थोडा है थोडे की जरुरत है @ 11.02.2020

आनंदाने स्विकारलेला पराभव

दुःख आणि वेदना जेव्हा येतात ना, तेव्हा त्या एकत्रितपणे येतात. त्यावेळी आपली खरी परीक्षा असते. जीवनाचे दिवस पुढे ढकलताना अनेकवेळा अशी काही परीस्थिती निर्माण होते की त्यावेळी सर्व बाजुंनी आपली कोंडी झालेली असते. अगदी जवळचे वाटणारे लोक देखील अश्यावेळी विचित्र पद्धतीने वागू लागतात. काही गोष्टी ज्या आपल्या हातात नाही त्या देखील चुकीच्याच घडत जातात. सहजच जी गोष्ट काही काळ आधी जुळून यायची किंवा होऊन जायची ती देखील आता मनापासून प्रयत्न केले तरी होत नाही. बरे अश्या वेळी तटस्थपणे आपल्या क्षमतांचा, योग्यतांचा विचार केला तर असे जाणवायला लागते की जी परिस्थीती आपल्याला सहन करावी लागते आहे ती परीस्थिती सामोरी यावी इतकी कमी योग्यता आपली निश्चितच नाही. अगदी आत्मस्तुतीचा कसलाही लवलेश ठेवता देखील विचार करुन मन हेच सांगत राहते की हे तुझ्या नशीबात यावे इतका तू वाईट नाहीस. या सोबतच आपल्या धार्मिक प्रक्रियेमधे आपल्याच कर्माची फळे आपल्याला भोगावी लागतात असे म्हणले आहे. त्याचाही अगदी तटस्थपणे विचार केल्यास मन सांगत असते की जी परिस्थीती किंवा त्यायोगे सहन करावे लागणारे दुःख बघता आपल्या आयुष्यात आपण एवढा त्रास तर कुणालाही दिलेला नाही. खरे तर अजाणतेपणीही दिलेला स्मरत नाही. हे बरोबर आहे की काही निर्णयांमुळे किंवा काही वागण्यांमुळे काही लोकांची मने दुखावली असणार. ते मी नाकारत नाही. परंतू जी परिस्थीती समोर आलेली आहे त्यामुळे जी मानसिक व्यथा सहन करावी लागते आहे त्या प्रमाणात तर निश्चितच कुणाला दुखावले नाहीच. आपल्याला जगत असताना स्वतःबद्दल खरेच काय ते माहित असते. त्या अनुषंगाने अशी वेदनादायी परिस्थिती समोर यावी असे काहीही वाईट कुणाच्या बाबत घडलेले नाही आणि या सोबतच तेवढ्या प्रमाणात अयोग्यता देखील नाही. अडचणींच्या वर्तुळात अडकलेले एक काका फार पोटतिडकीने बोलत होते. ज्या वयात शांतपणे जीवन जगण्याची इच्छा असते त्या वयात ते विविध अडचणींना सामोरे जात होते. त्यातील बऱ्याच अडचणी अनाकलनीय होत्या. त्या का येत आहेत याचा तर्कशुद्ध विचार करताना त्यांना या वरील गोष्टी जाणविल्या होत्या. अर्थात हे त्या काकांचेच मत होते असे नाही तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या अनेकांचे त्यांच्या जीवनाबाबत हेच मत होते. म्हणूनच त्यांना या सर्व समस्यांबाबत नेमके कारण कळत नव्हते किंवा सांगता येत नव्हते. लोक देखील त्या काकांच्या जीवनाबद्दल प्रांजळपणे आपली मते द्यायची.

एक तर अनेकांना जीवनात काकांनी मनापासून मदत केली असल्याने त्यांच्यावर जीव टाकणारा मोठा वर्ग होता. कोणत्या ना कोणत्या प्रकारे काका मदत करीत रहायचे. जगाच्या किंवा खुद्द काकांच्या दृष्टीने ती मदत फार मोठी नसली तरी त्या मदतीमुळे अनेकांच्या जीवनाला आकार मिळाला, अनेकांना सन्मानाने जगण्याची संधी प्राप्त झाली. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे काका सर्वांनाच केवळ सकाररात्मकता शिकवित राहीले. त्यांच्याकडे कोणतीही समस्या घेऊन गेल्यावर अवघ्या काही मिनीटातच ती समस्या सुटून जायची समस्या घेऊन गेलेला सकारात्मकतेचा पाठ उराशी बाळगून काकांकडून निघायचा. ही कमाल होती काकांच्या समुपदेशनाची. यासोबतच अनेकांना पैश्याची मदत, पुस्तकांची मदत हे तर त्यांचे सुरुच रहायचे. त्यांच्या या मदतकार्यामुळे त्यांच्या जीवनाची योग्यता त्यांना स्वतःला फार सांगावी लागत नव्हती तर इतरच त्यांच्या या कार्याबद्दल आणि मदतीबद्दल भरभरुन बोलायचे. या सोबतच काकांचा बौद्धिक आलेख विचारक्षमता प्रचंड होती. परंतू दुर्दैवाने त्या आलेखाच्या तुलनेत त्यांना आयुष्यात संधी मिळाल्या नाही. वेगवेगळी कारणे होत गेली त्यामुळे त्यांच्या क्षमतांना शोभेल असा मंच त्यांना प्राप्त झाला नाही. त्यांच्या बुद्धीमत्तेला विचारक्षमतेला साजेश्या अनेक बाबी त्यांच्यापासून दूरच राहील्या किंवा त्या तश्या पद्धतीच्या वर्तुळामधे त्यांचा प्रवेशच होऊ शकला नाही. काकांच्या मदतीने मोठी झालेली अनेक मंडळी त्या वर्तुळात प्रवेशित होऊ शकली परंतू काकांना मात्र नशीबाने त्या बाबतीतही वंचितच ठेवले. अश्या प्रकारे कर्तृत्व साधनेच्या बाबतीत इतर रोजच्या जीवनक्रमाच्या बाबतीतही काका जरासे कमनशीबीच ठरत गेले. या सर्व गोष्टींबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या आहेत हे मला जाणवित होते. परंतू शेवटी ते ग्रेट काका आहेत. जास्त वेळ असे भावनिक राहणे रडत बसणे त्यांना जमतच नाही. माझ्याशी बोलताना, मी त्यांचा आवडता पुतण्या असल्याने त्यांना जरासे भरुन आले होते. पण क्षणार्धात त्यांनी तो दुःखाचा आवेग बाजूला सारला मला या संदर्भातील एक नवी संकल्पना समजावून सांगितली. ती संकल्पना ऐकल्यावर मला त्यांच्या विचारक्षमतेबद्दल आणखी जास्त आदर वाटू लागला. जगावे तर असे असाच विचार माझ्या मनात आला. मनाला वेदना होत असताना किंवा योग्यता असूनही आवश्यक ते प्राप्त होत नसनाचे दुःख पचवून काकांनी मला जीवनाचे ते सकारात्मकता निर्माण करणारे तत्वज्ञान सांगितले. ते मला म्हणाले, अविनाश याला आनंदाने स्विकारलेला पराभव म्हणतात. पराभवाचा आनंद? हे काय नवीन? मी प्रतिप्रश्न केला. त्यावर काकांनी सांगितलेली संकल्पना खरोखरीच खचून गेलेल्या माणसालाही उभे करु शकते समाधानी बनायला बाध्य करते.

