थोडा है थोडे की जरुरत है @15.10.19
संस्कारांची सहजता
सोशल मिडीयाच्या वेगवेगळ्या फायद्यांबाबत मागे एका लेखामधे मी विस्तृत वर्णन केले होते. या सोशल मिडीयाचा एक फायदा आणखी झाला तो म्हणजे आपल्याला आपल्या गुरुजनांना पुन्हा भेटता येते. जुन्या काळात जी कदाचित फारच विरळी घटना होती. अर्थात आपल्या गुरुजनांनी स्वतःला अपडेट ठेवले असेल तर हे शक्य होते. परंतू अश्या भेटी या सुखावणाऱ्या असतात. कारण ही सारी मंडळी त्या काळातली मार्गदर्शक होती ज्या काळात आपली आजसारखी ओळख निर्माण झालेली नव्हती, त्या काळात विचार स्विकारण्याची सर्वाधिक तयारी होती व सर्वात महत्वाचे म्हणजे जगण्याची सहजता होती. त्या काळामधे आपल्याला मार्गदर्शन केलेले मार्गदर्शक जेव्हा आता भेटतात तो अतीव आनंदाचा क्षण असतो. अमरावतीच्या ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात विद्यार्थी असताना आम्हाला शिकविणाऱ्या अनेक चांगल्या शिक्षकांपैकी एक म्हणजे प्रा. वासुदेव मराठे. सर नव्या काळानुसार सोशल मिडीयाच्या वापराबाबत जागरुक असल्याने आम्हा सर्वांना पुन्हा भेटले. आम्हाला रसायनशास्रासारखा विषय मराठे सर साहित्यासारख्या रसाळ पद्धतीने शिकवायचे. असे आम्हाला आवडणारे मराठे सर पुन्हा या सोशल मिडीयाच्या माध्यमातून भेटल्याचा आम्हा सर्वच विद्यार्थ्यांना फार आनंद आहे. त्यांच्या फेसबुकवरील पोस्टला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन त्याची कल्पना येते. पण या वर्षीच्या शिक्षक दिनाला सरांनी एक संदेश लिहीला त्यावर ज्या प्रतिक्रीया आल्या त्याला उत्तर देताना सरांनी लिहीले की मी काहीच केले नाही. तुम्ही कल्पिलेल्या प्रतिमेला तडा जाऊ नये याकरीता मी प्रयत्न करीन. आमच्या सरांनी आमच्यासाठी जे काही केले ते करण्यामधे एक अत्यंत महत्वाची गोष्ट होती व त्यामुळेच सरांना त्यांनी काही केले नाही असे कदाचित जाणवित असेल. परंतू खरे तसे नाही. त्यांची आमच्या मनातील प्रतिमा कल्पिलेली नाही तर खरी आहे. सरांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर जे संस्कार केले ते करण्याची त्यांची पद्धत जरा वेगळी होती. त्या पद्धतीचे नाव होते संस्कारांची सहजता.
