थोडा है थोडे की जरुरत है @ 29.10.19

अनोखे एकत्रीकरण

आज दिवाळीच्या सणातला आणखी एक महत्वाचा दिवस. भाऊबीज. बहिण भावाचा सण. या सणानिमीत्ताने मी एका अनोख्या एकत्रीकरणाबाबत बोलणार आहे. खरे तर यात अनोखे असे काहीच नाही. आजपासून साधारण तीस वर्षांपूर्वी जी माझी पिढी युवावस्थेमधे होती त्यांना यामधे कोणतेच अनोखेपण वाटणार नाही. परंतू त्या एकत्रीकरणाची आठवण देखील मला माझ्याच पिढीला करुन द्यायची आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, या माझ्या पिढीतील मंडळींना या असल्या एकत्रीकरणाचा आनंद ठाऊक आहे. आमच्या नंतरच्या पिढीला ते माहित असण्याचे कारण नाही कारण काळाच्या ओघात आमच्या पिढीने ते जपले नाही त्यामुळे त्यांना संदर्भासाठी काहीच नाही. म्हणूनच बदललेल्या या काळात आपण आपल्या घरी साऱ्या सुख सोयी निर्माण केल्या, आपले जीवन सुखकर बनविले परंतू काही महत्वाच्या गोष्टी मात्र गमावल्या त्याचीच आठवण मला या निमीत्ताने करुन द्यायची घ्यायची आहे. आणि या आठवणी करीता भाऊबिजेसारखा प्रसंग अत्यंत सुयोग्य आहे. अर्थात मी सांगतो ते एकत्रीकरण समजून घेऊन त्याला प्रत्यक्षात आणणे जरा कठीण आहे. याला कारण काळाच्या ओघात आपण स्विकारलेले आमुलाग्र बदल. आपण बदल स्विकारले ही जरी चांगली गोष्ट असली तरी ते स्विकारताना काही महत्वाच्या गोष्टींकडे आपले दुर्लक्ष झाले त्यामधील एक म्हणजे एक अनोखे एकत्रीकरण.

भाऊ बहिण मोठे झाले नि आपापल्या वर्तुळात अडकून गेले. वर्तुळे मनापासून स्विकारुन त्यांना फुलविण्याचे, जपण्याचे, सांभाळण्याचे आणि धरुन ठेवण्याचे महत्वाचे कार्य दोघेही करु लागले. भाऊ असेल तर आपल्या मुलाबाळांच्या भविष्याकरीता त्याचे धडपडणे सुरु झाले. आधुनिकतेसोबत आलेली जगण्यासाठीची स्पर्धा त्याला पार गुंतवून ठेवू लागली. त्या सगळ्या टारगेट आणि परफाॅर्मन्सच्या व्युहामधे तो असा अडकला की त्यामधून बाहेर कसे पडावे हे त्याचे त्यालाही कळत नाही. आता घराची जबाबदारी त्याच्यावर आल्याने त्याला या एकत्रीकरणाकरीता विचारही करायला अवकाश नसतो. घरच्यांच्या त्याच्या स्वतःच्याही वाढत्या गरजा पुऱ्या करत करत तो जे धावू लागतो की त्याचे त्यालाच सुचत नाही. यामधूनही त्याला जेव्हा वेळ मिळतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीला, मुला बाळांना आणि त्याच्याच सोबत रहात असलेल्या आई बाबांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे बहिण ही त्याच्या त्या वर्तुळाच्या बाहेर असते म्हणूनच त्याच्या लिस्टमधे मी सांगतो तश्या एकत्रीकरणाचा विचारही निर्माण होत नाही. अश्याच प्रकारची स्थिती त्याच्या बहिणीची देखील असते. ती देखील तिच्या वर्तुळामधे अडकलेली असते ज्यात तिचा नवरा, तिची मुले, तिचे सासु सासरे, तिच्या नणंदा, तिच्या भावजया अश्या सर्व गोतावळ्याचा ती एक अविभाज्य अंग बनलेली असते. हा सर्व गोतावळा सांभाळणे त्यानुसार आपल्या आयुष्याचे मार्गक्रमण करणे ही तिची आता सवय झालेली असते. मी सांगतो त्या पद्धतीच्या एकत्रीकरणाचा विचार मुळात तिनेच जोपासला नसल्याने तिला त्याबद्दल बरेच वेळा परवानगीच मिळत नाही. काळ बदलला असे आपण म्हणतो परंतू अजूनही आमच्या पिढीत बहिणीला तिला वाटते म्हणून केवळ तिनेच एखादी गोष्ट ठरविली केली असे होत नाही. काही मोजके अपवाद यांस राहू शकतात परंतू अजूनही सरसकट बहिणीचा कोणताही कार्यक्रम तिने वर्तुळातील जबाबदारी पूर्ण केल्यावरही इतरांच्या मर्जीवर अवलंबून असतो. तिची मर्जी म्हणून तिनेच ठरवून काही केले असे होत नसल्याने या प्रकाराची तिनेच स्वतःला सवय लावून घेतली असल्याने तिच्याही मनात मी म्हणतोय तसे एकत्रीकरण येत नाही. अश्या प्रकारे भावाची त्याच्या वर्तुळातील व्यस्तता आणि बहिणीचे तिच्या वर्तुळातील समर्पण या गोष्टींमुळे हे दोघेही एक महत्वाची गोष्ट विसरलेली असतात. ती गोष्ट म्हणजे या बहिण भावाचे स्वतःचे एक स्वतंत्र वर्तुळ होते. त्या वर्तुळाचे काय? कारण मी सुचवित असलेले एकत्रीकरण त्या वर्तुळाचे आहे.