काका मला म्हणाले, हे बघ मी पूर्ण विचार करुन बघितला. माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल इतरांकडूनही मते मागितली. या सर्व बाबींवरुन मी या निष्कर्षाला आलोय. मी माझ्या आयुष्यात माझा झालेला पराभव स्विकारला आहे. शेवटी प्रत्येकच जण मनापासून त्याच्या त्याच्या इच्छेप्रमाणे जीवनाचा खेळ खेळतच असतो. तो खेळत असताना प्रत्येकालाच तो खेळ त्याला वाटेल तसा खेळता जरी येत असला तरी त्याचा विकाल मात्र त्याच्या हातात नसतो. त्याच्या निकालासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जीवनाच्या सारीपाटावरील अनेक प्यादे आपल्या नकळत खेळले जात असतात. अनेकदा हे प्यादे आपल्यापेक्षा वेगळ्या व्यक्तीच्या नशीबाच्या जोरावर खेळले जातात. आपल्याला वेदना यासाठी की आपण त्या व्यक्तीशी जोडलेलो असतो. म्हणूनच आपल्या जीवनातही अश्या काही गोष्टी असतात ज्यावर आपला ताबाच नसतो परंतू त्या आपल्या अपयशाला किंवा खिन्न मनस्थितीला जबाबदार असतात. त्यांच्यामुळे देखील आपल्या पराभवाला हातभार लागला असतो. त्यामुळे सर्वप्रथम मी माझा पराभव मान्य केला आहे स्विकारला देखील आहे. पण खरे सांगतो, हे मान्य केल्याबरोबर मला एकदम मोकळे वाटू लागले. कारण पराभवाच्या शल्यासोबत त्याला स्विकारणे हे एक अतिरीक्त दडपण मी सहन करीत होतो जे मी एका झटक्यात काढून फेकले आहे. आता पराभव झाल्याचे दुःख नाही कारण मी तो स्विकारला आहे आणि आता त्या स्थितीसोबत जगायचे आहे हे मनाशी ठरविल्यामुळे मी परत हसणे सुरु केले आहे. याला आपण स्वतःहून स्विकारलेला पराभव म्हणूयात. त्यामुळे आता मी पराभूत झालो आहे याबद्दल कुणाच्या मनात किंवा चेहेऱ्यावर मला भाव दिसले तरी मला त्याचे काहीच वाटत नाही.माझ्या मनावरचे ओझेच कमी झाले आहे. मी परत एकदा नव्याने उत्साहाने जगायला लागलो आहे. एवढ्या वर्षांपासून साचत गेलले पराभवाचे शल्य मी एका क्षणात काढून फेकले कारण मी माझा पराभव खुल्या दिलाने स्विकारला. आता मी परत नव्या दिशेने वाटचाल करु लागलोय, नव्या उर्मीसह, हसत खेळत!!

काकांचे हे तत्वज्ञान कळायला जरा कठीण होते परंतू मला ते पटले. हे सांगताना खळखळून हसणाऱ्या काकांना मी मनोमन सलाम केला कारण मला तो चित्रपट नायक आठवला जो एके काळचा सुपरस्टार असूनही पुढे ज्याचे चित्रपट जेव्हा चालेनासे झाले, जेव्हा तो कर्जात बुडाला होता, तेव्हा स्वतःचा पराभव आनंदाने मान्य करुन तो एका मोठ्या दिग्दर्शकाकडे जाऊन बसला म्हणाला, मला काम द्या, मला काम करायचे आहे. पराभव मान्य करुन उतारवयातही पुन्हा नव्या उर्जेने कामाला लागलेला तो नायक आज महानायक अमिताभ बच्चन बनला आहे. आमच्या काकांचे आनंदाने पराभव मान्य करण्याचे तत्वज्ञान यापेक्षा वेगळे ते काय? असे करता आले पाहिजे!!




Comments

  1. एकदम बरोबर ,👍🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  2. यालाच तर परिस्थितीशी जुळन घेण म्हणतात ..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18