थोडा है थोडे की जरुरत है @14.01.2020
आसावरी
का गं? माझ्या जेवणाची काही चिंता आहे की नाही तुला? मला उपाशी ठेवून कुठे गेली होतीस भटकायला? इतका मी जड झालेलो आहे का तुला? तसे वाटत असेल तर मला सांगून दे, मी मरुन जातो. नाहीतरी सध्या तुझे या घराकडे लक्षच नाही. तू घराबाहेर आनंद शोधण्याचा काय प्रयत्न करते आहेस? हे घर म्हणजेच तुझे कार्यक्षेत्र आहे. येथे आधी लक्ष दे आणि मग बाहेरचे बघ. घराकडे लक्ष देणे, घरातल्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेळांनुसार त्यांना खायला देणे, या घराला सांभाळणे, या घराच्या भिंतींमधे स्वर्ग शोधणे हेच तुझे कर्तव्य आहे. त्या कर्तव्याला सोडून तू कशी काय बाहेर राहू शकतेस? तुझा आनंद या घरातील प्रत्येकाशी निगडीत आहे आणि तेच तुझे आद्य कर्तव्य आहे. या घरांतील कर्तव्यांकडे जर तू दुर्लक्ष केलेस तर तो अपराध ठरु शकतो हे ध्यानात ठेव नव्हे तो अपराधच आहे. या घरातील कर्तव्ये हेच तुझे मनोरंजन आणि हाच तुझा आनंद हे लक्षात ठेव. आज मला उपाशी ठेवून तू बाहेर गेलीस, गेलीस तर गेलीस परंतू तुला वेळेचे भानही राहीले नाही इतकी तू स्वतःमधे गुंग झाली होती. आज तू माझ्या जेवणाची वेळ विसरलीस उद्या मला आणि मग पुढे या घरातल्या लोकांना देखील विसरशील. आता आम्ही हे समजायचे का? की तुला या घरघूती कामांचा आता कंटाळा आलाय आणि तुला आता या पासून सुटका हवीय. काय आहे ते स्पष्टपणे सांग. तुझ्यावाचून माझे काहीही अडणार नाही. मी स्वतः स्वतःला सांभाळायला समर्थ आहे. तुझ्या भरवश्यावर हे घर चालतय असे तुला वाटत असेल तर तो तुझा गैरसमज आहे. या घराची जी शिस्त आणि नियम मी लावले आहेत ते तुला पाळावेच लागतील अन्यथा तुला या घराचे दरवाजे मोकळे आहेत. माझ्या घरात रहायचे असेल तर माझ्या नियमांना व शिस्तीला पाळावेच लागेल हे कायम ध्यानात ठेव. आता वेंधळ्यासारखी बघत काय बसली आहेस. बावळटच आहेस. काय डोके फिरलेय की काय? बघतेय काय भान हरपल्यासारखी. जा लवकर स्वयंपाकाचे बघ. माझ्या पोटाला भुकेपोटी मुरड पडलीय. आणि हे बघ हे डोळ्यात अश्रू आणून मला तुझ्याबद्दल कणव वाटेल असे समजू नको. तुझ्या या अश्या अश्रुंना मी फसणारा नाही. मला तुझी ही सारी नाटके ठाऊक आहेत. डोळ्यातून पाणी ढाळले म्हणजे माझ्या मनाला पाझर फुटेल आणि मी तुला माफ करेल असे समजू नको. मला ही तुझी सगळी थेरं दिसत आहेत. परंतू हे माझ्या घरात चालणार नाही अन्यथा तू कुठेही गेली तरी मला हरकत नाही. पुन्हा जर अश्या प्रकारची चूक घडली तर मी खपवून घेणार नाही.
एका वाहिनीवर सुरु असलेल्या एका फार लोकप्रीय मालिकेमधील सासरे आपल्या अतिशय समंजस, सालस आणि घरातील प्रत्येकाची काळजी घेणाऱ्या सुनेला केवळ एक दिवस जेवायला उशीर झाला आणि तो देखील ती पावसात अडकली होती त्यामुळे झाला असताना या पद्धतीने रागवतात. अत्यंत सुस्वभावी, कधीही कुणालाही उलटून न बोलणारी, प्रत्येकाला काय हवं नको ते बघणारी, मनाने अतिशय साधी, अजिबात डावपेच न समजणारी अशी ती आसावरी नावाची सून आपल्या सासऱ्यांकडून अश्या पद्धतीचे बोल ऐकते व त्यानंतर देखील बाबा, माझे चुकले, मी पुन्हा असे करणार नाही असे म्हणून सासऱ्यांना लवकर जेवण मिळावे म्हणून डोळ्यातले अश्रू पुसून व आपले खरोखरीच चुकले असे मानून कामाला लागते. हे दृष्य बघितल्यावर ही मालिका बघणाऱ्यांच्या प्रतिक्रीया फार खास असतात. इतकी सालस, समंजस व काळजी करणारी सून असूनही तिला वाट्टेल तसे बोलणाऱ्या सासऱ्यांबद्दल हा म्हातारा वेडा झालाय, काहीतरी काय बोलायचे? एक दिवस उशीर झाला म्हणून त्या बिचाऱ्या आसावरीला इतके काय बोलायचे? अश्या म्हाताऱ्यांना जेवायलाच घालायला नको. चांगले वठणीवर आणायला हवे. यासोबतच जास्त प्रतिक्रीया अश्याही असतात की ही आसावरीच वेडी आहे. इतके काय ऐकून घ्यायचे? या अश्या भोळ्या असण्याला आणि साधेपणाला खरे तर वेडेपणाच म्हणायला हवा. आजकालच्या काळात हा असला साधेपणा काही परवडणारा नाही. मी जर तिच्या