वर्षातील ३६३ दिवसांमधे आपापल्या वर्तुळामधे राहिल्यावर तेथे आवश्यक ती जबाबदारी पार पाडल्यानंतर भावा बहिणींनी वर्षातील दोन दिवस केवळ त्यांच्या असणाऱ्या वर्तुळाकरीता राखून ठेवायचे. माझ्या पिढीच्या काही लोकांना माझ्या या दोन वाक्यांनंतरच हे होऊ शकणार नाही अशी निराशा वाटू लागली असणार. परंतू ती वाटू देता या एकत्रीकरणाचा आनंद समजावून घेऊयात. वर्षातील दोन दिवस भावाबहिणींनी आपापले वर्तुळ संपुर्णपणे सोडून बालपणी जगलेले निखळ आनंदाचा स्रोत असलेले ते वर्तुळ पुन्हा जीवित करायचे. त्याकरीता बहिणींचे नवरे, मुले आणि भावाची बायको, मुले यापैकी कुणीही सोबत घेता केवळ भावा बहिणींनी दोन दिवस सोबत घालवायचे. दोन दिवस आपण नाही तर आता आपल्या वर्तुळांचे काय होईल असा उगाचच स्वतःचे महत्व वाढवून घेणारा विचार करता किंबहुना दोन दिवस आपण नसलो तर कुणाचेही काही अडत नाही असा विचार करीत हे दोन दिवस काढायचे. आणि मग बघा कशी धमाल होते ते! त्या दोन दिवसांचा केवळ विचार जरी केला ना तरी मन प्रफुल्लीत होऊन जाते. केवळ भाऊ बहिणी सोबत. धमाल गप्पा आणि अश्या वेळी उघडला जातो तो बालपणीच्या आठवणींचा पेटारा. अगदी नकळतच. त्यामधे सहजच आपण रमायला लागतो. शाळेचे दिवस, एकमेकांच्या काढलेल्या खोड्या, एकमेकांसोबत घालविलेले क्षण, भांडणे, रुसवे, फुगवे, सोबत खेळलेले खेळ, त्यामधे केलेल्या बदमाश्या, त्यावेळी आलेला राग, बाबांनी दिलेले धपाटे, आईच्या हातचा दहीभात, आईला बरे नाही म्हणून सर्वांनी मिळून केलेला स्वयंपाक, बाबांची शिस्त, परंतू त्यांचे नितांत प्रेम, त्यांनी शिकविलेल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी, त्यांनी वाचनाची आणि संगीताची लावलेली गोडी, जीवनातील छोट्या छोट्या क्षणांना सुंदर बनविणारा त्यांचा स्वभाव, आई बाबांचे झालेले भांडण, आईचा अबोला, तो सोडविण्याकरीता बाबांनी केलेले प्रयत्न, कंटाळा आला म्हणून बाबांनी खाऊ घातलेले जेवण, त्यावेळी त्यांनी म्हणलेले गाणे, पाठकोऱ्या पानांची बाबांनी शिवून दिलेली वही या आणि अश्या कितीतरी गोष्टी अलगद उलगडल्या जातील आणि या एकत्रीकरणाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्याला आपले बालपण पुन्हा एकदा जगता येईल ते मी सांगितलेल्या एकत्रीकरणाशिवाय शक्यच नाही

