थोडा है थोडे की जरुरत है @ 08.10.19
हसरे दुःख
(आजचा लेख म्हणजे, माझ्या थोडा है च्या वाचकांकरीता, माझी मुलगी अनन्या हिने नुकत्याच लिहिलेल्या तिच्या मन कस्तुरी रे या इंग्रजी भाषेतील ब्लाॅगमधील एका भागाचा स्वैर भावानुवाद होय.)
केवळ पाचच मिनीटे उरली होती. माझ्या एन्ट्रीची वेळ झाली होती. मी तोंडाला मेकअप लावून तयार होतो. बाहेर हजारो लोक माझी वाट बघत होते. जीवनातील विविध विवंचनांनी त्रासलेले, अडचणींचा सामना करुन थकलेले, आणि या सर्व रोजच्या कामातून काही वेळ काढून आपल्या परीवारासोबत मनमुराद हसण्यासाठी आलेले हे लोक, माझीच वाट बघत होते. मला त्यांच्याकरीता आज पुन्हा एकदा मनापासून सर्व वाकड्यातिकड्या गोष्टी करायच्या होत्या. वेगवेगळे अंगविक्षेप करुन, तोंडाचे वेगवेगळे प्रकार करुन, उगाचच धडपडून, वाटेल तसे नाचून मला माझ्या अंगावरच्या पोषाखासह आणि विशेषतः चेहेऱ्यावर लावलेल्या मेकअपच्या आणि माझ्या नाकावरच्या त्या बाॅलच्या आधारे मला त्यांना हसवायचे होते. मी देखील तयार झालो होतो. मेकअपच शेवटचा थर लावतच होतो की माझ्या फोनची बेल वाजली. हा फोन येऊ नये असे मला वाटत असतानाही तो आलाच. माझ्यापासून लांब असलेल्या टेबलवर माझा फोन घणघणत होता. अचानक मनात धस्स झाले कारण ती खास रींगटोन मला घरुन फोन असल्याबाबत सूचित करीत होती. अचानक दरदरुन घाम फुटला. फोनपर्यंत जाण्याचे ते दहा फुटाचे अंतरही मला कितीतरी योजने दूर असल्यागत वाटत होते. माझ्या कपाळावरील घामामुळे माझा मेकअप खराब झाला. थरथरत्या हाताने मी फोन घेतला आणि तिकडून मला एक वाक्य ऐकू आले आणि क्षणार्धात माझ्या पायातील सर्व शक्ती निघून गेली असे मला वाटले. डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. ज्या उत्साहाने मी स्टेजवर एन्ट्री घेण्यासाठी तयार झालो तो कुठल्या कुठे निघून गेला आणि मी खालीच बसलो. मला काय करावे सुचेना. सारे जग जणू थांबून गेले असे मला वाटू लागले. मी तेथे होतो पण संपलो होतो, माझा श्वास सुरु होता पण आनंद संपला होता, मी जिवंत होतो परंतू माझी चेतना संपली होती. तेवढ्यात शो मॅनेजर मेकअप रुमच्या बाहेरुनच ओरडला, जोकर, रेडी हो जाओ, दो मिनीट.
होय मी जोकर होतो आणि जे हजारो लोक माझ्यामुळे हसणार होते ते सारे माझी वाट बघत होते. काय करावे सुचत नव्हते. मला तर माझे जग जळून राख झाल्यासारखे वाटत होते. आता उठायचे कसे? पण मला क्षणात मला माझ्या गाॅडफादरची आठवण झाली. ज्याने मला या सर्कसमधे नोकरी दिली व ज्याने मला जोकर बनविले होते तो म्हणाला होता, तुझे काम जरी मजेशीर किंवा टिवल्याबावल्या करणारे आहे, पण या सर्कशीतले सर्वात महत्वाचे आहे. या सर्कशीतील प्रत्येक प्रकार हा वेगवेगळ्या भावना लोकांच्या मनात निर्माण करणारा आहे, कधी आश्चर्य, कधी भिती, तर कधी जिवाचा थरकाप उडविणारा आहे परंतू येथे हास्य निर्माण करणारा तूच एकमेव राहणार आहेस. लोकांना त्यांच्या जीवनातील समस्या विसरायला लावून त्यांना मनमुराद आनंद घ्यायला तूच भाग पाडणार आहेस व त्यामुळे लक्षात ठेव, काहीही झाले तरी, शो मस्ट गो ऑन. जसे ते वाक्य आठवले, मी उठलो. वास्तविक जगतातील लोक माझी वाट बघत होते. घामामुळे व अश्रुंमुळे माझा मेक अप पार बिघडला होता. बाहेरुन मॅनेजर ओरडला, लास्ट वन मिनीट टू गो.. पटापट मेक अप चढवला. चेहेऱ्यावर सगळे टच अप पुन्हा केले. नाकावर तो लाल रंगाचा बाॅल लावला, आणि पडद्याच्या मागे उभा राहीलो. माझ्या एन्ट्रीचा काऊंट डाऊन सुरु झाला. मनातून मी पार तुटून गेलो होतो. माझे ह्रदय तर अक्षरशः भळाभळा जखम वाहिल्यागत विदीर्ण झाले होते. सारे अश्रू मी महत्प्रयासाने थांबवून ठेवले होते. ६, ५, ४ अंक मोजले जात होते, २ आल्यावर मी माझ्या चेहेऱ्यावरचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे खुललेले हसू अक्षरशः जबरदस्तीने लावले आणि गो ऐकल्याबरोबर बाजूला झालेल्या पडद्यामधून प्रवेश करुन लाईट्स च्या प्रकाशाने झळाळून निघालेल्या स्टेजवर उड्या मारत मारत जाऊन पोहोचलो, एक मोठ्ठे स्माईल देत!
