थोडा है थोडे की जरुरत है @ 18.02.20

केवळ बापच!

फेसबुकवर त्याच्या पोस्ट मी नेहेमीच बघतो. परंतू दोन दिवसांपूर्वीची त्याची पोस्ट जराशी वेगळी होती. संवेदनशील मनाने खाजगी आयुष्यात आलेल्या एका अनुभवाला त्याने शब्दांद्वारे वाट मोकळी करुन दिली होती. त्याच्या मित्रपरीवारातील माझ्यासकट सर्वांनाच त्या पोस्टचे कौतुक वाटलेच, आम्ही सर्वांनीच भरभरुन त्यावर प्रतिक्रीया देखील दिल्या. कधी कधी आपल्या मनातील भावनांना व्यक्त करण्याचे हे माध्यम अश्या काही कारणांमुळे मला आवडून जाते. ज्या गोष्टी कधी कदाचित व्यक्तच झाल्या नसत्या, वर्तमानपत्रात त्यासंबंधी लिहीणे प्रशस्त वाटले नसते अश्या गोष्टी मित्रांजवळही बोलणे ही सवय नसल्याने अडचणीचे जाते अश्या काही अंतस्थ भावनांना या नव्याने रुढ होत असलेल्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त करता येतात. याच पद्धतीने माझ्या त्या मित्राने या भावना व्यक्त केल्या. त्याच्या कानावर पडणाऱ्या आणि त्याच्या द्वारे बरेच वेळा बोलल्या जाणाऱ्या अत्यंत व्यवहारी, स्पष्ट आणि प्रसंगी फारच रखरखीत भाषेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या द्वारे व्यक्त झालेल्या या भावना फारच वेगळ्या असल्याने त्याचे सर्वांनाच कौतुकमिश्रीत आश्चर्य वाटले. एरवी त्याची भाषा आमच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे.

त्याच्या कार्यालयात किंवा कुठेही त्याची भेट झाली की त्याचे सारखे फोनवर बोलणे सुरु असते किंवा त्याच्या समोर बसलेल्या लोकांशी तो बोलत असतो. परंतू बोलण्याचे विषय त्याची व्याप्ती ही ठराविक पद्धतीचीच असते. कधी समजावून सांगत तर कधी रागावून तर कधी खूप चिडून देखील तो बोलत असतो. समोर नोट्स घोण्याची डायरी घेऊन त्याची चौकशी सुरु असतो. काय झाले ते नक्की सांग. कुठे घडला हा प्रकार? अरे तू मारलेस पण समोरच्याला कुठे लागले? मग काय झाले? पोलीसांनी तुला नेले. मग झोडपले का? मग, असे करशील तर असेच होणार. असे काही झाल्यावरच माझी आठवण येते तुम्हाला. सगळा प्रकार नीट सांग. एकही गोष्ट लपवू नको. चाकू होता का हातात? तू चालविला की त्यानी चालविला? पागल आहेस तू. इतका छोटा वाद इतका मोठा बनवायचा का? अरे मित्र आहे ना तुझा तो, मग? आता मी काय वाचवू? हे असे वागताना मला विचारले होते का? फोनवर असे काहीतरी सुरु असते. ते आटोपल्यावर समोर बसलेले काका बिचारे त्यांच्यावर अचानक आलेल्या संकटामुळे घाबरुन गेले असतात. त्यांची मनःस्थिती ओळखून हा माझा मित्र त्याचा टोन बदलवितो परंतू भाषा आणि विषय मात्र तेच रहातात. काका, कशी गडबड केलीत तुम्ही? आता गुन्हा दाखल झाला म्हणजे सारेच बघावे लागेल. जरा काळजी घ्यायला हवी. आता सध्या तरी त्या पोलीस स्टेशनमधे तो गुन्हा एनसी केला आहे. काकांना एनसी म्हणजे अदखलपात्र वगैरे काही कळलेले नसते. आमच्या मित्राचे बोलणे सुरु असते. परंतू कशाचे काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण अग्रीम जमानतीसाठी अर्ज करु. त्याचेही काय होईल ते आता सांगता येत नाही. मी सांगतो तसे दोन लोक आणि त्यांची कागदपत्रे घेऊन उद्या सकाळी कोर्टात या. किती वाजता काम होईल ते मी काही सांगू शकत नाही. माझ्या हातात काही नसते. जजसाहेबांवर अवलंबून आहे. कधी कधी तीन नंतर देखील नंबर लागतो. घाई करायची नाही. मला सारखा सारखा फोन करायचा नाही. मी बरोबर पोहोचतो. अहो काका, रडता कशाला? मला हे रडणे नाही आवडत. असे इमोशनल होऊन काही मिळत नाही. मी जसा प्रॅक्टीकल विचार करतो तसा विचार करा. आता यापुढे काय झाले, कसे झाले, व्हायला नको होते, किंवा माझ्याबाबतच का झाले असले टीपीकल प्रश्न बाजूला ठेवा आणि एकंदर सगळा घटनाक्रम मला सांगा. कारण उद्या आता केवळ जमानत होणार आहे. आपल्याला केस लढायची आहे त्यासाठी मला सगळी माहिती लागेल. पैश्याचे नंतर बघू. पहिले आता उद्याचा दिवस. जा आता. काकांना अश्या व्यावहारिक स्वरुपात सारे समजावून घरी पाठवतानाच पुन्हा फोन वाजतो. अबे, क्या हुवा तुझे? फिरसे उसे उठाया क्या पुलीस ने? ऐसे कामही क्यू करता है रे तेरा भाई और फिर आते हो मेरे पास. क्या करु मै अभी? यावेळी तो फारच चिडलेला असतो. अरे रुक ना, मुझे जरा सोचने तो दे, कैसे निपटाना अब. मेरे हाथ मे है क्या सब? कानुन नामकी कोयी चिज है की नही, तुम्हारे भाई ने तो सब चुले मे डाल दिया है और अब मेरे पिछे तुने परेशानी बढा दी है, देख अभी मै सोचता हूँ, मुझे तु रात मे ग्यारह बजे के बाद फोन कर तब मै कुछ बताता हूँ, उसके पहले फोन किया तो याद रखना वगैरे वगैरे. विदर्भातला माणूस रागावल्यानंतर साधारणपणे जे काही आणि जसे काही बोलतो ते सारे पुढे तो त्याला सुनावतो रागाने तो फोन कट करतो.