जागी असते ना तर म्हाताऱ्याला हडसावूनच ठेवले असते. एवढे सगळे करा नि वर असले बोलणे पण ऐका. मला तर वाटते त्या म्हाताऱ्यापेक्षा या आसावरीचेच चुकते. ती जास्त ऐकून घेते म्हणून कुणीही तिला बोलतो. आजच्या काळात हे असे राहणे म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. आपला कुणी गैरफायदा घेतोय आणि आपण सहन करीत जायचे याला काय अर्थ आहे? निव्वळ वेडेपणा. एकंदरीत ही मालिका फार जोस्त लोकप्रिय का आहे हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. यामधे साधारणपणे कमी अधिक प्रमाणात प्रत्येकाच्याच घरी घडणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टींना सादर केले आहे. सादरीकरण देखील चांगले असल्याने मालिकेचा भाग संपल्यावर देखील त्या संदर्भात चर्चा सुरु राहतात. या सर्व चर्चांचा रोख किंवा सार मात्र एकच आहे की आसावरीने शहाणे व्हावे. साधे राहू नये. कारण नव्या काळात साधेपणा हा बावळटपणा ठरतो. मला ही मालिका फार बघण्याची संधी मिळत नाही परंतू बऱ्याच ठिकाणी या मालिकेतील आसावरीच्या या वागण्याबद्दल व तिने स्वतःला बदलावे असे सांगण्यावर जेव्हा भर दिला जातो तेव्हा तिला अकारण बोल लावणाऱ्या सासऱ्यांनी किंवा घरातल्या इतर लोकांनी बदलावे असे मात्र फार कुणी बोलताना दिसत नाही.
ही आसावरी म्हणजे कोण आहे? खरे तर आपल्या सध्याच्या वेगाने बदलत जाणाऱ्या व अतिशय व्यावहारिकतेने विचार करणाऱ्या समाजामधील सच्चेपणाचे व सह्रदयतेचे प्रतिक म्हणजे आसावरी. सांभाळ आणि जोपासना या शब्दांचे अर्थ प्रत्यक्ष जगण्यातून जाणवून देणारी मायेची सावली म्हणजे आसावरी. प्रयत्येकाला आधार देणारी, त्यांच्या जीवनामधील विकासाला खऱ्या अर्थाने बळ देणारी किंबहुना त्यांच्या कामामुळे त्यांना मिळणाऱ्या यशस्वीपणाचा खरा कणा असलेली व्यक्ती म्हणजे आसावरी. जग हे चांगलेच आहे आणि आपण चांगले वागलो तर सारेच आपल्याशी चांगलेच वागतील त्यामुळे कुणाबद्दलही कधीही वाईट विचार न करता प्रत्येकासाठी निस्पृहपणे काहीतरी करत राहणे हाच आपल्या जीवनाचा खरा धर्म मानणारी माऊली म्हणजे आसावरी. घराच्या चार भिंतीमधे वसलेल्या घराला व घरातील नात्यांना प्रेमाच्या आणि संवेदनशीलतेच्या आधारावर घट्ट धरुन ठेवणारा सर्वात महत्वाचा दुवा म्हणजे आसावरी. एकंदरीत माणसाने माणूस म्हणून कसे जगावे याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आसावरी. परंतू तिच्या आयुष्याबद्दल चर्चा करताना सारेच आसावरीने बदलावे असे म्हणतात. असे का म्हणू नये की या सह्रदयी व मनाने अत्यंत निर्मळ असलेल्या आसावरीला आणि तिच्यातील सच्चेपणाला जपण्यासाठी आपण तिच्या आजुबाजूचे स्वार्थी, केवळ स्वतःचाच विचार करणारे, असंवेदनशील, अजिबात समजून न घेणारे व या सर्व गोष्टींना व्यावहारीकतेचे नाव देणारे जगच बदलुयात. तिला समजून घेऊयात. घरापलीकडच्या जगात देखील तिला वावरु देऊयात, तिच्याही काही आकांक्षा असतील व स्वतंत्रपणे त्या आकांक्षांची पूर्तता करण्याची तिची देखील इच्छा होऊ शकते ही छोटीशी बाब लक्षात घेऊयात. तिच्या साधेपणाला वेडेपणा न म्हणता तिच्या सत्शील मनाचा सन्मान करुयात. एकंदरीत आसावरीला जपुयात कारण ती माणसांच्या या जगातील निरागसतेचे प्रतिक आहे व तिच माणसाची शाश्वत टिकणारी ओळख आहे.
दुर्देवाने आपल्याला बरेच वेळा ही निरागसता उपयोगाची नाही व काही प्रमाणात तरी बदमाशी करता यायला हवी असे बोलताना लोक दिसतात. हे काही परिस्थीतींमधे खरे आहे असे जरी सिद्ध झाले तरी देखील अंतिमतः आपल्याला आसावरीला जपणे गरजेचे आहे कारण तिचा चांगुलपणा, तिची निरागसता, तिची जीव लावण्याची सवय, तिची संवेदनशीलता आणि तिच्या मनातून पाझरणारे सच्चे प्रेम ही तिची नव्हे तर आपल्या सर्व मानव जमातीचीच खरी ओळख आहे. म्हणून आसावरीच्या साधेपणाला धूर्तपणात परावर्तित करण्याऐवजी तिच्या आजुबाजूचे धूर्त जग समजुतदार बनवूया, हा बदल जास्त फायद्याचा राहू शकतो. होय ना?
Comments
Post a Comment