थोडा है थोडे की जरुरत है @ 28.01.2020

परफेक्ट ॲंगल

एका मित्राच्या मुलीच्या लग्नात मला तो दिसला. खरे तर सर्वांनाच त्याचे अस्तित्व जाणवत होते. कारण तो कामच असे करीत होता की त्याच्याकडे सर्वांचे लक्ष जाणारच होते. परंतू त्याचे आणखी एक वैशिष्ट्य असल्याने त्या सबंध सभागृहात त्याचा वावर ठळकपणे जाणवित होता. रात्रीच्या वेळी सिमांत पुजनाचा कार्यक्रम सुरु होता त्या कार्यक्रमात त्याचा सहभाग जास्त होता. तसेच लग्नाच्या दिवशी देखील होमाच्या वेळी, किंवा सुनमुखाच्या वेळी त्याच्यावरच काही जबाबदाऱ्या मुद्दाम देण्यात येत होत्या. त्याच्या कामामधे तो सराईत असावा कारण त्याच्यावर ती जबाबदारी सोपवून त्याचे सर्व साथीदार बिनधास्तपणे आराम करीत होते आणि हा आपले काम चोख बजावित होता. माझ्या तो स्मरणात राहून गेला कारण त्याच्या ठायी असलेले एक आगळे वेगळे वैशिष्ट्य. ज्याचे काम बघून मी फारच प्रभावित झालो त्याला मी अद्यापही विसरु शकलो नाही तो म्हणजे त्या लग्नात मला भेटलेला एक फोटोग्राफर.

आजकाल लग्नांमधे फोटोग्राफी हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम बनलेला आहे. केवळ एक फोटोग्राफर आणि नंतर त्याने आणलेले फोटो त्या प्लास्टीकच्या अल्बममधे लावून बघणे ही संकल्पनाच कालबाह्य झाली. हजारो रुपये खर्च करुन लग्नापूर्वीच प्री वेडींग शूट केले जाते. अत्यंत छान ते सारे करतात. लग्नात देखील आता फोटेग्राफर्स चा समुह असतो. कमीतकमी चार ते पाच फोटोग्राफर वेगवेगळ्या ॲंगलमधून फोटो काढतात. त्यामधे काही केवळ लग्नाला आलेल्या लोकांचे नकळत फोटो काढतात. त्याला कॅंडीड फोटोग्राफी असे म्हणतात. परंतू या वेगवेगळ्या कॅमेरांच्या माध्यमातून ते सारे क्षण अत्यंत सुंदरतेने ते पाचही फोटोग्राफर टिपत असतात. या सर्व कॅमेरांमधून निघालेले हजारो फोटो समारंभानंतर यजमानांना सोपविले जातात त्यामधून मोजके ठरलेले फोटो निवडून त्याचा अत्यंत सुंदर असा अल्बम बनविला जातो. त्यामधे ब्लॅक ॲंड व्हाईट फोटोंचे देखील सुरेख काॅम्बीनेशन केले जाते. एकंदरीत फोटो काढणे हा एक स्वतंत्र सुंदर प्रकार सध्या बनला आहे. ज्या लग्नाचा मी उल्लेख करीत आहे तेथेही हे सर्व फोटोग्राफर्स वेगवेगळे कॅमेरे, त्याचे वेगवेगळे लेन्स अश्या सर्व गोष्टी वापरुन सर्वोत्तम फोटोग्राफी करीत होते. यामधे केवळ वेगळा होता तो. जो बैठ्या स्वरुपाच्या कार्यक्रमांच्या फोटोग्राफीसाठीच जणू नेमला होता. लग्न समारंभात अनेक वेळा वर किंवा वधू किंवा त्यांचे आई वडील यांना खाली बसून शास्त्रोक्त विधी पार पाडावे लागतात. जसे सीमांतपुजनाच्या वेळी वर वधू पुजन, किंवा होमाच्या वेळी वर वधू सोबत बसलेले असतात किंवा सुनमुखाच्या वेळी देखील तसेच असते. अश्या बैठ्या क्षणांना कॅमेरात कैद करण्यासाठी या माझ्या फोटोग्राफर मित्राची निवड करण्यात आली होती, नव्हे हे सर्व बैठे कार्यक्रम त्याच्याच कॅमेराने कैद केले जात होते. ही जबाबदारी त्याच्याकडे त्याच्या ठायी असलेल्या एका वैशिष्ट्यपूर्ण गोष्टीमुळे देण्यात आली होती. ती गोष्ट म्हणजे या माझ्या फोटोग्राफर मित्राची उंची केवळ सव्वादोन फुटच होती.

