थोडा है थोडे की जरुरत है @ 07.01.2020

पंधरा मिनीटांची गोष्ट

अजय एका मोठ्या कंपनीच्या एका मोठ्या विभागाचा बाॅस होता. त्या दिवशी कंपनीत प्रचंड काम सुरु होते. काहीतरी महत्वाची माहिती मुख्य कार्यालयाला पाठवायची होती. त्यामुळे अजयचे कार्यालय कामाची वेळ आटोपली तरी सुरुच होते. अजय स्वतः सर्व कामांवर लक्ष ठेवून होता. कार्यालयाचा प्रमुख म्हणून त्याच्यावर सर्वात जास्त जबाबदारी होती. त्यामुळे सहाजिकच ताण देखील जास्त होता. मोठ्या मेहनतीने अजय त्या कंपनीच्या इतक्या मोठ्या पदावर पोहोचला होता. सुरुवातीपासूनच तो जिद्दी होता. तसे त्याचे शिक्षण फार सरळ सरळ झाले नव्हते. वेगवेगळ्या शाखा बदलवित त्याने शिक्षण पूर्ण केले होते. सुरुवातीला छोट्या छोट्या कंपन्यांमधे पडेल ती कामे केली. अनुभव मिळविला आणि मग पुढे पुढे सरकत राहीला. त्याचा जनसंपर्क देखील दांडगा होता. त्यामुळे त्याला पुढे सरकण्यास मदत झाली. अर्थात जीव ओतून काम करणे हा मात्र त्याचा स्थायी भाव असल्याने त्याला यश मिळत राहीले. मध्यंतरी काही कठीण प्रसंग देखील त्याच्या जीवनात आले. परंतू त्याही प्रसंगांमधे सर्वांचे सहकार्य घेऊन आणि आपल्या कार्यशैलीचे सर्वोत्तम कौशल्य वापरुन त्याने मार्ग काढला. त्यामुळे आज अतिशय मोठ्या पदावर कार्य करीत असला अतिशय यशस्वी मानल्या जात असला तरी देखील त्याच्याही आयुष्यात वेगवेगळे चढऊतार आले. कठीण परीक्षा घेणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांना त्याला सामोरे जावे लागले. काही प्रसंगी तर त्याला पराभव देखील पत्करावा लागला. त्यामधून निराशा देखील आली. परंतू मुळात जीवनाशी मैत्री करुन जगण्याची त्याची सवय त्याला कायम मदत करणारी ठरली. या सर्व प्रवासामधे एक गोष्ट मात्र कायम त्याच्या सोबत त्याने जाणीवपूर्वक ठेवली. ती गोष्ट सोबत ठेवणे खरे तर पुढे पुढे कठीण होते. परंतू त्याने कशाचीही पर्वा करता ती एक गोष्ट कधीच सोडली नाही. लोकांना खरे तर त्याच्या त्या गोष्टीसोबतच्या सहवासाचे फारच आश्चर्य वाटायचे. कारण ती गोष्ट सर्वसाधारणपणे लोकांच्या विचारपठडीत बसत नव्हती. बरेचवेळा त्याबद्दल अजयवर टिका देखील व्हायची. एकदा तर त्याच्या कंपनीच्या प्रमुखाकडून देखील त्याबाबत विचारणा करण्यात आली होती. परंतू अजयने अत्यंत समर्पकपणे त्याचे उत्तर दिले होते मुख्य म्हणजे अजयची ती भूमिका सर्वांनाच पटली होती. कार्यालयात अजयचा बाॅस म्हणून दबदबा होता. परंतू त्याच्या प्रशासन शैलीमधे एक वेगळेपणा होता. त्याची त्याच्या कर्मचाऱ्यांवर जरब होती परंतू ते सारे त्याला भित नव्हते. त्याच्या अस्तित्वाची दखल सर्वच जण घ्यायचे परंतू त्याच्याशी संवाद सर्वांचा होता. प्रसंगी त्याचा राग सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात सहन करावा लागायचा परंतू त्याच्या कक्षातून त्याचे कर्मचारी हसत हसत बाहेर देखील पडायचे. कामाचा अतिशय जास्त ताण असताना देखील ते कार्य फार ताण जाणवू देता, स्वतः नेतृत्व करुन कार्य करुन घेण्याची त्याची शैली अफाट होती त्यामुळेच कंपनीमधे तो या मोठ्या पदावर पोहोचला होता. परंतू हे सारे करीत असताना देखील त्याचेही श्रेय बऱ्याच प्रमाणात अजय त्याच्या सहवासात अनेक वर्षांपासून असलेल्या त्या गोष्टीलाच द्यायचा. त्याचे म्हणणे होते की ती गोष्ट त्याच्या आयुष्यात असल्यानेच प्रत्येक दिवस त्याच्यासाठी एक सुंदर दिवस असतो. त्यादिवशी देखील कार्यालयातील काम आटोपण्याची तो वाट बघत होता. त्यानंतर त्याला त्या गोष्टीचे वेध लागले होतेच.

