरात तुमच्या आई वडीलांना आणि त्यांच्या सर्व कामांना मार्गी कोण लावते? पन्नास प्रकारचे पदार्थ लागतात या घरातील लोकांना. कुणाला हे आवडते, कुणाला ते आवडत नाही. या सर्व आनडी निवडी जपण्याचे काम कोण करते? महिन्यातून पाच दिवस तरी भांडेवाली किंवा कपडे धुणारी बाई येत नाही तेव्हा तुमची आई तर जेवण करुन बसते टीव्ही बघत. मग अश्या वेळी ती सगळी भांडी कशी घासली जातात. तुम्ही पाठवत जा ना तुमच्या ओळखीतून. तुमच्या घरी सारखे पाहुणे येत राहतात, त्यांच्यासाठी स्वयंपाक बडविण्याची जबाबदारी माझीच आहे का? पण कधीच कुरकुर करता मी करतेच ना? प्रत्येकाच्या कार्यालयाच्या, शाळांच्या वेळा पाळायच्या, सर्वांना डबे द्यायचे, सर्वांसाठी काही ना काही करायचे, सुटीच्या दिवशी तुम्ही सोफे मोडत बसता टीव्ही समोर आणि तुमच्या सेवेसाठी मी मात्र हजर हवी. मला नको का सुटी? आम्हाला बाहेर घेऊन जाता म्हणता म्हणजे उपकार आहेत का? तुम्हाला नसते जायचे का? तुमच्या दूरदूरच्या नातेवाईकांकरीता जेवणाचे डबेच्या डबे द्यायला सांगते तुमची आई, त्यावेळी मी नाही म्हणते का? तुम्ही देखील थकून येता तेव्हा गरम जेवण मिळावे म्हणून धडपडत असते आणि तुम्हाला आहे का किंमत त्याची? किराणा संपल्यावर तो आणून टाकता परंतू तो जागच्या जागी आपोआप जातो का? तुम्ही सांगता तशी माझ्याकडेही मोठी यादी आहे. लग्न झाल्यावर तुमच्या मावशीकडे गेलो होतो आपण आठवतेय? त्याठिकाणी तुमच्या मावशीने मला, नव्या लग्न झालेल्या सुनेला चक्क भांडी घासायला लावली होती. त्यावेळी तिच्या मुली माहेरपणी आल्या होत्या म्हणून आराम करीत बसल्या होत्या मला मात्र सुनेने कामे करायला हवी असे म्हणून कामाला जुंपले होते. हे तर मी तुम्हाला सांगितलेच नाही. अश्या कित्येक गोष्टी आहे. हिशोब मांडायला बसली ना तर तुमचेच कठीण होईल. माझ्याजवळही तो बऱ्याच दिवसांपासून मांडून ठेवलाय आणि मला काय तुम्ही सांगताय मिजासीचे? मी जर दोन दिवस निघून गेली ना तर तुमच्या घराचे काय हाल होतील याचा तुम्ही अंदाजही करु शकत नाही.

वादाचे अत्यंत वाईट स्वरुप झाले होते. अनेक वर्षांचे हिशोब काढून झाले. रागारागाने दोघेही टीव्ही बघायला बसले. वीर झारा नावाचा चित्रपट सुरु होता. जिच्यावर प्रेम करतो तिच्या नावाला डाग लागू नये म्हणून आपल्या आयुष्याची बावीस वर्षे तो परदेशातील एका कारागृहात घालवितो. तिच्यापासून दूर जाताना तिच्या एका पायाची तोरडी त्याच्याजवळ राहून गेली असते. ती त्याने सांभाळली असतो. बावीस वर्षांनंतर त्याची नि तिची भेट होते. त्या भेटीत तो तिला तिची तोरडी दाखवितो नंतर तिच्या पायात ती घालून देण्यासाठी खाली वाकतो, बघतो तर काय? तिच्या एकाच पायात तोरडी असते एक पाय रिकामाच असतो. त्याच्या कडून ती तोरडी त्या पायात कधी ना कधी घातली जाईल या विश्वासाच्या आधारे ती एका पायात तोरडीच घालत नाही. निखळ प्रेम. कसलाही हिशोब नसलेले किंबहुना हिशोबांच्या पलीकडले प्रेमकसल्याही अपेक्षा नसलेले, फक्त आणि फक्त निरपेक्ष प्रेम

वाद घातलेले दोघेही म्हणाले. चित्रपटात हे ठिक आहे. इथे येऊन बघा सत्यात काय असते ते! सहजच मनात विचार आला, सत्यात असे होत नसेल तरी असे व्हायला काय हरकत आहे? हिशोबांच्या पलीकडले प्रेम जपायला काय हरकत आहे? होय ना?




Comments

  1. हिशोबाच्या पलीकडले आणि हिशोबाने घेणे ह्याचा हिशोब जुळवण्याचा प्रयत्न करणे हेच जीवन , नाही काय पंत //,?

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18