होय केवळ सव्वादोन फुट उंची असलेला तो फोटोग्राफर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. समारंभातील अनेक लोक आपल्याकडे बघत आहेत हे त्याला ठाऊक होते. परंतू त्या बघण्याची अजिबात चिंता करता तो कार्यक्रमांचे सुरेख फोटो काढत होता. त्याच्याशी बोलण्याची मला इच्छा झाली. काही वेळाने हे बैठे कार्यक्रम आटोपल्यावर तो मित्र एका खुर्चीवर निवांत बसला असताना मी त्याच्याशी बोलण्याची संधी घेतली. त्याने देखील मोकळेपणाने आपले मन मोकळे केले. कदाचित त्याला त्या सर्व चर्चेची किंवा प्रश्नांची देखील सवय झाली होती. त्यामुळे मनमोकळेपणाने त्याने त्याच्या त्या वैशिष्ट्याची गंमत मला सांगितली. तो म्हणाला की सर, मला माझ्या उंचीचा सर्वात जास्त फायदा हा आहे की ज्या बैठ्या कार्यक्रमांचे फोटो काढताना योग्य तो ॲंगल मिळविण्याकरीता माझ्या इतर फोटोग्राफर्स मित्रांना खाली बसावे लागते, वाकावे लागते, त्रास घ्यावा लागतो त्या सर्व वेळी मला फोटो काढण्याचा सर्वात नैसर्गिक ॲंगल प्राप्त होतो. माझ्या उंचीमुळे मला बैठ्या कार्यक्रमांमधील ऑब्जेक्ट सर्वात योग्य पद्धतीने कॅप्चर करता येते. हा माझा प्लस पाॅईंट आहे. थकता किंवा फार वाकल्यामुळे त्रास होता मी सरळ सरळ फोटोग्राफी करु शकतो म्हणूनच माझे फोटोग्राफी करणारे वेगवेगळे ग्रुप मला या बैठ्या कार्यक्रमांचे फोटो काढण्यासाठी सोबत घेऊन जातात. मला देखील फार मजा येते सर. सुरुवातीला माझ्या अश्या बुटका असण्याचा मला फार त्रास झाला. परंतू तो त्रास लोकांकडून कमी माझ्या मनामुळे जास्त झाला. मला माझ्या अश्या उंचीमुळे देवाने आपल्यावर फारच अन्याय केला असेच वाटायचे. परंतू जेव्हापासून हा कॅमेरा हातात आला आणि मला तो परफेक्ट ॲंगल सापडला तेव्हापासून माझे स्वतःबद्दलचे नकारात्मक भावच अदृष्य झाले. तो परफेक्ट ॲंगल माझ्या उंचीमुळे केवळ फोटोग्राफीसाठी फायदा देणारा नाही तर मला स्वतःला किंमत देऊन स्वतःकडे बघण्याचा तो ॲंगल होता. माझ्या एका फोटोग्राफर मित्राचे मी त्यासाठी धन्यवाद मानतो. त्याने मला कॅमेराच्या माध्यामातून केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम केले नाही तर मला माझ्याही जीवनावर प्रेम करता येऊ शकते हे शिकविले. आणि आता बघा, मला फोटोग्राफीच्या कामातून वेळच मिळत नाही. आता तर केवळ मी सुंदर बघत नाही तर माझ्या या छोट्या उंचीमुळे मला मिळणारा फरफेक्ट ॲंगल मी पकडतो आणि अनेक लोकांना सुंदर बनवून दाखवतो. सुरुवातीला माझ्या उंचीवर कुत्सितपणे हसणारे नंतर मात्र त्यांचे मी काढलेले फोटो बघून फार गोड हसतात आणि माझ्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टीकोनच बदलून जातो. एवढा प्रभावी आहे सर, हा मला माझ्या उंचीने मिळालेला परफेक्ट ॲंगल. चला सर, पुढचा कार्यक्रम सुरु होतोय. मला जायला हवे. मी त्याच्या बाजूने बसलो होतो. त्याला हात देऊन मी खुर्चीवरुन उतरवून दिले. जाता जाता तो अचानक वळला माझ्या दिशेने त्याने कॅमेरा केला फोटो काढण्याचा प्रयत्न केला. मी देखील जरासा सावरुन बसलो. पण माझा फोटो काढताच हसून मला म्हणाला, सर खुर्चीपेक्षा जमिनीवर बसला असतात तर मला परफेक्ट ॲंगल मिळाला असता. मी चटकन खाली बसलो त्याच्याकडून फोटो काढून घेतले

स्वतःच्या जीवनामधे सापडलेला परफेक्ट ॲंगल इतरांनाही सहजच समजावून सांगण्याची त्याची ती पद्धत मला आवडली. आपल्याही जीवनात अनेकवेळा तो परफेक्ट ॲंगल मिळाल्यामुळेच विविध समस्या निर्माण होतात. त्यातील बऱ्याचश्या आपल्याच मनात जन्मलेल्या असतात. त्या सर्व समस्यांचे समाधान या माझ्या मित्राने सांगितलेल्या परफेक्ट ॲंगल मुळेच साधल्या जाऊ शकते. विशेष म्हणजे हा परफेक्ट ॲंगल कुणी कितीही सांगितला तरी साधावा आपला आपल्यालाच लागतो. त्यामधे केवळ मदत केली जाऊ शकते परंतू त्या ॲंगलमधून बघण्याची सवय ज्याची त्यालाच करावी लागते. परंतू एकदा तो सापडला की मग मात्र आपल्याला अनेक गोष्टी सुंदर वाटू लागतात. मुख्य म्हणजे माझा तो मित्र त्याच्या त्या परफेक्ट ॲंगलच्या पलीकडचे फोटो काढण्याच्याही भानगडीत पडत नाही कारण त्याच्या त्याच ॲंगलमधे त्याला एवढा जास्त मोकळा श्वास घेता येतोय की त्याला बाकी कशाचीही गरज भासत नाही आणि भासलीच तरीही तो त्याबद्दल रडत बसत नाही.

समस्या नसलेले आयुष्यच आपल्याला सापडू शकत नाही. परंतू समस्यांचा योग्य पद्धतीने सामना करुन, त्यामधून निर्माण झालेल्या मर्यादा ओळखून, आपला परफेक्ट ॲंगल शोधणारी व्यक्ती जग सुंदरतेने बघू शकते जगाला सुंदर बनवू देखील शकते. आपल्याला हसत हसत जगण्यास्तव तो परफेक्ट ॲंगल सापडू शकेल? नक्की सापडेल, शोधुयात!!!






Comments

  1. Perfect ...! But you had posted a snap of Asawari in the last episode.
    A photo of that photographer would have done more justice to the subject ...I feel.

    ReplyDelete
  2. जीवनाच्या एक पाँझिटिव्ह अँगल एका अतिशय सुंदर प्रसंगाच्या माध्यमांतून ठेवला आहे

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18