कार्यालयाची काम संपविण्याची नियोजित वेळ सायंकाळी सहा असली तरी त्या दिवशी तब्बल आठ वाजले होते. यशस्वीपणे सर्व माहिती पाठविल्याबद्दल सर्वांचे त्याने अभिनंदन केले. खूप काम झाले म्हणून दुसऱ्या दिवशी सर्वांनी एक तास उशीरा कार्यालयात आले तरी चालेल अशी सूचना देखील त्याने देऊन टाकली. सारा स्टाफ खूश झाला. एका क्षणात सर्वांचा दिवसभराचा ताण कमी झाला. या अश्या युक्त्या अजयला फार जमायच्या. नेहेमीप्रमाणे सर्वात शेवटी तो निघाला. दिवसभर अंगावर असलेली ठेवावी लागणारी ब्लेझर नावाची झूल त्याने काढून गाडीच्या मागच्या सीटवर ठेवून दिली. टायची नाॅट लूज केली. त्याच्या फार्मल शर्टच्या बाह्या फोल्ड केल्या आणि गाडी ड्राईव्ह करणे सुरु केले. पहिला फोन बायकोला केला. ती वाटच बघत होती. आपल्या नवऱ्याला कार्यालयातून घरी पोहोचायला अर्धा तास लागतो हे तिला माहित होते. परंतू तिने प्रश्न मात्र वेगळाच विचारला. आज थांबा नेहेमी इतकाच ना? अजयने हसतच उत्तर दिले, होय. फक्त पंधरा मिनीटे. ती म्हणाली, ठिक आहे, या मग घरी. गरमागरम जेवण वाट बघतंय तुमची. येतो, असे म्हणून अजयने फोन बंद केला. गाडीत लताबाईंचे गाणे सुरु झाले. अजय गाडी चालवू लागला. त्याच्या बायकोला माहित होते की आज त्याला घरी यायला अर्धा तास अधिक पंधरा मिनीटे जास्त लागणार आहेत. त्या पंधरा मिनीटांकरीता ती चिडली नाही उलट तिने शांतपणे तिला एकूण पंचेचाळीस मिनीटे वाट बघायची आहे हे मान्य केले. कारण त्या पंधरा मिनीटांचा परीणाम तिला माहित होता. अजयच्या जिवनातील त्या पंधरा मिनीटामुळे काय जादू होते हे तिला माहित होते. सुरुवातीला तिने त्या गोष्टीबाबत चिडचिड केली होती. परंतू अजयने त्याच्या पद्धतीने शांतपणे तिला समजावून सांगितल्यावर तिला देखील त्याचे महत्व पटले. अजयच्या जिवनात त्या गोष्टीचे महत्व तिने देखील समजून घेतले होते. कधी कधी तर अजय विसरला तर तीच त्याला आठवण करुन देते त्या गोष्टीची, इतके त्या गोष्टीचे महत्व अजयच्या जीवनात आहे हे ती जाणून होती. त्यामुळे पुढचे पंचेचाळीस मिनीटे ती निवांत होती.