स्टेजवर पोहोचल्यावर माझी धमाल सुरु झाली. लोक नेहेमीप्रमाणे माझी वाट बघत होते. मी नाचणे सुरु केले, प्रेक्षकातील मुलांना चिडवू लागलो, बॅट घेऊन माझ्या सहकारी जोकर्सच्या मागे धावू लागलो. दोराच्या पायऱ्यांवरुन चढलो, माझा पायजामा लटकलेल्या माणसाच्या हातात देऊन झुल्यावरुन पडलो, रडण्याची नक्कल केली, नक्कल? नाही मी तर खरोखरीच रडत होतो आणि लोक माझ्या रडण्यावरही पोट धरुन हसत होते. मी फुगे उडवू लागलो, मोठे मोठे चेंडू देखील खेळू लागलो, छोट्या सायकली चालविल्या, एका चाकाची सायकल चालविली. त्यावरुन पडण्याचे ठरले नव्हते तरी पडलो व पुन्हा एकदा रडून घेतले. साधारण अर्धातास धमाल केल्यावर आणि जवळपास पूर्णवेळ चेहेऱ्यावर ते खोटे हसू लावून लोकांना मनसोक्त हसवून मी जसा आत गेलो तसा त्याच कपड्यानीशी व मेकअप सह घराकडे धावलो. कसा बसा धडपडत घरी पोहोचलो. आणि समोर तेच बघितले जे मला बघायचे नव्हते.
आज घरी आलो तर तिचा दंगा नव्हता, डॅडा डॅडा म्हणून मला घाबरविण्यासाठी ती लपली नव्हती, मला कडेवर घ्या म्हणून माझ्याकडे झेपावली नव्हती, मला घट्ट मिठी मारुन गोड गोड पप्पी दिली नव्हती, बाबांसारखे हवेत उंच उडी मारुन एका पायावर गिरकी घेऊन पडण्याची नक्कल करत नव्हती आणि सोबतच मी पण जोकरच होणार हा घोषा तिने लावला नव्हता. आज हे असे का डॅडा? अशी प्रश्नांची सरबत्ती नव्हती, आईने मला माझ्या आवडीचे चाॅकलेट दिले नाही अशी गोड तक्रार नव्हती, मला तुमच्यासारखा रंगीबेरंगी ड्रेस हवाय म्हणून आग्रह नव्हता किंवा आज मी डॅडाच्या हातूनच जेवण करणार अशी घोषणा नव्हती. आई रागवेल म्हणून तिने उरलेला टिफीन लपविला नव्हता, उद्याचा होमवर्क करायला मला मदत कर अशी आईच्या मागे भूणभूण लावली नव्हती. ती आज शांत झोपली होती आणि त्या क्षणी मी लोकांना खळखळून हसविणारा व सर्वांचा आवडता जोकर न राहता एक असहाय डॅडा बनून कसातरी माझ्या लडखडणाऱ्या पायांवर उभा होतो. घामाने आणि अश्रुंनी माझा मेक अप उतरला होता व माझा मुखवटा गळून पडला.
आपण सारेच खरे तर या जोकरसारखेच असतो नाही का? मुखवटे आणि चेहेऱ्यावर लावलेले हसू या दोन साथीदारांसह आपण जगात वावरत असतो. आपल्या मनातील वेदनादायी सत्ये आपण त्या मुखवट्याखाली लिलया दडवलेली असतात. रंगवलेल्या मुखवट्याखाली आपण मनाला दंश करणाऱ्या अनेक बाबी लपविलेल्या असतात. वेदना, दुःख किंवा अंतस्थ विरोधाने झालेल्या चेहेऱ्यावरील जखमा आपण खोट्या हास्याने किंवा मेक अप ने रंगवून टाकलेल्या असतात. पण मनात असलेल्या वेदनांचा सल मात्र कायम राहतो. त्याचे काय करावे? काही करायला वेळच नाही कारण पुन्हा पाचच मिनीटात नवा शो सुरु होतोय आणि त्याकरीता आपल्याला परत ते मेक अप आणि ते मोठ्ठे हसू चेहेऱ्यावर लावून तयार व्हावे लागेल कारण, शो मस्ट गो ऑन!! (ब्लाॅग: मन कस्तुरी रे! लेखिका: अनन्या मोहरील स्वैर भावानुवाद: डाॅ. अविनाश मोहरील)
Comments
Post a Comment