आपल्या आजुबाजूचा काळ जसा हळू हळू बदलत गेला तश्या संस्कार करण्याच्या पद्धती देखील बदललेल्या आहेत. आज नव्या युगात संस्कार हा एक उपचार बनतोय की काय असे वाटू लागले. उन्हाळ्याच्या दिवसांमधे दिवसांगणिक वाढत चाललेल्या संस्कार शिबीरांची संख्या हे दर्शविते. अशी शिबीरे आयोजित करणे अजिबात वाईट नाही परंतू संस्कार करण्याचा तोच एकमेव मार्ग आहे आणि त्याशिवाय संस्कार करण्याच्या पद्धतीच नाहीत असा समज आजकाल दृढ होतो आहे. अश्या प्रकारे संपुर्ण औपचारिक पद्धत राबवून संस्कार दिले जातात हे पालकांसोबत नव्या काळातील आमच्यासारख्या शिक्षकांनाही वाटू लागलेय. त्यामुळे शिक्षक म्हणून जगण्याची भुमिका आणि खाजगी आयुष्य यामधे आम्ही सहजच तफावत केली. माझे खाजगी आयुष्य काही आहे की नाही? या सदराखाली दारु ढोसण्याकरीता बार मधे जाणे, पानठेल्यावर सिगारेटीचे झुरके मारणे, खर्रे खाऊन शैक्षणिक परीसरातील कोपरे लाल करणे किंवा समोरच्याला हीन समजून वाटेल तसे अपमानित करणे या बाबी शिक्षकांच्या देखील सहजच अंगवळणी पडल्या. मुळात आपल्या वागणूकीतूनही संस्कार दिल्या जाऊ शकतात ही भावना हळू हळू लोप पावत जाते आहे कारण संस्कारांची सहजता संपली आहे. ती सहजता जी आमच्या मराठे सरांनी आयुष्यभर जपून अनेक चांगल्या गोष्टी रुजविल्या. परंतू हे सारे संस्कार त्यांनी विलक्षण सहजतेने केल्यामुळे त्यांना आता मी काय केले? हा प्रश्न पडतोय.
सर्वांनी आपल्या कामाचा आनंद घेत जगले पाहिजे हा एक महत्वाचा संस्कार आहे. अनेकांना हे जमत नाही व असे लोक टिका करत करत कामे करतात. आनंद घेण्याचा हा संस्कार आमच्या सरांनी कसा रुजवावा? महाविद्यालयात स्नेहसंमेलनाची तयारी चालायची. सर आम्हा सर्वांना सहभागी करुन घ्यायचे. कधी कधी रात्री बारा वाजून जायचे या तयारीमधे. आम्ही थकलेलो असायचो. मग अचानक आमचे सर आम्हा सर्वांना गोळा करायचे आणि कामामधून अर्धा तासाचा ब्रेक घेऊन आम्ही सारे सरांच्या मार्गदर्शनामधे गाण्याच्या भेंड्या खेळायचो. रात्री बाराच्या सुमारास रंगलेल्या त्या गाण्याच्या भेंड्या आम्हाला काम करण्याची उर्जा द्यायच्या व त्यानंतर आम्ही आमचे काम पूर्ण करायचो, परंतू अतिशय आनंदात. कामाच्या मधेच आमच्या पैकी तीन चार मुलांना बोलावून रात्री अकराच्या सुमारास सर, कच्चा चिवडा बनवायचाय, असे सांगायचे. पन्नास रुपये मुलांना दिले जायचे व व्यवस्था त्यांनीच करायची. पडेल त्या परिस्थितीमधे आपल्याला हवी ती कार्यसिद्धी करता आली पाहिजे हा तो संस्कार होता. साधनांची उपलब्धता नाही म्हणून रडत बसणारी व त्यामुळे जिवनातील आनंद गमावणारी टिकेखोर मंडळी आपल्याला बरीच दिसतात. इथे मात्र आमचे सर आम्हाला चॅलेंज द्यायचे, अगदी सहजच आणि आम्ही कामाला लागायचो. ज्या मित्राकडे किराणा दुकान आहे त्याला रात्री गाठून, कच्च्या चिवड्याचे सामान गोळा करुन, महाविद्यालयाच्या चौकीदार काकांच्या झोपडीमधे असलेल्या भांडे व इतर काही गोष्टींचा उपयोग करुन सरांनी दिलेला टास्क रात्री साडेबाराच्या सुमारास तयार व्हायचा. टोपलेभर कच्चा चिवडा. सरांसह आम्ही सर्व त्या टोपल्याभोवती बसून हातांनीच चिवड्याचा आस्वाद घ्यायचा. प्लेटमधे घेऊन स्वतंत्रपणे चमच्याने खाल्लेल्या चिवड्यापेक्षा कितीतरी छान चव त्या चिवड्याची होती. सरांनी आम्हाला अगदी सहजच प्राप्त परीस्थितीमधे मार्ग कसा काढायचा आणि त्यानंतर त्याचा आनंद कसा घ्यायचा हे सहजच शिकविले होते. तो संस्कार आजतागायत टिकून आहे. एखाद्या ट्रेकींग मार्गावर जंगलात असाच कच्चा चिवडा बनविण्याची वेळ येते तेव्हा सर आठवतात व त्यांची सहजता आठवते.
