थोडा है थोडे की जरुरत है @ 22.10.19

कार्यमग्न शांतता

अमेरीकेतून चीन मधे आपल्या आईसोबत स्थलांतरीत झालेला तो छोटासा मुलगा तेथील कुंग फु शिकणाऱ्या काही टारगट मुलांच्या त्रासांमुळे खचून गेलला असतो. त्याला त्या मुलांचा सामना करण्यासाठी कुंग फु शिकायचे असते. कुंग फु शिकण्याच्या पद्धती काळानुरुप बदलत गेलेल्या असतात. नव्या जगात समोरच्याला संपेपर्यंत ठेचा असा हिंसेचा संदेश मुलांच्या मनात ठसवून कुंग फु शिकविले जात असते. अश्या वेळी या मुलाला एक जुन्या पद्धतीचे कुंग फु शिकविणारा शिक्षक भेटतो. काही दिवसाच्या प्रशिक्षणानंतर तो त्या मुलाला कुंग फु शिकणाऱ्यांचे तिर्थस्थान असलेल्या एका ड्रॅगन वेलचे पाणी पिण्यास घेऊन जातो. पर्वताच्या उंच शिखरावर वसलेल्या एका मंदिरामधे ती ड्रॅगन वेल असते ज्याचे पाणी पिणे ही प्रत्येक कुंग फु शिकणाऱ्याकरीता प्रेरणा असते. त्या ठिकाणी जाताना रस्त्यात त्या मुलाला अनेक अद्भुत गोष्टी दिसतात. परंतू एका ठिकाणी मात्र तो स्तब्ध होतो. पर्वताच्या टोकावर कुंग फु मधील एका विशिष्ट मुद्रेमधे एक मुलगी एका पायावर उभी असते. तिच्या समोर प्रत्यक्ष नाग असतो नागाच्या हलणाऱ्या फण्याप्रमाणे तिची मान हलत असते. तो मुलगा काही वेळ ते दृष्य बघतो नंतर तो ड्रॅगन वेल चे पाणी प्यायला जातो. ते पाणी पिल्यावर तो आपल्या गुरु ला त्या मुलीबद्दल विचारतो. ती मुलगी त्या सापाची नक्कल का करीत होती? त्याचा गुरु त्याला सांगतो, बेटा तू काळजीपूर्वक बघितले नाहीस, तो साप त्या मुलीची नक्कल करीत होता. त्या मुलाला धक्काच बसतो. हे काय? त्याला कळत नाही. आपल्या वाक्याचा अर्थ समजाविण्याकरीता तो त्याला त्या ड्रॅगन वेल मधे बघायला लावतो आणि त्याला विचारतो की तुला काय दिसतंय? मुलगा उत्तरतो, माझे प्रतिबंब. मग तो पाण्याला हलवतो आणि विचारतो, आता काय झाले? मुलगा उत्तरतो, आता माझे प्रतिबिंब अंधुक झाले. गुरु समजावतो, पाणी जर शांत असेल तर प्रतिबिंब आरश्याप्रमाणे स्वच्छ दिसते आणि ते जर शांत नसेल तर ते अंधुक होते. ती सापासमोरची बाई शांत आहे, या पाण्यासारखी बुद्धीने मनाने देखील. ती शांत असल्याने साप आरश्याप्रमाणे तिची नक्कल करतोय. मुलगा परत विचारतो, तुमच्या मते ती बाई काहीही करता त्या सापाच्या हालचालींवर ताबा मिळवतेय? मुलाच्या या अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर त्याचा गुरु तेवढ्याच महत्वाच्या वाक्याने देतो. माणसाला आपले जीवन जगत असताना अतिशय कामात पडणारे ते वाक्य आहे. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून ती बाब अतिशय महत्वाची आहे. अस्वस्थ मनाच्या बरेचवेळा अव्यक्त राहीलेल्या संभ्रमाबद्दल समाधान देणारे ते वाक्य आहे. कारण हा मनातील संभ्रम अनेक वेळा कार्यशक्ती कदाचित कमी करीत नाही परंतू कार्यामधील कलात्मकता आणि कार्याची सुयोग्य उपयोगीता मात्र संपवितो.

