थोडा है थोडे की जरुरत है @ 21.01.20

आसावरी नि अभिजीत

मागच्या आठवड्यात मी आसावरी या शिर्षकाचा एक लेख लिहीला होता. त्यामधे मी एका चॅनलवर सुरु असलेल्या अत्यंत लोकप्रीय मालिकेतील एका आसावरी नावाच्या व्यक्तीरेखेच्या अनुषंगाने लिखाण केले होते. अत्यंत साधी असलेली आसावरी जिचा केवळ चांगुलपणावर विश्वास आहे अश्या आसावरी नामक व्यक्तीरेखेद्वारे आपल्याला जाणवणारा निरागसपणा आपण प्रयत्नपूर्वक जपायला हवा असे मी लिहीले होते. या मालिकेमधे आसावरीला गृहित धरुन तिला बोलणारे, तिच्यावर अधिकार गाजवणारे किंवा तिने आपल्या सेवेसाठी कायम हजर असावे त्यामधेच तिने सुख मानावे असे दर्शविणारे वागणारे लोक दाखविले आहेत. परंतू आसावरीच्या निरागसतेवर मनापासून प्रेम करणारे, तिच्यातील निरागसतेला जपणारे, तिच्या चेहेऱ्यावर हास्य निर्माण व्हावे म्हणून कसलाही इगो बाळगता तिच्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेले आणि कोणत्याही स्वरुपात तिच्यावर अधिकार गाजवता तिचे स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे एक पात्र या मालिकेत दाखविले आहे. माझ्या लिखाणात खरे तर त्या व्यक्तीरेखेचा उल्लेख व्हायला हवा होता. परंतू मी तो मुद्दाम एक गंमत बघावी म्हणून टाळला होता. लिखाणावर ज्या भरभरुन प्रतिक्रीया मला फोन वरुन, किंवा सोशल मिडीयावरुन प्राप्त होतात त्यात या संदर्भात काही प्रतिक्रीया अपेक्षित होत्या. आसावरी संबंधी बोलताना, तिच्याबाबत अन्याय होत असताना तिच्या पाठीशी तिची सून म्हणजे एक स्त्री जशी खंबीरपणे उभी आहे त्याच प्रमाणे अभिजीत राजे नावाचा एक पुरुष देखील खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे याची आठवण होतेय का? हे मला बघायचे होते. परंतू मला जेव्हा अभिजीत राजेच्या नावाचा तुम्ही लेखात साधा उल्लेख देखील केला नाही, तो तर करायलाच होता अश्या प्रतिक्रीया सर्वांकडूनच आणि विशेषतः महिला मंडळींकडून आल्या तेव्हा मात्र मी पुढच्या लेखात त्याबद्दलच लिहीणार आहे असे त्यांना सांगितले. सक्षम समाजनिर्मीतीच्या आणि विकासाच्या प्रक्रीयेत आता आपण हळू हळू स्त्री पुरुष समानतेच्या विचारांमधील भाव योग्य पद्धतीने समजू लागलो आहे याचेच हे द्योतक असावे असे मला वाटले

स्रीयांवर अनेक वर्षांपासून होत आलेल्या अन्यायाबाबत जनजागृती, या संबंधात चळवळी, काही महिलांचे या संदर्भातील महत्वाचे योगदान, पुरुषप्रधान संस्कृतीबाबतचा विरोध, महिला सक्षमीकरणाचे मोठ्या प्रमाणात झालेले प्रयत्न, महिलांना जवळपास सर्वच क्षेत्रात मिळत असलेल्या संधी, अनेक ठिकाणी महिलांनी पुरुषांच्या तुलनेत घेतलेली आघाडी, त्याबाबतचे सर्वच पातळ्यांवर व्यक्त करण्यात आलेले समाधान, त्यासोबतच अजूनही भरपूर काम विचार बदल या संदर्भात व्हायचे आहेत ही परीस्थीती, परंतू तरीदेखील चित्र आता बदलत जाते आहे हा सर्वसामान्यपणे स्विकारला जाणारा विचार अश्या सर्व पातळ्यांवरुन स्त्रियांच्या सामाजिक अस्तित्वासंबंधात वाटचाल सुरु राहीली ती अजूनही सुरु आहे. परंतू ज्या पद्धतीच्या प्रतिक्रीया मला मागच्या लेखावर प्राप्त झाल्या मोठ्या मनाने अनेक मैत्रीणींनी अभिजीत राजेंचे आसावरीच्या जीवनाला सक्षम करण्यासाठी केलेले प्रयत्न मान्य करुन त्याबाबत सकारात्मकता दाखविली ही माझ्या मते एक फारच चांगली नांदी आहे, सामाजिक एकरुपतेची.

खरे तर समाजात देवाने निर्माण केलेले मानवाचे दोनच प्रकार अस्तित्वात आहेत. स्त्री पुरुष. या दोन प्रकारांमधील सौहार्द हाच समाजव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. परंतू काही प्रथा किंवा परंपरांमुळे काही विपरित गोष्टी घडल्या त्यामुळे हा सामाजिक समतोल बराच काळ विस्कळीत राहीला. त्यामधून मग अन्याय सहन करत राहणाऱ्या गटातून काही नेतृत्व उभे झाले त्यांच्या माध्यमातून चळवळी देखील उभ्या राहील्या. परंतू आता मात्र याच सर्व मंडळींचे यश म्हणजे स्री पुरुष यांच्या एकत्रीत तरीदेखील वेगवेगळे अस्तित्व जपण्याच्या प्रक्रीया सुरु झाल्या आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या नव्या भुमिका दोन्ही गटांना हळू हळू पटू लागल्यात. बदल होऊ लागलेत ते फारच सकारात्मक आहेत.