या भाऊबिजेच्या निमीत्ताने केवळ भावा बहिणींचे एकत्रीकरण ठरले. सारे काही पक्के झाले. लहानपणी ही मंडळी ज्या गावाला रहायची त्याच गावाला दोन दिवस जाऊन रहायचे ठरले. तीच सारी ठिकाणे जेथे बालपण गेले ती परत नव्याने बघायची, त्याच गल्ल्यांमधे भटकायचे, त्याच हवेमधे असलेला बालपणाचा सुगंध शोधायचा आणि वर्षातील ३६३ दिवस आपापल्या वर्तुळांना दिल्यावर दोन दिवस आपल्या त्या बालपणीच्या वर्तुळासाठी राखून ठेवायचे ठरले. एकत्रीकरणाचा दिवस जवळ येऊ लागला. बहिण भावांच्याच खास असलेल्या व्हाॅट्सॲप ग्रुप वर चर्चा सुरु झाल्या. सारे काही नक्की झाले. भावाने आपल्या बायकोला बहिणींनी आपल्या घरी सांगून टाकले. पुढच्या आठवड्यात आता आपल्याला जायचे आहे या आनंदात सर्वजण असताना त्या ग्रुपवर तीन मेसेज आले. एका बहिणीचा मेसेज आला, माझे बहुदा जमणार नाही. माझ्या मुलाची नेमकी परीक्षा आहे त्याच दिवशी त्याच्या परीक्षेच्या काळात मी नसले तर कसे होणार? त्यावर भावाचा रीप्लाय आला, बरे झाले यार, माझ्या देखील कंपनीच्या एका अधिकाऱ्याची भेट आहे त्यावेळी कसे गैरहजर रहायचे ही मला चिंता होतीच. आणखी एका बहिणीचा संदेश आला, ठीक आहे मग मी माझ्या नणंदेला माहेरपणासाठी बोलावून घेते. नाहीतरी मी जाणार म्हणल्यामुळे घरात धुसफुस सुरु झालीच होती. तिच्या येण्याच्या तारखेलाच मी जातेय म्हणल्यावर घरचे वातावरण जरा ताणलेले होतेच. बरेच झाले. आता काही चिंता नाही. आपण पुन्हा कधीतरी जाऊयात.

खात्री बाळगा, मी वर्णन केलेल्या बहिण भावांचा हा पुन्हा कधीच येऊ शकत नाही कारण त्या एकत्रीकरणामधून जपल्या जाणाऱ्या अनुभवता येणाऱ्या वर्तुळाच्या आनंदाला त्यांनाच प्राधान्य देता येत नाही त्यामुळे त्यांच्या आताच्या वर्तुळातील लोक त्याला प्राधान्य देणे शक्यच नाही. यांचे तर वर्तुळ हरविले, परंतू आज भाऊ बिजेच्या निमीत्ताने माझ्या पिढीच्या किती जणांना अश्या बालपणीच्या वर्तुळाच्या आनंदाकरीता प्राधान्य देता येईल?




Comments

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18