धावणे हा माणसाच्या जीवनाचा आधुनिक काळातला मंत्र बनलाय. विशेषतः उमेदीच्या काळात जेव्हा त्याला स्वतःला स्थापित करायचे असते तेव्हा तो केवळ धावत राहतो. नवनवीन आव्हाने स्विकारतो, ती पूर्ण करण्याकरीता पुन्हा धावतो. या धावण्यामुळे एक प्रकारची खळबळ कायम त्याच्या जीवनात असते. या धापण्यामुळे कायम काहीना काही करीत राहील्यामुळे त्याला बरेच वेळा अपेक्षेप्रमाणे फळ मिळतेही, त्याच्या लौकीकामधे भर देखील पडते. परंतू हे सारे करताना पळण्याची त्याला एवढी सवय होऊन जाते की सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात पण एक महत्वाची गोष्ट त्याच्या जीवनातून हरवायला लागते, ती म्हणजे शांतता. शांत राहणे त्याला पसंतच नसते. अत्यंत उद्यमशील असणे ही त्याची ओळख बनलेली असेत. ही तशी चांगली बाब आहे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत उद्यमशील राहून कार्य करणे हाच त्याच्या जीवनाचा ध्यास असतो. परंतू ही सारी कामे कलात्मकतेने आणि उच्च दर्जाची करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या शांततेची गरज असते ती मात्र बरेच वेळा अनेकांना सापडत नाही. कामे करीत असताना जर त्याचा संबंध थेट पैश्याशी जोडलेला असेल तर मग परीस्थिती आणखीच बिकट होते. जेवढा जास्त काम तेवढा जास्त पैसा या सूत्रानुसार तर मग तो थांबतच नाही. तो भरमसाठ मिळणारा पैसा त्याला थांबूच देत नाही. उद्यमशील असणे आणि केवळ धावत राहणे यामधे फरक आहे. याच पद्धतीचे वाक्य त्या मुलाच्या गुरुने त्या मुलाला सांगितले असते. परंतू ते अनेकांच्या लक्षात येऊनही ते अनुसरणे कठीण असते. कारण धावण्यामधून मिळणाऱ्या भौतिक फायद्यांची मनाला चटक लागली की मग त्याला थांबता येत नाही. शांत बसलेल्या लोकांकडे पाहून आपल्याही मनात तोच प्रश्न येतो जो त्या सापासमोर विशिष्ट मुद्रेमधे असलेल्या बाईला बघून त्या लहान मुलांच्या मनात आला होता. त्याच्या गुरुने त्याला सांगितले होते, बेटा, शांत राहणे काहीही करणे या दोन स्वतंत्र आणि वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

या एका छोट्याश्या वाक्यामधे केवढा मोठा जीवनसार सामावलेला राहू शकतो. बरेच वेळा शांत असलेल्या मंडळींकडे बघून ते अकार्यक्षम आहेत असा ग्रह केला जातो. विशेषतः आपल्या या धावपळीने भरलेल्या जगात जेथे आपले व्यवहार जवळपास यंत्रवत सुरु असतात त्या जगात शांत बसलेला व्यक्ती हा रिकामा असे संबोधिले जाते. परंतू म्हणूनच त्या मुलाचा गुरु त्याच्या शिष्याला शांततेची ताकद समजावतोय. शांतता ही शब्दांपेक्षाही जास्त ताकदवान असेत. केवळ त्या शांततेच्या मागे सुरु असलेले चिंतन कळल्यामुळे शांततेला अनुपयोगी संबोधिले जाते. .पु. काळेंनी त्यांच्या एका पुस्तकात लिहीलेय, शब्दांची मर्यादा ज्या अंतरावर संपते तेथून मौनाचा प्रभाव सुरु होतो. म्हणूनच शांतता ही सर्वतोपरी उपयोगी असते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे या शांततेच्या क्षणी आपण साधू शकणारा आपला आत्मिक संवाद.

धावपळीच्या जीवनाचा जर विचार केला ना तर हा आत्मिक संवाद खरे तर सध्या अत्यावश्यक झालेला आहे. मनाची आणि बुद्धीचीही शांतता ही चिंतनाचा भाग असते. त्या चिंतनातून पारदर्शी व्यक्तित्व तयार होते जे त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्याला आपलेसे करण्याची क्षमता निर्माण करते. याच प्रकाराला आजकाल मेडीटेशन असे म्हणतात. परंतू बरेच वेळा या मेडीटेशनमुळे होणाऱ्या व्यक्तित्व बदलापेक्षा ते केले जाण्याचाच बाऊ जास्त केला जातो. तासन तास मेडीटेशन करणारी मंडळी सामाजिक दृष्टीने वागताना अत्यंत आक्रस्ताळेपणाने, लोकांना कायम कमी लेखत किंवा बेधुंद वागताना दिसतात तेव्हा मात्र त्यांचे मेडीटेशन चुकतेय असे म्हणावे लागते. मुळात शांत राहून जेव्हा पारदर्शी व्यक्तित्व निर्माण होण्याची प्रक्रीया सुरु असते तेव्हा त्यामधे बेधुंदपणाला, उत्श्रुंखलतेला, आक्रस्ताळेपणाला स्थान नसते. कारण त्या शांततेच्या स्थितीमधे निर्माण होणाऱ्या आत्मसंवादातून आपल्याला आपली खरी ओळख होत असते. आपल्या व्यक्तित्वातील बलस्थाने कोणती त्याचा शोध लागत असतो. सोबतच आपल्यामधील कमतरतांचाही विचार मनामधे अत्यंत स्पष्टपणे येतो. अशी आत्मपरीक्षणाची संधी लाभल्यावर ती शांत स्थिती आपल्याला बरेच काही करायला लावते. लौकिकार्थाने आपण शांत बसलेले असतो परंतू आपण आपल्या बलस्थानांना आणखी बळकट करण्याचा आपल्यातील कमतरता विचारपूर्वक दूर करण्याचा संकल्प करीत असतो. अश्या विचारी आणि कार्यमग्न शांततेनंतर आपले व्यक्तित्व पारदर्शी अनुकरणीय बनते. आपल्याला दिशा दर्शन करणाऱ्या थोरा मोठ्याच्या जीवनाचे सूक्ष्म अवलोकन केले असता त्यांच्या जीवनाला श्रेष्ठ बनविण्यामधे या कार्यमग्न शांततेचा मोठा सहभाग आहे. म्हणूनच लक्षात घ्यायला हवे की शांत राहणे आणि काहीही करणे या दोन संपूर्णपणे वेगळ्या बाबी आहेत.





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18