आपल्या सुनेने नोकरी करावी असा हट्ट धरणारे सासरे तिला नोकरी लागल्यानंतर तेच सासरे तिला नोकरीच्या वेळा सांभाळताना होणारी तारांबळ कमी करण्यासाठी तिच्यासाठी स्वतःसाठी चहा देखील करु लागले. मुलांच्या जबाबदाऱ्या सांभाळताना आता आई आणि वडील दोघेही समान पद्धतीने वेळ देऊ लागले आहेत. रेल्वेचे तिकीट काढताना महिलांकरीता स्वतंत्र रांगेची व्यवस्था आता मोडकळीस येऊन एकच रांग राहू लागलीय आणि याचा स्त्रियांनी देखील स्विकार केलाय. घरातील वेगवेगळ्या महत्वाच्या निर्णय प्रक्रीयांमधे देखील स्त्रियांचा सहभाग बऱ्यापैकी वाढलाय. परंतू या सोबतच स्त्रियांच्या काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी देखील परत एकदा जपणे सुरु झाले. जसे छान तयार होणे, सौंदर्यप्रसाधनांचा वापर करणे या बाबी देखील आता पुन्हा नव्याने सुरु झाल्यात. लग्न समारंभांमधे वधुचा मेकअप ही बाब आता एक महत्वपूर्ण भाग बनली आहे. एकंदरीत स्त्रीयांच्या नैसर्गिक आवडी निवडी ज्या पुरुषांची बरोबरी करण्याच्या प्रक्रीयेमधे जराश्या मागे पडल्या होत्या त्या आता पुन्हा स्थापित होऊ लागल्या. चळवळींच्या काळात ते आवश्यक देखील होते परंतू आता स्त्रियांच्या नैसर्गिक बाबींचे महत्व पुरुषांना पटवून देण्यात त्या यशस्वी झाल्या पुरुषांनी देखील ते पटवून घेतले. म्हणूनच लग्नामधे आपल्या मुलीकरीता मेकअप करण्यासाठी पन्नास हजार रुपये खर्च करायला तिचे वडील तयार होत आहेत आणि मुलीच्या आईलाही मेकअप करायला लावून तिच्यासोबत एक सेल्फी काढू लागले आहेत. घरच्या गृहीणीला आता होम मेकर ही नवी संज्ञा आलेली आहे आणि ही होम मेकर आता स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करु शकतेय. नोकरी करीत नसली तरी देखील आपल्या आवडी निवडी जपणे, घरापलीकडे स्वतःचे एखादे छोटेसे अस्तित्व निर्माण करणे, त्या एका वेगळ्या वर्तुळामधे मनापासून काम करुन स्वतःला गुंतवून ठेवणे, स्वतःच्या जिवनात स्वतःबद्दल स्वतंत्रपणे निर्णय घेणे, काही ना काही स्वरुपात आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे सर्वात महत्वाचे म्हणजे स्वतःचे वेगळेपण जपणे हे आता तिलाही जमू लागलेय. यासोबतच तिच्यातील हे बदल पुरुषांनी देखील स्विकारणे सुरु केलेय. कारण अशी परस्परांबद्दलची स्विकार्हता वृद्धींगत झाली तरच हे बदल कायमस्वरुपी राहणार आहेत. हे सारे  बदल छोटे छोटे असले तरी एका पोषक समाजव्यवस्थेकडे जाणारी ही वाटचाल निश्चितच आहे. माझ्या लेखाच्या निमीत्ताने आसावरीच्या आयुष्याला आनंदी बनविण्यासाठी तिला तिचा सन्मान प्रदान करण्यासाठी अभिजीत राजेंचे प्रयत्न माझ्या मैत्रीणींनी अधोरेखीत करणे ही एक महत्वाची बाब मला वाटलीअर्थात एका बाजूने अभिजीत राजेंचे कौतुक करताना, सुट मिळाली म्हणून आसावरी देखील आपल्या आई, किंवा सून म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या सोडत नाही. ती देखील तिला मिळणाऱ्या मोकळीकतेचा गैरफायदा घेत नाही आणि सारे काही उधळून बाहेर पडायला तयार होत नाही. एकंदरीत तिच्या स्त्रीपणाचा अभिजीत राजेंनी केलेला सन्मान, तिला दिलेले स्वातंत्र्य आणि विचारांची निर्णय घेण्याची मोकळीक आनंदाने स्विकारुन ती स्वतःच्या मर्यादांचे उल्लंघन अजिबात करीत नाही असे करुन ती अभिजीत राजेंच्या विश्वासाचा सन्मानच करते. किती छान आहे हे सारे! काहींना ते अतिरंजीत वाटते, काहींना तो बावळटपणा देखील वाटतो. त्यांना तसे वाटत असेल तर हरकत नाही. परंतू या निमीत्ताने स्त्री पुरुष सहजीवनाचे एकमेकांसोबत वावरताना कसलाही इगो निर्माण होऊ देता एकमेकांच्या विचारांचा सन्मान करण्याचे जे सुंदर चित्र उभे केले आहे ते फारच छान आहे.

एकंदरीत सर्वच बाबतीत सकारात्मकतेने संवेदनशीलतेने बघितले ना, की मग सारे काही छानच होऊ लागते. धिराने हे केले तर बदल देखील होतात. अगदी या मालिकेचाच विचार केला तर माझ्या दोन लेखांच्या दरम्यान आसावरीला घालून पाडून बोलणाऱ्या आणि तिचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होण्यास आडकाठी करणाऱ्या तिच्या सासऱ्यांनी तिचे अभिजीत सोबत लग्न देखील लावून दिले. गंमतीचा भाग सोडला तरी, मनापासून प्रयत्न केला तर बदल होतातच. जरासा धीर धरावा लागतो





Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18