अजय गाडी चालवित त्या गोष्टीजवळ पोहोचला. गाडीतून उतरल्याबरोबर दिवसभर गुड माॅर्नींग सर, थॅंक यू सर, मे आय कम इन सर, गुड नाईट सर, अशी ठराविक सर, सर ऐकल्यामुळे आता जी हाक कानावर आली त्यामुळे तो खुश झाला. तो आवाज होता, अज्या, लेका झोपला होता का ऑफीसमधे? तो त्याच्या पिंट्या नावाच्या मित्राचा आवाज ऐकल्याबरोबर अजय खूश झाला कारण तो ज्या आवडत्या जागी पोहोचला होता ती गोष्ट होती त्याचा कट्टा.

होय, जुन्या मित्रांचा कट्टा. जुन्या जिवलग मित्रांचा कट्टा जेथे अजय मोठे पॅकेज असलेला, मोठे घर असलेला, मोठ्या गाडीतून प्रवास करणारा, एका मोठ्या कंपनीचा मोठ्ठा बाॅस नव्हता तर केवळ त्या साऱ्या मित्रांचा अज्या होता. त्याच टोन मधे अजय ने त्या पिंट्याला उत्तर दिले आणि पुढचे पंधरा मिनीटे नुसती धमाल. तिथे आलेले काही जण वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी व्यक्ती म्हणून दबदबा असणारे होते तर काही साधे मंडळी पण होते. परंतू येथे साऱ्यांनीच आपल्या तथाकथीत मोठेपणाची किंवा साधेपणाची झूल उतरवून ठेवली होती. सर्वांचे खिदळणे सुरु होते. एकमेकांची टर उडविणे, नव्या पुस्तकांबद्दल सांगणे, मधेच अजयने नवी हरीहरनची गजल गाऊन दाखविली, तिथेच रस्त्याच्या कडेला असलेल्या एका सामान्य जागी, कसलेही आढेवेढे घेता. तेथे इतर मित्रमंडळी देखील आणखी काही काही करीत होते. साधारण पंधरा मिनीटे ती सारी मित्र मंडळी नुसती खिदळत किंवा आनंद घेत होती. मधे भुईमुगाच्या भाजलेल्या शेंगा ठेवल्या होत्या. या कट्ट्यावर अश्याच पद्धतीचे काहीतरी चालायचे. आनंद घेण्यासाठी ऑन राॅक्स वगैरे काही लागायचे नाही. महत्वाचे होते दिवसभराचा ताण आणि ऑफीसातले बॉसपण विसरायला लावणाऱ्या जिवाभावाच्या सवंगड्यांचा मनमोकळा सहवास. अगदी पंधराच मिनीटे. परंतू त्या पंधरा मिनीटाची जादूच काही और होती.

पंधरा मिनीटात दिवसभराचा ताण कुठल्याकुठे निघून जाऊन अजय घराकडे निघाला, पूर्ण फ्रेश होऊन, मस्त शीळ वाजवत. आता घरी त्याची सगळी धमाल सुरु राहणार होती. परीवारासोबत त्याचा वेळ मस्त जाणार होता. कार्यालयाचा ताण तो पार विसरुन गेला होता आणि दुसऱ्या दिवशी देखील अतिशय प्रसन्नतेने पुन्हा आपले काम करण्यास जाणार होता. इतकी ताकद होती त्याच्या या मनापासून जपलेल्या कट्ट्याची.

दिवसांगणिक प्रत्येकाच्याच आयुष्यात कामाचा ताण वाढतोय. या सोबतच इतर देखील छोटे छोटे ताण जमा होत राहतात. या ताणांचा निचरा करण्यासाठी इतर काही आरोग्यहानीकारक करण्यापेक्षा असा एखादा जिवलग मित्रांचा कट्टा किती उपयोगाचा ठरु शकतो. ताणामुळे तरुणांमधे ह्रदयरोग मधुमेहाचे वाढते प्रमाण ही अतिशय चिंतेची बाब असताना असे कट्टे जपल्यास किती मज्जा येईल, होय ना?





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18