वरचे सर्व संवाद वाचल्यावर आमचा मित्र नेमका काय करतो हे सर्वांच्याच लक्षात आले असेल. त्याच्या त्या व्यवसायाला अनुरुप अशी भाषा, असे लोक, असे प्रसंग, अश्या परिस्थिती हे सारे सामोरे येत असल्याने त्याच्या ठायी तयार झालेली प्रखर व्यावहारिकता अत्यंत स्वाभाविकपणे आमच्यापैकी प्रत्येकाला जाणवते. एका क्रिमीनल लाॅयरला शोभेल आणि ठेवावी लागेल अशीच त्याची भाषा, शब्दागणीक जाणविणारा तसेच ठेवावा लागणारा आत्मविश्वास त्याचा दृष्टीकोन आम्हाला कायम जाणवत आलेला आहे. किंबहुना व्यावहारिक दृष्टीने जर एखाद्या गोष्टीकडे बघायचे असेल तर त्याचा सल्ला आम्ही मंडळी घेतो. कारण त्याच्या त्या क्रिमीनल लाॅयरच्या विचार करण्याच्या पद्धतीमधून त्याला अनेक अश्या गोष्टी दिसतात ज्या कदाचित भावनिक पातळीवर आम्हाला दिसत नाही. झपाझप निर्णय घ्यायचे, अनावश्यक गोष्टी कापून टाकायच्या, भावनिक पातळीवर अजिबात वाहवत जाता संपुर्णपणे व्यावहारिक इतरांना प्रसंगी कठोर वाटणारे निर्णय घ्यायचे, रडणे वगैरे असल्या कमकुवत गोष्टींना अजिबात थारा द्यायचा नाही या पद्धतीचे त्याच्या व्यवसायाला पोषक असेच त्याचे व्यक्तिमत्व आमच्या मनामधे समाजमाध्यमांमधेही व्यक्त होत असताना अचानक तो लिहून गेला

डोळ्याच्या पाणावलेल्या कडा जाणवित होत्या. आम्ही एकमेकांना टाळू लागलो होतो. तो विषय आपल्यात निघू नये याचा प्रयत्न दोघांचाही सुरु होता. परंतू त्या प्रसंगी मात्र घट्ट केलेले मन माझ्या नेहेमीच्या रोखठोक स्वभावाला ऐकेनासे झाले होते. मेंदूच्या व्यावहारिकतेला मनाने पार दूर लोटले होते. माझे असे काही होऊ नये असा माझा सारखा प्रयत्न सुरु होता. परंतू माझ्या विचारांचा व्यावहारिक निग्रह माझ्या हळव्या झालेल्या मनापुढे थिटा पडत होता आणि शेवटी बराचवेळ रोखून ठेवलेला बांध फुटला आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मलाच माझे कळेना की हे काय होतंय? मी तर कधीच असले रडणे वगैरे मान्य करत नाही. काही मिळत नसते अश्या रडण्याने. पण आज हे काय होतंय? आज माझे, ग्रेट क्रिमीनल लाॅयरचेही डोळे पाणावलेत. होय असे झाले होते खरे

होय, खरेच असे झाले होते, आमच्या ग्रेट क्रिमीनल लाॅयरच्या देखील डोळ्यात आज आसवे गोळा झाली होती कारण आज त्याचा जिवाभावाचा मित्र, त्याचा बडी, त्याचा यार, त्याच्या जीगरचा तुकडा, त्याचा लाडका छोकरा शिक्षणाच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या विमानामधे बसण्याकरीता चेक इन करीत होता आणि कायम कठोर व्यावहारिक जगात वावरणारा, गुन्हेगारी जगतातील विद्रुप चेहेरे बघणारा, संवेदना संपल्यावरच गुन्हा घडतो अश्या मंडळींच्या संपर्कात बरेच वेळा असणारा त्यामुळे त्यांच्याशी सहसा कठोरतेनेच डील करणारा आमचा ग्रेट क्रिमीनल लाॅयर या प्रसंगी मात्र केवळ बापच होता. काचेच्या दारापलीकडे विमानाकडे आपली बॅग घेऊन निघालेल्या पाठमोऱ्या मुलाला अश्रुभरल्या डोळ्यांनी निरोप देणारा, केवळ बापच!!





Comments

  1. सर नमस्कार. वडील कितीही शिस्तप्रिय असले तरीही ते मनातून अतिशय संवेदनशील असतात याची प्रचिती येणारा उत्तम लेख वाचायला मिळाला. आपली लेखणी विविध व्यक्तिरेखा वर प्रकाश टाकते . .🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18