या सहजतेमुळेच या सर्व बाबी जीवनाचा भाग बनू शकल्या. सर नेहेमी सायकलवर महाविद्यालयात यायचे. परंतू त्यामधे अभिनिवेश नव्हता. मी सायकल चालवितो म्हणजे तुम्हीही चालवा असे सांगणे नव्हते. सायकल चालवून काय काय फायदे होतात हे पण ते दर्शवित नव्हते. त्यांच्या त्या कृतीमधे सहजता होती जी ते तसे वागून आमच्या मनावर बिंबवायचे. उच्च शिक्षित प्राध्यापक असूनही सायकल चालविण्याची सरांची सहजता इतकी भावली होती की त्यानंतर पुढच्या शिक्षणाकरीता मला घरापासून दूरच्या महाविद्यालयात जावे लागले जेथे जवळपास सर्व विद्यार्थी गाड्या घेऊन यायचे. परंतू त्या सर्व गाड्यांच्या मधे मला माझी सायकल लावताना कधीच वाईट वाटले नाही किंवा सायकल वापरतोय याचे फार कौतुकही वाटले नाही. अश्या एक नाही अनेक बाबी सरांनी सहजच आम्हाला शिकविल्या व त्याबद्दल कधीही वाच्यता केली नाही. कदाचित त्यांच्या संस्कार रुजविण्याच्या पद्धतींमधे जी सहजता होती ती एवढी तरल होती की आपण इतके काही करतोय हे त्यांनाही कळत नव्हते. संस्कार खरे तर असेच व्हायला हवेत ना? ते जो करतोय त्याला त्याचा व्यर्थ अभिमान असू नये व ज्यांच्यावर ते होताहेत ते त्यांच्या चारित्र्याचा भाग बनावे. सकस मानव निर्मितीची सुयोग्य प्रक्रीया यापेक्षा वेगळी राहू शकत नाही.
मुळात सध्या संस्कार कसे रुजवायचे हीच समस्या मोठी आहे व त्याचे उत्तर सापडणे कठीण झालेय. या प्रक्रीयेमधील सर्वात मोठा अडथळा म्हणजे संस्कार रुजविण्याच्या प्रक्रियेतही आपण आणलेली अनावश्यक औपचारीकता. जसे मुल्य शिक्षण शाळांमधे एका तासापुरते मर्यादित झाले तसेच काहीसे या संस्कारांचे होतेय बहुदा. कामाचा ताण आल्यावर जर पालक त्याला घालविण्याकरीता सुंदर गाणी ऐकत असतील, एकत्रीकरण घडवित असतील किंवा सुखसंवाद साधत असतील तर घरातील नवी पिढी त्याचेच सहजच अवलोकन करणार आहे. अश्या मुलांना भविष्यात ताणनियोजनाकरीता समुपदेशकाची गरज सहसा भासणार नाही. परंतू ताण नियोजन करण्याकरीता पालकांकडूनच जर वाममार्गांचा असेल तर मात्र संस्कार ते देखील सहजच होतात. मराठे सरांनी जे केले ते आम्हा विद्यार्थ्यांच्या जिवनाचा सक्षम भाग बनले व त्यांनी ते इतके सहज केले की त्यांनाही ते कळले नाही. मराठे सरांसारखी ही सहजता आपल्याला साधता येईल? मनापासून प्रयत्न केला तर नक्कीच करता येईल!!
Avinash sir I am overwhelmed to read so many good words about me ,and probably the best compliments of any of my students received so far. I would call you later to talk. Thank you so much 🙏
ReplyDelete